शुक्रवार, ९ मार्च, २०१८

'अब तेरा दर्द नासुर नहीं रहेगा'


काल रात्री 'बेगम जान' पाहिला. जागतिक महिला दिनानिमित्त 'स्टार गोल्ड'ने दाखवला. भारत-पाक फाळणीच्या पार्श्वभूमीवर सीमेवरील बेगम जानच्या कोठ्याची ही कहाणी. दोन देशांना अलग करणारी Radcliff रेषा या कोठ्यातून जाते. तिथे निरीक्षण चौकी होणार असते. त्यासाठी ही जागा रिकामी करायला सांगण्यात येते. स्वाभाविकच बेगम जान, तिथल्या मुली, जानने तिथे आणलेली एक वृध्द स्त्री या सगळ्यांचा जागा सोडायला विरोध. त्यातून प्रशासनाशी निर्माण होणारा संघर्ष. या संघर्षासाठी केली जाणारी तयारी. त्या संघर्षात बेगम जान व अन्य मुलींना येणारे अपयश. अखेर गुंडांना हाताशी धरून जागा रिकामी करण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नात आगीच्या भक्ष्यस्थानी पडणारा कोठा. सरतेशेवटी पद्मिनीच्या कथेच्या निरुपणासोबत बेगम जान आणि तिच्या साथीदार महिलांनी त्याच जळत्या कोठ्यात दिलेली स्वतःची आहुती. साधारण चित्रपट हा असा.
सर्वसाधारणपणे आपण कथा पाहतो. त्यामुळे शरीरविक्री करणाऱ्या महिलांच्या एका कोठ्याची शोकांतिका, असाच अर्थ मनात उतरतो, उरतो. पण सामान्य कथेच्या पलीकडे जीवनदर्शन म्हणून जेव्हा कलाकृतीकडे पाहिले जाते तेव्हा त्याचे वेगवेगळे पदर, कोन दिसतात, जाणवतात. मला ते तसे जाणवले. म्हणूनच बेगम जानच्या जौहारासोबतच त्यांना वेळोवेळी मदत करणारे, देश स्वतंत्र झाला तेव्हा कोठ्यावर दिवाळी साजरी करणारे मास्टरजी आणि कोठ्याचे रक्षण करणारा, सगळ्या महिलांना बंदूक चालवायला शिकवणारा रखवालदार; या दोघांचे चित्रपटात फोकस न झालेले बलिदान देखील मनात घर करून जाते.
प्रत्यक्ष संघर्ष सुरू होण्यापूर्वी तयार केलेल्या पार्श्वभूमीतील एक प्रसंगही असाच जीवनदर्शन घडवणारा. एक मुलगी कोठ्यावर आणलेली. तिचा पहिलाच दिवस. पूर्ण शून्य झालेली ती मुलगी बेगमच्या खाटेजवळ बसलेली. दगड झालेल्या त्या मुलीला ती घेऊन जायला सांगते. अन चार पावले पुढे गेलेल्या तिला परत आणायला सांगते. परत आल्यावर तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत ती विचारते 'बहुत दर्द हो रहा क्या मेरे बच्चे?' अन ती समजावते आहे असं वाटत असतानाच बेगम एक सणसणीत तिच्या कानाखाली ठेवून देते. या प्रकाराने भांबावलेली ती मुलगी प्रचंड आक्रोश करते. तेव्हा बेगम तिला घेऊन जायला सांगते आणि म्हणते - 'अब तेरा दर्द नासुर नहीं रहेगा. अब तू जीएगी.' एक प्रचंड जीवनसत्य. वेदनेला आवाज मिळाला की जगण्याचा मार्ग प्रशस्त होतो. मुकी वेदना जीवन संपवून टाकते. म्हणूनच वेदनेला स्वर लाभलेली ती मुलगी अंतिम संघर्षाच्या वेळी तिच्या भावना व्यक्त करताना म्हणते - 'ये तो हमरा घर है. घर पे जितनी स्वतंत्रता नहीं थी उतनी यहां मिली.'
कोणासाठी कोठा हेच घर होऊन जातं तर कोणासाठी घर वा हे जगच कोठा होऊन जातं. आजच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सशर्त इच्छामरणावरील निकालात हेच तत्व मान्य करण्यात आले आहे. परिस्थिती कोणावरही येऊ शकते. परिस्थिती स्त्री, पुरुष, बालक, गरीब, श्रीमंत, अमुक तमुक भाषाभाषी, लहान मोठे असा कोणताही भेद करीत नाही. परिस्थितीची कारणेही खूप वेगवेगळी असू शकतात. अनेकदा कारणांचे आकलन होतेच असेही नाही. जीवन हे कोणासाठी अन कशामुळे स्वर्ग वा नरक होईल, घर वा कोठा होईल सांगता येत नाही. ज्योतिष विषयाचा थोडाफार व्यासंग ज्यांचा असेल त्यांना हे लवकर लक्षात येईल. ज्योतिषाचा जो भाव पक्ष आहे (बारा घरे, त्यांचे भाव, त्या घरांमध्ये असणारे ग्रह, त्यांचा अर्थ) तो या दृष्टीने लक्षणीय आहे. बाकी तर असो पण आई वडील आणि मुले यांचं नातं सुद्धा शत्रुत्व पूर्ण करण्यासाठी असू शकतं, इतक्या धीटपणे ज्योतिष शास्त्र जीवनाचं प्रतिपादन करतं. आपल्या मनावरची, बुद्धीवरची झापडं बाजूला करून निरपेक्ष जीवन समजून घेणं जीवनाला समृद्ध करीत असतं. चांगलं, वाईट वगैरे खूप सापेक्ष असतं. जीवनाचं सोलीव दर्शन महत्वाचं. बेगम जान मध्ये मला ते जाणवलं. म्हणूनच तो केवळ शरीरविक्री करणाऱ्या महिलांचा किंबहुना महिलांचा शोकार्त चित्रपट न वाटता जीवनदर्शन घडवणारा चित्रपट वाटला.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ९ मार्च २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा