शनिवार, १९ नोव्हेंबर, २०१६

सूर्यनारायण राव


जगरहाटीप्रमाणे सूर्यनारायण राव गेलेत. सुदीर्घ आणि कृतार्थ जीवन जगून गेलेत.
तीन-चार वर्षांपूर्वी विजयादशमीला जोडून रा. स्व. संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांचे एक शिबिर नागपूरला झाले होते. जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचलेले देशभरातील सुमारे शंभरेक प्रचारक त्याला आले होते. त्यातील सगळ्यांनीच पाच दशकांहून अधिक काळ संघाचे प्रचारक म्हणून कार्य केले होते. काहींनी तर सहा-सात दशके सुद्धा. त्यावेळी नागपूरच्या विश्व संवाद केंद्राने त्या सगळ्या प्रचारकांच्या मुलाखती घेण्याचा एक उपक्रम केला होता. या निमित्ताने या व्रतस्थ जीवनांना बोलके करणे, त्यांचं जीवन आणि रा. स्व. संघाची वाटचाल यांची प्रेरक माहिती गोळा करणे हा त्याचा हेतू. माझ्याकडे त्यातील तीन नावे आली होती. त्यातील एक होते- सूर्यनारायण राव. त्यापूर्वी त्यांना पाहिले होते. भेटणे, बोलणेही झाले होते. पण ते प्रतिनिधी सभेतील व्यवस्था म्हणून, कधी बौद्धिक वर्गाच्या वा अन्य कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा एखाद्या वेळी एखादा प्रश्न विचारण्यापुरते. मुलाखतीच्या निमित्ताने मात्र त्यांना जवळून पाहता आले, समजून, जाणून घेता आले.
रेशीमबागेतील यादव भवनाच्या तळमजल्यावरील त्यांच्या खोलीत मी पोहोचलो तेव्हा दुसरे एक ज्येष्ठ प्रचारक रंगा हरीजी तिथे बसले होते आणि त्यांची चर्चा सुरु होती. सूर्यनारायण राव संघाचे पहिले अखिल भारतीय सेवाप्रमुख राहिले होते, तर रंगा हरीजी संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख राहिलेले. दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समग्र साहित्याचे जे १२ खंड गुरुजी जन्मशताब्दी निमित्त प्रकाशित झाले त्याचे संपादन देखील रंगा हरीजी यांनीच केले होते. दोघेही अतिशय ज्येष्ठ, अत्यंत कर्तृत्वसंपन्न, प्रज्ञावान प्रचारक. तरीही मी तिथे पोहोचताच रंगा हरीजी लगेच उठून, नमस्कार करून तिथून गेलेत. मुलाखतीची वेळ ठरलेली होती, मुलाखत घेणारा आला होता; त्यामुळे चर्चा ताबडतोब बंद. अनुशासन आणि साधेपणा, सहजता यापेक्षा वेगळी आणि अधिक काय असू शकते? त्या दोघांपुढे मी कोणीच नव्हतो. थोडा वेळ थांबावे लागले असते तरीही काहीच हरकत नव्हती. पण मला थांबावे लागले असते तर त्याने संघ आणि त्या दोन ज्येष्ठ प्रचारकांच्या महानतेला किंचित धक्का लागला असता ना !!
माझे स्वागत करून मराठीत म्हणाले- बसा. अन मला प्रश्न केला - which language? मी हसत म्हणालो- as you wish. but of course not tamil. त्यावर तेही दिलखुलास हसले. अन म्हणाले- ok. we will start and will proceed naturally आणि इंग्रजी व हिंदीत ही मुलाखत पार पडली. अधून मधून एखादा शब्द वा छोटेसे वाक्य मराठीतही. बोलणे सुरु करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या सहायकाला आवाज दिला. मी म्हटले, काही हवे आहे का? मी देतो. सांगा. ते नाही म्हणाले. सहायक आल्यावर म्हणाले- दोन पेले पाणी भरून इथे ठेव. सहायकाने पाणी ठेवल्यावर गप्पा सुरु झाल्या आणि सुमारे नऊ दशकांचा जीवनपट आणि संघाचा इतिहास उलगडू लागला. धिप्पाड शरीरयष्टीचे सूर्यनारायण राव थोडे थकले होते, पाय कामातून गेल्याने उठबस नव्हती, वॉकरशिवाय पान हलत नव्हते; पण आवाज आणि स्मृती मात्र खणखणीत होती. बोलण्याच्या ओघात सव्वा तास कसा गेला कळलेच नाही. बोलणे मात्र पूर्ण झालेच नव्हते. कारण त्यांच्याकडे सांगायला खूप होते आणि मला ऐकण्यासारखे खूप होते. मग तेच म्हणाले- तुम्ही परवा या. उद्या तर विजयादशमी. उत्सव आणि सणाचा दिवस. परवा संध्याकाळी समारोप आहे. तुम्ही दुपारी या. मला मिळालेला हा आनंददायी बोनस होता.
ठरल्याप्रमाणे गेलो. सूर्यनारायण राव तयारच होते. मी विचारले- कालचा दसरा उत्सव कसा वाटला? प्रसन्न होऊन म्हणाले- खूप छान. उत्सव छान झाला. संख्याही भरपूर होती. मी पहिल्यांदाच नागपूरचा दसरा उत्सव पाहिला, त्यात सहभागी झालो. कधी योग आला नव्हता. पुन्हा तास- सव्वा तास बोलणे झाले. त्यांनी एक छान आठवण सांगितली. गोळवलकर गुरुजी तामिळनाडू प्रवासात होते. ते सुर्यनारायण राव यांच्या घरी गेले. त्यांच्या पद्धतीप्रमाणे गुरुजींनी सगळी चौकशी केली. तेव्हा लक्षात आले की, त्या कुटुंबात एक चिंता आहे. सूर्यनारायण राव यांची बहीण आणि नंतर राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय मंडळात राहिलेल्या रुक्मिणी अक्का यांना नागपूरला शिकायला जायचे होते आणि नागपूरला तर त्यांचे कोणीच नव्हते. गुरुजी लगेच म्हणाले- गोळवलकरांचे घर तुमचे नाही का? आणि रुक्मिणी अक्का पुढील व्यवस्था होईपर्यंत गुरुजींच्या घरी राहिल्या. बोलणे संपवून निरोप घेऊन मी उठलो. निघण्यापूर्वी त्यांना नमस्कार केला आणि दाराकडे वळलो त्यावेळी ते म्हणाले- माफ करा हं. तुम्हाला निरोप द्यायला मी दारापर्यंत येऊ शकत नाही. यावर मी काय बोलणार? एक आवंढा गिळला आणि बाहेर पडलो.
सूर्यनारायण राव १९४६ साली प्रचारक निघाले. महात्मा गांधीजींची हत्या झाली त्यावेळी गुरुजी मद्रासला प्रतिष्ठित नागरिकांच्या कार्यक्रमात होते. सूर्यनारायण राव त्यावेळी तिथे गुरुजींसोबत होते. नंतरच्या घटनाक्रमात त्यांना अटक झाली होती. कारागृहात असताना त्यांनी संपूर्ण विवेकानंद साहित्य अनेकदा वाचून काढले होते. ते त्यांना अक्षरशः पाठ होते. पृष्ठ क्रमांकासह. त्यानंतर अनेक वर्षांनी विवेकानंदांचे ते संपूर्ण साहित्य मद्रास कारागृहाच्या ग्रंथालयाला देण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी सूर्यनारायण राव यांना खास आमंत्रित करण्यात आले होते. स्वामीजींच्या शिकागो भाषणाच्या शताब्दीनिमित्त नागपूरला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा एक कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमात त्यांनी दिलेले संदर्भ ऐकून सगळेच अवाक् झाले होते. प्राचार्य राम शेवाळकर त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. ते तर अक्षरशः भारावून गेले होते. तोवर शेवाळकर संघ वा संघ परिवाराचे विरोधक नसले तरीही फार जवळ सुद्धा नव्हते. परंतु त्या भाषणाने त्यांना अधिक जवळ आणले होते.
दक्षिण भारतात, विशेषत: तामिळनाडूत संघाचे काम रोवण्यात सूर्यनारायण राव यांचे फार मोठे योगदान आहे. तामिळनाडूत ४० च्या दशकातच काम सुरु झाले होते तरीही ते रुजले नव्हते. अन्य प्रांतांच्या तुलनेत तामिळनाडू प्रांत संघाच्या कामात एकदम पिछाडीवर होता. कुख्यात आणीबाणीनंतर तेथील कामाने वेग घेतला. त्यासाठी एक घटना सांगता येईल. संघाच्या इतिहासात प्रथमच आणीबाणीनंतर सरसंघचालकांचे विजयादशमीचे भाषण आधी तयार करून देशभर एकाच वेळी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार ते भाषण `तुघलक'चे संपादक चो रामस्वामी यांच्याकडेही पोहोचवण्यात आले. त्यावर चो रामस्वामी यांचे म्हणणे पडले की, भाषण ठीक आहे. मात्र संघावर अनेक आरोप होत असतात, आक्षेप घेतले जातात त्यांना कोणी अधिकाऱ्याने सविस्तर उत्तरे दिली पाहिजेत. त्यानुसार त्यांनी आपल्या संपादक विभागातील सहकाऱ्यांना अनेक वृत्तपत्रे, नियतकालिके यातील संघविषयक बातम्या व लेखांचे अध्ययन करून चार पानांची एक प्रश्नावली तयार केली आणि सहकाऱ्यांना त्या प्रश्नावलीसह मद्रासच्या संघ कार्यालयात पाठवले. तेथे सूर्यनारायण राव यांनी त्या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. हा सगळा मजकूर सुमारे ५१ पानांचा झाला. चो रामस्वामी यांनी त्याचे संपादन करून ती उत्तरे विस्तारपूर्वक `तुघलक'मध्ये छापली. परिणामी संघाचे काम सुरु करा, अशी मागणी करणारी ६०० पत्रे २० दिवसात संघाच्या मद्रास कार्यालयात आलीत. येथून संघाच्या कामाने तामिळनाडूत उचल घेतली.
महाराष्ट्राचे एक माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांचे काका स्वामी चिद्भवानंद यांचे अनेक आश्रम आणि मठ तामिळनाडूत आहेत. ते संघाचे कट्टर विरोधक होते. मात्र सूर्यनारायण राव यांनी एका कार्यक्रमासाठी त्यांना बोलावले. त्यांनी स्पष्ट नकार दिला. सूर्यनारायण राव मात्र त्यांच्या मागेच लागले. स्वामी चिद्भवानंद त्यांना म्हणाले- मी एका अटीवर येईन. मी वेळेचा आणि शिस्तीचा अतिशय भोक्ता आहे. तुमचा कार्यक्रम शिस्तशीर आणि वक्तशीर होणार असेल तरच मी येतो. सूर्यनारायण राव हो म्हणाले. स्वामीजी कार्यक्रमाला आलेत आणि तेथील शिस्तशीरपणा आणि वक्तशीरपणा यांनी इतके प्रभावित झाले की, तेथेच त्यांनी जाहीर केले की, राज्यभरातील त्यांचे मठ आणि आश्रम संघासाठी सदैव खुले राहतील. सूर्यनारायण राव यांनी तामिळनाडूत संघकार्यासाठी एक भक्कम आधार त्यांच्या रूपाने उभा केला होता.
रेशीमबागेत माझ्याशी झालेल्या बोलण्यात त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले- ९० च्या दशकात संघ म्हातारा झाला अशी एक चर्चा संघात आणि संघाबाहेरही सुरु झाली होती. आम्हा कार्यकर्ता मंडळींच्या मनातही पुढील वाटचालीचा गंभीर विचार सुरूच होता. अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते वृद्ध होत होते. तेव्हा सरसंघचालक रज्जुभैय्या यांच्याशी हा विषय बोलावा असे ठरले. त्यावेळच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी विचारविनिमय केला आणि रज्जुभैय्यांना याबद्दल पत्र लिहिण्याचे ठरले. ते काम सूर्यनारायण राव यांच्यावर सोपवण्यात आले. त्यानुसार त्यांनी सगळ्यांच्या वतीने सरसंघचालकांना एक पत्र लिहून ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी पदावरून दूर व्हावे आणि तरुण कार्यकर्त्यांकडे जबाबदारी सोपवावी असा विषय मांडला. स्व. रज्जुभैय्या यांनी याला संमती दिली आणि आपणही वृद्ध झालो असल्याने आपणही निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतरचा इतिहास सगळ्यांना परिचित आहे.
सूर्यनारायण राव यांच्या रूपाने संघाच्या महत्वाच्या सात दशकांच्या इतिहासाचा साक्षीदार आणि संघाचा इतिहास घडवणारा एक शिल्पकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांना विनम्र श्रद्धांजली.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १९ नोव्हेंबर २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा