सोमवार, २६ मार्च, २०१८

खारुताई...

खारुताई... तू काल व्यक्त केलेल्या भावना पोहोचल्या. छान वाटलं गं. असं मनमोकळं बोललं की छान वाटतं. माणसाला काय अन देवाला काय. अन तुला म्हणून सांगतो- माणसं मोकळ्या मनाने न बोलता लपवाछपवी करतात ना आपसात, तशीच ती लपवाछपवी करतात देवांशीही. जाऊ दे. कोणी कसं वागावं हे काय कोणाच्या हाती असतं होय? ते अगदी देवांच्याही हाती नसतं बघ. तुला गंमत वाटेल माझं म्हणणं वाचून, पण असतं मात्र तसंच. आता हेच बघ ना- काल तू म्हणालीस, `माझं खारपण अक्षय राहो'. चांगलं अन योग्यच आहे गं तुझं मागणं. हळवं सुद्धा. अन प्रेरक सुद्धा म्हणता येईल. पण मी जर असं मागणं मागितलं की बाबा- `माझं रामपण अक्षय राहो'; तर सगळ्यांना नाही गं आवडणार ते. लोक म्हणतील- आला मोठा राम. लागून गेला मोठा. देव झाला म्हणून काय झालं? मोठेपणा चढला याच्या डोक्यात, असं म्हणतील. अन मला हे देवपण टाकून देऊन खार व्हावंसं वाटलं तर? ऐकणार आहे का कुणी माझं? बरं दुसरंही आहेच ना... १०० योजने जाऊ शकणारा हनुमंतही लागतोच ना गं... शिवाय कोणी सुषेण, कोणी रागे भरणारा पण पाठ राखणारा लक्ष्मण, नल नील जांबुवंत अंगद हेही हवेतच ना? नुसत्या वाळूने बांधता आला असता का समुद्रावर पूल... आणि सांगू का हवा असतो रावणही- माझं रामपण, अन तुझं खारपण सिद्ध व्हायला. हे काहीच नसतं आपल्या हाती... ना तुझ्या ना माझ्या... आपण फक्त एवढंच करायचं- चालत राहायचं... मनातून काढून टाकायचं लहानमोठेपण... सोडून द्यायचे हट्ट लहान वा मोठे होण्याचे किंवा कसलेही... कोणास ठाऊक- कालचक्राच्या फेऱ्यात कधीतरी; तू होशील राम आणि मी होईन खार... होईलच असेही नाही, नाहीच होणार असेही नाही... कोणाला ठाऊक? गणितं मांडण्याची खोड टाकून देण्याचा प्रयत्न, एवढंच ठेवलंय त्या नियतीने आपल्या हाती... हो, आपल्या हाती- तुझ्या नि माझ्याही... नियती म्हणजे पराभव नाही, नियती म्हणजे कर्मशून्यता नाही, नियती म्हणजे संपून जाणे नाही... प्रगल्भ ज्ञानाच्या अत्युच्च विनयशीलतेला मानवी हुंकाराने बहाल केलेला शब्दालंकार आहे `नियती'... म्हणून सोडून द्यावे स्वत:ला त्या अगम्य चिरंतन प्रवाहावर... ठेवू नये कुठलीच अभिलाषा `रामपणाची' किंवा `खारपणाची' किंवा याची वा त्याची... वाहत राहावे प्रवाहासोबत... अन अंतरी निर्माण होणाऱ्या प्रत्येक उर्मीनुसार कृती करताना फक्त म्हणत राहावे- तत्त्वमसी तत्त्वमसी तत्त्वमसी...
- श्रीपाद कोठे
सोमवार
२६ मार्च, २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा