बुधवार, ७ मे, २०१४

प्रश्नांकित मातृत्व

पुत्र हा कुपुत्र असू शकतो, पण माता ही कुमाता असणे शक्यच नाही; हे आदि शंकराचार्यांचं वचन खोटंच ठरवण्याची जणू चढाओढ लागली आहे की काय अशी शंका घ्यावी, अशा घटना एकापाठोपाठ एक घडत आहेत. शंकराचार्यांचं वचन हे भक्तीभावनेपोटी थोडं अतिशयोक्त स्वरूपाचं आहे हे आपल्याला मान्य असलं तरीही त्यातील आशयाशी आपण सहमत असतोच. नव्हे प्रत्येकाने असायलाच हवे. जगभरचाच हा अनुभव आहे. माता या गोष्टीबाबत जगभरातच एक आदराची, श्रद्धेची भावना दिसते. तरीही कैकेयीला `माता न तू वैरिणी' असं म्हणणारा भरतसुद्धा आपल्या परिचयाचा असतो. तरीही `आई' याविषयी मन कलुषित वा संभ्रमित करेल एवढी शक्ती त्यात नसते. गेल्या दोन दिवसातील दोन घटनांनी मात्र `मातृत्व' प्रश्नांकित केलेलं आहे. एक घटना आहे जर्मनीतील आणि एक आपल्याच देशातील.

जर्मनीत एका २० वर्षीय तरुणीने जन्म दिलेल्या आपल्याच बाळाला; त्याच्या जन्मानंतर काही तासातच चाकूने कापून यमसदनी धाडले. कारण काय तर आता त्या बाळातच गुंतून पडावे लागेल आणि आपल्याला मित्र मैत्रिणींसमवेत क्लब, पब आणि पार्ट्यांना जाता येणार नाही ही तिची भावना. ही घटना केवळ आपल्यासारख्या बुरसटलेल्या भारतीय लोकांनाच धक्का देणारी म्हणावी का? तर तसे नसून ही घटना इतकी धक्कादायक आहे की प्रत्यक्ष जन्मदात्या मुलीच्या आईने या प्रकारामुळे सैरभैर होऊन आत्महत्या केली. प्रगत जर्मनीतील २० वर्षांच्या, स्वतंत्र जीवन जगणाऱ्या मुलीला स्वत:च्या प्रत्येक कृतीचा अर्थ आणि परिणाम समजत नसेल? परंतु तरीही त्या कृती नियंत्रित करता न येणे हा महत्वाचा प्रश्न आहे.

`कळते पण वळत नाही' अशी आज जगाची गत आहे. `सिगारेट पिणे आरोग्यास हानिकारक आहे' असा इशारा नजरेआड करून सिगरेटचा मनसोक्त आस्वाद घेणे आणि जर्मनीतील ताजी घटना एकाच स्वरूपाच्या आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. एकूणच जीवनाच्या तळाशी न जाता तुटक तुटक विचार करणाऱ्या तथाकथित आधुनिक विचारकांना हे पटणार नाही. एकूणच माणूस काय किंवा अन्य काहीही काय (वस्तू, व्यक्ती, घटना, विचार, भावना वगैरे काहीही) हे एखाद्या कारखान्यात विशिष्ट साचातून तयार केलेले ठोकळे आहेत असेच त्यांना वाटते. त्यामुळे त्यांचा विचार न करता पाहिले तर, सिगारेट पिणे आणि नवजात अर्भकाचा खून करणारी माता या दोन्ही घटनांच्या मुळाशी एकच तत्व सापडते; ते म्हणजे मनावर नियंत्रण नसणे. जगातील आजच्या असंख्य समस्यांचा ल.सा.वि. काढला तर तो एकच असेल, मनावर नियंत्रण नसणे. `मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक' वगैरे हमरस्त्यावरील पाट्यांचेही दिवस आता सरले आहेत. अनिर्बंधता हाच `आज'चा मूलमंत्र झाला आहे. तुम्ही अनिर्बंध नसाल तर तुम्ही कालचे. ही अनिर्बंधता सारं काही गिळंकृत करीत निघाली आहे. तिची मजल आता कुठवर पोहोचली आहे हे दर्शवणारी जर्मनीतील ही घटना आहे.

आम्हाला स्वातंत्र्य अनिर्बंध हवं, (अर्थात स्वत:च, दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याशी घेणेदेणे नाही.) आम्हाला सुख अनिर्बंध हवं. सुख म्हणजे- पैसा, वस्तू, सत्ता, लैंगिकता, नावीन्य, शरीराला धक्काही न लागणे, जमीनजुमला वगैरे वगैरे वगैरे... सुख अनिर्बंध म्हणजे हे सगळंही अनिर्बंध हवं. मनोभावांची पूर्तता अनिर्बंध हवी. समाजासाठी वगैरे काही करण्याची इच्छा असणारे आणि प्रयत्न करणारे यांनाही हेच सारे अशाच अनिर्बंध पद्धतीने हवे, फक्त ते आपल्यासोबत सगळ्यांसाठी हवे एवढेच. हेच जगण्याचे प्रयोजन. त्यामुळे त्यासाठी काहीही करायला तयार असलेच पाहिजे. आणि काहीही करायला तयार हवे तर मग मनावर नियंत्रण कसे ठेवायचे? आणि मुख्य म्हणजे का ठेवायचे? अन मातृत्व तर मनावरील नियंत्रणाची प्रचंड मागणी करतं. हे नियंत्रण फक्त `मादित्वा'वरील नसतं तर असंख्य प्रकारचं असतं. मुलाला मोठा अपघात झाल्यावरही डोळ्यातलं पाणी मागे फिरवून त्याला हिम्मत देण्यातही मनावरील नियंत्रण आवश्यक ठरतं. मातृत्व ही खरे तर वस्तू नाही, तो भाव आहे. त्यात गोड बोलणे आहे आणि कठोर बोलणेही आहे. त्यात धीर आहे, धैर्य आहे; माघार घेणे आहे, आक्रमक होणे आहे; थोपटणे आहे अन ताडन करणेही आहे; काळजी घेणे आहे आणि स्वावलंबी बनवणेही आहे; अन याशिवायही पुष्कळ काही आहे. या अनेक परस्परविरोधी  गोष्टी कधी, कुठे, कशा व किती प्रमाणात उपयोगात आणायच्या हे आपोआप उमजवून देणारं रसायन आहे मातृत्व. म्हणूनच ते स्त्री मध्ये असू शकतं तसंच पुरुषातही असू शकतं. मातृत्व ही एक साधना आहे. तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम आहात की ख्रिश्चन आहात; तुम्ही जडवादी आहात की आध्यात्मिक आहात; तुम्ही महानगरात राहता की खेड्यात राहता; याला काहीही अर्थ नाही. मातृत्वासाठी साधना आवश्यक आहे. अन साधना म्हणजेच मनावर नियंत्रण.

आज मात्र मातृत्वाला एक वस्तू बनवून टाकले आहे. एकीकडे तर त्याला स्पष्ट वा प्रच्छन नकार आणि दुसरीकडे त्याचे वस्तुकरण. पश्चिम बंगालच्या मालदा भागातील घटना मातृत्वाचे वस्तूकरण दाखवणारी आहे. एका महिलेने आपल्या पोटातील बाळाचा जन्माला येण्यापूर्वीच ३० हजार रुपयात सौदा करून टाकला होता. मूल न होणारी अनेक जोडपी असतात. त्यातून मार्ग काढण्यासाठी प्राचीन काळापासून दत्तक प्रथा आहे. परस्पर संबंधातही एखादी स्त्री मूल जन्मालाच एवढ्यासाठी घालते की, तिच्या जवळच्या एखाद्या स्त्रीच्या ओटीत ते घालावे. अनाथालयातून जी मुले दिली जातात ती सुद्धा विकली जात नाहीत. पण या महिलेने चक्क जन्माला येण्यापूर्वीच ३० हजार रुपयात बाळ विकून टाकले. मातृत्व भावाचे याहून आणखीन कोणते अवमूल्यन असू शकते?

आणखीन एक मुद्दा विचारात घ्यायला हवा. मूल होणे, त्याचे लालनपालन करणे, संगोपन करणे; हे मातृत्वाचे अंग आहेच. त्याचे महत्व, एखाद्या स्त्रीच्या जीवनातील त्याची गरज हेही अत्यंत महत्वाचे आहे. परंतु तेवढे म्हणजेच मातृत्व असे जे चित्र सर्वत्र पाहायला मिळते ते योग्य आहे का याचाही विचार व्हायला हवा. मी पुरुष असल्याने यावर बोलण्याचा मला अधिकार नाही आणि ती सारी गुंतागुंत मी कधीच समजून घेऊ शकत नाही; असे आक्षेप यावर घेतले जाऊ शकतील. ते आक्षेप अनाठायी आहेत असेही समजण्याचे कारण नाही. तरीही माझा मुद्दा अनाठायी आहे असा त्याचा अर्थ होत नाही. दुसरे असे की, एक तटस्थ व्यक्ती म्हणून मला असेही दिसते की निसर्गदत्त मातृत्व नाकारलेल्या काही माता आपल्या मातृत्वाचा परीघ एवढा विस्तारतात की त्यात सगळे जग सामावून जावे. उषाताई चाटी यांचा एक उदाहरण म्हणून उल्लेख करायला हरकत नाही. त्यांना मुलबाळ नाही तरीही राष्ट्र सेविका समिती या महिलांच्या अखिल भारतीय संघटनेचं सर्वोच्च नेतृत्व अनेक वर्षे त्यांनी यशस्वीपणे केलं. लाखो सेविकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या त्या आई झाल्या. एखादी गोष्ट मिळणे न मिळणे यापलीकडे जाण्याची आणि मनाला उंच उचलून घेण्याची सवय लावणे म्हणजेच तर साधना. ही साधना आध्यात्माची असो की मातृत्वाची. परंतु अशा प्रकारे विचार करण्याऐवजी मनाला अधिकाधिक दुबळे बनवणाऱ्या पद्धतीनेच विचार करणे सयुक्तिक म्हणता येईल का?

आज सगळं जग एका विचित्र कोंडीत सापडलं आहे. स्वार्थ, चोरी, लबाडी यांना आम्ही चांगलं म्हणू शकत नाही आणि त्यातून सुटूही शकत नाही. जीवनाचं प्रयोजन, सर्व प्रकारच्या आर्थिक- सामाजिक- राजकीय- सांस्कृतिक व्यवस्था, वातावरण, कल्पना, संकल्पना, आदर्श; या साऱ्यातून स्वार्थ, संपत्ती, सत्ता, संघर्ष, स्पर्धा याचीच साधना आम्ही करत आहोत. वास्तवतेच्या नावाखाली त्याचं समर्थन करत आहोत आणि अपेक्षा मात्र नि:स्वार्थी, सज्जन, परहिताचा विचार करणाऱ्या समाजाची करीत आहोत. हा आमच्या विचार-व्यवहाराचा paradox आहे. हा paradox दूर करण्याचे प्रयत्न आधीही झालेत आणि आताही सुरु आहेत. परंतु मातृत्व भावाच्या अभावी त्यांना यश मिळालेले दिसत नाही. मातृत्व भावाची साधना आणि विकास हाच इष्ट बदलाचा प्रारंभबिंदूही आहे आणि त्याचे शिखरही. म्हणूनच मातृत्वाचे आज सुरु असलेले विडंबन आणि स्खलन रोखणे या जगाच्या सार्थक अस्तित्वासाठी आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, ७ मे २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा