सोमवार, १५ सप्टेंबर, २०१४

आदर- अनादर

एकेरी बोलणं हा पुष्कळांचा स्वभावच असतो. कोणत्याही व्यक्तीबद्दल असे लोक एकेरीतच बोलणार. ती व्यक्ती मोठ्या पदावर असो, वयाने- ज्ञानाने- मानाने- दानाने- कर्तृत्वाने- कितीही मोठी व्यक्ती असू द्या; हे लोक त्यांचा उल्लेख एकेरीतच करणार. पूर्वी नवरा बायको सुद्धा परस्परांशी बोलताना देखील आदरार्थी बहुवचन वापरीत असत. बहुतेक सगळ्या बायका आणि सगळे नसले तरी बरेच पुरुष सुद्धा आदरार्थी बहुवचनाचाच वापर करीत. अगदी वडील सुद्धा मुलाचे लग्न वगैरे झाले की, त्याला अहो-जाहो करीत. नात्यांमध्ये तर बहुधा आदरार्थी बहुवचनच ऐकायला मिळत असे. स्वामी विवेकानंद यांचे गुरु श्री रामकृष्ण परमहंस यांच्या धर्मपत्नी सारदा मा त्यांच्या परस्पर संबंधांविषयी म्हणत असत- `त्यांनी (म्हणजे श्री रामकृष्णांनी) मला कधीही तू म्हटले नाही.' भारतीय मजदूर संघाचे संस्थापक, एकात्म मानव दर्शनाचे आणि संघाचे थोर भाष्यकार, महान कामगार नेते आणि विचारवंत स्व. दत्तोपंत ठेंगडी यांच्याबाबत मला स्वत:ला असाच अनुभव आहे. सुदैवाने माझा त्यांच्याशी पुष्कळ आणि चांगला संबंध आला. ते नेहमीच अहो म्हणूनच बोलत असत. मी त्यांना पुष्कळदा म्हटले की मी सगळ्याच अर्थाने खूप लहान आहे. वयातही खूपच अंतर आहे, तुम्ही मला अहो नका म्हणू. पण त्यांनी शेवटपर्यंत अहो म्हणणे सोडले नाही.

आज काळ बदलला आहे आणि बहुतेक सगळ्या नात्यांमध्ये एकवचन ऐकायला मिळते. वडिलांचासुद्धा `ए बाबा' झाला आणि नवरा-बायको अरे-अगं वर आले. नव्हे एकेरीतच बोलावे हा आग्रह देखील असतो. बहुवचनी अनेकदा कृत्रिमही वाटते. पण एकेरी संबोधनाची ही पद्धत आता विकृतीकडे झुकते आहे की काय असे वाटू लागले आहे. समवयस्क, वर्ग मित्रमैत्रिणी, कुटुंब, नाती, समाजात वावरताना निर्माण झालेले मैत्र अथवा नाती यात सहजपणे निर्माण झालेल्या आपुलकीतून- स्नेहातून- विकसित झालेले एकेरी संबोधन आणि सगळ्या जगाच्या घुगऱ्या आपण खाल्ल्या आहेत अशा थाटात मान- अपमान- सभ्यता- चांगुलपणा- मनाचा/ वृत्तीचा मोठेपणा हे सगळे गुंडाळून ठेवून वेळ- प्रसंग- वातावरण- कसलाही विचार न करता एकेरी बोलणे; या दोन गोष्टीत महदंतर असते. हे लक्षात घ्यायला हवे. राष्ट्रपती, पंतप्रधान, न्यायाधीश, शास्त्रज्ञ, साहित्यिक, विचारवंत, उद्योगपती, कलाकार असे देशाच्या, समाजाच्या जडणघडणीत, भावविश्वात विशिष्ट स्थान असणाऱ्या लोकांबद्दल; किंवा शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य, कार्यालयीन वरिष्ठ, शेजारपाजारचे ज्येष्ठ, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, प्रतिभावंत अशा अनेकांबद्दल आदरार्थी बोलताना आपली जीभ का अडखळावी?

एकेरी बोलण्याचा आणखीनही एक गमतीशीर पण अयोग्य पैलू आहे. पुष्कळदा आपल्या सोबतचे, बरोबरीचे लोक पुढे निघून जातात. हुद्दा, सामाजिक स्थान, कर्तृत्व, ज्ञान, साधना, व्यासंग यात ते खूप आघाडी घेतात. अशी आघाडी ठरवून घेतली जाते वा तो एक स्वाभाविक प्रवासही असू शकतो. मागे राहिलेली व्यक्ती डावी वा कमअस्सल असेलच असेही नाही. सारखी क्षमता, योग्यता असूनही दोन व्यक्ती मागेपुढे होतात. यात योगायोगाचा भागही असतो. पण मागे राहणारा पुढे गेलेल्याबद्दल सवयीने वा ठरवून एकेरी बोलतो. कुठेतरी मनातील मागे पडल्याच्या दु:खाला तो अशी वाट करून देतो. मग चार लोकांपुढे किंवा त्याच्या हाताखालील लोकांपुढे सुद्धा त्याच्या मानपानाचा विचार न करता मुद्दाम त्याच्याशी एकेरीत बोलतो. हे योग्य नाही हे कळून सुद्धा. आपण एखाद्याच्या खूप जवळचे आहोत हे दाखवण्यासाठीसुद्धा अनेक जण अनेकदा एकेरीत बोलतात. अनेकदा कशाचा मान आणि कशाचा अपमान असा युक्तिवाद करून सन्मानाने बोलणे टाळले जाते. आपल्या हाताखालचे लोक, आपल्या घरी काम करणारी बायामाणसे, यांचा तर मान ठेवला पाहिजे असे क्वचितच वाटते.

सन्मानाने आणि आदराने बोलल्याने आपण लहान होतो का? आपला अपमान होतो का? आपल्याला कमीपणा येतो का? असे काहीच नाही. उलट, योग्य आदराने, सन्मानाने, बहुवचनी बोलल्याने आपण मोठेच ठरतो. परंतु मोठे आणि चांगले होण्यापेक्षा आपला अहंकार सुखावणे आपल्याला अधिक मोलाचे आणि महत्वाचे वाटते. इंग्रजी भाषेत आदरार्थी एकवचन नाहीच. नसेल. पण इंग्रजीत नाही म्हणून आम्ही ते सोडून द्यावे असे तर नाही ना? आज जग एकत्र येत आहे. भाषांची सरमिसळ होते आहे. भावना, संकल्पना नव्याने आकारास येत आहेत. त्यात काही गोष्टी बदलणार, काही गोष्टी सुटून जाणार. पण हा बदल केवळ एकाच बाजूने होईल वा व्हावा असे तर नाही ना? केवळ मराठीने किंवा हिंदीने बदलावे असे नाही. इंग्रजीही बदलू शकते. आदरार्थी एकवचन आपण सोडून देण्यापेक्षा ५० वर्षांनंतर इंग्रजीने आदरार्थी एकवचन स्वीकारलेले पाहण्यात समाधान आणि सार्थकता नाही का? एकीकरणाच्या या प्रवाहात योग्य-अयोग्य, चांगले-वाईट यांचा विवेक करून त्यापाठी उभे राहणे आणि ठाम राहणे आवश्यक. मनात आदरभावना जपणे आणि आपल्या वागण्याबोलण्यात त्याचं प्रतिबिंब अनुभवायला मिळणे हे योग्य आणि चांगले नाही असे कोण म्हणेल?

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, १५ सप्टेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा