रविवार, १८ मे, २०१४

रिझर्व्ह बँकेचा अनैतिक निर्णय

भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडेच एक निर्णय घेतला आहे. बँक खाते उघडण्याची व स्वतंत्रपणे वापरण्याची वयोमर्यादा १० वर्षेपर्यंत खाली आणली आहे. हा निर्णय का घेण्यात आला हे विस्ताराने वाचायला, ऐकायला मिळाले नाही. परंतु यावर व्यापक सामाजिक मंथन होणे आवश्यक आहे. नीती या शब्दाचे इंग्रजीत दोन अर्थ होतात- policy आणि morality. policy नेहमीच moral वा ethical राहीलच असे नाही. रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय सुद्धा तशाच प्रकारचा म्हटला पाहिजे.

या विषयाला अनेक बाजू आहेत. एक तर या वयात मुलांकडे बँक खाते काढण्यासाठी पैसा असतो का? बालकांना काम करण्यास कायद्याने बंदी असल्याने त्यांच्याजवळ कमाईचे पैसे असणार नाहीत. जे काही पैसे असतील ते आई-वडिलांनी दिलेले खाऊचे, खेळण्याचे, वाढदिवस वा तत्सम प्रसंगाचे पैसे असतील. घरच्या घरी ते साठवणे आणि मोठी रक्कम जमा झाली की त्याचा विनियोग करणे हे रूढ आहे. मुलांना पैशाचे महत्व पटवून देणे, बचतीची सवय लावणे यासाठी ते योग्य आहे आणि पुरेसेही. त्याहून अधिकची गरज आहे का?

रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला असल्याने बँका मुलांची खाती उघडण्याचा प्रयत्न करतील. जाहिराती होतील, कदाचित शाळातून प्रयत्न होतील, अन्यही मार्ग उपयोगात आणले जाऊ शकतात. त्यामुळे मुलांमध्ये खाती उघडण्याची चढाओढ लागेल. त्यातून अनिष्ट स्पर्धा सुरु होईल. नको असलेलं श्रेष्ठ कनिष्ठत्व सुरु होईल. ते वय लक्षात घेता हे प्रकार किती विविध पद्धतींनी परिणाम करतील याचा विचार रिझर्व्ह बँकेने केला असेल असे वाटत नाही. यामुळे घरोघरी अशांतता निर्माण होईल. अभ्यासाची मानसिकता बिघडेल. जी मुले खाती उघडू शकणार नाहीत त्यांच्या मनात न्यूनगंड वा हिनगंड किंवा खातेधारक मुलांचा दुस्वास निर्माण होईल. बालवयातील मुलांची वर्तणूक, त्यांची विचार करण्याची क्षमता यावर या गोष्टींचा परिणाम होईल. काही पालक सधन असतात आणि आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन, चर्चा त्यांना आवडत असते, हवीही असते. असे पालक मुलांच्या खात्यांचा त्यासाठी उपयोग करून घेतील. महिलांच्या कंपूत आपापल्या मुलांच्या खात्यांवरून चर्चा आणि हेवेदावे होतील.

दुसरे म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयाने मुलांना पैसा त्यांच्या मताने खर्च करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे मुलांना आई-वडिलांकडे हट्ट करण्याची गरज नाही. एकीकडे मुलांना नाही म्हणा, त्यांना नकार ऐकण्याची आणि पचवण्याची सवय लावा असे मानसशास्त्रज्ञ सांगत आहेत आणि दुसरीकडे नकाराची, त्यातून विकसित होणाऱ्या चांगल्या-वाईट तारतम्याची व्यवस्थाच नष्ट करणारे हे पाऊल आहे. भरीसभर आज चहुभोवताल असलेली आकर्षणे. असे तर नाही की, याच कारणाने रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला की, मुलांच्या हातात पैसा आला म्हणजे ते या आकर्षणांना बळी पडून अधिकाधिक खर्च करतील. एकूणच केवळ तंत्राचा विचार करण्याच्या आजच्या काळात, अर्थतंत्राचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असावा. बाजाराला उठाव देण्याचा एक खात्रीशीर मार्ग म्हणून. अर्थतंत्राचा विचार करताना अर्थनीतीला तिलांजली देण्यात तसेही काय मोठेसे? अर्थकारण महत्वाचे समाज गेला खड्ड्यात.

असंख्य अर्थहीन गोष्टींनाच आधुनिकता आणि सभ्यता समजत जो गोंधळ सध्या जगभर सुरु आहे, त्याचा हा परिणाम आहे. या साऱ्या भोंगळ गोष्टी दूर सारून मुळातून विचार करण्याची, समजून घेण्याची कोणाची तयारी नाही. आर्थिक स्वतंत्रता ही अशीच एक भोंगळ बाब. आर्थिक स्वतंत्रता हा या लेखाचा विषय नाही, पण विषयाच्या अनुषंगाने त्याचा विचार आवश्यक आहे. आज आपल्याकडे एक कुटुंब व्यवस्था आहे. जिथे ती नाही तिथे ती उभी करण्याचे प्रयत्न होतात. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कुटुंब व्यवस्था बळकट करण्याचे आश्वासन देण्यात येते. आपल्या या कुटुंब व्यवस्थेत परस्पर अवलंबित्व महत्वाचं आहे. या अवलंबित्वाचा अतिरेक आणि गैरवापर या समस्या आहेत. त्यांची चिंता करण्याची गरज आहे. पण म्हणून `आम्हाला कोणाची गरज नाही' हा उद्धट भाव योग्य तर नाहीच उलट कुटुंब व्यवस्थेला छेद देणारा आहे. it's like throwing a baby with a bathwater. पैसा, त्याचा विनियोग, त्याची उपलब्धता, निर्णय; या सगळ्यासाठी मुले-मुली आपल्या पालकांवर अवलंबून असतात. या बाबतीत हळूहळू ती स्वतंत्र होतात. यातून योग्य-अयोग्यता, तारतम्य, पैशाकडे पाहण्याची दृष्टी विकसित होते. हे असेच व्हायलाही हवे. आयुष्य ही एका दिवसात जगून घ्यायची गोष्ट नाही, एका दिवसात समजण्याची गोष्ट नाही, एका दिवसात करून टाकण्याची गोष्ट नाही. तसेच जन्माला येतानाच सगळं ज्ञान, समज वगैरे घेऊन कोणीही येत नाही. एकूणच आयुष्य ही एक विकासाची प्रक्रिया आहे. सगळ्याच अंगांना हे लागू आहे. पैसा, त्याचा विनियोग यालाही ते लागू आहे. ही प्रक्रिया मुद्दाम मोडीत काढणे वा बदलणे हे morality या अर्थाने अनैतिक आहे.

ही समज आणि दृष्टी विकसित होणे याशिवायही अवलंबित्वाचे उपयोग आहेत. त्यातील एक म्हणजे त्यातून निर्माण होणारा भावबंध. कोणासाठी काही करणं यातून होणारं मनाचं उन्नयन, त्यातून मिळणारा आनंद, वात्सल्याची भूक या साऱ्याची पूर्ती पालकांच्या दृष्टीने; तसेच कृतज्ञतेची भावना, प्रेम, आदर, अशा पद्धतीने वागायचं असतं हा संस्कार बालकांच्या दृष्टीने; या  जीवन समृद्ध करणाऱ्या बाबी आहेत. संपन्न करण्याच्या नादात समृद्धीकडे दुर्लक्ष का व्हावे? आज सगळ्या वेडपट गोष्टींकडे ओढा दिसून येतो. अमेरिकेत मुले खूप लहान वयात आई-वडिलांपासून दूर होऊन कमवायला लागतात म्हणून आम्हालाही त्याचीच ओढ लागते. माणसाचा माणूस म्हणून विचार न करता एक आर्थिक प्राणी, एक सामाजिक प्राणी, एक राजकीय प्राणी असाच विचार करणाऱ्या या आधुनिकतेच्या अशा अनेक गोष्टींचा खरे तर मुळातून विचार आवश्यक आहे.

महाकवी कालिदासाने एका ठिकाणी म्हटले आहे-
पुराणमित्येव् न साधु सर्वम्
नचापि काव्यम् नवमेत् वद्यम्
संत: परिक्षान्यतरद भजन्ते
मूढ: परप्रत्ययनेन बुद्धि:
(जुनं सारं सोनं नाही, नवीन सारं काव्य -सुंदर मधुर या अर्थाने- नाही; संत- समतोल व्यक्ती या अर्थाने- सारासार विचार करतात आणि मूर्ख लोक दुसऱ्याच्या बुद्धीने चालतात.)

काही वर्षांपूर्वी लोकसत्तात वैद्यकीय व्यवसायाच्या सद्यस्थितीबाबत लिहिले होते. त्यावेळी प्रख्यात अस्थीतज्ञ पद्मश्री डॉ. विक्रम मारवा यांच्याशी चर्चा करण्याचा योग आला होता. तेव्हाचे त्यांचे एक वाक्य आजही कानात आहे. ते म्हणाले होते, `वैद्यकीय व्यवसायाला वैद्यकीय तंत्रज्ञासोबतच वैद्यकीय तत्वज्ञाची गरज आहे.' आज सगळ्याच क्षेत्रांबाबत हे म्हणण्याची पाळी आली आहे. तंत्रशरण समाजाला तत्वज्ञानाची फार मोठी गरज आहे. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांनी आपल्या `स्वरमयी' या पुस्तकात याच आशयाचं एक वाक्य नमूद केलं आहे. ते वाक्य आहे - `जो समाज तत्वज्ञानाकडे दुर्लक्ष करून तंत्रज्ञानावर अधिक भर देतो, त्या समाजाला काही काळानंतर त्यापैकी एकाचीही गरज उरत नाही.' आशय हा की, त्याचं समाज म्हणून अस्तित्वच नष्ट होतं. या साऱ्याचा गांभीर्याने आणि मुळातून विचार केल्याशिवाय policy आणि morality यातील भेद समजणे अवघड आहे. अन हा भेद समजून घेत नाही तोवर रिझर्व्ह बँकेच्या निर्णयासारखे समाजाच्या अस्तित्वाच्या मुळावर येणारे अनैतिक निर्णय येतच राहणार आहेत.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, १८ मे २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा