गेल्या आठवड्यात केंद्रिय नियोजन आयोगाने सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र सादर केले आणि देशभर एका खमंग चर्चेला सुरुवात झाली. भारतात तुम्ही जर शहरात राहात असाल तर तुम्हाला रोजच्या जगण्याला ३२ रुपये पुरेसे आहेत आणि तुम्ही जर खेड्यात राहात असाल तर तुम्हाला रोजच्या जगण्याला २६ रुपये पुरेसे आहेत, अशा आशयाचे ते प्रतिज्ञापत्र आहे. देशाचे पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष आहेत. या अतिशय महत्त्वपूर्ण आयोगात अत्यंत बुद्धिमान लोक असतात, असा या आयोगाचा लौकिक आहे. संपूर्ण देशातील योजनांचे नियोजन, सरकारी पैशाचे समन्यायी वाटप वगैरे अतिशय महत्त्वपूर्ण कामे नियोजन आयोग करीत असते. संपूर्ण देशाचा गाडा चालवण्यात नियोजन आयोगाचा सिंहाचा वाटा असतो. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा एक इतिहास आहे. याआधी चार महिन्यांपूर्वी नियोजन आयोगाने असेच प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात आयोगाने शहरात जगण्यासाठी रोज २० रुपये पुरेसे आहेत असे म्हटले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करून दुसरे सुधारित प्रतिज्ञापत्र सादर करावे असे निर्देश दिले होते. त्याला अनुसरून नवीन प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे.
या देशातील सगळ्यात खालच्या आर्थिक स्तरावरील माणुसही हे सांगू शकतो की, नियोजन आयोगाचे हे प्रतिज्ञापत्र किती निरर्थक आहे. तथाकथित बुद्धिवंतांनी आपली निर्बुद्धताच या प्रतिज्ञापत्राद्वारे जगाला दाखवून दिली आहे. हे मत कदाचित फार कठोर वाटेल पण आज सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने आणि कोडगेपणाने होत आहेत त्या पाहता या कठोर भाषेला कोणताही पर्याय उरलेला नाही. या प्रतिज्ञापत्राचे समर्थन करण्याचा निलाजरेपणाही सुरूच आहे. कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळण्याचा बेशरमपणा करणारेच हे सारे करू शकतात. या प्रतिज्ञापत्राचे समर्थन करणार्या निरढावलेल्या आणि कोडग्या बुद्धिवंतांनी आणि नेत्यांनी केवळ एक महिना ३२ रुपये रोज याप्रमाणे जगून दाखवावे आणि उदाहरण घालून द्यावे. या देशाचा गाडा चालवणारे लोक माणसांना माणूस तरी समजतात का, हा खरे तर कळीचा मुद्दा आहे.
आज १०-१२ हजार रुपये महिना कमावणारा माणुसही कसाबसा आपला चरितार्थ चालवत असतो. जुनीपुराणी एखादी खटारा दुचाकी घेउन १०-१५ किलोमीटरवर कामाला जाणारा माणूस ७५ रुपये लीटर पेट्रोल झाल्यावर सायकल जवळ करतो. भाज्यांचे दर दुप्पट झाल्यावर त्याच्या ताटातील भाज्या गायब होतात. चप्पल तुटल्यावर अजूनही तो दहा वेळा तीच चप्पल दुरुस्त करून वापरतो. तरीही घरी आलेल्या पाहुण्याला कपभर चहा पाजण्याची माणुसकीही जपतो. या स्तराच्या खालचे तर सोडूनंच द्या. खरे तर नियोजन करणार्या बुद्धिवंतांना सर्वसामान्य जनतेच्या जगण्याचा परिचयसुद्धा नाही आणि सर्वसामान्य माणूस तर हे विद्वान ज्या पद्धतीने जगतात त्याचे स्वप्नसुद्धा पाहू शकत नाही. ३२ रुपयात जगणे होत असेल तर मग खासदारांना लाखो रुपयांचे वेतन व भत्ते कशाला हवेत? नवनवीन वेतन आयोग सरकार का स्थापन करते? नवनवीन गाड्या मंत्र्यांना आणि अधिकार्यांना कशाला हव्यात? पण असले कोणतेही प्रश्न विचारायचे नसतात. प्रश्न विचारले तर तुम्ही अस्थिरता निर्माण करता म्हणून हे गळे काढणार. आमच्यावर विश्वास ठेवा हा टाहो तर रोजचाच झाला आहे. का ठेवायचा यांच्यावर विश्वास? हे म्हणतात म्हणून? विश्वास ही गोष्ट मागून मिळत नसते. ती आपल्या कृतीतून प्राप्त करायची असते. नुसत्या पोकळ उक्तितून आणि टाहो फोडून विश्वास मिळत नसतो ही साधी गोष्टसुद्धा या कथित थोरांना कळत नाही.
परंतु या सार्या युक्तिवादाला, तर्काला काहीही अर्थ नाही. कारण आज सारी सूत्रे ज्यांच्या हाती आहेत ते फक्त दरोडेखोर आहेत. दरोडेखोराला फक्त लुटणे माहीत असते. अंगावरच्या कपड्यांपर्यंत सारे काही तो लुटत असतो. अन् लुटायला काही शिल्लक राहिले नाही की लाथ मारून हाकलून देत असतो. नियोजन आयोग काय आणि सरकार काय, याशिवाय दुसरे काहीही करणार नाही याबद्दल शंका नको. हे जे काही करीत आहेत ती त्यांची बुद्धी आहे, असेही समजण्याचे कारण नाही. देशाला महासत्ता, आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी यांना जागतिक बैंक, आंतर्राष्ट्रीय नाणेनिधि तसेच अमेरिका, यूरोप सांगतात त्याप्रमाणे सुधारणा करायच्या आहेत. ते सांगतात सब्सिडी कमी करा आणि यांना सब्सिडी कमी करायच्या आहेत. सब्सिडी कमी करायच्या तर भारतात गरिबी नाही, सगळे लोक कसे सुखाने जगू शकतात हे सिद्ध करायला हवे. त्यासाठी मग हे बुद्धी गहाण टाकलेले बुद्धिवंत प्रयत्न करायला लागतात. त्यासाठी रात्रीचा दिवस करतात आणि हे सारे तरी कशासाठी? तर त्यांच्या जगण्याला रोज एक चांदणी (२ स्टार, ३ स्टार... ५ स्टार, ७ स्टार..... अनंत स्टार) चिकटावी म्हणून. मात्र जे दीडशहाणे आम्हाला हे करा, ते करा, या सुधारणा करा, त्या सुधारणा करा असे सांगत असतात त्यांनी या सुधारणा मोठ्या प्रमाणावर केल्या तरीही त्यांच्या अर्थव्यवस्था का गडगडल्या? त्यांच्या महाकाय बन्कांचे दिवाळे का निघाले? आज ग्रीससारखे देशचे देश बुडण्याच्या मार्गावर का आहेत? हे वा यासारखे साधेसाधे प्रश्नही या बुद्धिमान लोकांना पडत नाहीत एवढे त्यांचे मेंदू मरून गेले आहेत. मने आधीच मेली होती. त्यामुळे कोणाच्याही सुखदु:खाशी त्यांना घेणे देणे नव्हते. आता मेंदूही मरून गेल्याने चर्चा वगैरेनाही काही अर्थ उरलेला नाही.
आचार्य विनोबा भावे यांनी एकदा असे म्हटले होते की, जगातील सारे व्यवस्थापक घरी बसवा. त्याने जगाचे कल्याण होईल. आज पुन्हा त्याच धर्तीवर म्हणण्याची वेळ आली आहे की, सगळ्या बुद्धिवाद्यान्ना घरी बसवा. त्यानेच जगाचे भले होईल. आज जगात चालत असलेल्या बहुतांश व्यवस्था आणि त्याच्या मुळाशी असलेला विचार आणि तत्वज्ञान यांचे हेतू आणि दिशाच मुळी चुकलेली आहे. त्यामुळे सगळेच भांबावलेले आहेत. अन् तुम्ही आम्ही मेंढरांसारखे अगतिकपणे त्यांच्या मागे फरपटत चाललो आहोत. तथाकथित प्रगती, अधोगतीची मूर्ख चर्चा न करता सारे क्रियाकलाप थांबवून आमची दिशा आणि हेतू यांचा शांतपणे विचार करणे हाच एकमेव उपाय आहे. जे काही करायचे ते त्यानंतर. दिल्लीला जायचे आहे पण बसलो आहोत कलकत्त्याला जाणार्या गाडीत आणि तिथे बसूनच नुसती कावकाव करीत आहोत, अशी आमची अवस्था झाली आहे. पहिले स्वत:चा गाढवपणा मान्य करून गाडीतून खाली उतरावे लागेल. शांतपणे परिस्थितीचा विचार करावा लागेल आणि मग पुढची कृती करावी लागेल. पण समर्थानी म्हटल्याप्रमाणे `जो तो बुद्धीच सांगतो' अशी आज स्थिती आहे. जगाचा पालनकर्ता या जगाचं भलं करेल का?
-श्रीपाद कोठे
बुधवार, २७ सप्टेम्बर २०११
नागपूर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा