शुक्रवार, ३ मे, २०१३

व्यवस्थापक स्वामी विवेकानंद – २

`प्रबुद्ध भारत' आणि `ब्रम्ह्वादिन' या दोन नियतकालिकांचे व्यवस्थापन विवेकानंदांनी कसे केले हे पाहण्यासारखे आहे. व्यवस्थापक म्हणून किती आणि कशी अवधानं स्वामीजींनी ठेवली आहेत हे ११ जुलै १८९४ च्या त्यांच्या पत्रावरून पाहायला मिळते. पेरूमल यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `नियतकालिक चालू करा. मी वेळोवेळी तुम्हाला लेख पाठवीत जाईन. नियतकालिकाचा एक अंक, त्यासोबत एक आभारदर्शक पत्र बोस्टन येथील हार्वर्ड विश्वविद्यालयातील प्रा. जे.एच. राईट यांना पाठवून द्या. कारण असे की, त्यांनीच मला प्रथम मदत केली. ते पत्र वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यास त्यांना विनंती करा. तसे केल्याने मिशनऱ्यांचे म्हणणे खोटे आहे असे आपोआपच सिद्ध होईल.' पुढे ते म्हणतात, `डेट्रोइट येथील व्याख्यानात मला ९०० डॉलर्स म्हणजे २७०० रुपये मिळाले. दुसऱ्या एका व्याख्यानात एका तासात मला २५०० डॉलर्सची म्हणजे ७५०० रुपयांची प्राप्ती झाली. परंतु प्रत्यक्षात माझ्या हातात २०० डॉलर्सच पडले. एका भामट्या व्याख्यान मंडळाने मला ठकविले. मी त्या मंडळाशी असलेला माझा संबंध तोडून टाकला आहे.'

अनुभवांची देवाणघेवाण, त्यातून सावधतेचा इशारा, वास्तवाची जाण, वेगवेगळ्या लोकांमध्ये मेळ घालण्याचा प्रयत्न, काम करण्याचे शिक्षण, कामातील आपला सहभाग कोणता राहील याचे स्पष्ट निर्देश; अशा असंख्य गोष्टींचे व्यवधान स्वामीजी ठेवीत असत. स्वामीजी सतत प्रवासात राहत असत. त्यामुळे त्यांचा पत्ता सतत बदलत असे. त्याविषयीच्या सूचनाही स्वामीजींनी वारंवार केल्या आहेत.

मद्रासचेच त्यांचे अन्य एक शिष्य डॉ. नांजुंदा राव यांनाही त्यांनी व्यवस्थापकीय मार्गदर्शन केले आहे. `ब्रम्ह्वादिन' मासिक सुरु झाल्यावर मुलांसाठी एक मासिक सुरु करावे असा विचार डॉ. राव यांच्या मनात आला. त्याविषयी समाधान व्यक्त करून स्वामीजींनी त्यांना अनेक उपयुक्त सूचनाही केल्या. संस्कृत साहित्यातील अनेक कथा लिहवून घेऊन त्या लोकप्रिय करण्याची ही सुसंधी आहे असे नमूद करून ते म्हणतात, कथांच्या द्वारे तत्वांची शिकवण देणे हे या नियतकालिकाचे उद्दिष्ट असायला हवे. पण त्यात तात्त्विक चर्चा मात्र नको. प्रस्तावित मासिक मुलांसाठी असल्याने ते विद्वत्तापूर्ण नसावे असेही त्यांनी आवर्जून सांगितले होते. आपण त्यासाठी कथा लिहू असे सांगून स्वामीजी डॉ. राव यांना सांगतात, मुखपृष्ठाचे चित्र विचारपूर्वक ठरवा. ते साधे आणि आकर्षक असले पाहिजे. संघटनेसाठी आज्ञापालन ही अतिशय महत्वाची गोष्ट असल्याचेही स्वामीजींनी डॉ. राव यांना लिहिले होते.

अळसिंगा पेरूमल यांना ८ ऑगस्ट १८९६ रोजी स्वामीजींनी स्वित्झर्लंड येथून एक पत्र लिहिले आहे. त्या पत्राचा पहिलाच परिच्छेद वाचताना असे वाटते की, एखाद्या नियतकालिकाच्या व्यवस्थापकाने आपल्या संपादकालाच व्यावसायिक पत्र लिहिले आहे की काय. या पत्रात ते म्हणतात, `काही दिवसांपूर्वी तुम्हाला पत्र लिहिल्यानंतर `ब्रम्हवादिन'ला हातभार लावण्याचा मार्ग मी शोधून काढला आहे. त्याविषयीच मी आज तुम्हाला लिहिणार आहे. मी तुम्हाला एक-दोन वर्षांपर्यंत दरमहा १०० रुपये म्हणजेच वर्षाला ६० ते ७० पौंड पाठवीत जाईन. त्यामुळे `ब्रम्हवादिन'साठी पूर्ण वेळ काम करण्यास तुम्ही मोकळे व्हाल आणि परिणामी `ब्रम्हवादिन' अधिक यशस्वी होईल. छपाई वगैरेसाठी होणारा खर्च भागविण्यासाठी निधी उभारण्याच्या कामात श्री. मणी अय्यर व इतर मित्र साहाय्य करू शकतील. वर्गणीचे उत्पन्न किती येते? लेखकांना मानधन देऊन त्यांच्याकडून उत्कृष्ट लेखमाला लिहवून घेणे हे या रकमेत शक्य होईल काय? `ब्रम्हवादिन'मध्ये जे काही छापलेले असेल ते प्रत्येकाला अगदी समजलेच पाहिजे असे मुळीच नाही. माझे म्हणणे असे की, हिंदूंनी देशभक्तीने प्रेरित होऊन आणि सत्कर्म म्हणून वर्गणीदार व्हावे.'

पैशाच्या व्यवहाराबाबत सूचना करताना पुढे ते म्हणतात, `अनेक गोष्टी आवश्यक आहेत. प्रथमत: पूर्ण सचोटी हवी. तुमच्यापैकी कुणी सचोटीच्या मार्गापासून ढळेल असे मला मुळीच म्हणावयाचे नाही. परंतु पैशाच्या व्यवहाराच्या बाबतीत हिंदूंच्या ठिकाणी एक विशिष्ट गबाळेपणा आढळून येतो. ते आवश्यक तेवढे पद्धतशीर नसतात. जमाखर्च वगैरे ठेवण्याच्या बाबतीत ते काटेकोर नसतात.'

हाच विषय अधिक स्पष्ट करताना २६ ऑगस्ट १८९६ रोजीच्या पत्रात स्वामीजी डॉ. राव यांना लिहितात, `भारतात सर्व संघटित प्रयत्न एका दोषामुळे असफल होतात. तो दोष हा की काम करण्याची काटेकोर व कडक पद्धती अजून आपण शिकलो नाही. काम म्हणजे काम, मग तेथे मैत्री किंवा भीड उपयोगाची नाही. आपल्या ताब्यातील सर्व रकमेचा प्रत्येकाने चोख हिशेब ठेवला पाहिजे आणि एका विशिष्ट कार्यासाठी आपल्या स्वाधीन करण्यात आलेल्या रकमेचा विनियोग दुसऱ्या कोठल्याही कार्यार्थ होता कामा नये. मग आपल्यावर पुढच्या क्षणी भुकेने मरण्याची का पाळी येईना! याला म्हणतात व्यवहारातील सचोटी. दुसरी आवश्यक गोष्ट म्हणजे अदम्य उत्साह. कोणतेही काम केले तरी त्या वेळेपुरते ते काम तुम्ही उपासना म्हणून करा. सध्या या नियतकालीकालाच तुम्ही आपला देव समजा. म्हणजे मग तुम्ही यशस्वी व्हाल.' स्वामीजी किती कडक प्रशासक होते हे दाखवणारे हे पत्र आहे. एकदा आपल्याला यश मिळाले की विविध भाषांमधूनही आपण आपल्या नियतकालिकाचा विस्तार करू अशी भविष्यातील विस्ताराची दृष्टीही त्यांनी डॉ. राव यांच्यापुढे मांडली आहे.

आपल्या कामाला पोषक अशा विविध गोष्टींकडेही व्यवस्थापकाचे लक्ष असावे लागते आणि त्याचे नीट समायोजन त्याला करावे लागते. स्वामीजींनी हे कार्य केलेले देखील पाहायला मिळते. रशियाच्या झारने एक प्रवास वर्णनात्मक लेख लिहिला होता. त्यात भारताचे वर्णन `आध्यात्मिकतेची व ज्ञानाची भूमी' असे केले होते. तो लेख स्वामीजींनी अळसिंगा पेरूमल यांना पाठवला आणि तो `ब्रम्हवादिन'मध्ये छापण्याची सूचना केली.

अमेरिका व इंग्लंड येथे `प्रबुद्ध भारत' आणि `ब्रम्हवादिन' यांचे वितरक मिळावेत म्हणून देखील स्वामीजींनी खटपट केली होती. या मासिकांसाठी वर्गणीदार मिळवण्याचे कामही त्यांनी केले होते. `कर्मयोग', `भक्तियोग', `राजयोग' ही पुस्तके छापून त्यातून निधी उभा करण्याचा मोठा व्यापही त्यांनी केला होता. यासाठी होणाऱ्या विलंबासाठी त्यांनी कडक शब्दात पेरूमल यांची कानउघाडणीही केली होती. विलंबामुळे आपण संधी गमावून बसतो, विक्री कमी होते याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. स्वामीजी पहिला विदेश प्रवास आटोपून भारतात परतले तेव्हा आपल्यासोबत येणाऱ्या लोकांची माहिती देण्याची आणि त्यांच्या व्यवस्थेच्या सूचना देण्याची काळजीही त्यांनी घेतली होती. कोणाची गैरसोय होऊ नये ही व्यवस्थापकाची दृष्टीच त्यामागे होती.

स्वामीजींनी कशाकशाची व्यवस्था केली हे पाहण्यासारखे आहे. भारतात परतल्यावर मरी येथून जगमोहनलाल यांना लिहिलेल्या पत्रात विवेकानंद म्हणतात, `मी तिघा संन्याशांना जयपूरला पाठवीत आहे. तरी मुंबईला जाण्यापूर्वी त्या तिघांची काळजी घेण्यास कुणाला तरी सांगून ठेवा. त्यांच्या जेवणाखाण्याची आणि राहण्याची चांगली व्यवस्था करावयास सांगा. मी येईपर्यंत ते तिघे तेथेच राहतील. ते तिघेही सरळ स्वभावाचे असून फारसे शिकलेले नाहीत. ती माझीच माणसे असून त्यांच्यापैकी एक माझा गुरुबंधू आहे. त्यांची इच्छा असल्यास त्यांना खेत्रीला न्यावे.'

खेत्रीच्या राजेसाहेबांना १६ ऑक्टोबर १८९८ रोजी लिहिलेल्या पत्रात त्यांनी पाश्चात्य स्नेह्यांबाबत लिहिले आहे. ते म्हणतात, `माझे पाश्चिमात्य स्नेही जयपूर पाहण्यासाठी एखाद-दोन आठवड्यात येतील. जगनमोहन तेथे असल्यास त्यांना पाहुण्यांकडे लक्ष देण्यास, त्यांना शहर दाखविण्यास, तसेच जुन्या कलाकृती दाखविण्यास सांगावे. पाहुणे मंडळी जयपूरला जाण्यासाठी निघण्यापूर्वी मुन्शीजींना पत्र पाठवा, अशी सूचना मी माझे गुरुबंधू सारदानंद यांना देऊन ठेवली आहे.'

स्वामीजींनी विदेशात हिंदू तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार केला, आश्रमांच्या रूपाने त्यासाठी काही स्थायी कार्यही उभे केले अन त्यासाठी अनेक विदेशी स्त्री-पुरुषांना सोबत उभे करून सहकार्य मिळविले. यामुळे प्रभावित होऊन अनेक जण भारत पाहण्यासाठी आले. काही त्यांच्यासोबत आले. काही स्वतंत्रपणे आलेत. अनेक जण भारतात राहिलेही. भारतातील कामासाठीही अनेकांचे अनेक प्रकारे सहकार्य स्वामीजींनी मिळविले. पण हे सारे वाटते तितके सोपे नक्कीच नव्हते. याचे एक मासलेवाईक उदाहरण त्यांनी १० जुलै १८९७ रोजी कु. जोसेफाईन मॅक्लिऑड यांना लिहिलेल्या पत्रात पाहायला मिळते.

या पत्रात ते म्हणतात, `तुम्ही इकडे जरूर या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, युरोपीय आणि भारतीय लोक (युरोपीय त्यांना नेटिव्ह म्हणतात) एकत्र राहतात, पण तेल व पाणी याप्रमाणे. नेटीव्हांशी मिसळणे म्हणजे युरोपियांना आपला दर्जा कमी करून घेण्यासारखे वाटते. अगदी राजधानीच्या शहरात सुद्धा चांगली हॉटेले नाहीत. अनेक नोकर बरोबर घेऊन तुम्हाला प्रवास करावा लागेल. (नोकर ठेवणे हे हॉटेलात राहण्यापेक्षा स्वस्त आहे.) फक्त कमरेवरच वस्त्र असलेल्या लोकांची संगत तुम्हाला सहन करावी लागेल. मी सुद्धा असेच वस्त्र नेसलेला तुम्हाला आढळेन. घाण व कचरा सगळीकडे भरपूर; माणसे सावळ्या रंगाची. परंतु तत्वज्ञानाबद्दल तुमच्याशी चर्चा करणारी माणसे मात्र पुष्कळच आढळतील. येथील इंग्रज रहिवाशांशी जास्त संबंध जोडलात तर तुम्हाला जास्त सुखसोयी मिळतील.. परंतु येथील हिंदू कसे आहेत याची काहीच कल्पना येणार नाही. बहुधा मी तुमच्याबरोबर भोजन घेऊ शकणार नाही. परंतु तुमच्याबरोबर पुष्कळ प्रवास करण्याचे, पुष्कळ ठिकाणांना भेट देण्याचे आणि माझ्या शक्तीनुसार तुमचा प्रवास शक्य तितका सुखकर करण्याचे मात्र मी अभिवचन देतो. या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागणार या अपेक्षेने तुम्ही यावे हे चांगले. अर्थात प्रत्यक्षात यापेक्षा अधिक काही चांगले झाले तर उत्तमच.' किती प्रकारचे व्यवस्थापन स्वामीजींनी केले असेल?

भगिनी निवेदिता यांना २९ जुलै १८९७ रोजी अल्मोडा येथून लिहिलेल्या पत्रातही त्यांनी अशाच प्रकारे भारतातील परिस्थितीची स्पष्ट कल्पना देणारे, परंतु हिरमोड न करणारे; धाडस कमी न करणारे; उत्साह देणारे पण वास्तवाची जाण निर्माण करणारे पत्र लिहिले आहे.

कोलकाताहून संत्री घेऊन मद्रासला पाठवावी. तेथे ती आपल्याला मिळतील, असे स्वामी ब्रम्हानंद यांना एका पत्रात लिहिलेले वाचायला मिळते. स्वामी रामकृष्णानंद यांना लिहिलेल्या २० एप्रिल १८९७ च्या पत्रातही अशाच अनेक छोट्या छोट्या गोष्टींचे मार्गदर्शन दिसून येते. मद्रास येथील आश्रम तेथील एक गृहस्थ श्री. बिलिगिरी यांच्या घरी सुरु झाला. तेथील पूजाअर्चा, अन्य कामे यासोबतच बिलिगिरी यांच्या दोन विधवा मुली आहेत याची आठवण ठेवून, त्यांच्याशी योग्य व्यवहार असावा याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. या मुलींना धर्म, तसेच संस्कृत व इंग्रजीचे शिक्षण द्यावे यावरही स्वामीजींनी भर दिला आहे. कुणी श्री. गुप्ता यांना कुत्रा चावला होता, त्यांनी नीट औषध घ्यावे हे सांगायलाही स्वामीजी विसरले नाहीत.

व्यवस्थापकाचा अभिन्न गुण असलेल्या नेतृत्वाविषयीही स्वामीजींनी फार मोलाचे मार्गदर्शन केले आहे. भगिनी निवेदिता यांना श्रीनगर येथून १ ऑक्टोबर १८९७ रोजी लिहिलेल्या पत्रात स्वामीजींनी नेतृत्व या विषयाची चर्चा केली आहे. नेतृत्वाबाबतचा मुलभूत विचार तर त्यात पाहायला मिळतोच, पण आजच्या विविध क्षेत्रातील नेतृत्वाच्या पार्श्वभूमीवर त्याचे आगळेपण ठळकपणे नजरेत भरते.

स्वामीजी म्हणतात, `काही लोक दुसऱ्याच्या नेतृत्वाखाली उत्तम काम करतात. प्रत्येक जण नेतृत्व करण्यासाठी जन्मलेला नसतो. जो एखाद्या लहान मुलाप्रमाणे सत्ता गाजवतो तोच सर्वात उत्तम नेता होय. लहान मूल हे जरी सर्वांवर अवलंबून असलेले दिसले तरी त्याची सर्व कुटुंबावर निरंकुश सत्ता असते. कमीत कमी मला तरी नेतृत्वाचे रहस्य हेच आहे असे वाटते. पुष्कळांना इतरांबद्दल प्रेम, सहानुभूती इत्यादी वाटत असेल, परंतु फारच थोड्यांना या भावना व्यक्त करता येतात. दुसऱ्यांबद्दलची सहानुभूती, त्यांच्याबद्दल वाटणारे कौतुक आणि प्रेम ही व्यक्त करण्याची शक्ती ज्या व्यक्तीच्या ठायी असते ती त्या शक्तीच्या जोरावर इतरांच्या मानाने आपल्या विचारांचा व कल्पनांचा अधिक प्रभावीपणे प्रचार करू शकते.'

याच पत्रात याच विषयावर स्वामीजी पुढे म्हणतात, `सगळ्यात मोठी अडचण आहे ती अशी- लोक मला प्राय: त्यांचे सर्व प्रेम देऊन टाकताना दिसतात, परंतु मोबदल्यात मी मात्र त्यांना माझे संपूर्ण प्रेम देता कामा नये. कारण ज्या दिवशी मी तसे करीन त्या दिवशी कार्य नष्ट होईल. पण व्यक्तीला विसरून व्यक्तीनिरपेक्ष विचार करण्याची विशाल दृष्टी ज्यांना लाभलेली नाही अशा काही लोकांना मात्र अशा मोबदल्याची अपेक्षा असते. मी शक्य तितक्या लोकांचे अनिर्बंध प्रेम संपादन करावे, परंतु स्वत: मात्र व्यक्तीनिरपेक्ष दृष्टी ठेवून पूर्णपणे अलिप्त राहावे, हे कार्याच्या साफल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण मी जर तसा अलिप्त राहिलो नाही तर, मत्सर व कलह ही कार्याचा विध्वंस करून टाकतील. नेत्याने नेहमी व्यक्तीनिरपेक्ष दृष्टी बाळगणे आवश्यक आहे. तुम्हाला हे पटेल अशी मला खात्री आहे. अर्थात नेत्याने निर्दय बनावे, लोकांच्या श्रद्धेचा स्वत:चे हेतू साध्य करण्यासाठी उपयोग करून घ्यावा आणि मनातल्या मनात त्यांना हसत राहावे, असा माझ्या म्हणण्याचा आशय नाही. माझ्या म्हणण्याचा जो अर्थ आहे, तो माझ्या जीवनात तुम्हाला दिसेलच. तो अर्थ हा की, माझे प्रेम कितीही व्यक्तिगत असले तरी वेळ आली किंवा तसेच आवश्यक भासले तर बुद्धांच्या कथनाप्रमाणे `बहुजनहिताय बहुजनसुखाय' माझ्या हाताने आपले हृदय उपटून काढण्याची शक्ती माझ्या ठायी असली पाहिजे. प्रेमाचा वेडेपणा तर पाहिजे, परंतु त्याने निर्माण होणारे बंधन मात्र नको.' आज आपल्यापुढे ज्या प्रकारचे नेतृत्व विविध क्षेत्रात वावरताना दिसते, त्यातून निर्माण होणाऱ्या ज्या अनेक विकृती दिसतात; त्या संदर्भात विचार केला तर स्वामीजींचे हे विवेचन आणि मार्गदर्शन किती महत्वाचे आणि अनोखे आहे हे सहज जाणवावे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ३ मे २०१३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा