गुरुवार, २२ मे, २०१४

अवास्तव किमतींचे वास्तव

आजच्या वर्तमानपत्रात सॅमसंग कंपनीने आपल्या स्मार्टफोनच्या किमती २०-२५ टक्के कमी केल्याची बातमी आहे. ही रक्कम आठ हजारापेक्षा अधिक आहे. किमती एवढ्या कमी केल्या म्हणून अनेकांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले असेल. आता आपण हा फोन घ्यायला काही हरकत नाही असा विचार काहींनी केला असेल. मनात विचार आला, आता ही कंपनी तोटा सहन करून हे स्मार्टफोन विकणार की काय? तसे तर शक्य नाही. कोणताही व्यापारी तोटा सहन करून माल विकत नाही. तो माल खराब होणारा असला, सडणारा असला, बाजारात अतिप्रचंड प्रमाणात असला तरच एखादे वेळी असे होईल. परंतु टिकणारा, कारखान्यात तयार झालेला, मागणी असलेला माल असा तोटा स्वीकारून कोणी विकणार नाही. यासाठी काहीतरी कारण खासच असले पाहिजे. ते कारण जे काही असेल ते असो. एक खरे की आता त्या फोनवर कंपनीने नफा थोडा कमी केला. याचा अर्थ कंपनीने आतापर्यंत भरपूर नफेखोरी केली.

जगात आठ हजार रुपयात महिन्याचा संसार करणारी कुटुंब आहेत आणि एका फोनवर आठ हजार रुपये अतिरिक्त आकारणारी कंपनी आणि एका फोनवर आठ हजार रुपये अतिरिक्त देणारे लोक आहेत. कशाचा कशाला मेळ नाही. ही नफेखोर वृत्ती अनेक ठिकाणी आढळते. कधी कधी मोटारींच्या किमती काही हजाराने कमी केल्याच्या अशाच बातम्या वाचायला मिळतात. बरे, काही धोरणात्मक बदल झाले, सरकारचे कर कमी झाले वगैरे प्रकार असेल तर गोष्ट वेगळी. तसे नसताना ग्राहकी आकर्षित करण्यासाठी किंवा माल खपवण्यासाठी असे भाव कमी केले जातात तेव्हा आश्चर्याऐवजी चीड येते.

माणसाच्या नफेखोरीला काही सीमा नसेल आणि कदाचित इलाजही नसेल. पण मग सरकार नावाच्या यंत्रणेचे काय? जेव्हा अशा वृत्ती वेगवेगळ्या प्रकारे गैर मार्गाने समाजाला त्रास देतात, लुटतात, शोषण करतात, गैरफायदा घेतात तेव्हा त्यावर लक्ष ठेवून नियंत्रण आणायला हवे की नाही? वस्तूंच्या वा सेवांच्या किमती ठरवण्याची काही नीती आहे की नाही? नसेल तर का नाही आणि असेल तर ती कोणत्या बासनात गुंडाळून ठेवली आहे? की ज्याला जसे वाटेल तसे भाव त्याने ठरवायचे? गेली अनेक वर्षे ग्राहक पंचायत मागणी करते आहे की, वस्तूंचे भाव निर्मितीमूल्यावर (उत्पादन मूल्यावर) आधारित असावेत. तसे होताना मात्र दिसत नाही. आपण वापरीत असलेल्या शर्ट, चपलांपासून, संगणक, गाड्या येथपर्यंत अनेक गोष्टींचे भाव अनेकदा अवास्तव असल्याचे आढळून येते.

सामान्यपणे त्याबद्दल लोकांची तक्रारही नसते. कधी कधी तर एखाद्या गोष्टीसाठी जास्त पैसे मोजणे यातच प्रतिष्ठा आणि समाधान मानले जाते. वास्तविक भाव कमी असेल आणि त्या वास्तविक भावात खरेदी केली असेल किंवा एखाद्या गोष्टीसाठी वाजवी किंमत मोजली असेल तर तो तुच्छतेचा विषय होतो. म्हणूनच एखाद्या बड्या पंचतारांकित वगैरे हॉटेलात चहा पिऊन आलो तरी आपली कॉलर ताठ होते. कारण आम्ही अवास्तव पैसे मोजलेले असतात. टपरीवरचा चहा आणि पंचतारांकित चहा यांच्या किमतीत एवढा फरक का असतो तर प्रतिष्ठेसाठी. आज अगदी कोटी कोटी रुपयांच्या गाड्या आहेत. टाटांनी गरिबांसाठी आणलेली नॅनो आणि ऑडी यात लागणारे सामान, त्यांची जोडणी, जुळणी, रंग, मजुरी वगैरेत इतका फरक का?

तुमच्या-माझ्या मनातील पैशाशी जोडलेला उच्चनीच भाव याच्या मुळाशी आहे. निर्मितीमूल्याशी संबंध नसलेल्या किमती आपल्या प्रतिष्ठेचा गंड जोपासतात. त्यामुळे त्या आपल्यालाही हव्या असतात. आपण एक प्रकारे फसवले गेलो, ठकवले गेलो, लुबाडले गेलो याची खंत वा दु:ख आम्हाला नसते. तर आपण अधिक पैसा खर्च केला आणि कोणापेक्षा तरी अधिक पैसा खर्च केला, अवास्तव पैसा खर्च केला याचे समाधान आमच्यासाठी महत्वाचे असते. याचाच फायदा उचलून नफेखोरी केली जाते.

एक माहितीतला किस्सा वानगीदाखल सांगायला हरकत नाही. दोन कुटुंब सुटीच्या दिवशी दिवसभराच्या सहलीसाठी गेली होती. येताना गावातील एका ओळखीच्यांच्या शेतात गेली. शेतकऱ्याने स्वाभाविकच शेतातील झाडाला लागलेली संत्री, पालक ताजा ताजा तोडून पाहुण्यांना दिले. `अतिथी देवो भव' हा त्याच्यावरचा संस्कार. दोन्ही कुटुंब घरी परतली. दोन दिवसांनी त्या कुटुंबातील गृहिणीमध्ये बोलणे झाले तेव्हा एकीने संत्री, पालक यांचे कौतुक केले तर दुसरीने तिला सांगितले, `मी तर ते आमच्या कामवाल्या बाईला देऊन टाकले. नाही तरी ते काही चांगले नव्हते. त्यापेक्षा reliance fresh मध्ये चांगले आणि ताजे मिळते. मी काल तिथूनच आणली संत्री.' असे म्हणून तिने reliance fresh मधील संत्री दुसरीपुढे ठेवली. झाडावरच्या संत्र्यांपेक्षा दुकानातील संत्री तिला ताजी वाटली याचे कारण चकचकाट आणि त्यासाठी मोजलेले पैसे. तिच्यासाठी शेतकऱ्याचा स्नेह, संत्र्यांचे ताजेपण, मैत्रिणीला संत्री खाऊ घालणे; यापेक्षाही मोजलेले पैसे मोलाचे आणि महत्वाचे होते. वेगवेगळ्या संदर्भात असे अनुभव आपण कुठेही घेऊ शकतो.

मात्र ही वृत्ती अनिष्ट, अनैतिक आणि असमतोल निर्माण करणारी आहे. माणसातील प्रामाणिकता, समबुद्धीने विचार व्यवहार करण्याची उर्मी आदि गुणांचा ऱ्हास यामुळे होतो. शिवाय यातून कृत्रिम असमतोल निर्माण होतो. कच्चा माल, खनिजे, उर्जा ताब्यात घेण्याची प्रवृत्ती वाढते. साठेबाजी वाढते. उधळपट्टी वाढते. भाववाढ होते, चलनवाढ होते. परिणामी सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय असमतोल वाढतो. ज्याच्याकडे पैसा आहे तो खर्च करतो, तुम्हाला काय हरकत आहे; असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण तो गैरलागू आणि अयोग्य आहे. मुळात पैसा आहे म्हणून खर्च करतो अशी स्थिती नसून, खर्च करण्यासाठी पैसा दिला जातो आणि मिळवला जातो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, काही माणसांच्या प्रतिष्ठांसाठी मानवी प्रतिष्ठेचा बळी दिला जातो.

पाणी हे याचे उत्तम उदाहरण आहे. वास्तविक पाण्यावर प्रत्येकाचा समान अधिकार असायला हवा. पण आज तुमच्या खिशात पैसे असतील तर तुम्हाला चांगले पाणी मिळणार आणि खिशात पैसे नसतील तर पिऊ नये असे पाणी मिळणार किंवा मग पाणीच मिळणार नाही अशी स्थिती आहे. याच्या पलीकडची स्थितीही एखाद्या वेळी पाहायला मिळते. उद्या ती सार्वत्रिक होऊ शकते. ती म्हणजे- पैसे असूनही पाणी मिळणार नाही. कारण एक तर पाणीच उपलब्ध असणार नाही किंवा नफेखोरी वाढल्याने तुमच्याकडील पैसे त्यासाठी पुरणार नाहीत. जगभरातील पाण्याच्या समस्येवर नजर टाकल्यास हे वास्तव स्पष्ट होते. कारण मुळात पाण्याचं मूल्य पाणी हेच आहे. लोखंडाचं मूल्य लोखंड हेच आहे. कापसाचं मूल्य कापूस हेच आहे. झोपेचं मूल्य झोप हेच आहे. प्रेमाचं मूल्य प्रेम हेच आहे. आज करोडो रुपये, सर्व सुखसुविधा, औषधे असूनही झोप गायब झाली आहे याचे कारण आपण झोपेचं मूल्य ओळखूच शकलो नाही. प्राणवायूचे मास्क लावून लोकांना फिरावं लागतं याचंही कारण हेच आहे की, आपण प्राणवायूचं मूल्य ओळखलं नाही. तसं नसतं तर प्राणवायूचा गळा घोटणाऱ्या गाड्यांना आम्ही आमच्या जगण्यात अवास्तव महत्व दिलंच नसतं.

ही सगळी एक साखळी आहे. मुळात पैसा, वस्तू, सुख वगैरे गोष्टींकडे पाहण्याची आपली दृष्टी या सगळ्याच्या मुळाशी आहे. सॅमसंग कंपनीने आपल्या स्मार्टफोनच्या किमती २५ टक्के कमी करणे, नफेखोरी, त्यात गुंतलेली प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी आपल्या या दृष्टीशी संबंधित आहेत. सगळं जग आज या दुष्टचक्रात सापडलं आहे. हे दुष्टचक्र भेदणे आवश्यक आहे, हे मात्र खरे.

श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २२ मे २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा