शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०१४

आचरटांचे विलाप

कार्यकर्ता हा विचारवंत, द्रष्टा असायलाच हवा असा काही नियम विधात्याने केलेला नाही. पण आपण कोणाचा हात, तोंड वा मेंदू धरुही शकत नाही आणि नियंत्रितही करू शकत नाही. मात्र त्यामुळे होणारे परिणाम थांबत नाहीत. असेच हौशी विचारक फारसा मागचापुढचा विचार न करता लिहित किंवा बोलत सुटतात आणि गोंधळ माजवत राहतात.

कुठल्याशा उपनिषदात एक कथा आहे की, एक शिष्य आपल्या गुरूकडे जातो आणि एक प्रश्न विचारण्याची अनुज्ञा मागतो. गुरु त्याला १०० दिवस थांबण्याची आज्ञा करतो. १०० दिवसांनी शिष्य गुरूकडे जातो तेव्हा विचारतो, `मला १०० दिवस थांबायला का सांगितले? आता माझा जुना प्रश्न राहिला नसून नवीन प्रश्न विचारायचा आहे.' गुरु त्याला म्हणतो- नवीन प्रश्न असेल तर पुन्हा १०० दिवस थांब. असे दोन-तीनदा होते. अखेर शिष्य नाराजीनेच गुरूला याचे कारण विचारतो. गुरु त्याला सांगतो की, एखादा प्रश्न तुझ्या मनात आल्याबरोबर तू ज्यावेळी विचारतो त्यावेळी तू त्यावर काहीही विचार केलेला नसतो. तो तुझ्या मनातील केवळ एक तरंग असतो. १०० दिवस थांबल्यावर तुझ्या मनात, बुद्धीत तो घोळत राहतो. त्याला अनुसरून तू निरीक्षण करतो, तर्क करतो, अनुमान करतो, माहिती गोळा करतो, त्याचे विश्लेषण करतो; अशी सगळी प्रक्रिया घडते. त्यातूनच तुला उत्तर मिळते. किंवा समजा उत्तर नाही मिळाले तरी त्याबद्दल तू साधकबाधक विचार केलेला असतो आणि त्यामुळे मी जे उत्तर देईन ते समजून घेण्याची तुझी योग्यता तयार होईल. मग माझे उत्तर तुला पटेल किंवा पटणार नाही पण ते तुला योग्य अन निर्णायक उत्तराकडे घेऊन जाईल.

विचार, चिंतन, सिद्धांत, मते वगैरे संबंधात आज हे पदोपदी जाणवते. एकूणच विचार या गोष्टीसाठी आवश्यक असा वेळ देणे आणि सायास करणे बंद झाले असल्याने गोंधळ आणि बजबजपुरी पाहायला मिळते. त्यातून हाती मात्र काहीही लागत नाही. प्रसार माध्यमांनी हा गोंधळ वरच्या पायरीवर नेउन ठेवला आहे. एवढे सगळे विवेचन आज करण्याचे कारण म्हणजे विवेक कोरडे या मुंबईच्या सर्वोदयी कार्यकर्त्याचे आजच्या लोकसत्तेत प्रसिद्ध झालेले पत्र. या पत्रातून त्या सर्वोदयी कार्यकर्त्याचा वकूब जेवढा स्पष्ट होतो, तेवढीच लोकसत्ताच्या संपादकांची वृत्तीही. तसे नसते तर एक साधे पत्र, `लोकमानस' म्हणून न छापता `विशेष' म्हणून छापले नसते; तेही सरसंघचालकांचे छायाचित्र वगैरे छापून त्याला इतके उठावदार करून मोठ्या वैचारिक प्रबोधनाच्या स्वरुपात तर नक्कीच नसते छापले. याउलट, मी जर त्यावर प्रतिवाद पाठवला तर तो न वाचता केराच्या टोपलीत टाकला जाईल याबद्दल माझ्या मनात कणमात्र शंका नाही. बुद्धिमत्ता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा, जगाच्या कल्याणाची कळकळ आणि प्रयत्नांची पराकाष्ठा यांचा मक्ता स्वत:लाच स्वत:च्याच हाताने देऊन टाकल्यानंतर यापेक्षा वेगळे काहीच घडू शकत नाही.

त्या पत्राचे शीर्षक आहे- `सारेच संघाचे !' अन संपूर्ण पत्रात त्यावर भरपूर टीका आहे. खरे तर यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? एकीकडे बरळत सुटायचे- विचारभिन्नता/ मतभिन्नता असायला हरकत नाही पण मनभिन्नता नको आणि संघ जर सगळ्यांनाच आपले म्हणत असेल तर त्यावर आक्षेप घ्यायचा याला `गाढवपणा' याशिवाय दुसरे काय म्हणायचे. `आधीच मर्कट, त्यातही मद्य प्याला' अशीच ही स्थिती. आपण काय लिहितो/ बोलतो आहोत हे लिहिणाऱ्याला/ बोलणाऱ्याला न समजणारी स्थिती. संघात रोज म्हटल्या जाणाऱ्या एकात्मता स्तोत्राचा संदर्भ घेऊन त्यातील विसंगती दाखवण्याचा खटाटोप या स्वनामधन्य विद्वानाने केला आहे. काय आहे ही विसंगती? गांधीजींच्या अहिंसेला न मानणाऱ्यांनी गांधीजींना प्रात:स्मरणीय मानणे ही ती विसंगती. विचार तर दूर राहो, पण सामान्य समज इतक्या हास्यास्पद थराला आणल्यावर काय बोलावे? संघाने कधीही लपवून ठेवले नाही की, गांधीजींचा अहिंसा विचार आणि त्यांची मुसलमानांबद्दलची भूमिका यांच्याशी संघाचे मतभेद आहेत. प्रत्यक्ष गांधीजींशी झालेल्या चर्चेतही संघसंस्थापक डॉ. हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी त्यांना हे स्पष्ट केले होते. गेल्या ८९ वर्षात संघाने ती भूमिका बदललेली आहे असेही नाही. दुसरीकडे राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ग्रामविकास, गोरक्षा, साधेपणा, आध्यात्मिक अधिष्ठान अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल संघाचे मतभेद नाहीत, उलट संघाला ते सारे विषय आपलेच वाटतात आणि संघाने सातत्याने त्यासाठी भरीव कार्य केले आहे.

एखाद्याचे मोठेपण मान्य करणे किंवा त्याला सन्मान देणे, आदर देणे याचा अर्थ त्याचा प्रत्येक शब्द प्रमाण मानणे असा असतो का? आपल्या परंपरेत तर गुरूलाही तपासून घेण्यास सांगितले आहे. गांधीजी ज्या भगवदगीतेचे भक्त होते, ती गीता सांगणारा श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला स्पष्ट सांगतो- मी म्हणतो म्हणून तू युद्ध करू नकोस. तू विचार कर, योग्य-अयोग्य तू ठरव आणि निर्णय घे. स्वत: गांधीजींनी कधीही हा आग्रह धरला नाही की, आपण म्हणतो तेच प्रमाण. मग त्यांच्याशी प्रामाणिक मतभेद व्यक्त करूनही त्यांच्याबद्दल आदर बाळगणे, एवढेच नव्हे तर त्यांच्या लोकोत्तर व्यक्तित्वाचे रोज स्मरण करणे, त्यांच्यापासून प्रेरणा घेणे यात गैर काय आहे? खरे तर गांधीजींचे नाव प्रात:स्मरणात आणि नंतर एकात्मता स्तोत्रात समाविष्ट करणे आणि कायम ठेवणे हे संघाला सहज शक्य झालेले नाही. गांधीजींच्या भूमिका आणि त्यांच्या हत्येनंतरचा इतिहास या पार्श्वभूमीवर संघाच्या स्वयंसेवकांच्या मनात त्यांच्याविषयी रागही होता. तरीही एक समतोल भूमिका घेत संघाने स्वयंसेवकांच्या मानसिकतेत परिवर्तन घडवून आणले. हे काय लहानसहान काम आहे का? समाजाच्या मोठ्या वर्गाच्या मनातील राग, गैरसमज, कटुता प्रयत्नपूर्वक निपटून काढीत योग्य समतोल विचार आणि आचार रुजवत जाणे हे वाईट वा चुकीचे आहे का? ते वाईट वा चुकीचे असेल तर संघाने ही चूक केली आहे आणि पुढेही करीत राहील.

दुसरीकडे- गांधीजींची मुसलमानविषयक भूमिका आणि त्यांचा अहिंसाविचार यांची काय स्थिती आहे? सर्वोदय चळवळीची आज काय स्थिती आहे? सर्वोदय मृत्यूपंथाला का लागला? सर्वोदयी संस्था गतार्थ का झाल्या? त्यातील जोम, जोश, उत्साह, प्रेरणा लयास का गेल्या? संघ उन्मादी आहे त्यामुळे तो वाढला किंवा टिकला असे म्हणणे तर्कदुष्ट तर आहेच, पण माणूस, समाज याबद्दलची समज नसल्याचे ते लक्षण असून तो सामान्य माणसाचा अपमानही आहे. लोक मूर्ख आहेत असे म्हणायचे का? संघ वर्षानुवर्षे उन्माद निर्माण करीत असेल तर समाजाच्या सगळ्या थरातील कोट्यवधी स्त्री-पुरुष त्यात सहभागी का होतात? तेही स्वत:चे कुटुंब, कामधंदा वगैरे सांभाळून !! बरे हिंदू-मुस्लिम ऐक्य व्हावे अशी जर सर्वोदयवाद्यांची इच्छा होती तर त्यांनी केले काय? संघाला शिव्या देऊन ते ऐक्य होणार होते काय? याउलट हिंदू समाज आणि मुस्लिम समाज यांच्यात सार्थक चर्चा व्हावी आणि ऐक्य निर्माण व्हावे हा प्रयत्न संघानेच केला. दहा वर्षांपूर्वी तर चक्क एक अखिल भारतीय संस्था त्यासाठी स्थापन केली. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे एक सदस्य पूर्णवेळ त्याच संघटनेचे काम करतात. अन हा नुसताच प्रयत्न नाही तर गोरक्षणासाठी लाखो मुस्लिमांना सहभागी करून घेण्याचे काम संघानेच केलेले आहे. त्यासाठी देशभर काढलेल्या विश्वमंगल गो-ग्राम यात्रेच्या समारोपाला संघाच्या रेशीमबागेतील मैदानावर सरसंघचालकांच्या शेजारी तीन-तीन मुस्लिम विद्वान धर्मगुरू बसले होते आणि त्यांनी गोरक्षेला पाठींबा दिला. संघाला लाखोली वाहणाऱ्यांनी काय केले? आजच्याच वृत्तपत्रात बातमी आहे की, संघाशी संबंधित जनता सहकारी बँकेने स्व. मोरोपंत पिंगळे पुरस्कार `मुस्लिम सत्यशोधक चळवळी'च्या कार्यकर्त्याला दिला आहे. स्व. मोरोपंत पिंगळे हे संघाचे फार मोठे अधिकारी होते. संघाने यावर आक्षेप वगैरे घेतलेला नाही. पण हे तथाकथित सर्वोदयी कार्यकर्ता किंवा लोकसत्ताच्या संपादकांना दिसणार आहे का? उलट संघाच्या बातम्या, संघाची माहिती, संघविषयक लेख कसे दाबून टाकायचे, दडवून ठेवायचे, समाजापर्यंत ते सारे पोहोचू द्यायचे नाही; असाच प्रयत्न होत असतो. यासंदर्भात माझे स्वत:चे अनुभव लिहायचे म्हटले तरी एक ग्रंथ होईल. वैचारिक प्रामाणिकपणा जोपासणे नाकाने कांदे सोलण्याइतके सोपे नाही.

गांधीजींच्या अहिंसा विचारांची आज काय स्थिती आहे हे सगळे जग पाहत आहे. जगभर सुरु असलेल्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी तथाकथित अहिंसेचे पुजारी काय करीत आहेत किंवा त्यांच्याकडे त्यासाठी काय कार्यक्रम आहे? की फक्त अहिंसा, अहिंसा अशी जपमाळ ओढत बसायचे. हिंसा थांबणे महत्वाचे की अहिंसेची जपमाळ ओढणे? हीच अहिंसेची जपमाळ ओढत बसल्याने १९६२ च्या चीन युद्धात काय झाले? अखेर देशाला आपली भूमिका बदलावी लागली. लालबहादूर शास्त्रींना `जय जवान, जय किसान' ही घोषणा द्यावी लागली. देशाला शक्तीची उपासना करावी लागली. परंतु शक्तीची उपासना म्हणजे हिंसेची आराधना नाही अन एखाद्या समाजाशी मैत्री आणि बंधुत्व म्हणजे त्या घटकांच्या सामाजिक विश्लेषणावर बंदी नाही; हे कळायला बुद्धी लागते, केवळ बुद्धिवादी असणे पुरेसे नसते. गांधीजींचे हे दोन्ही विचार पराभूत झाले असून याबाबत संघाची भूमिकाच योग्य आणि वास्तव असल्याचे काळाने दाखवून दिले आहे.

संघ सोयीस्कर भूमिका घेतो असे धादांत खोटे विधान करतानाच सर्वोदयवाद्यांनी गांधीजींचे धर्मप्रेम, त्यांच्या धर्मप्रेरणा, त्यांची रामभक्ती, त्यांचा काँग्रेसविरोध, त्यांचे व नेहरूंचे टोकाचे मतभेद हे सारे का दडवून ठेवले? सर्वोदयवाद्यांएवढा ढोंगीपणा तर क्वचितच कोणी केला असेल. याच पत्रात विवेक कोरडे यांनी स्वामी विवेकानंद आणि बंकिमचंद्र यांच्यासंदर्भातही लिहिले असून संघाचा दुटप्पीपणा उघड केल्याचा आव आणला आहे. फार खोलात न जाता एवढेच म्हणणे पुरेसे आहे की, त्यांनी स्वामी विवेकानंद आणि बंकिमचंद्र समजून घेणे तर दूरच वाचलेलेही नाहीत हे छातीठोकपणे सांगता येईल.

लोक आता `दूध का दूध और पानी का पानी' करू लागले आहेत हे दिसत असूनही या मर्कटलीला थांबत नाहीत याला काय म्हणावे? खरे तर म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावायला नको म्हणून आचरटांच्या या विलापावर वारंवार लिहावे लागते.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १७ ऑक्टोबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा