शुक्रवार, ३ मे, २०१३

व्यवस्थापक स्वामी विवेकानंद- ३


रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशन यांच्या कल्पनेपासून तर स्थापना व नंतर ते काम पुढेही अव्याहत सुरु राहावे, यासाठी स्वामीजींनी कसे व्यवस्थापन केले हे पाहण्यासारखे आहे. रीतसर रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना व्हावयाची होती. तशी काही चर्चाही फारशी नव्हती. परंतु रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य व त्यांचे भक्त एकत्रित राहत असत आणि भजन-पूजन, शास्त्राध्ययन, शास्त्रचर्चा वगैरे करीत असत. हे लोक राहत असत त्याला आलमबाजार मठ म्हणत असत. स्वामी विवेकानंद त्यावेळी अमेरिकेत होते. पण त्यांच्या गुरुदेवांनी त्यांना जी जबाबदारी सोपविली होती आणि त्यांच्या जन्माचे जे प्रयोजन त्यांना सांगितले होते त्याची जाण आणि त्याचे भान त्यांना पूर्ण होते. २७ एप्रिल १८९६ रोजी अमेरिकेतूनच आलमबाजार मठातील गुरुबंधूंना लिहिलेले प्रदीर्घ पत्र मुळातून वाचण्यासारखे आणि समजून घेण्यासारखे आहे. स्वामीजींच्या अद्भुत व्यवस्थापन कौशल्याचे ते प्रत्यक्ष प्रमाण आहे.

अगदी सुरुवातीलाच तुम्हाला (म्हणजे गुरुबंधूंना) या जगात फार मोठे काम करावयाचे आहे हे त्यांनी सांगितले आहे. त्यासाठी व्यक्तिश: काय काळजी घ्यायला हवी हे लिहिताना त्यांनी, मत्सर आणि अहंकार यापासून कटाक्षाने दूर राहण्यास सांगितले आहे. नियमाची अपरिहार्यता आणि गरज पटवून दिली आहे. त्यानंतर मठाच्या व्यवस्थेविषयी बारीकसारीक सूचना दिल्या आहेत. त्यात जागा, जागेची विभागणी, जागेचे व्यवस्थापन, भेटायला येणारे लोक, त्यांच्या भेटण्याच्या वेळा, त्यांना अटेंड करणे, परस्पर संबंध, दिनचर्या, मठाचे कार्यालय, कार्यवाह, मठातील सामानसुमान; अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यानंतर मठाच्या संचालक मंडळाची चर्चा केली आहे. अध्यक्षाची निवड, कार्यवाहाची निवड, कामाची विभागणी, मठात नवीन व्यक्तीला दाखल करून घेण्याविषयी; आदी गोष्टींची चर्चा आहे. त्यानंतर कार्यविभाग या मथळ्याखाली १) अध्ययन विभाग, २) प्रचार विभाग, ३) साधना विभाग; या तीन विभागांची चर्चा आहे. त्यानंतर काही सामान्य सूचना आहेत. जेवणाच्या वेळा निश्चित असाव्यात, जेवणाची व्यवस्था कशी असावी, स्वच्छता असलीच पाहिजे, महिलांचे मठात येणेजाणे, पदाधिकारी वगैरे अनेक गोष्टी नमूद केल्या आहेत.

२० मे १८९७ रोजी अल्मोडा येथून स्वामी ब्रम्हानंद यांना लिहिलेले पत्रही उल्लेखनीय आहे. कोलकाताच्या मठासाठी जागा पाहण्याचे वगैरे काम तेव्हा सुरु होते. पैसा गोळा करण्याचे कामही सुरु होते. या विषयावर स्वामीजी म्हणतात, पैसा अजून हातात आलेला नाही. त्यासाठी थोडा वेळ लागेल. पण तोवर स्वस्थ बसून चालणार नाही. स्वामी ब्रम्हानंद यांना पसंत असलेली जागा दलालाला बयाणा रक्कम देऊन पाहून घ्यावी. ती जागा मिळाली नाही तर तेवढी रक्कम वाया जाईल, याच भावनेने ती जमीन पहावी, असा सल्ला विवेकानंदांनी दिला आहे व्यवहारावर त्यांची इतकी जोरदार पकड होती. यासोबतच आपला गुरुबंधू गंगाधर याने उपाशी राहू नये. भिक्षा मिळाली नाही तर पैसे खर्च करून पोट भरावे हेही त्यांनी कटाक्षाने लिहिले आहे. कामासाठी माणसे जमवण्याची चर्चा करताना ते म्हणतात, `गोड शब्द फार दूरवर ऐकू जातात हे लक्षात ठेवा.'

यानंतर बरोब्बर एका महिन्याने २० जून १८९७ रोजी भगिनी निवेदिता यांना लिहिलेल्या पत्रात त्यावेळची परिस्थिती स्पष्ट होते आणि किती वज्रसमान हृदयाने स्वामीजींनी कार्य केले हे दिसून येते. ते म्हणतात, `एव्हाना पुष्कळसे तरुण शिक्षण घेऊ लागले आहेत. परंतु नुकताच जो भूकंपाचा धक्का बसला त्याने आमच्या एकुलत्या एक, दरिद्री आश्रयस्थानाचा विध्वंस करून टाकला. बाकी ते भाड्यानेच घेतले होते म्हणा. काही हरकत नाही. याची तमा बाळगण्याचे कारण नाही. आश्रयस्थान असो वा नसो, आपत्ती कितीही येवोत, काम हे केलेच पाहिजे. अर्थात काही थोडे संन्यासी, काही फाटलेले कपडे व कधी कधी मिळणारे जेवण यावरच अद्यापि भागवावे लागत आहे. यात बदल झालाच पाहिजे आणि तो निश्चित होणार, कारण आम्ही मन-प्राण अर्पण करून कार्य करीत आहोत. नाही का?'

स्वामी ब्रम्हानंद यांना लिहिलेल्या अन्य एका पत्रात मठासाठी काशीपुर येथील कृष्णगोपाल यांची बाग मिळवण्याबद्दल त्यांनी लिहिले आहे. याच बागेत त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी देह ठेवला होता. त्यामुळे १५-१६ हजार रुपयात ही बाग मिळाली तर चांगले, असे लिहितानाच, तुम्हाला हे योग्य वाटले तरच हा व्यवहार करा असेही नमूद करून, स्वामी ब्रम्हानंद यांच्या अध्यक्षपदाचा मान राखायचे सौजन्यही त्यांनी दाखवले आहे. अर्थात या कामाचा बोभाटा होऊ नये, असा इशारा देताना ते म्हणतात, `योजना गुप्त ठेवल्या नाहीत तर कार्य बिघडते.' आपण ही जमीन घेणार असे कळले तर मालक भाव वाढवतील, याकडे लक्ष वेधून त्यासाठी गुप्तता आवश्यक असल्याचे स्वामीजींनी म्हटले आहे. अर्थात जे काही करायचे ते लवकर करावे. `दीर्घसूत्रीपणाने कार्याचा नाश होतो', असा इशाराही त्यांनी दिला आहे. स्वामीजींची अशी सुविचारवजा वाक्ये गोळा केलीत तरीही त्यातून व्यवस्थापन या विषयाची सांगोपांग मांडणी होऊ शकेल. याच पत्रात त्या वेळच्या दुष्काळाची चर्चा करून उपयुक्त सूचनाही त्यांनी दिलेल्या आहेत.

वेगवेगळ्या ठिकाणी रामकृष्ण संघाची केंद्रे स्थापन करणे, गुरुबंधू- शिष्य यांच्या गरजा पूर्ण होणे, पुस्तके लिहिणे, त्या पुस्तकांचे भाषांतर, पुस्तकाची भाषा सुबोध करणे, भाषांतर करू शकणाऱ्या व्यक्तींची माहिती अशा कित्येक गोष्टींकडे त्यांचे सतत व बारीक लक्ष असे. त्याविषयी ते सतत लिहित, बोलत असत.

१८९७ पासून त्यांच्या पत्रव्यवहारात एक प्रकारची निवृत्तीपरता दिसून येते. सगळ्या व्यापातून बाहेर पडण्याची धडपडही पाहायला मिळते. परंतु त्या मानसिकतेतही व्यवहाराकडे दुर्लक्ष वा ढिसाळपणा झालेला दिसत नाही. उलट आपल्यानंतरच्या व्यवस्थेची त्यांनी काळजी घेतलेलीही दिसते. आपल्या मनातील विरक्ती स्पष्टपणे मांडणारे एक पत्र त्यांनी स्वामी ब्रम्हानंद यांना मरी येथून ११ ऑक्टोबर १८९७ रोजी लिहिले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी १२ ऑक्टोबर १८९७ ला त्यांनी पुन्हा एक पत्र स्वामी ब्रम्हानंद यांना लिहिले. त्यात त्यांनी ५ अत्यंत महत्वाच्या सूचना केल्या आहेत. त्या अशा-
१) जे लोक पैसे गोळा करून मठाकडे पाठवतील त्यांना मठाकडून पावती दिली जाईल.
२) या पावतीच्या दोन प्रती असणे आवश्यक आहे. एक पैसे पाठविणाऱ्याकडे धाडली जाईल व दुसरी मठाच्या फाइलमध्ये राहील.
३) मठाजवळ सर्व दात्यांची नावे व पत्ते यांची नोंद असलेले एक मोठे रजिस्टर असले पाहिजे.
४) मठाच्या निधीसाठी दान म्हणून दिलेल्या रकमांचा अगदी पै-पै पर्यंतचा बिनचूक हिशेब ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सारदाला किंवा इतर कुणाला पैसे दिल्यास त्याचा बिनचूक हिशेब त्यांच्याकडून घेतला पाहिजे. पैशांचा हिशेब बरोबर न ठेवल्यामुळे मला कोणीही फसवा किंवा पैसेखाऊ म्हणणार नाही याची काळजी घ्या. हे सर्व हिशेब पुढे छापून प्रसिद्ध करावे.
५) ताबडतोब एका वकिलाकडे जाऊन त्याच्या सल्ल्याने आपल्या दोघांच्या मृत्युनंतर आपल्या मठामध्ये जे काही असेल ते सर्व हरी व शरद यांना मिळावे असे मृत्युपत्र दाखल करा.
आश्रमातील आपल्या गुरुबंधूकडूनही चोख हिशेब घेण्याची सूचना आणि वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी मृत्युपत्राची केलेली तरतूद या लक्षणीय बाबीच म्हटल्या पाहिजेत.

ज्या उद्देशासाठी देणग्या गोळा केल्या जातात त्या उद्देशापासून थोडेदेखील ढळण्याचा आपल्याला अधिकार नाही, असेही स्वामीजी बजावत असत. अनेकदा विशिष्ट कामासाठी गोळा केलेला पैसा दुसऱ्या एखाद्या कामासाठी वापरायला त्यांनी मना केले आहे. काम चालवताना प्रत्येक माणसाला त्याच्या आवडीचे काम देता यायला हवे याकडेही ते लक्ष वेधत असत.

आपल्या कामाच्या संबंधात एक व्यवस्थापक म्हणून ते कसा विचार करीत असत, हे स्वामी ब्रम्हानंद यांना श्रीनगर येथून  लिहिलेल्या १ ऑगस्ट १८९८ च्या पत्रावरून दिसून येते. ते लिहितात, `तुम्ही नेहमी एक चुकीची समजूत करून घेता. मी ज्या ज्या वेळी हिशेबासंबंधाने तुम्हाला काही लिहितो त्या त्या वेळी माझा तुमच्यावर विश्वास नाही असे तुम्हाला वाटते. मला नेहमी जी काळजी वाटते ती सांगतो. कसे का होईना आपल्या कार्याला आता सुरुवात झालेली आहे. हे कार्य सतत सुरु राहावे आणि आपण निघून गेल्यानंतरही त्याची प्रगती होत राहावी याबद्दलचे विचार मला अहोरात्र भंडावून सोडत असतात. एखाद्या माणसाजवळ तात्त्विक ज्ञान जरी भरपूर असले तरी एखादे कार्य प्रत्यक्ष केल्याशिवाय त्याला खऱ्या अर्थाने शिकण्याची संधी मिळत नाही. आपल्यापैकी प्रत्येक माणसाने कार्याची जबाबदारी स्वीकारावयास तयार राहिले पाहिजे, असे मला वाटते. म्हणून मी निवडणूक, हिशेब, चर्चा यांचा पुन्हा पुन्हा उल्लेख करीत असतो. कार्यकर्त्यांपैकी एक माणूस जरी दगावला तरी दुसरा, किंबहुना जरूर पडली तर त्याच्यासारखे इतर दहा लोक ते कार्य अंगावर घेण्यास तयार असले पाहिजेत. दुसरे म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी माणसाच्या ठायी आवड निर्माण केली नाही तर तो जिवाभावाने काम करणार नाही. म्हणून प्रत्येकाला असे वाटले पाहिजे की- या कार्यात, या संस्थेच्या मालमत्तेत आपला वाटा आहे. हे कार्य चालविण्यात मत प्रकट करण्याचा आपल्याला अधिकार आहे. ही गोष्ट आपण आताच सुरु केली पाहिजे. आळीपाळीने प्रत्येकाला जबाबदारीची जागा द्या. प्रत्येकावर लक्ष ठेवा. जरूर पडल्यास तुम्हाला सर्व गोष्टींचे नियंत्रण करता आले पाहिजे. असे यंत्र उभे करा की, कोणीही मरो, कोणीही उरो ते यंत्र आपोआप चालू राहिले पाहिजे. आपण भारतीय लोक एखादी कायमच्या स्वरुपाची संस्था उभी करू शकत नाही हा आपला फार मोठा दोष आहे. याला कारण एकच आणि ते म्हणजे आपण सत्ता विभागून घ्यावयास तयार नसतो. आपल्या पश्चात कार्याचे काय होईल याचा विचारच करीत नसतो.' किती दूरगामी आणि मुलभूत विचार स्वामीजी करीत होते आणि कार्याला घाट देत होते, हे दाखवणारे हे पत्र आहे.

कामाच्या बाबतीत स्वामीजी अतिशय खमके होते आणि वेळप्रसंगी कडक कानउघाडणी करण्यासही ते कमी करीत नसत. नियतकालिकाच्या संबंधाने स्वामी ब्रम्हानंदांना एका पत्रात ते म्हणतात, `नियतकालीकाकडे विशेष लक्ष द्या. मी तुमच्यात नाही असेच गृहीत धरून चला. स्वतंत्रपणे कार्य करा. धन, विद्वत्ता आणि सगळ्याच बाबतीत आम्ही आमच्या वडील भावावर अवलंबून आहोत, अशी भावना असणे म्हणजे विनाशाचा मार्ग होय. नियतकालिकासाठी लागणारा सगळा पैसा मीच गोळा करायचा आणि त्यातले सगळे लेखही मीच लिहायचे, तर मग तुम्ही सगळे लोक काय करणार? आपले सर्व साहेब काय करीत आहेत? माझ्या वाट्याचे काम मी केले आहे. आता राहिलेले तुम्ही करा. कुणाला पैसा गोळा करता येत नाही., प्रचार करण्याचे कुणालाही जमत नाही, स्वत:ची कामे करणेही कुणाला जमत नाही, एक ओळ लिहिण्याचीही कुणाची कुवत नाही; आणि सगळे म्हणे संत आहेत !!' अशी कडक कानउघाडणी केल्यानंतर पुन्हा पैशाबाबत सूचना देताना ते म्हणतात, पैशाच्या बाबतीत प्रत्येक तपशीलासाठी कमिटीचा सल्ला घ्या. खर्चाच्या प्रत्येक मुद्यावर कमिटीच्या सर्व सदस्यांच्या सह्या घ्या.

आपण अतिशय कठोर भाषा वापरतो याची त्यांना जाण होती. त्याबाबत जोसेफाईनला इ.स. १९०० च्या एप्रिल महिन्यात लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `आम्ही भारतीय लोक बराच कालपर्यंत अगदी पराधीन होतो. त्यामुळे आम्हाला कोणत्याही कार्याला प्रवृत्त करण्यासाठी कठोर भाषेचा उपयोग बराच करावा लागतो. हे सांगताना मला वाईटच वाटते. या खेपेस आमच्या वार्षिक उत्सवाची जबाबदारी आमच्यातील एका सर्वात आळशी असलेल्या माणसाने अंगावर घेऊन ती पार पाडली. हेच लोक सध्या दुष्काळग्रस्तांच्या सेवेची कामे माझी मदत न घेता अगदी योजनाबद्ध आणि यशस्वी पद्धतीने स्वत:च पार पाडीत आहेत. हा सगळा माझ्या अत्यंत कठोर कानउघाडणीचाच परिणाम आहे यात शंका नाही.'

काही काळानंतर स्वामीजी आणि त्यांचे अन्य गुरुबंधू यांचेही शिष्य होऊ लागले होते. त्यापैकी एक स्वामी शुद्धानंद यांना अल्मोडा येथून ११ जुलै १८९७ रोजी लिहिलेल्या पत्रात कार्यकर्त्यांचे मनोबल स्वामीजी कसे वाढवीत असत हे पाहायला मिळते. ते लिहितात, `माझ्या बंधुंपेक्षा मी माझ्या संतानांकडून अधिक अपेक्षा करतो हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. मी जितका मोठा होऊ शकलो असतो त्याच्या शंभर पट मोठे माझ्या सर्व मुलांनी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुमच्यापैकी प्रत्येक जण अचाट कर्मे करणारा झाला पाहिजे - झालाच पाहिजे असे मी म्हणतो. आज्ञाधारकपणा, तत्परता आणि प्रेम या तीन गोष्टी जर तुमच्याजवळ असतील तर मग कोणताही अडथळा तुम्हाला रोखू शकणार नाही.'

व्यवस्थापन या बाबीचा विचार करताना साधारणपणे १) नियोजन, २) संघटन, ३) कार्यकर्ते/ कर्मचारी, ४) निर्देशन, ५) नेतृत्व, ६) संवाद, ७) प्रेरणा, ८) समन्वय, ९) नियंत्रण या गोष्टींचा विचार केला जातो. स्वामीजींनी त्यांच्या सर्व प्रकारच्या कामाचे जे काही व्यवस्थापन केले ते अभ्यासले, तर या सगळ्या गोष्टी त्यांनी किती उत्तम प्रकारे केल्या हे पाहायला मिळते. यातील आणखीन वैशिष्ट्य हे की, या साऱ्याचे कुठले शिक्षण वगैरे त्यांनी घेतले नव्हते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे असा कुठला अनुभवही त्यांच्या गाठीशी नव्हता. तिसरे वैशिष्ट्य म्हणजे केवळ हे एकच काम त्यांनी केले नाही, तर अन्य अनेक कामे करीत असताना हे काम केले आहे. चौथे वैशिष्ट्य म्हणजे, कुठे एका जागी बसून त्यांनी हे केलेले नसून सतत फिरत फिरत हे काम त्यांनी केले आहे. पाचवे वैशिष्ट्य म्हणजे व्यवस्थापनाचे फक्त मार्गदर्शन तेवढे त्यांनी केले असे नसून, पैसा जमवणे; माणसे जमवणे वगैरे कामेही प्रत्यक्षपणे केली आहेत.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ३ मे २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा