सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

प्रयत्न आणि उपाय

प्रयत्न आणि उपाय यांच्यात फरक आहे हे आपल्याला कळतं का? बहुतेक नाही कळत. रोज सतत पाहायला, ऐकायला मिळणारं अरण्यरुदन, आक्रोश, आकांडतांडव, अभिनिवेश पाहून तरी तसंच वाटतं. धार्मिक कर्मकांड, विज्ञान तंत्रज्ञान, राज्यघटना, योग, शिक्षण, वैद्यकशास्त्र, संस्कार, गुन्ह्याला सजा, चांगल्या कामाला पुरस्कार, कला, व्यायाम, आहार... कोणतीही गोष्ट घ्या. अन थोडा विचार करून पाहा. `अमुक गोष्टीने अमुक होईल' असे जे जे म्हणून दावे केले जातात ते ते खोटे ठरतात. एखादा उपचार हा उपाय असता तर त्याचे निकाल १०० टक्के लागायला हवेत. ते लागत नाहीत. या जगात आजवर जे जे म्हणून झालं आणि सध्या सुरु आहे, ते सारेच्या सारे प्रयत्न आहेत. ते कधी परिणाम देतात, कधी देत नाहीत. आम्हाला हवे ते, आम्हाला हवे तेवढे, आम्हाला हवे त्या पद्धतीने, आम्हाला हवे तेव्हा परिणाम आले की आम्ही खुश होतो. हा प्रयत्नाचा परिणाम आहे असा दावा करतो आणि एकांगीपणे, अट्टाहासाने त्याला घट्ट धरून ठेवतो. आम्हाला क्षणभर सुद्धा प्रश्न पडत नाही की, मिळालेला परिणाम हा प्रयत्नामुळे मिळाला असेल तर त्याचा अनुभव १०० टक्के का नसतो? असा प्रश्न पडत नाही, पण तो समोर आला की आम्ही कारणे शोधतो. त्यावरून वेगवेगळी मते मांडली जातात. एखादा प्रयत्न असफल का झाला याची कारणमीमांसा करताना एकवाक्यता कधीच राहत नाही. कारण प्रत्येकाला अपयशाची कारणे जरी वेगळी वाटली तरीही प्रत्येकाच्या मनात एक मात्र अगदी शिगोशिग भरलेलं असतं- प्रयत्न हाच उपाय आहे. दु:ख असो, दारिद्र्य असो, वेदना असो, वंचना असो, अभाव असो, आकांक्षा असो, आपल्या कल्पनेतील एखादे चांगले- सुंदर- सुखद- व्यक्तिगत वा सामुहिक चित्र असो; त्यासाठी जे जे करतो वा केलं जातं ते उपाय आहेत ही आमच्या मनातील भावना आम्हाला जाणवतच नाही. परंतु कोणताही विचार, कोणतीही कृती; हे प्रयत्न आहेत, प्रयत्न असतात. एखाद्या गोष्टीला उपाय समजणे याचा अर्थ, अपेक्षित परिणामांची शाश्वती वा खात्री वाटणे, शाश्वती वा खात्री गृहीत धरणे असते. मात्र प्रयत्न समजणे याचा अर्थ, परिणामांचा विचार सोडून देऊन प्रामाणिक प्रेरणेने कृती करणे असा होतो. उपाय समजले की, अपयशाचे दोषारोपण करण्याची चढाओढ सुरु होते. प्रयत्न समजले की, आत्मचिंतन येतं. उपाय समजले की, जबाबदारी ढकलण्याची अहमहमिका सुरु होते. प्रयत्न समजले की, जबाबदारी स्वीकारणे सुरु होते. उपाय समजले की, स्वत:ला excuse मागणे सुरु होते. प्रयत्न समजले की, स्वत: स्वत:ची चिरफाड करणे सुरु होते. उपाय समजणे दुबळे बनवते. प्रयत्न समजणे सशक्त बनवते. उपाय समजणे म्हणजे अहंकार गोंजारणे. प्रयत्न समजणे म्हणजे अहंकार तपासणे. उपाय समजणे म्हणजे स्वत:ला सर्वशक्तिमान समजणे. प्रयत्न समजणे म्हणजे अपूर्णतेचा बोध होणे. `कर्मण्येवाधिकारस्ते, मा फलेषु कदाचन' या कालातीत उपदेशाचे हे मर्म असावे. महाभारताचे युद्ध भगवद्गीतेच्या प्रस्थापनेसाठी होते. आम्हाला मात्र महाभारत युद्धातच रस आहे. अजूनही. कौरव किंवा पांडवांच्या बाजूला उभे राहण्यातच आम्हाला धन्यता वाटते. आम्हाला भगवद्गीता हवी आहे का?

आजच्या घटकेला सुरु असलेल्या एकूण एक चर्चा पाहून हा प्रश्न मनात उभा राहिला. स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देताना आपणापुढे ठेवतो.

- श्रीपाद कोठे

नागपूर

मंगळवार, १५ ऑगस्ट २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा