बुधवार, २९ मे, २०१३

संघ शिक्षा वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दरवर्षी उन्हाळ्यात होणाऱ्या संघ शिक्षा वर्गांचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. संघाचे काम करण्यासाठी कुशल कार्यकर्ते तयार करण्यासोबतच, संघाची कार्यपद्धती, तंत्र आणि भाव जागृती या अंगाने या संघ शिक्षा वर्गांकडे पाहता येते. या संघ शिक्षा वर्गांची सुरुवात १९२७ च्या उन्हाळ्यात झाली. कार्यकर्ता कोठेही जाऊन काम करू शकला पाहिजे, हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून हा उपक्रम सुरु झाला. संघात त्यावेळी मुख्यत: तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाच भरणा होता. त्यांना उन्हाळ्यात सुटी राहत असे. त्यामुळे उन्हाळा सोयीचा होता. पहिल्या संघ शिक्षा वर्गात १७ तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यावेळचे स्वरूपही वेगळे होते. त्यात सकाळ, संध्याकाळ शारीरिक कार्यक्रम, खेळ, कवायत यासोबतच दुपारी ४-४.३० तास चर्चा, गप्पागोष्टी, टिपणे असे चालत असे. आठवड्यातून तीनदा बौद्धिक वर्ग होत असे. डॉक्टर हेडगेवार कधी कधी स्वयंसेवकांना पोहायलाही घेऊन जात. जेवण व निवास मात्र प्रत्येकाचा आपापल्या घरीच राहत असे. सारेच स्वयंसेवक नागपूरचेच असल्याने वेगळी व्यवस्था करण्याची गरजच पडली नाही. तशी व्यवस्था करण्याची त्यावेळी कल्पनाही नव्हती आणि शक्तीही नव्हती. त्यावेळी चालणाऱ्या university officers training camp च्या धर्तीवर या वर्गाचे नामकरणही  officers training camp असेच झाले. त्याचे लघुरूप OTC  हेच त्यानंतर बरीच वर्षे रूढ होते. अजूनही अनेकांच्या ओठी OTC  रुळलेले आहे. आता मात्र सर्वत्र देशभरात संघ शिक्षा वर्ग असेच रूढ झाले आहे.

त्यानंतर हळूहळू या उन्हाळी संघ शिक्षा वर्गांना आकार प्राप्त होत गेला. नागपूरबाहेर पुण्याला संघ शिक्षा वर्ग सुरु झाला. कार्यकर्त्यांच्या उपलब्धतेनुसार नंतर हळूहळू देशभरात संघ शिक्षा वर्ग सुरु झाले. शारीरिक व बौद्धिक अभ्यासक्रमाची रचनाही हळूहळू झाली. त्यानंतर त्याचे प्रथम, द्वितीय, तृतिय वर्ष असे विभाजन करण्यात आले. तृतिय वर्षाचा वर्ग फक्त नागपुरात होतो. स्वयंसेवकांना संघाच्या या स्थापना भूमीतून आणि संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या कर्मभूमीतून प्रेरणा मिळावी, हा यामागील हेतू. नागपूरच्या शुक्रवारी भागातील डॉ. हेडगेवार यांचे घर, तसेच संघाचे मुख्यालय असलेले आणि दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्यापासून पुढील सर्व सरसंघचालकांचे निवासस्थान असलेले; डॉ. हेडगेवार भवन म्हणून ओळखले जाणारे; नागपूरच्या महाल भागातील संघाचे कार्यालय पाहण्याचाही एक कार्यक्रम तृतिय वर्षाच्या वर्गात असतो. शिवाय ज्या ठिकाणी हा वर्ग होतो तेथे  डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाध्याही आहेत. या साऱ्याशी असलेले स्वयंसेवकांचे भावनिक नाते लक्षात घेऊनच तृतिय वर्षाची योजना नागपुरात करण्यात आली आहे.

संघ शिक्षा वर्गाचे आयोजन जसजसे नागपूर बाहेर होऊ लागले, तसतसे प्रथम व द्वितीय वर्षाचे वर्ग प्रत्येक प्रांताचे स्वतंत्रपणे होऊ लागले. अर्थात हे टप्प्याटप्प्याने होत गेले. सगळ्या प्रांतात एकदम उन्हाळी वर्गांची सुरुवात झाली नाही. सुरुवातीला जे स्थान जवळ असेल तेथे स्वयंसेवकांनी जावे, अशी योजना होत असे. आता मात्र सगळ्या प्रांतात वर्ग होऊ लागले आहेत. साधारण २५ वर्षांपूर्वी या आयोजनात थोडा बदल करण्यात आला आणि प्रथम वर्षांच्या वर्गाचे आयोजन प्रांत स्तरावर, द्वितीय वर्षाच्या वर्गांची योजना क्षेत्रीय स्तरावर आणि तृतिय वर्षाची योजना अखिल भारतीय स्तरावर नागपूर येथे होऊ लागली. प्रथम व द्वितीय वर्षाच्या वर्गांची स्थाने दरवर्षी वेगवेगळी असतात. तृतिय वर्षाचे स्थान मात्र ठरलेले आहे. त्यात बदल होत नाही. या वर्गांच्या कालावधीतही वेळोवेळी बदल होत आले आहेत. सुरुवातीला संघ शिक्षा वर्ग ४० दिवसांचा राहत असे. मग हा कालावधी एक महिन्याचा करण्यात आला. त्यानंतर प्रथम व द्वितीय वर्षांचा कालावधी बदलून १५ दिवस व २१ दिवस करण्यात आला. याच वर्षीपासून (इ.स. २०१३) तृतिय वर्षाचा कालावधीही २५ दिवस करण्यात आला आहे.

नागपूरचा विचार करायचा तर १९८१ पर्यंत नागपूरचा प्रथम, द्वितीय व अखिल भारतीय असलेला तृतिय वर्षाचा वर्ग एकत्रच होत असत. सगळ्यांची भोजनाची व्यवस्था एकत्रच राहत असे आणि संघस्थानही एकत्रच राहत असे. निवास आणि बौद्धिक वर्ग मात्र वेगवेगळे राहत असत. १९८२ पासून मात्र तृतिय वर्षाचा वर्ग पूर्णपणे स्वतंत्र रुपात होऊ लागला. निवासासाठी इमारती नसल्याने परिसरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये निवासाची सोय राहत असे. त्या निवासस्थानाहून संघस्थानासाठी आणि भोजनासाठी येणेजाणे करावे लागत असे. अगदी प्रारंभीच्या काळात तर सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचीही निवास व्यवस्था मोहता विज्ञान महाविद्यालयातच राहत असे. बौद्धिक वर्ग आणि भोजनासाठी तट्ट्याचे मांडव असत. पंखे वगैरे नसत. मोहता विज्ञान महाविद्यालयात काही खोल्यात असलेले पंखे तेव्हाचे नागपूरचे अधिकारी स्व. विनायकराव फाटक यांनी वर्ग काळासाठी काढायला लावले होते, अशीही आठवण सांगितली जाते. नंतर हळूहळू रेशीमबागेत सुसज्ज निवासव्यवस्था उभी राहिली.

सुरुवातीला नागपूरच्या स्वयंसेवकांना शुल्क कमी भरून, घरून जेवणाचा डबा मागवण्याची सोय होती. संबंधित शाखांचे स्वयंसेवक रोज डबे पोहोचवून देत असत. आर्थिक दृष्ट्या दुर्बल स्वयंसेवकांनाही वर्गापासून वंचित राहावे लागू नये म्हणून ही सोय होती. काही कारणांनी नंतर ही सवलत बंद करण्यात आली. एखादा कार्यकर्ता चांगला असेल आणि त्याची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसेल तर त्याचे शुल्क गोळा करून त्याला वर्गाला पाठवण्याचे प्रसंगही नागपुरात आणि देशभरातही घडले आहेत. एक स्वयंसेवक अतिशय गरीब होता, पण त्याची इच्छा होती वर्गाला येण्याची. त्यावेळी डॉ. हेडगेवार यांनी त्याला वर्गातील मोकळ्या वेळात शिक्षार्थ्यांच्या गणवेशाच्या इस्त्रीचे काम करण्यास परवानगी दिली. त्या स्वयंसेवकाने आनंदाने ते काम केले आणि त्यातून जमा झालेल्या पैशातून वर्गाचे शुल्क भरले, अशीही एक आठवण जुने लोक सांगतात.

संघ शिक्षा वर्गाच्या स्वरुपासोबतच त्यातील शारीरिक व बौद्धिक कार्यक्रमातही वेळोवेळी बदल होत आले आहेत. पूर्वी सर्वत्र आखाड्यांमध्ये प्रचलित असलेले खड्ग, छुरिका आदी प्रकार होते. वेत्रचर्म होते. आता ते प्रकार नाहीत. योगासन, योगचाप, नियुद्ध हे प्रकार बरेच उशिरा शारीरिक अभ्यासक्रमात समाविष्ट झाले. बौद्धिक वर्गांचे विषय काळानुरूप बदलले आहेत. पूर्वी प्रवचन हा भाग राहत नसे. आता त्याचा समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीला संघाबाहेरील मान्यवरांनाही बौद्धिक वर्गासाठी बोलावले जात असे. हळूहळू अभ्यासू कार्यकर्ते तयार होऊ लागले, संघाचा व्याप वाढला, अनुभव वाढू लागला; तसे हा प्रकार बंद झाला. आता प्रवचनांसाठी मात्र बाहेरील मान्यवरांनाही बोलावले जाते.

विविध प्रयोगही वर्गात केले जातात. एखादा दिवस मौन पाळले जाते. म्हणजे, सारी कामे न बोलता करायची. अशा वेळी, सुमारे हजारेक स्वयंसेवक त्या परिसरात असूनही एकदम शांतता असते. वस्तू भांडारातून आपल्याला हवी ती वस्तू घ्यायची. त्याचे पैसे तेथील पेटीत आपणच ठेवायचे. जो काही हिशेब असेल तो आपणच नीट पार पाडायचा. कोणी `दुकानदार’ न राहता व्यवहार करायचे. असे प्रयोग केले जातात. सेवा हा विषयही त्या मानाने नवीन असून, त्याची तात्त्विक बैठक आणि प्रत्यक्ष कार्यानुभव या दोन्हीचा समावेशही वर्गात असतो.

अनेक वर्षे रेशिमबागचा वर्ग पार पाडण्याची जबाबदारी नागपूरच्या स्वयंसेवकांवरच राहत असे. शारीरिक शिक्षक, चर्चा प्रवर्तक, व्यवस्था सांभाळणारे स्वयंसेवक सारे नागपूरचे. नागपूरबाहेरील वर्गातही आवश्यकतेनुसार नागपूरहून स्वयंसेवक पाठवले जात. बाहेरील प्रांतात शिक्षक, मुख्य शिक्षक म्हणून अनेक वर्षे गेलेले स्वयंसेवक आजही नागपुरात आहेत. आता मात्र सर्वत्र स्वयंसेवक उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर नागपूरच्या वर्गातही मुख्य शिक्षक, शिक्षक वेगवेगळ्या ठिकाणांहून येत असतात. एका अर्थाने नागपूरचा भार किंचित हलका झाला आहे. अगदी अलीकडेपर्यंत सर्व वयोगटातले स्वयंसेवक या वर्गात राहत असत. आता मात्र ४० वर्षावरील ज्या स्वयंसेवकांनी संघ शिक्षा वर्गाचे शिक्षण पूर्ण केलेले नाही, त्यांच्यासाठी स्वतंत्र वर्गांची योजना करण्यात आली आहे.

तृतिय वर्षाचा वर्ग हा अखिल भारतीय स्वरूपाचा असल्याने सगळ्या प्रांतांचे, विविध भाषा बोलणारे स्वयंसेवक त्यात असतात. गणांची रचना करताना, प्रत्येक गणात जास्तीत जास्त विविधता आणण्याचा प्रयत्न करण्यात येतो. विविध भाषांचे स्वयंसेवक एकत्र राहतात. भाषा कळत नसली तरीही त्यांच्यात व्यवहार तर होतातच, पण स्नेह आणि सौहार्दही निर्माण होते. अनेक जण दुसऱ्या भाषा शिकण्याचा प्रयत्नही करतात. वेगवेगळ्या भाषांची गीते गायली जातात. एखादी भाषा येत नसतानाही त्या भाषेचे गीत मात्र पाठ झालेले असते. भाषांबद्दलचा टोकदारपणा गळून पडणे आणि आपुलकी वाढीस लागणे हे या वर्गात गेली अनेक दशके सहजपणे होत आले आहे. ज्या प्रांतात हिंदी प्रचलित नाही, त्या प्रांतातील स्वयंसेवकांसाठी बौद्धिक वर्गाचा अनुवाद सांगितला जातो. हाच भाव भोजनाच्या बाबतीतही पाहायला मिळतो. प्रत्येक प्रांतातील आहार अन त्याच्या सवयी वेगळ्या असतात. पण सगळे स्वयंसेवक वर्गात जी व्यवस्था असेल त्यानुसार सहज व्यवहार करतात. नागपूरचा उन्हाळा हा तर सगळ्या देशातच प्रसिद्ध आहे. पण भर मे महिन्यात सूर्य आग ओकत असताना स्वयंसेवक धुंदीत राहत असतात. अर्थात वैद्यकीय सेवा उपलब्ध असतेच. महिनाभराचा हा वर्ग ही एक प्रकारची तपश्चर्याच असते. अर्थात नुसते काही गोष्टींचे शिक्षण देणे हा केवळ या वर्गाचा हेतू नसून संघाच्या कामासाठी आवश्यक असा कार्यकर्ता निर्माण करणे हा उद्देश असल्याने, हे तप स्वाभाविकच ठरते.

संघ शिक्षा वर्गांचा विचार करताना तीन-चार वर्गांचा विशेष उल्लेख आवश्यक ठरतो. एक म्हणजे, १९४० चा पुण्याचा संघ शिक्षा वर्ग. या वर्गातच सर्वप्रथम आज प्रचलित असलेली संघाची संस्कृत प्रार्थना म्हणण्यात आली. तोवर एक हिंदी श्लोक व एक मराठी श्लोक असलेली प्रार्थनाच शाखा, शिबिरे, संघ शिक्षा वर्ग सर्वत्र म्हटली जात असे. दुसरा उल्लेख त्याच वर्षीच्या नागपूरच्या वर्गाचा करावा लागेल. कारण त्याच वर्गात प्रथम देशाच्या सगळ्या प्रांतातून स्वयंसेवक सहभागी झाले होते. अन डॉ. हेडगेवार यांनी त्यांचे ऐतिहासिक आणि अखेरचे भाषणही याच वर्गात केले होते. त्यात `मी आज संपूर्ण भारताचे लघुरूप माझ्यापुढे पाहत आहे,’ असे उद्गार त्यांनी काढले होते. त्यानंतर १९७३ च्या वर्गाचा उल्लेख करावा लागेल. हा वर्ग सुरु असतानाच, दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे देहावसान झाले होते. उल्लेखनीय हे की, उरलेला साधारण एक आठवड्याचा वर्ग त्यानंतरही पूर्ण करण्यात आला होता. फक्त अंत्यसंस्काराचा एक दिवस वर्गाचे दैनंदिन कार्यक्रम स्थगित होते.

संघावरील पहिल्या दोन्ही बंदी नंतरच्या वर्षी संघ शिक्षा वर्ग झाले नव्हते. बंदीची वर्षे अन त्यानंतरचे वर्ष एवढा अपवाद वगळला तर १९२७ पासून सुरु झालेले हे वर्ग अखंडपणे सुरु आहेत. गांधीजींच्या हत्येनंतर जी बंदी आली होती, त्याने संघाचे कार्य खूपच विस्कळीत झाले होते. खूप पडझड झाली होती. मानसिकताही खचली होती. पुन्हा सारे सावरून धरण्यासाठी खंबीर कार्यकर्त्यांची गरज होती. त्यामुळे १९५१ साली वर्षभर नागपुरात संघ शिक्षा वर्ग झाले होते. एक वर्ग संपला की दुसरा, अशी आठवण सांगितली जाते. त्याचा नेमका तपशील मात्र उपलब्ध नाही.

१९४०    च्या नागपूरच्या वर्गात देशभरातील १४०० स्वयंसेवक सहभागी झाले होते. देश विभाजनाच्या वेळी १९४७ साली पंजाबच्या संगरुर व भोगपूर या दोन ठिकाणी वर्ग झाले होते. यात २५८६ स्वयंसेवक सहभागी झाले होते. यात आज पाकिस्तानात असलेल्या लाहोर शहरातील अनेक स्वयंसेवकही होते. १९४७ च्या उन्हाळ्यात त्या भागात जी परिस्थिती उत्पन्न झाली होती त्यामुळे हे वर्ग १० दिवस आधीच संपवण्यात आले होते. प्रत्यक्ष लाहोर शहरात १९३८ व १९३९ साली संघ शिक्षा वर्ग आयोजित करण्यात आले होते. १९३८ साली डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजी त्या वर्गाला गेले होते. १९३९ साली मात्र डॉ. हेडगेवार प्रकृती बरी नसल्याने लाहोरला गेले नव्हते, पण गुरुजी गेले होते. १९७१ साली १८ स्थानी वर्ग होते. गेल्या वर्षी ५२ स्थानी वर्ग झाले होते आणि त्यात साडेसोळा हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते. वर्गांचा व्याप खूप वाढला, कालावधी मात्र तेवढाच (एप्रिल, मे, जून) आहे, प्रत्येक ठिकाणी पुरेसा वेळही दिला गेला पाहिजे; यामुळे सरसंघचालक आणि सरकार्यवाह सगळ्या वर्गांना भेटी देऊ शकत नाहीत. अर्ध्या वर्गांना सरकार्यवाह भेट देतात तर, अर्ध्या वर्गांना सरसंघचालक भेट देतात. नागपूरच्या तृतिय वर्षाच्या वर्गात मात्र दोन्ही सर्वोच्च अधिकारी आणि सगळे अखिल भारतीय अधिकारी भेट देतात. एक अखिल भारतीय अधिकारी पूर्ण दिवस वर्गात उपस्थित असतात. सगळ्या स्वयंसेवकांशी संपर्क, संवाद व्हावा यासाठी ही योजना करण्यात आली आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा