शनिवार, ८ फेब्रुवारी, २०१४

काही अनुभव आणि प्रसार माध्यमे

गेल्या आठवड्यात `इंडिया टुडे’च्या संपादक मंडळातील एका ज्येष्ठ संपादकांची भेट झाली. गप्पांच्या ओघात त्यांनी एक फार छान गोष्ट सांगितली. गुजरातमध्ये संत मुरारीबापू यांच्या रामकथेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी त्यांना आमंत्रण होते आणि ते त्याला गेले होते. त्यानंतर श्री. मुरारीबापू यांच्या गावीही ते गेले. त्यांनी सांगितले बापूंची राहणी अतिशय साधी आहे. त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ त्यांच्या शेतीवर चालतो. बापू देशविदेशात रामकथा, भागवतकथा करतात त्यातून उभा राहणारा पैसा, ज्या कामासाठी ती कथा आयोजित केली असेल त्यासाठी देऊन टाकतात. स्वत:ला काहीही नाही. एकदा कोणीतरी त्यांना म्हणाले, `बापू तुम्ही समाजाला चांगलं करण्याचा प्रयत्न करता. पण तुमच्या या भागातच अस्वच्छता खूप आहे. लोक उघड्यावरच शौचाला जातात. त्यासाठी तुम्ही काय करणार?’ बापूंनी त्याला धन्यवाद दिले आणि शौचालये उभारण्यासाठी रामकथा केली. थोडेथोडके नव्हे, तब्बल पाच कोटी रुपये गोळा झाले. श्री. मुरारीबापूंनी ते सगळे शौचालयांसाठी देऊन टाकले. आज त्या भागात कुठेही अस्वच्छता दिसत नाही.

`इंडिया टुडे’च्या ज्येष्ठ संपादकाने ही माहिती दिली. त्यामुळे त्याचा खरेखोटेपणा, त्याची अधिकृतता यावर शंका घेण्याचे कारण नाही. त्यांनी सांगितली असल्याने ती प्रचारकी थाटाची असण्याचेही कारण नाही. सहज काही महिन्यांपूर्वी झालेला वाद आठवला. नरेंद्र मोदी यांच्या एका विधानानंतर `राम की शौचालय’ असा एक वाद आमच्या सर्वतंत्रस्वतंत्र इलेक्ट्रोनिक प्रसार माध्यमांनी रंगवला होता. मुळात राम आणि शौचालय दोन्हीही आवश्यक आहेत. शरीरशुद्धीसाठी शौचालय आणि मनशुद्धीसाठी राम हेच हिंदुत्व आहे. पण शेंबड्या पोराला जे समजू शकते तेही समजण्याची क्षमता आज इलेक्ट्रोनिक प्रसार माध्यमांनी घालवलेली आहे. हिंदू धर्म, साधुसंत यांच्याबद्दल टीकाटिप्पणी करायला ही माध्यमे चढाओढ करतात. त्यातील खरेखोटेपणा, न्याय-अन्याय, हेतूंची शुद्धाशुद्धता काही क्षण बाजूला ठेवली तरी त्यांच्या मनातील आणि व्यवहारातील पक्षपात मात्र नक्कीच लपून राहण्यासारखा नाही. हा पक्षपात नसता तर `इंडिया टुडे’च्या संपादकांनी जी माहिती सांगितली तशा प्रकारची माहिती, तशी कामे समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या माध्यमांनी आवर्जून प्रयत्न केले नसते का? हिंदू धर्म, संस्कृती, समाज, संत यांचे एकांगी काळे चित्र निर्माण करण्याचे अन्यथा काय प्रयोजन असेल?
*********************************
अरुणाचल प्रदेशातील एका तरुण विद्यार्थ्याची काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत हत्या झाली. तो तरुण देखील सामान्य नव्हता तेथील आमदाराचा मुलगा होता. त्या प्रकरणाची बरीच चर्चा झाली. मतमतांतरे व्यक्त झालीत. सूचना करण्यात आल्या. राजकारणही झाले. देशात अजूनही वंशभेद आहे, अशीही टीका झाली. हे सारे राज्यघटनेच्या विपरीत असल्याचे तुणतुणेही वाजवून झाले. आपण खूप मोठे काम केले असे समाधान मानून घेत, आता ही समस्या संपली या कृतार्थतेने सगळे आपापल्या कामाला लागले. मनात प्रश्न येतो, या समस्या अशा संपतात का? याच्यावरील उपाय म्हणजे कायदा करणे असते का? आजकाल तर काहीही झाले की कायदा करा, अधिक कडक कायदा करा, कायद्यात सुधारणा करा, कायद्याची अंमलबजावणी करा. बास. आटोपले सगळे. खरे तर जगातल्या सगळ्याच्या सगळ्या समस्या या माणसाच्या क्षुद्रत्वाच्या, माणसाच्या कोतेपणाच्या, माणसाच्या लघुतेच्या समस्या आहेत. माणसाची व्यापकता, विशालता, उन्नत अवस्था हेच त्यावरील खरे उत्तर आहे. पण, व्यवहारातील व्यामिश्रता लक्षात घेता त्यासाठी कायदे वगैरेसारखे उपाय आवश्यक असतात. मात्र तेवढ्याने भागत नाही. माणसाचे क्षुद्रत्व, कोतेपणा आणि लघुता दूर करण्याचे प्रयत्न सतत चालू राहणे आवश्यक असते. त्याशिवाय कायदे वगैरेंचाही उपयोग नसतो. परंतु ही लघुता केवळ बोलून, चर्चा करून, लिहून, वाद घालून, सांगून, शिक्षेची भीती दाखवून किंवा इच्छाचिंतनाने दूर होत नाही. त्यासाठी शरीराला, मनाला, बुद्धीला, विचारांना, भावनांना हळूहळू तसे वळण लावावे लागते, लागावे लागते. ही एक दीर्घ, वेळखाऊ, कष्टीक, गुंतागुंतीची, वाटावळणांची, चढउताराची प्रक्रिया असते. त्यासाठी धीर, चिकाटी, शांतपणे काम करण्याची वृत्ती हे आवश्यक असते. आपल्याला दिसणाऱ्या आणि जाणवणाऱ्या अपार विविधतेसह व्यावहारिक जीवन जगतानाच, मनात मात्र आपण एक आहोत ही भावना निरंतर जोपासणे ही काही खायची बाब नाही. त्यासाठी अथक परिश्रम हवेत, प्रयत्न हवेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि समविचारी संघटनांनी गेली अनेक दशके अरुणाचल प्रदेशासह संपूर्ण ईशान्य भागात यासाठी अपार आणि अथक प्रयत्न आजवर केले आहेत, अजूनही करीत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वनवासी कल्याण आश्रम, विवेकानंद केंद्र, सेवा भारती, राष्ट्र सेविका समिती, विश्व हिंदू परिषद, संस्कार भारती आणि अन्यही अनेक संस्था-संघटना तेथे काम करीत आहेत. शिक्षण, आरोग्य, संस्कार, संस्कृतीसंवर्धन अशी अनेक कामे चालतात. शाळा, महाविद्यालये, आरोग्य केंद्रे, वसतिगृहे, विविध उत्सव महोत्सव, उपक्रम सतत सुरु असतात. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तर कित्येक वर्षांपूर्वीच `आंतरराज्य छात्र जीवन दर्शन प्रकल्प’ सुरु केला होता. ईशान्य भारताच्या विविध राज्यांमधील विद्यार्थ्यांना काही दिवस देशाच्या अन्य राज्यांमध्ये फिरवून आणायचे. तेथे स्थानिक कार्यकर्त्यांच्या घरी त्यांचा निवास, भोजन आदींची व्यवस्था करायची. त्यांना तेथील जीवनाची ओळख करून द्यायची. तसेच अन्य राज्यातील विद्यार्थांनी ईशान्य भारतात जाऊन यायचे, तेथील समाज, जगणे पाहायचे, समजून घ्यायचे; असा तो उपक्रम. या उपक्रमात हजारो तरुण-तरुणी सहभागी झाल्या आहेत. गेली काही वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ईशान्य भारतातील `सात भगिनी’ म्हणून ओळखली जाणारी राज्ये दत्तक घेतली आहेत. ज्या प्रांताने जे राज्य दत्तक घेतले आहे त्या प्रांतातील अधिकारी व कार्यकर्त्यांनी दत्तक घेतलेल्या राज्यात दरवर्षी जायचे. भेटीगाठी, माहितीचे आदानप्रदान, समस्या आणि त्या सोडवण्याविषयी चर्चा असा हा उपक्रम. तेथील कला संस्कृतीच्या संवर्धनासाठी संस्कार भारतीने सुरु केलेला ब्रम्हपुत्र महोत्सव लक्षणीय असतो. देशाच्या विविध भागात ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे चालवण्यात येतात. राष्ट्र सेविका समितीतर्फे तर खास त्या भागातील मुलींसाठी वसतिगृहे चालवली जातात. जेथे जाण्यासाठी रेल्वेने तीन दिवस लागतात, इतक्या दूरच्या भागातील लोक आपल्या छोट्या छोट्या मुलीदेखील विश्वासाने या वसतिगृहात पाठवतात. त्या भागात या संघटनांनी केलेल्या कामाने हा विश्वास निर्माण झाला आहे.

वेगळेपणाची, अलगतेची भावना दूर व्हावी, जवळीक वाढावी, जीवनस्तर उंचावावा, भावनिक ऐक्य वाढीस लागावे याच उद्देशाने ही कामे चालतात. देशाच्या वेगवेगळ्या भागातील महिला-पुरुष संघ आणि अन्य संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन त्याच भागात जाऊन स्थायिक झाले आहेत. नुसते स्थायिक झालेले नाहीत तर तेथीलच झालेले आहेत. त्यात डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, अभियंते, गृहिणी असे सारेच आहेत. काही कार्यकर्त्यांच्या तर दुसऱ्या, तिसऱ्या पिढ्या तिथे आहेत. हे लोक तेथील भाषा शिकले, तेथील राहणी, खानपान त्यांनी आत्मसात केले. काहींची तिकडील मुलामुलींशीच लग्नेही झाली आहेत. हे सारे सहज मात्र झालेले नाही. कार्यकर्त्यांनी त्यासाठी बलिदानही दिलेले आहे. तेही अनामपणे. नागपुरात तर अशाच एका कार्यकर्त्याच्या नावाने व्याख्यानमाला चालते. नारायण भिडे असे त्या तरुण कार्यकर्त्याचे नाव. ऐन विशीत समाजसेवेच्या भावनेने भारावून जाऊन नारायण तेथे गेला. देशविरोधी शक्तींनी आपला डाव साधला आणि एक दिवस सकाळी नारायण विहिरीत मृतावस्थेत आढळला. त्याच्या या बलिदानासाठी संघाने वा त्याच्या घरच्यांनी कधीही काहीही मागितले नाही. घरच्यांनी संघही सोडला नाही. उलट त्याच्या नावाने समाज जागरणासाठी व्याख्यानमाला सुरु केली. संघाची ही वृत्ती आहे, स्वयंसेवकांचा हा पिंड आहे. देशभक्ती, समाजसेवा हा व्यापार नसतो ही त्यांची भावना असते. ऐक्य म्हणजे काय, एकता कशी असते, ती कशी निर्माण होते, परस्पर विश्वास कसा निर्माण करायचा असतो या साऱ्याचा हा वस्तुपाठ आहे. मिझोराम आणि त्रिपुरा या भागातील रियांग जमातीच्या समस्या आणि त्यांचे विस्थापन समजून घेण्यासाठी १७-१८ वर्षांपूर्वी सुमारे आठवडाभर त्या भागात गेलो असताना या सगळ्याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलेला आहे. दुर्दैव एवढेच की त्याबद्दल लिहिण्यास मात्र मला त्यावेळी माझ्या वरिष्ठांनी मनाई केली होती. संघ काही चांगले करतो यावर विश्वास ठेवायचा आणि त्याला प्रसिद्धी द्यायची हे कसे शक्य आहे? प्रसार माध्यमांची १७-१८ वर्षांपूर्वीची वृत्ती आजही कायम आहे. उलट वाईट अर्थाने त्यात वाढच झाली आहे.

यावर लगेच प्रश्न विचारला जाऊ शकेल की, असे आहे तर त्या भागातून भाजपचा एकही खासदार का निवडून येत नाही? खरे तर एवढे काम असूनही भाजपचा एकही खासदार निवडून येत नाही यातूनच या प्रयत्नांमागील निखळ हेतू स्पष्ट होतो. सेवा करायची, ऐक्य भावना निर्माण करायची आणि त्याचा लाभ ज्यांना मिळतो त्यांच्यावर आपली भूमिका लादून त्याला त्याप्रमाणे वागायला लावायचे हे संघ आणि समविचारी संघटना करीत नाहीत. शिक्षण, आरोग्य, निवास आदी सोयी करायच्या, आपुलकी निर्माण करायची आणि मनात राजकारण ठेवायचे ही त्यांची पद्धत नाही. पण जे मनाने आणि हेतूने इतके निखळ नसतात त्यांना हे समजूही शकत नाही आणि त्यांचा त्यावर विश्वासही बसू शकत नाही. प्रसार माध्यमांबद्दल तर बोलायलाच नको.

- श्रीपाद कोठे
- नागपूर
- शनिवार, ८ फेब्रुवारी २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा