बुधवार, २४ सप्टेंबर, २०१४

एकात्म मानववादाचे प्रणेते दीनदयाळ उपाध्याय

२६ मे २०१४ रोजी या देशात खऱ्या अर्थाने काँग्रेसेतर पक्षाचे सरकार निर्भेळ बहुमताने केंद्रात सत्तेवर आले. याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, `हा अनेक पिढ्यांच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे.' स्वाभाविकच त्यांच्या डोळ्यापुढे केवळ भारतीय जनता पार्टीच नव्हे तर त्याचा पूर्वावतार असलेला जनसंघही होता. अनेक पिढ्यांच्या या कार्यकर्त्यांचे मेरुमणी आणि जनसंघाचे संस्थापक महामंत्री पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा २५ सप्टेंबर हा जन्मदिन. उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातील नागला चंद्रभान या गावी त्यांचा जन्म झाला. वयाची तीन वर्षे पूर्ण करण्याच्या आधीच त्यांचे वडील आणि वयाची आठ वर्षे पूर्ण करण्याच्या आधीच त्यांची आई हे जग सोडून गेले. त्यानंतर त्यांचे संगोपन सिकर येथे त्यांच्या मामांनी केले. सिकर येथूनच त्यांनी दहावीची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. या यशानंतर सिकरच्या महाराजांनी त्यांना दरमहा १० रुपये शिष्यवृत्ती आणि अन्य खर्चासाठी २५० रुपये दिले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पिलानी, कानपूर आणि आग्रा येथे झाले.

कानपूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्याशी भेट झाली. त्यानंतर संघाचे ज्येष्ठ प्रचारक बाबासाहेब आपटे, दादाराव परमार्थ, बापू महाशब्दे यांच्याशीही त्यांचा संबंध आला. नंतरच्या काळात राजकीय क्षेत्रात त्यांचे सहकारी राहिलेले सुंदरसिंग भंडारी कानपूर येथे त्यांचे सहाध्यायी होते. १९४२ साली ते रा. स्व. संघाचे प्रचारक म्हणून काम करू लागले. उत्तर प्रदेशचे सह प्रांतप्रचारक म्हणून जबाबदारी सांभाळत असतानाच जनसंघाच्या स्थापनेचा निर्णय झाला आणि त्यांना जनसंघाचे काम करण्यासाठी सांगण्यात आले. जनसंघाची स्थापना प्रथम उत्तर प्रदेशात झाली. त्यावेळी त्याचे प्रथम महामंत्री म्हणून त्यांना जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर काहीच महिन्यात पक्षाला अखिल भारतीय रूप देण्यात आले तेव्हा जनसंघाचे अखिल भारतीय महामंत्री म्हणून त्यांच्याकडे काम सोपवण्यात आले. जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा उजवा हात होऊन ते काम करू लागले. त्यावेळी त्यांचे वय अवघे ३५ वर्षे होते. मात्र त्यांचा कामाचा झपाटा आणि समज पाहून डॉ. मुखर्जी उद्गारले होते- `मला दोन दीनदयाळ द्या, मी देशाचा राजकीय चेहरा बदलून टाकीन.'

जनसंघ बाल्यावस्थेत असतानाच १९५३ साली डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे काश्मिरात कारागृहात संशयास्पद अवस्थेत अकाली निधन झाले. त्यानंतर पक्षाचा सगळा भार दीनदयाळजींच्या खांद्यावर आला. ११ फेब्रुवारी १९६८ रोजी रेल्वे प्रवासात गाडीतच त्यांची रहस्यमय हत्या झाली. त्यांचे वय त्यावेळी फक्त ५१ वर्षे होते. मात्र त्यांना मिळालेल्या उण्यापुऱ्या १५ वर्षांच्या काळात त्यांनी जनसंघाची अतिशय मजबूत पायाभरणी केली. पक्षाला अखिल भारतीय रूप देणे, पक्षाचे संघटन मजबूत करणे, हजारो ध्येयसमर्पित कार्यकर्ते उभे करणे, निवडणुकीच्या राजकारणात पक्षाचे प्रतिनिधी निवडून आणणे आणि या साऱ्याहून महत्वाचे म्हणजे पक्षाला सुदृढ वैचारिक अधिष्ठान मिळवून देणे ही सारी कामे त्यांनी त्या १५ वर्षात केली. त्यांनी पक्षासमोर आणि समाजासमोर मांडलेला `एकात्म मानववाद' कालातीत असून लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, भांडवलशाही, मार्क्सवाद, व्यक्तिवाद, विज्ञानवाद अशा सगळ्या विचारांच्या उलटसुलट खंडनमंडनाच्या वावटळीत भारतीय विचार परंपरेवर आधारित निश्चित दर्शन समोर ठेवणारा आहे.

जनसंघाचे महामंत्री म्हणून काम करत असतानाच दीनदयाळजींना देशातील, समाजातील, राजकारणातील, पक्षातील, प्रशासनातील विचारांच्या अभावाची, अपुरेपणाची अन भरकटलेपणाची जाणीव होऊ लागली. त्याच्याच परिणामी त्यांनी अतिशय सखोल आणि मुलभूत चिंतन केले आणि १९६५ साली एप्रिल महिन्यात २२, २३, २४, २५ असे सलग चार दिवस मुंबईत एका भाषणमालेच्या रुपात ते प्रकट केले. २२ एप्रिल रोजी `राष्ट्रवादाची योग्य कल्पना', २३ एप्रिल रोजी `एकात्म मानववाद', २४ एप्रिल रोजी `व्यष्टी-समष्टीतील समरसता' आणि २५ एप्रिल रोजी `राष्ट्रजीवनाला अनुकूल अर्थरचना' या विषयांवर भाषणे दिली. यातील एकाच भाषणाचे शीर्षक `एकात्म मानववाद' असे असले तरीही त्या चार भाषणांना संकलितपणे दीनदयाळजींनी मांडलेला `एकात्म मानववादाचा' सिद्धांत म्हणून ओळखले जाते. दुर्दैवाने त्यानंतर केवळ तीन वर्षेच ते या जगात राहिलेत, त्यामुळे या अतिशय सखोल अशा विचारदर्शनावर भाष्य करणे अथवा त्याचा विस्तार करणे; तसेच त्याचे व्यावहारिक स्वरूप समाजापुढे मांडणे त्यांना शक्य झाले नाही. म्हणूनच `एकात्म मानववाद' समजून घेताना त्यांचे अन्य लिखाण लक्षात घ्यावे लागते. त्याशिवाय `एकात्म मानववाद' नीट समजून घेता येऊ शकत नाही. त्यांनी लिहिलेले आद्य शंकराचार्यांचे चरित्र, त्यांच्या स्तंभलेखनाचे संकलन असलेली `पोलिटिकल डायरी', त्यांच्या लेखांचे `राष्ट्रजीवन की दिशा' आणि `राष्ट्रचिंतन' या सगळ्यातून त्यांचे सिद्धांत उलगडतात.

दीनदयाळजी जनसंघाचे महामंत्री होते तरीही `एकात्म मानववादाची' वैचारिक किंवा व्यावहारिक मांडणी जनसंघ किंवा भारतीय जनता पक्षाकडून झाली नाही. प्रथम जनसंघाने आणि नंतर भारतीय जनता पक्षाने पक्षाची विचारधारा म्हणून त्याचा स्वीकार केला असला तरीही त्याची चर्चा, विवेचन, मांडणी कधीच केली नाही. उलट मुख्य प्रवाहातील पक्ष होताना कुठेतरी `एकात्म मानववाद' बाजूस सारला गेला का, अशी शंका यावी अशीच स्थिती आहे.

१९७० च्या फेब्रुवारी महिन्यात कानपूरच्या दीनदयाळ उपाध्याय स्मारक शिक्षा समितीच्या वतीने प्रसिद्ध चिंतक दत्तोपंत ठेंगडी यांचे `एकात्म मानववादा'वर एक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. `एकात्म मानववाद- एक अध्ययन' या शीर्षकानेच ते प्रसिद्ध आहे. १९७२ साली कानपूरच्याच दीनदयाळ उपाध्याय सनातन धर्म विद्यालयात रा. स्व. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे एक भाषण आयोजित करण्यात आले होते. ते `परिपूर्ण मानव' या शीर्षकाने प्रसिद्ध आहे. एकात्म मानववाद समजून घेण्यासाठी ही दोन्ही भाषणेही उपयुक्त आहेत. त्यानंतर बऱ्याच काळाने, ८० च्या दशकात; म्हणजे दीनदयाळजींनी एकात्म मानववाद मांडल्यानंतर सुमारे वीस वर्षांनी पुण्याच्या `भारतीय विचार साधना' प्रकाशनाने `पंडित दीनदयाळ उपाध्याय विचार दर्शन' नावाचा द्विखंडात्मक ग्रंथ प्रकाशित केला. त्यात एकात्म मानववादाचा विस्तारपूर्वक आढावा आणि परामर्श घेण्यात आला आहे.

या द्विखंडात्मक ग्रंथात प्रसिद्ध पत्रकार आणि विचारवंत वि. वा. नेने यांनी `एकात्म दर्शन'चा आढावा घेतला आहे. दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राचे संस्थापक आणि प्रसिद्ध पत्रकार भा. कृ. केळकर यांनी दीनदयाळजींच्या राजकीय वारशाची चर्चा केली आहे. जळगावचे व्यावसायिक आणि अर्थशास्त्राचे अभ्यासक श. अ. कुलकर्णी यांनी एकात्म अर्थनीतीचे विवेचन केले आहे. सुप्रसिद्ध संपादक, विचारवंत, लेखक चं. प. भिशीकर यांनी दीनदयाळजींच्या मूलगामी राष्ट्रचिंतनाची चिकित्सा केली आहे. प्रसिद्ध विचारवंत ब. ना. जोग यांनी दीनदयाळजींनी राष्ट्रकारणासाठी केलेल्या राजकारणावर प्रकाश टाकला आहे. `दै. भारत', `केसरी', `महाराष्ट्र टाईम्स', `तरुण भारत', `लोकसत्ता' या विविध वृत्तपत्रातून वाचकांना परिचित असलेले वि. ना. देवधर यांनी अनेक लोकांच्या आठवणीतून दीनदयाळजींचे व्यक्तिदर्शन घडवले आहे. एकात्म मानववादाचा भाव समजण्यासाठी हे व्यक्तीदर्शन लक्षात घेणे अतिशय आवश्यक. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या द्विखंडात्मक ग्रंथाला दत्तोपंत ठेंगडी यांनी लिहिलेली आणि पहिल्या खंडाच्या सुरुवातीला असलेली दीडशेहून अधिक पृष्ठांची विवेचक प्रस्तावना. एक प्रकारे दीनदयाळजींच्या एकात्म मानववादावरील भाष्य म्हणून या ग्रंथाचा उल्लेख करावा लागेल.

काय आहे `एकात्म मानववाद'? एकात्म मानववाद काय आहे याचा विचार करण्यापूर्वी, ते जनसंघ वा भाजपचे आर्थिक, राजकीय, सामाजिक धोरण नाही; हे स्पष्ट व्हायला हवे. दीनदयाळजी एका पक्षाचे अध्वर्यू होते. त्यामुळे त्यांनी मांडलेला विचार हा त्या पक्षाचा धोरणात्मक दस्तावेज असावा अशी कल्पना सहजपणे करण्यात येते. परंतु ती वास्तवाला धरून नाही. दीनदयाळजी जनसंघाचे महामंत्री होते, त्याचवेळी ते विशुद्ध तत्वचिंतकही होते. प्रचलित विचारधारा, वाद, भारताचा आणि जगाचा इतिहास, सद्यस्थिती, मानवी सौख्याची आणि प्रगतीची कल्पना, अशा नाना गोष्टींच्या एकात्म चिंतनातून त्यांना प्रतित झालेले एक संकल्पचित्र त्यांनी `एकात्म मानववाद' या रुपात सादर केले. यात आर्थिक, राजकीय कार्यक्रम नाही. अर्थकारण, राजकारण याची चर्चा निश्चित आहे, परंतु ती ध्येयधोरण आणि दिशादर्शन या स्वरुपाची आहे; आराखडा वा कृती कार्यक्रम या प्रकारची नाही. अर्थकारण वा राजकारणाच्या पायाभूत सिद्धांतांची ही चर्चा आहे. हे विश्व तसेच त्यातील मानव आणि त्याचे जगणे याकडे पाहण्याच्या प्रचलित पाश्चात्य पद्धतीपेक्षा वेगळी दृष्टी दीनदयाळजींनी `एकात्म मानववादात' प्रतिपादित केली आहे. राष्ट्र म्हणजे काय? समाज म्हणजे काय? आंतर्राष्ट्रीयता म्हणजे काय? राजकारणाचं स्थान काय? अर्थकारणाचं स्थान काय? सुखाची कल्पना काय असावी? व्यक्ती, परिवार, समाज, राज्य यांच्यातील सर्वोच्च कोण? अशा अनेक मुलभूत गोष्टींची चर्चा आणि चिकित्सा त्यांनी केलेली आहे. व्यक्ती आणि समाजाचा एकांगी विचार न करता त्यांचे बहुरंगी स्वरूप समजावून घेऊन त्याआधारे मानवी जीवनाची घडी बसवायला हवी, असा त्यांचा निष्कर्ष आहे. माणूस हा आर्थिक प्राणी नाही, राजकीय प्राणी नाही किंवा सामाजिक प्राणीही नाही. हे सगळे त्याच्या व्यापक जगण्याचे अविच्छिन्न भाग आहेत, पण एक भाग म्हणजे पूर्णता; असे मानण्याची चूक आपण करतो आहोत आणि ती दुरुस्त करायला हवी हा त्यांच्या विचारांचा आशय आहे. शिवाय ही सारी अंगे एकाच वेळी विचारात घेणे आवश्यक. एकाचा विचार आता, एकाचा नंतर असे करून उपयोग नाही, असेही त्यांचे प्रतिपादन आहे. हा सगळ्या अंगांचा आणि त्यासोबतच माणसाला कुठे जायचे आहे त्या ध्येयाचा, एकत्रित विचार म्हणजे `एकात्म मानववाद'. या एकात्म, समग्र चिंतनाच्या आधारे त्यांनी कल्पना केलेल्या व्यवस्थेत `धर्म' हा सगळ्या गोष्टींचा मार्गदर्शक आणि नियंत्रक असेल. मात्र त्याच वेळी `धर्म' म्हणजे `रिलिजन/ पंथ/ संप्रदाय/ पूजापद्धती' नाही आणि `धर्मराज्य' म्हणजे `theocratic' राज्य नाही, हे दीनदयाळजी आग्रहाने मांडतात. `धर्मराज्य' म्हणजे पुन्हा हजारो वर्षे मागे जाणे नाही आणि ऐहिक जीवन नाकारणेही नाही, हेदेखील ते प्रखरतेने सांगतात.

येत्या एप्रिल महिन्यात दीनदयाळजींनी मांडलेल्या `एकात्म मानववादाला' ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्याची विस्तृत, तपशीलवार चर्चा होईलच. योगायोगाने त्यांनीच स्थापन केलेल्या पक्षाशी नाळ जुळलेला आणि त्यांच्या `एकात्म मानववादा'शी बांधिलकी सांगणारा भाजपा केंद्रात सत्तेवर आहे. त्यामुळे त्याची ध्येयधोरणे, त्याचे कार्यक्रम एकात्म मानववादाशी किती सुसंगत वा असंगत आहेत यांचीही चर्चा होईल. परंतु ते फारसे महत्वाचे नाही. कारण एकात्म मानववाद हा एखादा कार्यक्रम नसून, समाजाचे- मानवाचे- मूल्यभान जागवणारा एक विचार आहे. त्यामुळे तो विचार संपूर्ण समाजापर्यंत पोहोचणे, रुजणे आणि समाजाने त्या दिशेने पुढे जाणे आवश्यक आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, २५ सप्टेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा