सोमवार, १ जुलै, २०१९

विचार प्रक्रिया

राजकीय परिवर्तन हे वैचारिक परिवर्तन असतेच असे नाही. पश्चिम बंगालमध्ये सुमारे तीन दशके कम्युनिस्ट राजवट होती. तेथील जनतेने कम्युनिझम स्वीकारला का? उत्तर नाही असेच आहे. तीच गोष्ट उत्तर प्रदेशात समाजवादी वा बहुजन समाज पार्टी यांच्या सरकारांची. किंवा तामिळनाडूतील द्राविडियन पक्षांची. रशियात सुद्धा कम्युनिस्ट राज्य क्रांतीनंतर सात दशके सत्ता होती पण रशियन जनतेने तो विचार स्वीकारला होता असे म्हणता येईल का? अर्थात नाही. किंवा अमेरिकेत भांडवलशाही आहे म्हणजे तेथील जनतेने तो विचार मान्य केला असे म्हणता येईल का? भारताबाबतही आज हेच म्हणता येईल. सत्ता आणि विचारधारा हे अद्वैत नसते.
मग भारतीय जनतेने हिंदुत्व स्वीकारले नाही असा याचा अर्थ होतो का? अजिबात नाही. हिंदुत्व हाच भारताचा विचार आधीही होता, आजही आहे, उद्याही राहील. इस्लामिक राजवटीत भारताचा विचार हिंदुत्व होता, इंग्रजी आमदनीत तोच होता, काँग्रेस राजवटीत तोच होता आणि भाजपच्या राज्यातही तोच आहे. हे जरा विचित्र वाटेल परंतु वास्तव आहे. गडबड आमच्या विचार करण्याच्या पद्धतीत आहे.
प्रश्न हा आहे की, विचार ही अशी स्वीकार वा नकाराची बाब आहे का? विचार म्हणजे काय? विचार ही मानवी जीवनाला प्रगल्भ करणारी जीवमान प्रक्रिया आहे. ती बांधून ठेवता येत नाही. अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, युरोपीय पुनर्जागरण यांनी विचार आणि सत्ता यांना एक करण्याचा प्रयत्न केला. परंतु मुळातच विचार या गोष्टीचे स्वरूप वेगळे असल्याने विविध सत्तांनी कितीही दावे, प्रतिदावे केले तरीही हे ऐक्य साधणे कोणालाही शक्य होत नाही. या प्रयत्नांनीच तुमचा विचार, आमचा विचार अशी भावना निर्माण झाली. वास्तविक प्रत्येक विचारातच काही ना काही तथ्य असते. जीवनाचे कोणते ना कोणते सत्य, तथ्य त्यात असते. विशिष्ट दृष्टिकोन त्यात असतो. फापटपसाराही बराच असतो. मात्र त्याच्या मंथनातूनच काही ना काही हाती लागते ते मानवी जगण्याला प्रगल्भ करते. उलट हा आमचा विचार, हा तुमचा विचार ही भावना विचार म्हणून म्हटल्या जाणाऱ्या जीवमान प्रक्रियेलाच खीळ घालते.
भारताच्या संदर्भात बोलायचे तर आज हिंदुत्व म्हणून समजल्या जाणाऱ्या गोष्टींचे काही महत्व आहे की नाही? निश्चितच आहे पण ते विषय हिंदू समाजाचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विषय आहेत. ते लक्षात घ्यावे लागतीलच. परंतु ते विषय म्हणजे हिंदुत्वाचा विचार नाही. हिंदुत्वाचा विचार या विषयांशी बांधला तर त्याचे विचार म्हणून असलेले मानवी जीवनातील स्थान आणि आवाहन संपुष्टात येते. तो विचार म्हणून संपून जाऊन राजकीय धोरणांपुरता सीमित होतो. एकूण विचार या जीवमान प्रक्रियेलाच हे लागू होते. त्यामुळे सत्तेचे येणे जाणे आणि समाजाने विचार ग्रहण करणे या वेगळ्या बाबी ठरतात. सत्ता असणे वा नसणे हा विचारांच्या स्वीकार्यतेचा, योग्यतेचा मापदंड नसतो. सत्ता येते-जाते, निर्माण होते - नष्ट होते; विचार चिरंतन असतात. ते तसेच असायला हवेत.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १२ जून २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा