मंगळवार, ७ ऑक्टोबर, २०१४

स्वाभिमान आणि दृष्टीकोन

भारताच्या यशस्वी मंगळ मोहिमेची खिल्ली उडवणारे एक व्यंगचित्र न्यूयॉर्क टाईम्सने प्रसिद्ध केले. जगभरातील भारतीय समुदायाने त्यावर आक्षेप घेतल्यावर त्या वृत्तपत्राने माफीही मागितली. मात्र माफी मागितली म्हणजे वृत्ती आणि दृष्टी बदलते असे नाही. हे व्यंगचित्र काढणारी व्यक्ती सिंगापूरची आहे. काय होते त्या व्यंगचित्रात? कशावर भाष्य होते? भाष्य होते मंगळ मोहिमेला आलेल्या खर्चावर. पंतप्रधानांनी ज्या गोष्टीचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता आणि समस्त भारतीयांना ज्याचा अभिमान वाटतो अशी ही बाब. हॉलीवूड चित्रपटापेक्षा कमी खर्चात पार पाडलेल्या या मोहिमेच्या खर्चाचा अर्थ, व्यंगचित्र काढणाऱ्या दीड शहाण्याने आणि ते प्रसिद्ध करणाऱ्या अति शहाण्यांनी, भारत दरिद्री आहे असा लावला. एक शेतकरी आपली गाय घेऊन दारावर उभा आहे आणि उच्चभू लोकांच्या क्लबमध्ये आत घेण्याची विनंती करतो आहे, असे त्यात दाखवले आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या या आचरटपणातून निर्माण झालेल्या मान-अपमानाच्या प्रश्नाचा योग्य निकाल त्यांच्या माफीने लागलेला आहे. परंतु या व्यंगचित्राने पुढे आणलेल्या इतर प्रश्नांचे काय? वास्तविक तेच या प्रकरणातील खरे प्रश्न असून आज जगाला भेडसावत आहेत. काय आहेत हे प्रश्न?

हे प्रश्न आहेत, जगण्यातील पैशाच्या भूमिकेचे. पैसा म्हणजेच जगणे की पैसा हे जगण्याचे साधन आहे? जी गोष्ट कमी खर्चात होते त्यासाठी अधिक पैसा खर्च करणे शहाणपणाचे की मूर्खपणाचे? कोणाजवळ किती पैसा आहे यावरून व्यक्तीचा, समाजाचा, देशाचा, संस्थेचा दर्जा उच्च किंवा नीच ठरवणे याला सभ्यपणा म्हणावे का? बुद्धिमत्ता, गुणसंपदा यांना काही अर्थ आहे की नाही? अमाप पैसा आहे एवढ्यासाठी निर्बुद्धतेचा गौरव करण्याची वृत्ती माणसाला भूषणावह समजायची का? ज्या मानवेतर सृष्टीवर माणसाचे जीवन अवलंबून आहे त्याबद्दल तिरस्कार, घृणा आणि कमीपणाची भावना मानवाला कमीपणा आणणारी नाही का?

संपूर्ण जगात या प्रश्नांची जी उत्तरे दिली जातील त्याच्या नेमके विरुद्ध भारताचे उत्तर असेल. उत्तरातील हा विरोध वृत्ती आणि विचारांचा परिणाम आहे. वृत्ती आणि विचारांचा हा विरोध आजचाच आहे असेही नाही. हा खूप जुना आहे. अमेरिका आज भारतेतर जगाच्या या दृष्टीची सगळ्यात सशक्त प्रतिनिधी आहे. सुमारे १२५ वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद यांनी प्रत्यक्ष अमेरिकेतच या वृत्तीचे वाभाडे काढले होते. `डॉलरवर आधारित जीवनमूल्य, डॉलरवर आधारित समाजव्यवस्था, डॉलरवर आधारित विचारपद्धती' यावर प्रचंड कोरडे ओढून त्यांनी त्यातील त्रुटी आणि धोके दाखवून दिले होते. एवढेच नव्हे तर संपूर्ण जगासाठी यासंबंधातील भारतीय दृष्टीकोन कसा योग्य आहे याचेही विवेचन केले होते. आज त्यांनी दाखवलेल्या त्रुटी आणि धोके जगापुढे आ वासून उभे आहेत. जगातील बहुतेक सारेच संघर्ष आणि अशांती भारतेतर दृष्टीच्या स्वीकारामुळेच निर्माण झाले आहेत.

स्वामीजींनी भारताचा स्वाभिमान आणि दृष्टीकोन या दोहोंच्या प्रस्थापनेसाठी काम केले. आज स्वाभिमानाची प्रस्थापना झालेली आहे असा अनुभव येतो. न्यूयॉर्क टाईम्सच्या व्यंगचित्र प्रकरणाने हा अनुभव पुन्हा दिला आहे. दृष्टीकोनाची प्रस्थापना मात्र अजून बाकी आहे. खुद्द आम्ही भारतीय लोकही स्वभिमानापुरता विचार करीत असून, दृष्टीकोनाकडे दुर्लक्ष करीत आहोत अशी स्थिती आहे. `अर्थ' विषयातील भारतीय दृष्टीकोनाची प्रस्थापना हे आगामी काळातील आव्हान आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ७ ऑक्टोबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा