बुधवार, २९ ऑक्टोबर, २०१४

स्वच्छता, फटाके, प्रदूषण वगैरे


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून आल्यापासूनच स्वच्छता हा विषय लावून धरला आहे. २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी स्वत: रस्त्यावर उतरून आणि त्यांच्या कार्यशैलीप्रमाणे आणखी नऊ जणांना त्यासाठी आमंत्रित करून त्यांनी स्वच्छता या विषयाचे एक वातावरण तयार केले आहे. योगायोगाने पाठोपाठच दिवाळी आली. त्यामुळे फटाक्यांचा कचरा हा विषय पुढे आला. अनेक ठिकाणी हा कचरा तसाच असल्याचे पाहायला मिळाले तर अनेक ठिकाणी तो साफ करण्याची दृश्येही पाहायला मिळाली. सोबतच प्रदूषण हा विषयही जोडला गेला. पंतप्रधान मोदी हिंदुत्वाचे पाठीराखे. दिवाळी हा हिंदूंचा सण. या सगळ्या गोष्टी एकत्र करून काही निष्कर्ष काढले गेले. हिंदुत्वाचे पाठीराखे असलेले मोदी स्वच्छता अभियान राबवितात आणि हिंदू लोक आपल्या दिवाळी सणात फटाक्यांचा कचरा करतात, अशी विसंगतीही दाखवली गेली. या सगळ्या गोंधळात दोन्ही विषयांच्या मुळाशी जाताना मात्र फार कुणी दिसले नाही.

राजकारण बाजूला ठेवून पंतप्रधान मोदी यांच्या भाषणांकडे बारकाईने पाहिले तर एक महत्वाची गोष्ट ते सतत मांडत असल्याचे दिसून येते. अगदी त्यांच्या प्रचारसभातही त्यांनी हा मुद्दा मांडला होता. तो मुद्दा म्हणजे- एकटे मोदी वा एकटे सरकार काही करू शकत नाही. हा मुद्दा किती जण ऐकतात, किती जण लक्षात ठेवतात, किती लोकांना त्याचे आकलन होते आणि किती लोक व्यवहारातील त्याचे स्वरूप समजू शकतात हा गहन प्रश्न आहे. आजही आजूबाजूला लोक चर्चा करताना दिसतात की, `मोदी काही करून दाखवतील. मोदी आहेत तोवर सगळे ठीक चालेल. सगळे सुधरून जाईल.' देशाची राज्यव्यवस्था असो की घरची कुटुंबव्यवस्था नेत्याची एक विशिष्ट भूमिका असते हे निर्विवाद सत्य आहे. परंतु कुटुंबापासून देशापर्यंत एकटा नेता काहीही करीत नसतो. युद्ध जिंकल्यावर सेनापतीला पदक मिळते, पण ती कामगिरी काही त्याची एकट्याची नसते. सैन्यातील प्रत्येक सैनिकाचे श्रेय सारखे असते. प्रत्येक जण पूर्ण जबाबदारीने आणि समर्पण भावनेने आपले काम करतो तेव्हा विजय मिळतो. शिवाय नेत्यावर विसंबून राहिले तर नेता बदलला की पुन्हा घडी विस्कटायला वेळ लागत नाही. ही संपूर्ण प्रक्रिया आणि त्यातील भाव नीट समजून घेतला नाही तर हाती फार काही लागणार नाही आणि पंतप्रधान मोदी काय म्हणतात तेही समजून घेता येणार नाही.

इंग्रजांच्या काळापासून आपल्याला सवय लावण्यात आली की, तुम्ही तुमचे प्रतिनिधी निवडून द्या आणि पुढच्या निवडणुकीपर्यंत आराम करा. तुमचे कर्तव्य म्हणजे फक्त प्रतिनिधी निवडून देणे. तुम्हाला बाकी काहीही कर्तव्य नाही. तुम्हाला फक्त अधिकार. त्यामुळे आपल्या सवयी, आपले विचार करणे सगळेच बदलून गेले. म्हणजे आम्ही कसाही, कुठेही आणि कितीही कचरा करू, पण आम्हाला स्वच्छ परिसर मिळाला पाहिजे. तो आमचा हक्क आहे आणि सरकारचे कर्तव्य. कर्तव्य आणि हक्कांची ही विभागणी चुकीची असूनही चर्चेपुरती मान्य केली तरीही, एक मुद्दा शिल्लक राहतोच. तो असा की, स्वच्छतेसाठी केलेली व्यवस्था पाळण्याची जबाबदारी कोणाची? ती जबाबदारी तर दुसऱ्या कोणालाही देताच येणार नाही ना? कचरा योग्य जागी, योग्य रीतीने टाकणे हे काम कोणाचे? आपण तेवढे केले तरी खूप काम होण्यासारखे आहे. अगदी सुशिक्षित, साधनसंपन्न लोकांच्या लग्नातही जेवणाची ताटे वा अन्य कचरा कसाही, कुठेही पडलेला पाहायला मिळतो. शिवाय यात स्त्री आणि पुरुष असाही भेद नसतो. मुळात कमी कचरा करणे, स्वाभाविकपणे होणारा कचरा योग्य पद्धतीने योग्य ठिकाणी टाकणे, आम्ही जेवढ्या आणि ज्या कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो ती स्वत: लावणे; यात आपल्याला कमीपणा का वाटतो? सार्वजनिक तर जाऊच द्या, घरगुती स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्याची काळजीही आपण घेत नाही. आपल्याला त्याची गरजही वाटत नाही. पान, तंबाखू, खर्रा खाऊन थुंकण्याची आपल्याला लाज वाटत नाही अन `सगळ्यांना समजून घ्यावे' या आपल्या आध्यात्मिक वृत्तीने अशा लोकांबद्दलचा सार्वजनिक तिरस्कारसुद्धा उत्पन्न होऊ शकत नाही. तिरस्काराचं सुद्धा मानवी सभ्यता आणि विकासात महत्व आहे हे समजून घेण्याची गरज आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहे मोठ्या प्रमाणात उभारण्याची गरज असून ती सरकारची जबाबदारी आहे हे खरे असले तरी, असलेल्या सुविधा आम्ही कशा वापरतो हेही तपासायला हवे. कोणत्याही गोष्टीला एकच बाजू नसते. आमची तशी कितीही इच्छा असली तरी !! परंतु आम्ही स्वत:ला इतके डोक्यावर चढवून ठेवतो की सर्वंकष विचार आम्ही करूच शकत नाही. मोदी आणि मोदींचे सरकार काय करेल याचे चर्वितचर्वण करतानाच आम्ही काय केले पाहिजे, मी काय केले पाहिजे, मी काय करू शकतो; याच्या चिंतनालाही वेळ दिला पाहिजे.

फटाक्यांची चर्चा गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण, प्रदूषण या संदर्भात होते. यावर्षी त्या चर्चेला स्वच्छतेचाही एक पैलू जोडला गेला. एका झटक्यात सांगून टाकायचे तर फटाक्यांवर पूर्णपणे बंदी यायला हवी. दिवाळी साजरी करणारे किंवा न करणारेही अनेक जण याच्याशी मुळीच सहमत होणार नाहीत. आनंद, धार्मिक स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, रोजगार अशी बरीच कारणे पुढे केली जातील. ही सगळीच कारणे बहाणेबाजी या एका सदरात मोडणारी आहेत. व्यापारी आणि व्यावसायिक लोक असोत किंवा घरगुती लोक, फटाके उडवताना कुरघोडी हा एक मोठा घटक असतो. आपण अधिक किमतीचे, अधिक मोठे, अधिक आवाजाचे, अधिक प्रकाशाचे फटाके अधिक प्रमाणात अन अधिक वेळ फोडले हे दाखवण्याचा इरादा नसतो का हे त्या लक्ष्मीमातेची शपथ घेऊन सांगावे. फटाके उडवण्यातील आनंद हा आसुरी आनंदच असतो. त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे, स्वत:ला आणि इतरांना मोद देण्याऐवजी त्रास देणारी गोष्ट आनंद साजरा करणारी असूच शकत नाही.

फटाक्यांचं समर्थन करताना धर्माचा आधारही घेतला जातो. एक तर हिंदूंच्या सणाच्या वेळीच पर्यावरण वगैरे आठवते का, असा एक आक्षेप असतो. हा युक्तिवाद मुळातच तकलादू आहे. हिंदू समाजाला एकजूट होण्यासाठी आणि सशक्त होण्यासाठी इतक्या सैल मुद्याची गरज नाही. हिंदू समाज शक्तिमान करण्यासाठी त्याच्या शक्तीस्थानांवर जोर द्यायला हवा. देशकाल परिस्थितीनुसार तर्कपूर्ण अशा गोष्टींना हिंदू धर्माचा विरोध असूच शकत नाही. दुसरा युक्तिवाद असतो- फटाके फोडणे ही धार्मिक प्रथा आहे. या युक्तिवादात तथ्य नाही. अगदी प्रभू रामचंद्राच्या काळात सुद्धा अयोध्येत फटाके फोडले होते, असे सांगणारेही आहेत. भारतात असंख्य सणउत्सव सतत साजरे होत असतात. त्यांना शेकडो-हजारो वर्षांची परंपरा आहे. फटाके फोडणे हा जर धर्माचा भाग असेल तर अन्य कोणत्याही सणउत्सवाशी फटाके का जोडलेले नाहीत? अन्य अनेक उद्योग व्यवसायांचा भारताचा इतिहास शेकडो वर्षे मागे नेता येत असताना फटाका व्यवसायात आघाडीवर असलेल्या शिवकाशीचा इतिहास मात्र फक्त शे-सव्वाशे वर्षांचाच का असावा? मुळातच फटाक्यांचा जागतिक इतिहास हा दोन-अडीचशे वर्षांचा आहे. भारतात याची सुरुवात ब्रिटीश काळात झाली आणि तेव्हापासून आजतागायत फटाके हा निव्वळ व्यावसायिक प्रकार आहे. त्यात धार्मिकता काहीही नाही. धर्माचा त्याचा संबंध नाही. याउपरही समजा फटाके आणि धर्माचा संबंध असेल तरीही, हिंदू समाजाने योग्य-अयोग्य विवेक करून अनेक गोष्टीत बदल केलेले आहेत. तीच हिंदू धर्माची शिकवण आहे, त्याचे वैशिष्ट्य आहे आणि त्याचे शक्तीस्थानही.

फटाक्यांना विरोध का? त्याने रोजगाराची हानी होणार नाही का? दुसरा प्रश्न बालीश बुद्धीचा आहे. एक म्हणजे, फटाक्याने होणारे नुकसान आणि फटाके व्यवसाय बुडाल्याने होणारे नुकसान यातील, फटाक्यांनी होणारे नुकसान अधिक आहे. दुसरे म्हणजे, अशा गोष्टी अपरिहार्य असतात आणि त्यांनी खूप फरक पडत नाही. मोबाईलमुळे हजारो पिसिओधारक बेरोजगार झालेतच ना? स्वयंचलित दुचाकी वाहने वाढल्याने सायकलनिर्मिती आणि दुरुस्ती यातील रोजगार घटलाच ना? संगणक वापरणे सुरु झाल्यावर अनेक लोक बेरोजगार झाले ना? त्यामुळे हा मुद्दा गैरलागू आहे.

फटाक्यांना विरोध असण्याचे कारण आहे- त्यामुळे आरोग्य आणि पर्यावरणाची होणारी हानी. आवाज आणि वायू प्रदूषण किती होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आपण सारे प्रत्यक्ष ते अनुभवतो. डोळे खराब होण्यापासून, डोके बधीर होईपर्यंत आणि चिडचिडेपण वाढण्यापासून जखमा होईपर्यंत, शिवाय हृदयविकार- श्वसन विकार वगैरे माहिती सगळ्यांना आहे. एक गोष्ट आवर्जून सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की फटाक्यांचे हे प्रदूषण झाडे लावून कमी होऊ शकत नाही. कारण फटाके फोडण्यातून निर्माण होणारा धूर कागद, लाकडे वा काडीकचरा यांच्या धुरासारखा साधा नसतो. कागद, लाकडे, काडीकचरा जाळला तर त्यातून फक्त कार्बन डायऑक्साइड निर्माण होईल आणि हा वायू झाडांचे अन्न आहे. त्यामुळे थोडी झाडे लावली की त्याचे प्रदूषण कमी होईल. तसेही प्रत्येक माणूस रोज चोवीस तास, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कार्बन डायऑक्साइडचे प्रदूषण श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेदरम्यान करीतच असतो. ते प्रदूषण झाडे लावून पळवता येते. मात्र फटाक्यांच्या ज्वलनात (फटाके आवाजाचे असोत की प्रकाशाचे) अनेक रसायने आणि धातू असतात. वेगवेगळ्या रंगांच्या निर्मितीसाठी अनेक विषारी धातू वापरले जातात. झाडे ही रसायने आणि धातू शोषून घेऊ शकत नाहीत.

लाल रंगासाठी स्त्रॉशियम आणि लिथियम, नारिंगी रंगासाठी कॅल्शियम, पिवळ्या रंगासाठी सोडियम, हिरव्या रंगासाठी बेरियम, निळ्या रंगासाठी कॉपर, जांभळ्या रंगासाठी पोटॅशियम आणि रुबिडीयम, सोनेरी रंगासाठी कोळसा आणि लोखंड, पांढऱ्या रंगासाठी टिटॅनियम, अॅल्युमिनियम, बेरिलियम, मॅग्नेशियम आदी धातू वापरले जातात. याशिवाय झिंक, सल्फर, फॉस्फरस यांचाही वापर केला जातो. झाडांच्या प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साइड ग्रहण करून ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. अन्य धातू वा रसायने हवेत तशीच राहतात. हवेत मिसळलेले हे धातू आणि रसायने हवा, पाणी इत्यादी कायमस्वरूपी प्रदूषित करतात.

या ठिकाणी एक नोंद घेणे आवश्यक आहे. फटाक्यांप्रमाणेच सर्व प्रकारच्या स्वयं वातानुकूलन यंत्रणा (एसी), डिओडरंट्स, स्वयंचलित वाहनांचा धूर अशा काही गोष्टींनी होणारे प्रदूषण केवळ झाडे लावून दूर होणारे नाही. या ज्वलनातून उत्सर्जित होणारे क्लोरो-फ्लुरो कंपाउंडस व अन्य घटक पर्यावरण आणि आरोग्य यांना मोठी हानी पोहोचवतात. शिवाय सगळ्या गोष्टी पोटात घेऊन त्यांचे उपयुक्त अन्य गोष्टीत परिवर्तन करण्याची स्वयंसिद्ध क्षमता असलेल्या मातीशी आम्ही वैर धरलेलं आहे. त्यामुळे पर्यावरणाचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. फटाक्यांना पूर्ण फाटा देण्याची म्हणूनच आवश्यकता आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २९ ऑक्टोबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा