अडवाणींनी राजीनामा दिला आणि अनेक चर्चा सुरु
झाल्या. अनेकांना तर धरबंदच राहिला नाही. मनात प्रश्न आला, अडवाणी खरंच
वाईट आहेत का? समाजाचीही गंमत असते. एखाद्याला डोक्यावर घेईल तर इतके की
विचारू नका. आणि एखाद्याला डोक्यावरून खाली आपटेल तेही तसेच अतिरेकी.
अडवाणींचे कर्तृत्व, त्यांनी खाल्लेल्या खस्ता वगैरे मग समाजाला आठवत
नाहीत. त्याच्याशी त्याला फारसे देणेघेणे नसते. आज तो नरेंद्र मोदींवर
स्वार झालेला असतो. कोणे एके काळी समाज अडवाणींवर असाच स्वार झाला होता
याचा त्याला सहज विसर पडतो. अजून १५-२० वर्षांनी मोदी अडवाणींच्या मार्गाने
तर जाणार नाहीत ना, ही शंकाही त्याला स्पर्श करत नाही. भस्मासुराची
पुराणकथा; नीतिकथा वा बोधकथा म्हणून न पाहता `पुराणातली वांगी' म्हणून
सोडून देतो. आणि तेच ते पुन्हा पुन्हा घडूनही समाज मात्र जिथल्या तिथेच
राहतो.
याचा अर्थ अडवाणींचे सारे काही बरोबर आहे असा नक्कीच नाही.
त्यांनी आता निवृत्त होऊन `तुका म्हणे आता, उरलो उपकारापुरता' असेच वागायला
हवे. अजूनही सत्तेला चिकटून राहणे, उच्च पदाची आकांक्षा बाळगणे अन
त्यासाठी बटबटीत राजकारण करणे नक्कीच अयोग्य आहे. पण ही भूमिका घेताना
त्यामागील भाव, त्याचा आशय आणि अभिव्यक्ती कशी होते हे महत्वाचे आहे.
त्यांच्याबद्दलचा उपेक्षेचा, उपहासाचा, तिरस्काराचा भाव नक्कीच योग्य
म्हणता येणार नाही. तसेच मोदींसाठी त्यांनी दूर व्हावे हे देखील बरोबर
नाही. पक्षासाठी, देशासाठी मोदींनी नेतृत्व करावे हा एक वेगळा मुद्दा आहे.
आणि अडवाणींची वर्तमान भूमिका काय असावी हा वेगळा मुद्दा आहे.
खरं
तर अशी संघर्षाची स्थिती का निर्माण होते? घरात सासूची सत्ता चालावी की
सुनेची असा हा मुद्दा आहे. वर्चस्व गाजवण्याची लालसा, निर्णयाचे अधिकार
माझ्या हाती असावेत ही भूमिका, लाभ-हानीची गणिते, यातून संघर्ष उत्पन्न
होतात. पण निर्णय तर घ्यावे लागतात, कृती तर करावी लागते; प्रत्येकाची
भूमिका वेगवेगळी असते; मग अशा वेळी काय करायचे? ऐकायचे कोणाचे, माझे की
तुझे? याचे की त्याचे? मोठ्यांचे की लहानांचे? तरुणांचे की म्हातार्यांचे?
पुरुषांचे की बायकांचे? पैसेवाल्यांचे की गरिबांचे? आपण मत आणि निर्णय
यांची गल्लत करतो. मत प्रत्येकाला असू शकते. आसवेही. पण निर्णय ही वेगळी
आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असते. निरीक्षण, विश्लेषण, परिणाम, व्यवहार,
भावना, लाभ आणि हानीची तुलना; या आणि अशा अनेक गोष्टी त्यात असतात. पण
आपल्याकडे यासाठी फुरसद व इच्छा दोन्हीही नसते. आम्हाला २+२= ४ असे सोप्पे
उत्तर हवे असते. जीवन व्यवहार असा नसतो, हे आपण लक्षात घेत नाही. एखादा
निर्णय वा एखादी कृती करायची वा नाही हे; मत वा वाटणे यावर न बेतता; त्याचे
गुंतागुंतीचे निकष समजून घ्यायला हवेत. हे शाळा, महाविद्यालयात शिकवता येत
नाहीत. ते जीवन व्यवहारातूनच शिकावे लागतात. बहुतेक वेळा स्वत:चे स्वत:च.
यालाच समजूतदारी आणि परिपक्वता म्हणतात. ती असली की मग अनेक गोष्टी सुरळीत
होतात. राजकारणात, समाजकारणात, अर्थकारणात आणि कुटुंबातही. नि:स्वार्थता,
दुसऱ्याच्या भूमिकेत शिरून विचार करण्याची वृत्ती, `मी' बाजूला काढून
ठेवण्याची तयारी, या त्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत. हे जसे समाजाला लागू
होते तसेच व्यक्तीलाही.
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १३ जून २०१३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा