गुरुवार, ६ डिसेंबर, २०१८

टीवटीवाटी आगाऊपणाची चिकित्सा – ३


ज्याला भारत विविधता म्हणतो त्याला त्यांनी विषमता असे नाव दिले. हे जग कुणीतरी त्याच्या लहरीने तयार केले आणि त्यातील discrepancy दूर करणे हे आपले काम आहे असे ते मानतात. तर या विश्वात मूलभूत विविधता आहेत. प्रत्येक गोष्टीचे अंगभूत गुणधर्म आहेत, त्याची बलस्थाने आणि मर्यादा आहेत, माणूस या सगळ्यावर अधिराज्य गाजवायला जन्माला आलेला नाही; ही भारताची धारणा आहे. त्यामुळेच इच्छा, आकांक्षा, गरजा, भुका, मन, बुद्धी; या साऱ्याचा आणि त्यांच्या अखंडपणे चालणाऱ्या विभ्रमांचा सतत आढावा आणि व्यवस्थापन करावे लागते; असे भारत म्हणतो. अन्य लोकांना मात्र हे मान्य नाही. त्यांच्या मते मानवी मनात आलेली, बुद्धीला सुचलेली प्रत्येक गोष्ट साकार करणे, प्राप्त करणे हा केवळ अधिकारच नव्हे, तर जीवनमरणाचा प्रश्न असतो. भलेही नंतर त्यातील फोलपणा लक्षात येईल आणि त्यामुळे वैफल्य वाट्याला येईल. भारत नेमका याच्या वेगळा विचार करतो. त्यामुळे व्यक्तिगत गोष्टींना आळा घालण्यात काही गैर नाही असे त्याला वाटते. जगालाही आज तसे वाटू लागले आहे. नीतीमत्ता खुंटीला टांगून ठेवणारा आणि उपभोगवादाशी सांगड घातलेला इहवाद आज जगालाही चटके देऊ लागला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, सुख, शांति अशी जी स्वप्ने माणसाने बाळगली त्या साऱ्यांना या इहवादाने हरताळ फासला आहे. नुकतेच अमेरिकेतील black Friday sale चे काही व्हिडीओ पाहण्यात आले. त्यासाठी उडालेली झुंबड आणि तिथल्या अधिकाधिक वस्तू ताब्यात घेण्यासाठीचा हपापलेपणा आणि धावपळ तेथील एकूण आर्थिक आणि सामाजिक स्थितीची कल्पना देत होते. आर्थिक विषमता, शारीरिक-मानसिक रोग, जीवनाविषयीची निरर्थकता, हिंसा, भावनिक रिक्तता, भय, anxiety, तांत्रिकतेचा भस्मासूर अशा अनेक बाबींनी ग्रस्त होत जाणारी मानवजात आज भांबावल्यासारखी झाली आहे. तिचा जीवनप्रवाह कुंठीत झाल्यासारखा वाटतो आहे. विचार, प्रयत्न, धडपड यांचे डबके तयार झाले आहे. या डबक्यातून बाहेर पडण्यासाठी, जीवनाचा प्रवाह वाहता करण्यासाठी जी दृष्टी, बुद्धी, धाडस हवे त्याचा अभाव जाणवतो आहे. हा अभाव दूर करणे इहवादाला शक्य नाही हे कधीकधी, कुठेकुठे जाणवते पण ते मान्य करण्यात मानवी अहं आणि मानवी बुद्धीची दांभिकता आड येते. गेली पुष्कळ शतके जो विचार, जे तत्वज्ञान, ज्या धारणा, ज्या भावना उराशी बाळगले; ज्याचा उदोउदो केला; जे अभिनिवेशाने जगासमोर ठेवले; या साऱ्याचे मनबुद्धीवर जे संस्कार झाले; ते पुसून नवीन पर्व सुरु करणे तसेही कठीण असणारच.
भारताच्या संदर्भात मात्र स्थिती जरा वेगळी आहे. हजारो वर्षांच्या अनुभवाच्या, जीवनाच्या, विचारांच्या प्रभावाने भारताने या नीतीशून्य उपभोगवादी इहवादाला सहजासहजी स्वीकारलेले नाही. गेली अनेक दशके या दोहोत संघर्ष सुरु आहे. दुसरीकडे कालचक्राचा फेरा म्हणा किंवा या समाजाचे नाकर्तेपण म्हणा किंवा अन्य काहीही; पण या समाजाची ऐहिक वाताहत झाली होती. त्यामुळे एक संपन्न, सुखी, सर्वसमावेशी ऐहिक जीवन उभे करणे हेही भारताच्या प्राधान्यक्रमात आहे. चांगुलपणा आणि संपन्नता यांनी भारताबाहेरील विविध शक्तींनी भारताचे जे लचके तोडले, जी दुर्दशा केली; त्यातून उभे राहणे हेही आव्हान आहे. जुने तत्वज्ञान, जुने संस्कार, जुनी मूल्यव्यवस्था; ऐहिकतेची पूर्ती; अन जागतिक प्रवाहांचा मारा; या तीन अंगांनी भारतीय सामाजिक जीवन वर्तमानात आकार घेते आहे. या तिन्हींच्या समन्वयाचे, सामंजस्याचे अन संघर्षाचे स्वरही उमटत असतात. यातील इष्ट आणि अनिष्ट, सकस आणि हिणकस यांची निवड हे एक मोठे आव्हान आहे. `माझे – तुझे’ करून यातून मार्ग निघणार नाही. हेही ध्यानात घेतले पाहिजे की, आजच्यासारखेच जीवन कालचे वा परवाचे वा त्यापूर्वीचे नव्हते. अर्थ (पैसा), नाती, लैंगिकता, स्त्री, पुरुष, देश, विदेश, शिक्षण, आनंद, सुख, स्वास्थ्य; अशा असंख्य गोष्टींच्या कल्पना आज कल्पनातीत बदलल्या आहेत. त्या प्रत्येकाचे विश्लेषण करायचे तर एकेक जन्म लागेल, एवढा तो पसारा मोठा आहे. मात्र त्याच्या मुळाशी गेल्यास एक बाब स्फटिकाप्रमाणे स्पष्ट होते. ती म्हणजे – सत्ता आणि उपभोग ही वर्तमानाची मूल्ये आहेत आणि त्याग आणि समन्वय ही भारताची मूल्ये आहेत. सत्ता आणि उपभोग यांनीच इहवाद अतिशय आग्रही आणि असहिष्णू होतो; तर त्याग आणि समन्वय यामुळे भारतीय आध्यात्मिक विचार अनाग्रही आणि सहिष्णू ठरतो. अगदी छोट्या मोठ्या घटना, वाद, प्रसंग यातही हे दिसून येते. सत्ता आणि उपभोग यांच्या शीर्ष स्थानी असणाऱ्यांना ते स्थान टिकवून ठेवायचे आहे. त्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. त्यासाठी ज्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही अथवा ज्यांना ती मान्य नाहीत त्यांच्याही गळी ती उतरवण्याचे विविध प्रयत्न होत राहतात. मनोरंजन, विचार, साहित्य, जाहिराती अशा सगळ्या गोष्टींचा वापर करून सत्ता, संघर्ष, उपभोग, शोषण यांचे एक तत्वज्ञान तयार केले जाते. भारताचे तत्वज्ञान आणि समन्वयाच्या आधारे उभी असलेली कुटुंब व्यवस्था हे या शक्तींना अडथळे आहेत. त्यामुळे त्यावर आघात करणे, ते मोडीत काढणे, त्याबद्दल भ्रम उत्पन्न करणे, त्यासाठी खऱ्याखोट्याचा आधार घेणे; असे सगळे प्रकार होतात. ब्राम्हण या शब्दावर आघात हा वास्तविक भारतीय तत्वज्ञानावर आघात असतो. स्त्रियांना स्वतंत्र आणि सबल करणे याचा अर्थ, कुटुंब व्यवस्था मोडीत काढणे हा असतो. या दोन्हीवर आघात म्हणजे भारतीय मूल्यांवर आघात असतो. हे चक्र आता मागे फिरवणे शक्य नाही. यातूनच मार्ग काढणे आवश्यक आहे.
महिलांचा विचार करायला हवा, ही काही आता मोठी गोष्ट राहिलेली नाही. ते समाजाने मान्य केलेले आहे. तसा तो व्हायलाही लागला आहे. अगदी स्वामी विवेकानंद, भगिनी निवेदिता, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, मावशी केळकर आणि अशा अनेकांनी यावर स्पष्ट भूमिका घेतलेली आहे आणि प्रयत्नही केले आहेत. मात्र यांच्या भूमिका, त्यांची दृष्टी आणि आजचा यासंबंधातील विचारप्रवाह यातील फरक आणि अंतर समजून घेणे महत्वाचे ठरते. मानवी विकासाची भारतीय कल्पना आणि त्यासाठी आवश्यक अवकाश, बळ स्त्रियांना प्राप्त व्हावे हा त्यांचा आशय होता. आज मात्र सगळ्यांशी फटकून राहणारी, पुरुषनिरपेक्ष, भोगैक सर्वस्व मानणारी, अर्थप्रधान विचार करणारी, सत्तावादी स्त्री हाच आदर्श मांडला जातो आहे की काय अशी स्थिती आहे. दुर्दैव म्हणजे, वर ज्या महापुरुषांचा उल्लेख केलेला आहे त्यांच्याशी नाते सांगणारे स्त्री-पुरुषही यात जाणता अजाणता हातभार लावत असतात. एक अनुभव सांगितल्याशिवाय राहवत नाही. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नीचे अमिताभ बच्चन यांच्यासोबत नृत्यमुद्रेतील छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. मी ज्यावेळी त्यावर नाराजी व्यक्त केली त्यावेळी एक हिंदुत्वनिष्ठ कलाकार महिला मला म्हणाली – `त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? आपल्याला gorgeous महिला पाहण्याची सवय नाही.’ मी विषय थांबवला. परंतु विचारांचं, भावनांचं, दृष्टीचं penetration किती आहे यासाठी फक्त हे उदाहरण.
चारपाच दिवसांपूर्वी एकाने मला बीबीसी मराठीवरील एक ब्लॉग पाठवला. त्याचं शीर्षक वाचून तो मला का पाठवला असावा म्हणून मी बुचकळ्यात पडलो. ब्लॉग पाठवणाऱ्याला विचारलं. त्याने त्याचं कारणंही सांगितलं. काय होता ब्लॉगवरील लेख? ब्रेसियरचा इतिहास आणि ती वापरण्याचे फायदे तोटे. मात्र त्यात दोन उल्लेख होते – एक म्हणजे भारतात महिला आपली अंतर्वस्त्रे लपवून वाळवतात; अन दुसरा उल्लेख होता एक महिला सुद्धा दुसऱ्या महिलेला ब्रा दिसत असेल तर ते खुणेने सांगून लपवायला सांगते. प्रश्न असे आहेत की, हे दोन्ही उल्लेख लेखाच्या विषयाशी सुसंगत आहेत का आणि भारतीय महिलांच्या या सवयीत टीका करण्यासारखे वा आक्षेप घेण्यासारखे काय आहे? मर्यादा, लज्जा, शालीनता यात वाईट काय? आक्षेपार्ह काय? त्या कल्पना सतत बदलत असतात. बदलतील. पण याविषयीच्या fashion tv किंवा fox life यांच्याच कल्पना आणि मापदंड योग्य आणि भारतीय कल्पना आणि मापदंड अयोग्य, मागास, टाकाऊ हे कसे? एखादी महिला पोहण्याच्या पोशाखातच पोहणार. त्यात वावगे वाटण्याचे कारण नाही. कोणाला वाटत नाही. ज्यांना वाटत असेल त्यांनी स्वत:ला दुरुस्त केले पाहिजे. पण धाडसी खेळ, पर्यटन, मॉल, मंदिर, नृत्य किंवा अशाच अनेक ठिकाणी तोकडा, तंग, असभ्य पोशाख घालण्याचे समर्थन केले जाते तेव्हा; हा प्रवास दैहिकतेच्या दिशेने आहे असे म्हणण्याशिवाय पर्याय नसतो.
रामदेवबाबांच्या एका टीव्ही कार्यक्रमात भावना सेठ नावाची एक अभिनेत्री होती. त्यात हाच प्रश्न आला तेव्हा तिने उत्तर दिले होते – आम्हाला आवडते आम्ही घालतो. लोकांनी पाहावे, मिटक्या माराव्या, घरचा रस्ता धरावा. आज ही भावना सोशल मीडियातून देखील व्यक्त होताना दिसते. असा उत्तेजक वा अभद्र पोशाख करताना तुझ्या मनात नेमके काय असते? असा प्रश्न एकदा एका मुलीला विचारला तेव्हा तिने जो उथळ आक्रस्ताळेपणा केला तो मी अनुभवलेला आहे. जयपूरला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने इंडिया टुडेच्या एका संपादकांशी गप्पा मारण्याची संधी मिळाली होती. हाच विषय होता. ते म्हणाले – `दिल्लीत माझ्या apartment मध्ये शेजारी एक कुटुंब राहतं. तेथील सुनबाई सगळ्या प्रकारचे कपडे घालते. अगदी मिनी, मायक्रो वगैरे. पण पूर्ण धार्मिक, आध्यात्मिक आहे.’ मी त्यांना विचारले - `आध्यात्मिक म्हणजे काय?’ मग ते काहीही बोलले नाहीत. दैहिकता मर्यादित, नियंत्रित, नियमित करणे जर आवश्यक वाटत नसेल तर, त्याला धार्मिक, आध्यात्मिक म्हणता येईल का? आपण जरा साधासुधा पोशाख केला तर बावळट ठरू याची भीती आज भारतीय स्त्रीच्या मनात बसली आहे की नाही? एकीकडे भगवे झेंडे घेऊन, भारतीय पोशाख करून गाड्या चालवीत शक्तीप्रदर्शन करणारी स्त्रीसुद्धा, घरी आल्यावर टीव्हीवर नृत्याच्या नावाखाली तोकड्या कपड्यातील नृत्य करणाऱ्या मुलीच्या पायात हात घालून तिला दहा जण उचलून घेतात हे मेलेल्या नजरेने पाहते की नाही? कुठे राहिला मूल्यबोध? आपण अनैतिक नव्हे, ननैतिक होतो आहोत. टीव्हीवरील अनेक कार्यक्रम कोणत्या भावना, कोणती मूल्ये, कोणते मापदंड प्रक्षेपित करीत असतात. म्हाताऱ्या व्यक्तींच्या लैगिक भावनांचा विचार भारतात होत नाही. तो व्हायला हवा अशी विचारपेरणी सुरु झालेली आहे. त्या विचाराबाबत आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण लैगिकता हेच जीवन किंवा त्यापासून बाजूला जाणे म्हणजे चूक, पाप, मागासपण असा जो सूर आणि मांडणी असते ती संपूर्ण समाज दैहिकतेच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न असतो. स्त्री ही भोगाची वस्तू नाही हे वाक्य पार घासून गुळगुळीत झालेले आहे. पुरुषांचे सोडूनच द्या, स्त्रियांना तरी हे मनातून किती मान्य आहे? उपभोग घेऊ न देणे आणि उपभोगाची वस्तू नाही हे मान्य असणे यात फरक नाही का? या अनिर्बंध मोकळेपणाला सत्ताकांक्षा येऊन मिळाली की आणखीनच उत येतो. आपला नवरा आपल्यासाठी sanitary napkins घेऊन आला ही सोशल मीडियावर सगळ्यांना सांगून आनंद साजरा करण्याची गोष्ट कशी काय असू शकते? असाच एक चित्रपट मध्यंतरी आला होता. त्याचे कोण कौतुक? कशासाठी? हे सगळे न करताही स्त्रीचे अस्तित्व, तिचे अवकाश, तिच्या गरजा सहअनुभूतीने समजून घेणे आणि हा चिल्लर, पोरकट बाजारूपणा यातला फरक आपण समजून घेणार की नाही? आपण कुठे जातो आहोत आपल्याला तरी कळते आहे का?
समस्या असंख्य आहेत. त्या पुरुषांच्या आहेत अन स्त्रियांच्याही आहेत. केवळ स्त्रियांच्या अशाही आहेत. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, लैंगिक, मानसन्मानाच्या अशा अनेक आहेत. चौकट राजा नावाचा चित्रपट बहुतेक मराठी लोकांनी पाहिलेला असेल. त्या अपघात झालेल्या पुरुषाची समस्या आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, भावनिक जशी आहे तशीच लैंगिक पण आहे. वेडे लोक, अपघातग्रस्त लोक, शारीरिक- मानसिक- बौद्धिक- कमतरता असलेले लोक; अन अशा खूप वेगवेगळ्या लोकांच्या असंख्य समस्या आहेत. यात स्त्री आणि पुरुष असे करता येत नाही. एवढेच नाही तर काहीही कमतरता नसलेल्या लोकांच्या समस्या असतात त्यातही स्त्री वा पुरुष असा भेद करता येत नाही. एक लग्न की अधिक लग्न, समलैंगिकता योग्य की अयोग्य, ईश्वर आदी मानायचे की नाही; अशा अनेक गोष्टींकडे उपेक्षा अथवा मस्करीपेक्षा आस्थेने पाहायलाच हवे. परंतु याकडेही दुर्लक्ष नको की; पिंड, वृत्ती, गरज, इच्छा, आकांक्षा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्तर आणि समज, कौशल्य, स्वभाव, परिस्थिती, योग्य-अयोग्यता, compatibility, परंपरा, कल्पना, जुन्यातून बाहेर पडण्याची वृत्ती, जुने टाकून देण्याच्या नावाने अयोग्य किंवा अनावश्यक गोष्टींना मिळणारे पोषण, संधी, आर्थिक- सामाजिक व्यवस्था, जीवनशैली, अपेक्षा, अवास्तव अपेक्षा, अपेक्षापूर्ती, अपेक्षाभंग, अनुभव, छुपे वा उघड हेतू, आग्रहीपणा; असे अक्षरशः असंख्य कंगोरे असतात. या सगळ्यांचा घाऊक विचार करणे, घाऊक सिद्धांत मांडणे, अमुक विरुद्ध अमुक असा रंग देणे, न्यायअन्यायाचे स्वरूप देणे; हे शहाणपणाचे नक्कीच म्हणता येणार नाही. आजच्या प्रचलित अर्थाचे स्वातंत्र्य आणि सुख मिळवणारे सुद्धा किती विविध प्रकारे जीवनाला कंटाळतात, जीवन संपवण्याचे पाऊल उचलतात हे आता नव्हाळीचे राहिलेले नाही. आर्थिक स्वावलंबनाच्या विचाराने आता लग्न जुळवतानाच `तुझे तू, माझे मी’ हे स्वरूप घेतलेले आहे; अन पुरुषी अत्याचाराच्या खऱ्याखोट्या मांडणीने पुरुषविहीन जीवनाचा पुरस्कार करण्यासाठी फेसबुकचे प्रोफाईल काळे ठेवण्यापर्यंत आपण पोहोचलो आहोत. आम्हाला हेच हवे आहे का यापेक्षाही, यातून सगळ्यांचे कल्याण किंवा आमचे व्यक्तिगत सुख, समाधान, शांति तरी प्राप्त होईल का; हा कळीचा प्रश्न आहे. मानवीय आणि दैवी म्हणून जे जे गुण, प्रतीके, पद्धती विकसित झाल्या वा करण्यात आल्या त्यांचा साधकबाधक विचार करण्याचे नाकारणे हा करंटेपणा म्हणावा लागेल.
भारताचे काय होईल? हिंदूंचे काय होईल? आध्यात्माचे काय होईल? हे प्रश्नच गैरलागू आहेत. त्यांचे काय होईल याची चिंता करण्याची गरज नाही. इहवादी भोगवादाने, सत्तावादाने या साऱ्याची राखरांगोळी केली आणि ते भस्म फासून विश्वविजयाचे कितीही तांडव केले तरीही त्या राखेतून पुन्हा भारत, हिंदू आणि आध्यात्माचा फिनिक्स भरारी घेईल. प्रश्न हा आहे की, आम्हाला मर्यादित का होईना जे समजते त्याकडे दुर्लक्ष करून आजवरचे सारे शुभ, मंगल, कल्याणकारी आम्हीच उधळून टाकण्याचा नतद्रष्टपणा करणार आहोत का? Geneticaly modified माणूस जन्माला घातल्याचा दावा आज शास्त्रज्ञ करीत आहेत. येणाऱ्या भस्मासुराला ओळखण्याची गरज आहे. स्त्रीत्वाच्या किंवा अन्य कोणत्याही भावुकतेच्या प्रवाहात वाहून जाणे योग्य ठरणार नाही.
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २९ नोव्हेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा