गुरुवार, १४ ऑगस्ट, २०१४

अखंड भारत- २

भारताच्या भूभागावरील अन्य देशांचा जन्म साम्राज्यवादी कुटीलतेचा आणि ब्रिटीशांच्या प्रशासनिक चतुराईचा परिणाम होता. पाकिस्तानच्या निर्मितीत या दोन कारणांसोबत सांप्रदायिक उन्मादाचे तिसरे कारण महत्वाचे आणि निर्णायक ठरले होते. नव्हे तेच एकमेव कारण वाटावे इतका त्याचा प्रभाव आणि आवाका मोठा होता. म्हणूनच आजही अखंड भारत म्हटले वा भारताची फाळणी म्हटले की, पाकिस्तानची निर्मिती एवढेच प्रामुख्याने डोळ्यासमोर येते. अखंड भारताची चर्चाही त्याभोवतीच फिरत असते. हे अतिशय स्वाभाविक असेच आहे. याची काही करणे अशी-

१) अपरिमित मनुष्यहानी. किमान १० लाख हिंदूंचे शिरकाण भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी झाले.
२) जगातील आजवरचे सगळ्यात मोठे मानवी स्थलांतर त्यावेळी झाले. हे स्थलांतरदेखील रोजगार वा युद्ध वा तत्सम कारणांनी नव्हते, तर धार्मिक आधारावर लोकांना विस्थापित करण्यात आले होते- तेही दोन भागांपैकी फक्त एका भागातून, पाकिस्तानातून.
३) मानवी अन्याय, अत्याचार, दुराचार, लुटालूट याला तर सीमाच नव्हती.
४) परस्परांशी संलग्न नसलेल्या हजारो मैल दूर असलेल्या दोन स्वतंत्र भूभागांचा एक देश कृत्रिमरीत्या, शासकीय व प्रशासकीय आदेशाने जन्माला घालण्यात आला.
५) हे विभाजन होऊ नये यासाठी, अन्य कुठल्याही विभाजनापेक्षा कितीतरी अधिक नेत्यांनी प्रयत्न आणि प्रतिष्ठा पणाला लावले होते अन ते सारे पराभूत झाले होते.
६) अन्य देश वेगळे झाले तरीही त्यावेळी भारताचे शत्रू जन्माला आले नव्हते. मात्र पाकिस्तान निर्मितीच्या वेळी एक शत्रू देश जन्माला आला. मुळात पाकिस्तानची निर्मिती प्रशासकीय, राजकीय, आर्थिक, सामाजिक कारणांनी झाली नाही तर मुस्लिमांच्या हिंदू द्वेषातून आणि भारत द्वेषातून झाली.

मुळातच `एकं सत विप्रा: बहुधा वदन्ति' हे तत्व हजारो वर्षे रक्तात भिनल्यामुळे सांप्रदायिक आधारावर नवीन देशाची निर्मिती या देशाच्या स्वप्नातही आली नव्हती. सांप्रदायिक कलह हेच मुळात मोगलांच्या आक्रमणापासून या देशात आले. इस्लामच्या कट्टरवादी विचारधारेने येथील बहुलतावादी, उदार विचारांना आणि आचारांना पहिला धक्का दिला. त्यानंतर आत्मसुरक्षा आणि क्रियाप्रतिक्रिया न्यायाने या देशाची घडी विस्कटत गेली.

दुसरीकडे या आक्रमणाने हतबुद्ध होऊनही या देशाची विश्वकल्याणी चिंतनधारा आटली नाही. अनेकानेक संत, संप्रदाय, चिंतक, आंदोलने यांनी बाहेरून आलेल्या या लाटेला आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यशदेखील आले. मूळ संघर्षाची प्रवृत्ती, स्वामित्वाची लालसा आणि त्याला अधिकृत पांथिक पाठींबा असतानाही इस्लामचे भारतीय रूप आकार घेत होते. मूळ भारतीय मानस या दोन भिन्न प्रवाहांच्या एकीकरणासाठी तयार होत होते. अगदी १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात देखील याची झलक पाहायला मिळाली होती. धूर्त इंग्रजांना ते लक्षात आले आणि त्यांनी योजनापूर्वक हिंदू आणि मुस्लिम यांना वेगळे करण्यास सुरुवात केली. आत्मसातिकरणाच्या प्रक्रियेत पहिली पाचर मारली गेली अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या स्थापनेने. या विद्यापीठाच्या रूपाने दोन वेगळ्या अस्मिता पोसण्याचे आणि त्यासाठी इस्लामिक कट्टरता जोपासण्याचे, वाढवण्याचे, त्याला खतपाणी घालण्याचे आणि त्याचे तत्वज्ञान तयार करण्याचे एक सशक्त केंद्र १८७५ साली अस्तित्वात आले. देशाच्या स्वातंत्र्याचा लढा लढण्यासाठी स्थापना झाल्याचा दावा करणाऱ्या (वास्तविक भारतीय जनतेच्या असंतोषाला निरर्थक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या) काँग्रेस पक्षाच्याही अगोदर मुस्लिम विद्यापीठाची स्थापना घडवून आणण्यात काय हेतू असू शकतो?

अलिगढ विद्यापीठाच्या स्थापनेपासून सुरु झालेला हा प्रवास १९०५ च्या वंगभंग आंदोलनानंतर १९०६ साली मुस्लिम लीगच्या स्थापनेपर्यंत पोहोचला. इंग्रजांनी पसरलेल्या या जाळ्यात काँग्रेसदेखील फसली. खिलाफत चळवळीने त्याला बळच दिले. पाश्चात्य विचार आणि रीतीरिवाज मानणारे आणि पाळणारे, पारंपारिक अर्थाने मुस्लिम म्हणता येणार नाहीत असे मोहंमद अली जिना हे वेगळ्या पाकिस्तानचे प्रतिक बनले. जिना हे पाकिस्तानचे जनक मानले जातात. परंतु वेगळ्या मुस्लिम राष्ट्राची मूळ कल्पना अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांची आहे. १८६७ साली प्रथम त्यांनी ही कल्पना प्रचारित केली. त्यानंतर १८७५ साली त्यांनी मदरसातुल उलुम मुसलमान-ए-हिंद स्थापन केले, त्याचे पुढे मोहम्मेदन अँग्लो ओरिएन्टल कॉलेज झाले आणि नंतर त्याचेच अलिगढ मुस्लिम विद्यापीठ झाले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना १८८५ साली सर ए.ओ. ह्यूम या ब्रिटीश माणसाच्या पुढाकाराने झाली. सर सय्यद अहमद खान यांना त्यात रुची नव्हती आणि त्यांना त्यात सामील करून घेण्याचा प्रयत्नही काँग्रेसने केला नाही. उलट दोघातील फुट कशी वाढेल याचेच प्रयत्न करण्यात आले. १८८७ साली काँग्रेसचे तिसरे अधिवेशन झाले. बद्रुद्दिन तय्यबजी काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यावेळी सर सय्यद अहमद खान यांनी त्यांना मुस्लिम हितासाठी काँग्रेसच्या बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. काँग्रेस हिंदूंची प्रतिनिधी आहे, असा त्यांचा तर्क होता. त्याला बद्रुद्दीन तय्यबजी यांनी उत्तर दिले की, मुस्लिमांच्या हितासाठी बाहेर पडण्यापेक्षा काँग्रेसमध्ये राहूनच आपण प्रयत्न करू. परंतु दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या याच बद्रुद्दीन तय्यबजी यांनी काँग्रेस नेतृत्वाला एक लिखित विनंती केली की, काँग्रेसमध्ये मुस्लिमांना न्याय मिळत नाही. मुस्लिमांना न्याय मिळावा आणि त्यांच्यात विश्वास वाढावा यासाठी पाच वर्षे काँग्रेस विसर्जित करावी वा स्थगित ठेवावी. थोडक्यात म्हणजे या ना त्या प्रकारे सतत मुस्लिमांचे तुणतुणे वाजवत ठेवायचे. याच भावनेतून १९०६ साली मुस्लिम लीगची स्थापना झाली.

यामुळे त्यांचे वेगळेपण अधिकच उठावदार झाले. त्यांच्या मागण्यांना जोरही आला. वास्तविक यामागे फूस इंग्रजांचीच होती. मुस्लिम लीगच्या स्थापनेनंतर हिंदूंची काँग्रेस आणि मुस्लिमांची मुस्लिम लीग असे दोन पक्ष तयार झाले. कोणत्याही विषयावर चर्चा करताना प्रथम तुमच्या दोघांचेही एकमत होऊ द्या, अशी भूमिका ब्रिटीशांकडून सातत्याने घेण्यात आली. प्रथम दोन समुदायांमध्ये परस्पर अविश्वास निर्माण करून त्यांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्यात आले आणि नंतर तुम्ही एकत्र आल्याविना काहीही करता येणार नाही अशी आडमुठी भूमिका घ्यायची अशी ब्रिटीशांची खेळी होती. काँग्रेसही त्यांच्या या जाळ्यात अडकत गेली. १९१८ चा लखनौ करार याचे उदाहरण म्हणता येईल. लोकमान्य टिळकांनी अतिशय चांगल्या भावनेने या कराराला मान्यता दिली, पण त्यामुळे मुस्लिम लीगला स्वतंत्र गटाची मान्यता आणि शक्ती प्राप्त झाली. स्वाभाविकच त्यापुढील प्रत्येक गोष्टीत मुस्लिम लीगची भूमिका महत्वाची ठरू लागली. दोनच वर्षात टिळकांचे देहावसान झाले. महात्मा गांधी राजकीय पटलावर आले. त्यांना परिस्थितीची कल्पना नव्हती असे नाही. उलट परिस्थितीची कल्पना असल्यामुळेच आणि मुस्लिम लीग प्रत्येक वेळी आडमुठेपणा करील या शंकेनेच त्यांना खुश करण्याचा विचार ते करू लागले. मुस्लिमांना जवळ आणण्याचा प्रयत्न करावा म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेसला त्यांची साथ लाभेल असा त्यांचा होरा होता. परंतु मुस्लिम मानस समजून घेण्यात गांधीजी कमी पडले. मुस्लिमांचा विश्वास प्राप्त करून घेऊन त्यांना अधिकाधिक जवळ आणण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांनी तुर्कस्तानातल्या खिलाफत चळवळीला पाठींबा दिला. याचा अर्थ काँग्रेस आपली मित्र आहे असा काढण्याऐवजी खिलाफतची मागणी बरोबर आहे असा काढण्यात आला. त्यानंतर अशा मागण्या वाढतच गेल्या आणि प्रत्येक वेळी त्यापुढे वाकणे सुरु झाले. काय योग्य काय अयोग्य याचा विवेक सुटला. एवढेच नव्हे तर मुस्लिमांना जवळ आणण्याच्या या भावनेचा पगडा एवढा होता की मग हिंदूंचा विचार करण्याचीही गरज उरली नाही. मुसलमान म्हणतील ते योग्य आणि ते म्हणतील ते अयोग्य अशी अत्यंत घातक मुलभूत चूक काँग्रेसच्या या धोरणाने झाली. परिणामी अखेर २३ मार्च १९४० रोजी मुस्लिम लीगच्या लाहोर अधिवेशनात स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करण्यात आली.

मुसलमानांचे लांगुलचालन काँग्रेस करते, ब्रिटीश सरकार त्यांचे लाड करते आणि ब्रिटीश सरकार व मुस्लिम नेते यांच्यापुढे काँग्रेस लाचार होते; अशी भूमिका आणि टीका केवळ हिंदू महासभा किंवा रा. स्व. संघ किंवा काँग्रेस विरोधकच करीत असत असे नाही. प्रत्यक्ष काँग्रेसचे नेते डॉ. पट्टाभिसीतारामय्या यांनी १९४६ साली एक पुस्तक लिहून १९०६ ते १९४६ या काळात मुस्लिम लीगला देण्यात आलेल्या सवलतींची यादीच प्रसिद्ध केली होती. मुस्लिम लीग, काँग्रेसची दिशाहीन स्थिती, इंग्रजांची फोडा झोडा नीती या तीन बाबीच भारत-पाकिस्तान विभाजनासाठी जबाबदार ठरल्या.

भारत व पाकिस्तान हे दोन वेगळे देश होणार, फाळणी होणार हे जेव्हा स्पष्ट झाले तेव्हा मोहम्मद आली जिन्ना यांनी जोरकसपणे लोकसंख्येच्या अदलाबदलीची, म्हणजे प्रस्तावित भारतातील सगळ्या मुस्लिमांनी पाकिस्तानात यावे आणि प्रस्तावित पाकिस्तानातील सगळ्या हिंदूंनी भारतात जावे अशी मागणी केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही अशीच सूचना केली होती. हिंदू व मुसलमान एकत्रितपणे शांततेने आणि सौहार्दाने राहू शकणार नाहीत असे मत त्यांनी `thoughts on pakistan' मध्ये व्यक्त केले होते. काँग्रेसने मात्र ही फाळणी प्रादेशिक आहे, सांप्रदायिक नाही अशी भूमिका घेत लोकसंख्येच्या अदलाबदलीचा प्रस्ताव फेटाळून लावला आणि कुठे राहायचे याबाबत लोकांना स्वयंनिर्णयाचा अधिकार राहावा अशी भूमिका घेतली. लोकसंख्येची अदलाबदल होणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर शेवटच्या औपचारिकता पूर्ण करताना १९४६ साली कॅबिनेट मिशनसमोर प्रश्न आला की, पाकिस्तानात उरलेल्या हिंदूंचे काय? आणि भारतात उरलेल्या मुसलमानांचे काय? त्यावर बॅरि. जिन्नांचे उत्तर होते- `they will be treated as reciprocal hostages. this will prevent mistreating of minorities in both the countries.'

भविष्यकाळात भारताने कधीही यानुसार कृती केली नाही. केवळ राजकीय धोरणाचा भाग एवढेच कारण त्यामागे नव्हते तर भारताचा तो हजारो वर्षांचा स्वभाव आहे. कोणाचाही द्वेष वा सूडभावना हिंदूंच्या/ भारताच्या रक्तातच नाही. त्यामुळे पाकिस्तानातील हिंदूंचा अनन्वित छळ झाला, त्यांना परागंदा व्हावे लागले, त्यांची लोकसंख्या सतत घटत गेली तरीही भारताने मुस्लिमांकडे reciprocal hostages म्हणून कधीही पाहिले नाही. वास्तविक १५ ऑगस्ट १९४७ पूर्वी भारतातील ९० टक्केहून अधिक मुसलमानांनी वेगळ्या पाकिस्तानच्या बाजूने मतदान केले होते. प्रत्यक्षात पाकिस्तानात गेलेत मात्र सुमारे ५० टक्के. म्हणजे भारतातील बहुसंख्य मुस्लिमांचा त्यावेळी पाकिस्तानला पाठिंबा होता. तरीही भारताने त्यांना reciprocal hostages म्हणून वापरले नाही. अगदी बांगलादेश निर्मितीच्या वेळीही भारत आपल्या स्वभावानुसारच वागला. आपल्या हाती पडलेल्या हजारो सैनिकांना त्याने सन्मानाने परत केले. बांगलादेश आणि पाकिस्तानात मात्र काहीही कारण नसताना हिंदूंना योजनापूर्वक संपविण्यात आले. भारत भारताच्या स्वभावानुसार वागला आणि ते दोन देश त्यांच्या स्वभावानुसार. मात्र भारताच्या स्वभावाविरुद्ध तक्रार असता कामा नये, त्या दोन देशांच्या स्वभावाविरुद्ध मात्र दाद आणि न्याय मागायलाच हवे. कारण भारताच्या स्वभावाने कोणाचे अहित होत नाही, त्यांच्या स्वभावाने मात्र सगळ्यांचे अहित होते.

भारताच्या पूर्व भागातही मुस्लिम उपद्रव वाढला होता. मुस्लिम लीगने १५ ऑगस्ट १९४६ रोजी `डायरेक्ट अॅक्शन'ची घोषणा केली होती. त्यानंतर कोलकाता आणि बंगालमध्ये जे अभूतपूर्व दंगे उसळले त्याने हिंदूंची ससेहोलपट केली. हजारो हिंदूंना ठार करण्यात आले. मृत्यूचे ते तांडव पाहून गांधीजी अस्वस्थ झाले. ती आग विझवण्यासाठी गांधीजी बंगालमध्ये गेले. एक दिवस संध्याकाळी प्रार्थना सभा सुरु असताना जमावाने प्रार्थना स्थळाला घेरून घेतले. लोक मुस्लिम लीगचा नेता सुहरावर्दी याची मागणी करू लागले. गांधीजींनी सभेत उपस्थित सुहरावर्दीलाच उत्तर द्यायला सांगितले. नाईलाज झालेल्या सुहरावर्दीने `डायरेक्ट अॅक्शन'साठी आपणच जबाबदार असल्याचे मान्य केले आणि गांधीजींच्या उपस्थितीचा फायदा घेत पळ काढला. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी महात्मा गांधी रात्री ११ वाजताच झोपी गेले होते. रात्री १२ वाजता दिल्लीत स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा होत असताना गांधी शांत झोपून होते.

इंग्लंडचे पंतप्रधान क्लीमेंट अॅटलि यांनी २० फेब्रुवारी १९४७ रोजी ब्रिटीश पार्लमेंटमध्ये जाहीर केले की, जून १९४८ अखेर हिंदुस्थानी जनतेकडे सत्ता सुपूर्द करण्यात येईल. १९४७ च्या मार्च महिन्यात लॉर्ड माउंटबॅटन भारतात आले. त्यांनी घाईने फाळणी उरकली. सत्तांतराची घोषणा करण्याची पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी तारीख निश्चित झालेली नव्हती. परंतु फाळणीची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने स्वाभाविकच जगभरातील पत्रकार उपस्थित असलेल्या त्या महत्वाच्या पत्रपरिषदेत त्यांना `कधी?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर लॉर्ड माउंटबॅटन गडबडले. त्यांनी मनाशी काय हिशेब केला देव जाणे, अन अचानक जून १९४८ ऐवजी १५ ऑगस्ट १९४७ ही तारीख जाहीर केली. दोन देश वेगळे झाले तो क्षण एकच होता आणि असू शकतो. तरीही पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन १४ ऑगस्ट आणि भारताचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट असे का? तर लॉर्ड माउंटबॅटन यांना दोन्हीकडे उपस्थित राहता यावे यासाठी, असे त्याचे उत्तर आहे. हे महाशय नसते उपस्थित राहिले समारंभाला तर काय झाले असते?

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १४ ऑगस्ट २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा