सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

अमृतयोग

पंतप्रधानांनी आजच्या भाषणात २०४७ पर्यंत विकसित देश होण्याचा संकल्प जाहीर केला. हे छान झालं. अमृत महोत्सवाच्या उत्सवातून आपल्याला बाहेर पडायचं आहे हे त्यातून स्पष्ट व्हावं. या संकल्पासाठी काय करावं लागेल यावरही ते बोलले. मला तीन गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या. १) आत्मनिर्भर भारत. २) घराणेशाहीतून मुक्ती. ३) भ्रष्टाचारातून मुक्ती. या संदर्भात काही सूचना, काही विचार.

घराणेशाहीतून मुक्ती म्हटल्याबरोबर गांधी परिवार हे सगळ्यांच्या मनात येतं. पण हे तेवढ्यापुरतं असू नये. शिक्षण, उद्योग इत्यादी क्षेत्रातही घराणेशाही खूप आहे. ही घराणेशाहीसुद्धा असू नये. 'औद्योगिक घराणी' यांची जागा 'प्रत्येक घराण्याचा (परिवाराचा) उद्योग' याने घ्यावी. याचाच विस्तार करायचा तर - देशाचे एक रिलायन्स, देशाचे एक अमूल, देशाचे एक पतंजली, देशाचे एक लिज्जत... ... ... असे न राहता; जिल्ह्याचे रिलायन्स, जिल्ह्याचे अमूल, जिल्ह्याचे पतंजली, जिल्ह्याचे लिज्जत... असे असावे. पाणी, दूध, धान्य, तेल, स्वच्छता, पापड, लोणची, शेवया, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, पोलीस, कपडे, पादत्राणे, खते, बांधकाम; अशा असंख्य गोष्टीत प्रत्येक जिल्हा स्वयंपूर्ण व्हावा. वास्तविक न्यायव्यवस्थेत देखील काही विषयांसाठी जिल्हा हीच अंतिम सीमा ठरवायला हवी. जिल्हा स्तरावर होऊ शकणारी उत्पादने, त्यांचे वितरण, सेवा यासाठी जिल्हा स्तरापेक्षा मोठ्या कंपन्या, प्रतिष्ठाने असू नयेत. यासाठी जसा समाजाने पुढाकार घेतला पाहिजे; तसेच नियम, कायदे इत्यादीसाठी शासनाने देखील आपला वाटा उचलायला हवा. 

समाजाने जसे सुरुवातीला काही अडचणी सोसण्याची तयारी ठेवावी, तसेच शासनाने देखील सुरुवातीला नाराजी सहन करण्याची तयारी ठेवावी. शेकडो गोष्टी अशा आहेत ज्यासाठी मोठ्या आस्थापनांची गरज नाही. त्यासाठी विद्यमान तंत्रज्ञान पुरेसे आहे. नवीनच तंत्रज्ञान असले पाहिजे हा स्वप्नाळूपणा सोडावा लागेल. तंत्रज्ञान ही सतत बदलणारी, विकसित होणारी गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्यामागे धावण्यापेक्षा उपलब्ध तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून चांगले जीवन उभे करणे महत्त्वाचे. केवळ जगात याच्याकडे अमुक तंत्रज्ञान आहे, त्याच्याकडे तमुक तंत्रज्ञान आहे; असे करत धावाधाव करण्यात अर्थ नाही. मागासलेले अन पुढारलेले हे डोक्यातून काढून टाकले पाहिजे. जीवन महत्त्वाचे आहे तंत्रज्ञान नाही. पुढारलेले, मागासलेले, आधुनिक इत्यादी संदर्भात आपली मानसिकता सुदृढ असायला हवी विकृत नको.

खरं तर एकूणच मानसिकता योग्य वळणावर यायला हवी आहे. उदा. खाद्यतेल. खाद्यतेल काढणारे छोटे उद्योजक आजही आहेत. त्यांची संख्या वाढूही शकेल. पण तेल काढण्यासाठी तेलबिया उपलब्ध असायला हव्यात. त्यासाठी शेती नीट व्हायला हवी. आज त्याची मानसिकता नाही. ही मानसिकता नसण्याची पुष्कळ कारणे आहेत. त्यातील एक कारण आहे अवास्तव स्वप्ने. आपल्याला समाज म्हणून स्वप्नेही योग्य, व्यावहारिक व मानवीय पाहावी लागतील. अवास्तव स्वप्नांमुळे तरुण मोठ्या प्रमाणात निष्क्रिय राहतात हे वास्तव ध्यानात घ्यायला हवे. जसे राज्य वा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा. सरकारी नोकरी म्हणजे सुखाचे आणि निश्चिन्त आयुष्य असा समज. त्यामुळे त्यासाठी आटापिटा. प्रत्यक्षात परीक्षा देणाऱ्यांपैकी किती जणांना ती नोकरी मिळते. बाकी सगळे त्या प्रयत्नात जो वेळ वाया घालवतात त्याचे काय? मनोरंजन क्षेत्राचे उदाहरण देखील घेता येईल. जेवढे लोक यशस्वी होतात, नावलौकिक व पैसा कमावतात त्याच्या कितीतरी पटीने लोक सुमार जीवन ओढत राहतात. अशी अनेक उदाहरणे घेता येतील. अन दुसरीकडे अनेक कामांना माणसे नाहीत किंवा सुमार माणसे आहेत. स्वप्ने व्यावहारिक ठेवतानाच, सगळ्या कामांच्या मोबल्यातील तफावत सुद्धा व्यावहारिक पातळीवर आणावी लागेल. शेती आणि सरकारी नोकरी यातील मोबल्यातील तफावत खूप जास्त असेल तर ओढाताण होणारच. त्यासाठी काही ठिकाणी मोबदला कमी करण्याची गरज असेल तर तेही करायला हवे. मनोरंजन क्षेत्राची चमकधमक आणि अवाजवी पैसा कमी करण्याचीही गरज आहे.

देश स्वयंपूर्ण व्हायचा असेल, भ्रष्टाचारमुक्त, घराणेशाहीतून मुक्त व्हायचा असेल तर; आपल्याला खऱ्या अर्थाने आध्यात्मिक व्हावे लागेल. अध्यात्म याचा अर्थ ऐहिकतेसाठी वा पारलौकिकासाठी देव प्राप्त करणे नाही; तर स्वतः देवस्वरूप होणे. ही आत्मविकासाची प्रक्रिया आहे. याशिवाय आम्ही ना भ्रष्टाचारातून मुक्त होणार, ना घराणेशाहीतून मुक्त होणार, ना आपली स्वप्ने व्यावहारिक करू शकणार. सगळं जग मुठीत करणे, अमाप पैसा कमावणे, सगळ्यांवर सत्ता गाजवणे, मोठं... मोठं... मोठं... होत जाणे, आणखीन... आणखीन... आणखीन... मिळवत जाणे; याला नियंत्रित करायचं असेल तर आध्यात्मिक वृत्तीला पर्याय नाही. याशिवाय आमच्या सवयी इत्यादींसाठीही आध्यात्मिकता महत्त्वाची आहे. खाद्यान्न समस्या आहे. त्यासाठी फक्त उत्पादन वाढवून उपयोग नाही. वाया जाणारे अन्न वाया जाणार नाही हेही आवश्यक आहे. किती जण याची जाणीव रोजच्या जगण्यात ठेवतात. अन्न वाया जाणार नाही म्हणजे नाही. त्यासाठी आवडीनिवडी इत्यादी फार टोकदार न ठेवता flexible ठेवण्याची सवय करावी लागेल. न आवडणारी भाजी समोर आली तरी खाता यायला हवी. योग्य अंदाज घेऊन स्वयंपाक करण्याची सवय लावून घ्यावी लागेल. उरलेले अन्न टाकून न देता त्याला नवीन करून उपयोग करण्यात कमीपणा वाटू न देण्याची मानसिकता घडवावी लागेल. आम्हाला कसली कमी नसल्याने काहीही करू हा माज सोडावा लागेल. अशा असंख्य बाबी. त्यासाठी वृत्ती आध्यात्मिक हवी. योग हा योगदिवसापुरता किंवा शारीरिक सुदृढतेपुरता न ठेवता; योग म्हणजे कर्मकुशलता आणि चित्तवृत्तींचा निरोध (मनाला काबूत ठेवणे म्हणजेच मनाला वाटते त्यात वाहून न जाता, मनाला काय वाटायला हवे त्याकडे वळवणे) हे व्यवहारात उतरवावे लागेल.

हे सगळे उत्सव करण्याइतके सोपे नाही. त्यासाठी व्यक्ती म्हणून आणि समाज म्हणून स्वतःला बदलावे लागेल. अमृतयोगाने त्यासाठी शक्ती, बुद्धी द्यावी.

- श्रीपाद कोठे

सोमवार, १५ ऑगस्ट २०२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा