रविवार, २३ जून, २०१३

पैसा प्या पैसा

केदारनाथ दुर्घटनेची भीषणता छोट्या पडद्यावरून सगळे जग पाहत आहे. यातील एका व्यक्तीची आपबिती फार विदारक होती. त्या माणसाचा मुलगा पाणी पाणी करत होता. पण पाणी मिळत नव्हते. जिथून जसे शक्य होईल तसे पाण्याचे थेंब तो मुलाच्या तोंडात टाकत होता. त्याने सांगितले की, मरून पडलेल्या व्यक्तीची बनियन काढून ती मुलाच्या तोंडात पिळली. पण काही साध्य झाले नाही. अखेर पाणी पाणी करत त्याच्या मुलाने प्राण सोडला. त्याचं दु:ख आपण समजून घेऊच शकत नाही. आयुष्यभर आता ही घटना त्याचा पिच्छा पुरवणार आहे. पण आमच्यासाठी या घटनेचा काही बोध आहे की नाही? खरे तर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील दु:खाचे, अपघाताचे, दुर्दैवाचे प्रसंग बाकीच्यांसाठी काही शिकवण, काही बोध देऊन जातात. दुर्दैवाने आम्हाला अशा प्रकारे शिकण्याची सवय लागलेली नाही.

वरील प्रसंगातून पाण्याकडे पाहण्याची आमची दृष्टी, पाण्याविषयी आमची भावना, पाणीविषयक आमचे वर्तन हे आम्ही ठीकठाक करून घ्यायला हवे. हा विषय नवीन आहे असे नाही. पुष्कळदा त्याची चर्चा होते, अन वारंवार ती व्हायलाही हवी. पुढील महायुद्ध झाले तर ते पाण्यावरुनच होईल हेही सांगून झाले आहे. पण आम्ही पाण्याचा विचार करायला तयार नाही. आम्ही पैसा मोजतो, म्हणून वाटेल तेवढे आणि वाटेल तसे पाणी वापरण्याची आपल्याला मुभा आहे, ही वृत्ती टाकून देण्याची मात्र आमची तयारी नसते. वरील घटनेतील व्यक्तीच्या खिशातील पैशाचा, त्याला काहीही उपयोग झाला नाही. पैसा हे विनिमयाचे साधन आहे. पैसा काहीही तयार करू शकत नाही आणि पैसा कोणत्याही गोष्टीचा, गरजेचा पर्याय होऊ शकत नाही. या सगळ्याची जाणीव करून देणाऱ्या घटना आमच्या आजूबाजूला घडत नाहीतच असे नाही, पण आमची गुर्मी मात्र उतरायला तयार नाही. मोठमोठी शहरे, उद्योग पाण्याचा जो वापर करतात तो तर गुन्हेगारी स्वरूपाचा म्हणावा असा आहे. आम्ही जमिनीत पाणी मुरवत नाही. उपसा मात्र सतत सुरूच. सहज पाणी मुरावे यासाठी जमीन मोकळी ठेवायला आमची तयारी नाही. सिमेंट कोन्क्रीटचा एक भयानक भस्म्या रोग आम्हाला झाला आहे. ज्या मातीवर आम्ही आणि आमचा सारा सरंजाम उभा आहे त्या मातीविषयी अपार घृणा आम्ही बाळगतो.

पाण्याचा जपून आणि आवश्यक अन योग्य वापर तर सोडाच; पण रोज गाड्या धुणे, फरश्या धुणे, आजचे पाणी उद्या ओतून देणे; असे एक ना अनेक प्रकार. अतिशय थोडा पाऊस पडणाऱ्या राजस्थानच्या वाळवंटात पाण्याचे नियोजन आणि पाण्याचा वापर कसा होत असे, याचा इतिहास समजून घेण्यासारखा आहे. `राजस्थान की रजत बुन्दे' हे अनुपम मिश्रा यांचं पुस्तक सगळ्यांनी वाचावं असं आहे. त्यातून पाण्याची एक दृष्टी नक्कीच तयार होईल. पण अशा साऱ्या `निरर्थक' गोष्टींसाठी आमच्याकडे वेळ कुठे आहे?

केदारनाथाने एक जबर तडाखा लावून अनेक गोष्टी शिकण्याची, समजून घेण्याची संधी आम्हाला दिली आहे. वांड मुलाला पालक वा गुरुजन जसे कधीकधी जोरदार फटका देऊन वठणीवर आणण्याचा प्रयत्न करतात, तसेच या जगतपालकाने केले असावे. आम्ही आमचा वांडपणा टाकून देणार का, हा प्रश्न आहे. नाही तर उद्या, पाण्याऐवजी `पैसा प्या पैसा' असे म्हणण्याची पाळी येईल.

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, २४ जून २०१३

1 टिप्पणी: