शुक्रवार, १२ डिसेंबर, २०१४

अभिनंदनीय आणि आनंददायी

संयुक्त राष्ट्रसंघाने काल `आंतर्राष्ट्रीय योगदिनाची' अतिशय महत्वपूर्ण घोषणा केली. त्यामुळे आता २०१५ च्या २१ जून पासून दरवर्षी २१ जून हा दिवस `आंतर्राष्ट्रीय योगदिन' म्हणून साजरा होईल. तेही जगभर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात यासंबंधात केलेली सूचना उचलून धरण्यात आली आणि थोड्याथोडक्या नव्हे, चक्क १७७ देशांनी त्या सूचनेला पाठिंबा दिला आणि काल त्याची प्रत्यक्ष अधिकृत घोषणा करण्यात आली. तमाम भारतीय जनतेच्या अभिमानाचा आणि आनंदाचा हा क्षण आहे. दुर्दैवाने हा आनंद आणि अभिमान दिसून आलेला नाही. वृत्तपत्रे आणि अन्य माध्यमांची ही मुख्य `हेडलाईन' व्हायला हवी होती. पण तसे झालेले नाही. तू-तू, मी-मी आणि अन्य क्षुद्रता आपल्यात किती ठासून भरलेली आहे याचीच जणू पावती यानिमित्ताने मिळाली आहे. ना सरकारी स्तरावर, ना विरोधी पक्षांतर्फे, ना प्रसार माध्यमात, ना सामाजिक स्तरावर, ना सोशल मीडियात; कुठेही हा आनंद, अभिमान, उल्हास, कौतुक दिसून आलेले नाही. कोणत्याही विरोधी पक्षाने या निर्णयाचे स्वागत का केले नाही? हजारो वर्षांची योगपरंपरा जागतिक स्तरावर मान्यता मिळवीत असेल तर ते अभिनंदनीय नाही का? `योग' या गोष्टीची अंगभूत शक्ती आणि श्रेष्ठता, त्याच्या प्रचार-प्रसारासाठी आजवर खपलेले आणि अजूनही खपणारे लोक यांचा हा विजय; आम्हाला व्यापक आणि सकारात्मक करू शकलेला नाही. `योगा' लोकप्रिय करण्यासाठी स्वत:च्या सीडी काढून स्वत: लोकप्रियता आणि पैसा मिळवणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्रींनीही चकार शब्द तोंडातून काढण्याचे कष्ट घेतले नाही. असो. यात बदल होईल तेव्हा होईल. मात्र आज `आंतर्राष्ट्रीय योगदिन' जाहीर झाल्याबद्दल आनंद आणि अभिमान व्यक्त करून त्याच्या हजारो वर्षांच्या परंपरेचे आणि त्या परंपरेच्या आजच्या अनुयायांचे त्रिवार अभिनंदन करणे आपले कर्तव्य आहे.

आता `योग' या विषयाची जगभर चर्चा होईल. योगासने शिकवणाऱ्या लोकांची मागणी होईल. योगदिनाला शुभेच्छापत्रे पाठवली जातील. ई-शुभेच्छापत्रेही उपलब्ध होतील. योगाची मंडळे निघतील. या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. त्याची एक व्यावसायिक बाजूही आहे. त्यात काही गैर आहे असेही नाही. अगदी भारताला विदेशी चलन सुद्धा त्यातून मिळू शकेल. परंतु हे सारे तेवढ्यापुरतेच मर्यादित राहू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संयुक्त राष्ट्रसंघातील ते भाषण किती जणांनी लक्षपूर्वक ऐकले आणि ज्यांनी लक्षपूर्वक ऐकले त्यांना ते किती लक्षात आहे माहित नाही. पुन्हा लक्षात असलेल्या भाषणाचा कशा पद्धतीने अन्वयार्थ लावला जातो; या सगळ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत. मोदींनी एक महत्वाचा मुद्दा मांडला होता की, आपण आपली जगण्याची शैली बदलण्याची गरज आहे. पर्यावरणापासून तर अर्थकारणापर्यंत, आरोग्यापासून तर समाजकारणापर्यंत सगळ्या समस्या कमी करण्यासाठी ते आवश्यक आहे. `योग' या अपेक्षित जीवनशैलीचा मार्ग दाखवतो. त्यामुळेच `योग' म्हणजे केवळ शारीरिक कसरतीचा एक प्रकार असा विचार न करता, महर्षी पतंजली यांनी म्हटल्याप्रमाणे - `योग: चित्तवृत्तीनिरोध:' हे लक्षात घ्यायला हवे. योगासनांसोबत त्याच्या सखोल तत्वज्ञानाचा, योगाने केलेल्या मानवी जीवनाच्या तलस्पर्शी विश्लेषणाचा प्रचार-प्रसार होईल; त्यासंबंधातील समज वाढेल, आचरण वाढेल यावर जोर द्यायला हवा. `योगा'द्वारे शरीर चांगले राखून पैसा, मानसन्मान, पदप्रतिष्ठा, करीयर, शारीरिक सुखोपभोग, अधिकाधिक संग्रह आणि अधिकार; यांचीच आराधना करायची असेल तर तो `योग' या मूळ वस्तूचा/ भावनेचा/ संकल्पनेचा घोर अपमान ठरेल. `सर्वे सन्तु निरामयाः' सोबतच `सर्वे भद्राणि पश्यन्तु' हा `योगा'चा म्हणूनच भारतीय चिंतनाचा गाभा आहे हे विसरता कामा नये. संपूर्ण जगभरातील ७०० कोटी लोकांच्या जीवनात योगाच्या माध्यमातून इष्ट परिवर्तन येवो आणि सगळ्यांच्या जीवनात निरामयतेसोबतच भद्रता नांदो.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १२ डिसेंबर २०१४

बुधवार, १० डिसेंबर, २०१४

समता म्हणजे विषमतेचे व्यवस्थापन

इंग्रजांच्या आमदानीपासून आमच्यात सगळ्यात मोठा बदल जर कुठला झाला असेल तर आम्ही स्वत:ची अक्कल गहाण टाकायला सोकावलो. त्यातूनच आत्मनिषेध, आत्महीनतेचा प्रादुर्भाव झाला. मग बाहेरचे म्हणजे जणूकाही सगळे स्वर्गीय, अचूक, नेमके, कल्याणकारी वगैरे असे समीकरण झाले. अनेक कल्पना, संकल्पना, घोषणा यांचे असे झालेले आहे. `समता' ही एक अशीच बाब. कुठली तरी प्रतिक्रिया म्हणून देण्यात आलेल्या या नाऱ्याचे सखोल विश्लेषण करण्याची तसदी कधी घेण्यात आली आहे का? समता नावाची गोष्ट खरेच आहे का आणि असू शकते का?

एक बाब निर्विवाद आहे की, या जगाच्या मुळाशी समता असेल तर कोणीही आणि जगातील कोणतीही शक्ती विषमता निर्माण करू शकत नाही. अशी विषमता निर्माण केली तरी ती जास्त काळ टिकणार नाही. अन दुसरीही गोष्ट तेवढीच खरी आहे की, या जगाच्या मुळाशी विषमता असेल तर जगातील कोणतीही शक्ती समता निर्माण करू शकणार नाही. आजूबाजूला एक धावती नजर टाकली तरीही समता नसून विषमता हेच जगाचे वास्तव असल्याचे सहज दिसून येते. एवढेच नव्हे तर समता आम्हाला मनानेही मान्य नसते. आम्ही कोणापेक्षा तरी चांगले/ उजवे/ सुंदर/ मोठे/ श्रेष्ठ/ ज्ञानी/ शहाणे/ कर्तृत्ववान असायलाच हवे असतो. आजवरचा इतिहास देखील विषमतेचाच पक्षधर ठरलेला आहे. अमक्याने असे केले, तमक्याने तसे केले, त्यासाठी व्यवस्था जबाबदार वगैरे वितंडवाद योग्य नाही. कारण समतेसाठी झालेले प्रयत्न त्याच व्यक्तींच्या वा व्यवस्थांच्या विरोधातच झालेत ना? मग मुद्दा फक्त यश वा अपयश एवढाच उरतो. त्यात समतेचा पक्ष नेहमी अपयशी ठरत आलेला आहे. कारण मुळात या विश्वाच्या मुळाशी समता नाही. उत्तर आणि दक्षिण ध्रुव परस्पर विरोधी आहेत आणि म्हणूनच पृथ्वीचा समतोल निर्माण झाला आहे. आपल्याला वरवर असमान, म्हणूनच विरोधी वाटणाऱ्या गोष्टींमुळे समतोल निर्माण होतो.

मात्र या देवदत्त, निर्मितीच्या मुळाशी असलेल्या विषमतेचा उपयोग करून स्वार्थ, अन्याय, अत्याचार, दुराचार यांचा हैदोस घातला जाऊ शकतो/ घातला जातो. त्यामुळेच मानवाने आजवर या विषमतेचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला. जगात झालेले प्रयत्न हे विषमतेच्या योग्य व्यवस्थापनाचेच होते. विषमतेएवढ्याच या जगाच्या मुळाशी असलेल्या करुणेने आणि समतेच्या तेवढ्याच मुलभूत ओढीने माणसाला या व्यवस्थापनासाठी प्रवृत्त केले. अमेरिकेतील श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय यांच्यातील विषमता दूर करून गुलामी दूर करण्याचे झालेले प्रयत्न आणि त्यानंतर आजवर जर काही होत असेल तर ते विषमतेचे व्यवस्थापन होय. अगदी आपली राज्यघटनासुद्धा समता निर्माण करू शकली नाही आणि समता निर्माण करू शकणार नाही. ती फक्त विविध प्रकारच्या विषमतेचे व्यवस्थापन करते. कारण समता ही मानवी मनाची उच्च भावना आहे. त्या भावनेची धारणा जेवढ्या प्रमाणात होईल तेवढी समता अनुभवास येईल. अन मानवी भावना उपजत असतात आणि बाह्य परिस्थितीचा त्यावर परिणाम होऊन त्या आकार घेतात. त्यामुळे त्या कधीही समान राहूच शकत नाहीत.

आपल्या देशातील चातुर्वर्ण्य व्यवस्था, तसेच मनुस्मृती आदी गोष्टी विषमतेच्या व्यवस्थापनाचेच प्रयत्न होते. अगदी डॉ. आंबेडकर यांनीसुद्धा मनुला एक सामाजिक शास्त्रज्ञ म्हटले होते ते उगाच नव्हे. व्यवस्था, त्यातील त्रुटी, त्या बदलण्याची गरज यावर चर्चा होत आली आहे आणि व्हायलाही हवी. अन तसेही या जगात अशी कोणती गोष्ट आहे जी काळाच्या भक्ष्यस्थानी पडत नाही. आपले पोषण करणारे सुग्रास भोजन सुद्धा दुसऱ्या दिवशी विष होते. मग एखादी व्यवस्था बिघडली, अपुरी ठरली, त्यात दोष आलेत तर आकाशपाताळ एक का करावे? विचारांशी वैरच करायचे असेल तर गोष्ट वेगळी. पण प्रामाणिक आणि गंभीरपणे विचार करायचा असेल तर या सगळ्या बाबी लक्षात घ्याव्याच लागतील. आपल्या देशातील जुन्या व्यवस्था, जुने ग्रंथ, जुन्या चालीरीती, जुन्या परंपरा यांचा विचार करताना, त्याविषयी बोलताना हे भान राखले जायलाच हवे. अन नवीन घडी बसवताना मुळाशी जाऊन विचार करायला हवा. त्याला अन्य उपाय नाही.

याचा अर्थ हे लिहिणाऱ्याला पुन्हा चातुर्वर्ण्य आणायचे आहे, अस्पृश्यतेला त्याचे समर्थन आहे, तो समाजविरोधी आहे वगैरे अर्थ ज्यांना काढायचे असतील त्यांच्यासाठी- `आमेन !!'

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, १० डिसेंबर २०१४