मंगळवार, २७ जानेवारी, २०१५

हे तर चूक, पण हेही चूकच

फ्रान्सच्या `शार्ली हेब्डो' साप्ताहिकावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यावर जगभरात विविध प्रतिक्रिया उमटल्या. कोणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू उचलून धरली, तर कोणी इस्लामिक कट्टरवादाचा समाचार घेतला. कोणी तर तिसऱ्या महायुद्धापर्यंत जाऊन पोहोचले. या अतिरेकी हल्ल्यानंतर साप्ताहिकाने पुन्हा एकदा इस्लामला मंजूर नसलेले मोहम्मद पैगंबर साहेबांचे व्यंगचित्र मुखपृष्ठावर छापून `हम भी कुछ कम नही' हे दाखवून दिले. त्यांना इस्लामी जगतातून पुन्हा धमक्याही मिळाल्या. भारतातही यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. कथित धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणेच अनाकलनीय होत्या. त्यांच्या दृष्टीने एखादी गोष्ट योग्य वा अयोग्य ठरण्याची एकच कसोटी असते. ती म्हणजे, मुसलमानांची बाजू घेणे. बाकी साऱ्या गोष्टी, सारे तर्क त्यानुसार बेतले जातात. या धर्मनिरपेक्षतेच्या ठेकेदारांच्या व्यतिरिक्त आणखीन दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. एक होती अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गाणारी आणि दुसरी होती, भारताने भोगलेल्या मुस्लिम अतिरेकापोटी उमटलेली. `पहा,  मुस्लिम कट्टरता जगभरात थैमान घालीत आहे आणि तो जगाला असलेला धोका आहे. भारत गेली अनेक शतके त्याच्याशी झुंज देत आहे. आता वेळ येउन ठेपली आहे की, सगळ्या जगाने मिळून तो निपटून काढायला हवा-' अशा आशयाची. जगातील किंवा भारतातील या सगळ्याच प्रतिक्रिया उथळ म्हणाव्या लागतील. मुस्लिम कट्टरता हे वास्तव आहे. त्यात दुमत होण्याचे कारण नाही. `भारतीय सेक्युलर' सोडले तर कोणाचे त्या बाबतीत दुमत होणारही नाही. अगदी इस्लामिक देशांचे सुद्धा. आज पाकिस्तान जी भाषा बोलतो आहे, ती याचेच निदर्शक म्हणावी लागेल. त्यामुळे मुस्लिम कट्टरता नीट हाताळायला हवी, समूळ नष्ट करायला हवी आणि त्यासाठी संपूर्ण जगाने प्रयत्न करायला हवे यात वादच नाही. मात्र  `शार्ली हेब्डो'च्या मार्गाने तसे करणे योग्यही नाही आणि फलदायीही नाही. या घडामोडींच्या अनुषंगाने दोन बाबींचा सखोल विचार करायला हवा. एक म्हणजे, अभिव्यक्तीस्वातंत्र्य कसे आणि किती असावे? दुसरे म्हणजे, इच्छित परिवर्तन कसे घडवावे?

एक गोष्ट निर्विवादपणे मान्य करायला हवी की, `शार्ली हेब्डो'ने जे काही केले ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सरळ सरळ उल्लंघन आहे. अतिरेकी हल्ल्यानंतर त्याने मोहम्मद पैगंबर साहेबांचे व्यंगचित्र छापणे ही कृती तर उघड चिथावणीखोर आहेच, पण त्याचे मूळ असलेले व्यंगचित्र हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सरळ सरळ उल्लंघन आहे. केवळ एखाद्याला एखादी गोष्ट वाटते म्हणून ती व्यक्त केलीच पाहिजे आणि सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, हा अगोचरपणा झाला. माणसाच्या मनात अनेक गोष्टी येत जात असतात. त्यात प्राकृत, संस्कृत, विकृत असे सगळे प्रकार असतात. आपल्या मनातील प्रत्येकच वांती कुठेही अन कशीही बाहेर काढायची, याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणायचे का? अन तसे म्हणायचेच असेल तर `पिके'वर किंवा `एम. एफ. हुसेन'वर आक्षेप घेण्याचे कारण नाही. ज्या कारणांनी `पिके' चित्रपट वा हुसेनच्या चित्रांवर आक्षेप घेणे योग्य आहे त्याच न्यायाने पैगंबर साहेबांच्या व्यंगचित्रावरील आक्षेप योग्य आहे. अशा व्यंगचित्रावर मुस्लिमांनी का नाराज होऊ नये? मुळात सगळ्या जगाने प्रतिमा पूजन टाकून द्यावे हा इस्लामचा दुराग्रह जसा आणि जितका अयोग्य आहे तितकाच, इस्लामला मूर्तीपूजा मान्य नसतानाही आम्ही त्यांची मान्यता मोडीत काढून त्यांना डिवचू; ही मानसिकताही अयोग्य आहे. आपण हिंदूंनी विशेषत: हे लक्षात घ्यायला हवे. `एकं सत, विप्रा: बहुधा वदन्ति' ही जर आपली जीवनश्रद्धा असेल तर पैगंबर साहेबांचे चित्र काढण्याचा आचरट आग्रह चुकीचा आहे असेच म्हणावे लागेल. पैगंबर साहेबांचे चित्र काढल्याने काय मोठेसे होणार आहे? किंवा ते नाही काढले तर जगाचे काय नुकसान होणार आहे? आम्ही जर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकीत राहिलो तर आमचे वैशिष्ट्य आणि महानता गमावून बसू. नव्हे आम्हीही त्यांच्याच पंगतीत जाऊन बसू. हिंदूंनी शक्तिशाली व्हायला हवे याचा जो काही आशय आहे त्यात आपली वैशिष्ट्ये आणि महानता न गमावता योग्य गोष्टींसाठी आग्रही होणे हा महत्वाचा पैलू आहे. मात्र आग्रह आणि अतिरेक यातील सीमारेषा निश्चित करण्याचा विवेक करण्याएवढी परिपक्वता आपल्यात असायला हवी. मुसलमान समाजातील बुरखा सारख्या अनिष्ट प्रथा, जगभरातील मुस्लिम आक्रमणे आणि आक्रस्ताळेपणा यांचा इतिहास, दारूल हरब आणि दारूल इस्लाम या किंवा यासारख्या त्यांच्या मूळ तत्वज्ञानातील संकल्पना; यासारख्या विषयांवर चकार शब्द न काढणे हा नक्कीच दुबळेपणा आहे. तो त्यागायलाच हवा. मुसलमान समाजातील तात्विक आणि व्यावहारिक परिवर्तन, त्याचे त्या समाजावरील आणि अन्य समाजांवरील परिणाम, मुसलमान समाजाचा अन्य समाजांशी संबंध, त्यांच्यातील सलोखा, शांततापूर्ण सुखदायी सहअस्तित्व; यांची व्यापक चर्चा व्हायला हवीच. योग्य त्या मंचावर, योग्य त्या भाषेत, योग्य त्या व्यक्तींनी अशा प्रकारचे प्रयत्न करणे यात वावगे काहीच नाही. किंबहुना तोच योग्य परिवर्तनाचा राजमार्ग आहे. हे करताना अन्य लोक दुबळे आहेत, आपल्या अतिरेकाला ते घाबरतात, आक्रस्ताळेपणा करून आपण वाटेल ते करू शकतो, असा मुसलमान समाजाचा ग्रह होणार नाही; तसेच पूर्वीच झालेला अशा प्रकारचा ग्रह कायम टिकणार नाही; असे अन्य समाजाचे, विशेषत: हिंदू समाजाचे वर्तन असायलाच हवे. त्यासाठी जे काही करणे आवश्यक ते करायलाच हवे. मात्र हे करताना परिवर्तनाची व्याप्ती आणि सगळ्यांबद्दल समादराची भावना यांचे भान राखले जायला हवे. पैगंबर साहेबांचे व्यंगचित्र काढणे आणि त्याचे समर्थन करणे हा तो मार्ग नाही आणि `तुम्हाला काहीही वाटो आम्ही असेच करीत राहणार' हा  `शार्ली हेब्डो'चा आचरटपणा तर निषेधार्हच आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली संपूर्ण मानवजातीला तंत्रविहिनतेकडे नेण्याचा आणि विनोदाच्या नावाखाली मानवी जीवनाला गांभीर्यहीन बनवण्याचा जो उपद्व्याप सध्या जगभर सुरु आहे तो नीट समजून घेणे गरजेचे आहे. यामुळेच भारतातील `पिके'चे आणि फ्रान्समधील  `शार्ली हेब्डो'च्या कृतीचे समर्थन होऊ लागते. साहित्य, पत्रकारिता, चित्रपट, नाटके, वृत्तपत्रे, अन्य नियतकालिके, दूरचित्रवाणी, आकाशवाणी, भ्रमणध्वनी, आंतरजाल; असा खूप सारा पसारा मानवजातीने २१ व्या शतकापर्यंत पसरून ठेवलेला आहे. परंतु ही सारी माध्यमे आहेत. त्यांचा उपयोग कशासाठी करायचा, किती करायचा, कुठे करायचा, का करायचा, किंवा हे सगळे का करायचे नाही याची साधकबाधक चर्चा मात्र होत नाही. त्यानुसार वर्तन ही तर दूरची गोष्ट राहिली. प्रत्येक साधन प्रत्येक गोष्टीसाठी योग्य असतेच असे नाही. त्या प्रत्येक साधनाच्या मर्यादा असतात. या मर्यादा जशा शारीरिक असतात तशाच मानसिक, आर्थिक, सामाजिक, भावनिक, वर्तनशैलीला अनुसरून; अशा अनेक प्रकारच्या असतात. म्हणूनच त्या साधनांचा अमर्याद, बेछूट उपयोग अयोग्य आणि त्याज्य ठरतो. परंतु या सगळ्याचा गांभीर्याने विचार न करता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गायिले जातात. कोणतेही स्वातंत्र्य व्यक्तीच्या आणि समाजाच्या हितरक्षणाने मर्यादित होत असते, नव्हे व्हायला हवे. स्वातंत्र्य हे मूळ तत्व नसून व्यक्तीचा आणि समाजाचा विकास आणि त्यांचे हितरक्षण ही मूळ बाब आहे. त्यासाठी आवश्यक आणि पोषक असेच स्वातंत्र्य असायला हवे. हे सत्य स्वीकारताना अर्ध्याकच्च्या मनाने, पण परंतु करीत, स्वीकारणे कुचकामाचे ठरेल. स्पष्ट व रोखठोक विचार करायला हवा. नाहीतर स्वातंत्र्याच्या नावाने तंत्रविहिनतेकडे सुरु असलेला प्रवास कपाळमोक्ष घडवल्याशिवाय राहणार नाही.

कोणत्याही गोष्टीला विनोदी फोडणी देण्याचाही प्रकार प्रघात होऊ पाहतो आहे. take it easy - अशी एक संस्कृतीच रुजवण्याचा प्रयत्न सुरु आहे. माणसावरील दबावाचे आणि त्याच्या तणावाचे इतके भयंकर स्तोम माजवले जात आहे की, गांभीर्य नावाची काही गोष्ट आहे आणि ती आवश्यक आणि अपरिहार्य आहे याचाच विसर पडावा. जो उठेल तो, ज्यावर वाटेल त्यावर, जे वाटेल तसे बरळत सुटतो; वाटेल तशी टीकाटिप्पणी करत सुटतो, वाटेल तशी प्रतिक्रिया देत राहतो आणि कळस म्हणजे वाटेल तसे हिडीस कलारूप देत राहतो. खरे तर विनोद हा विषय गांभीर्याने घेण्याचा आहे हे भानच सुटले आहे. विनोदाचे जीवनात एक स्थान आहे. पण त्याची एक मर्यादाही आहे. चार घटका विरंगुळा आणि भावनांचे विरेचन एवढेच त्याचे क्षेत्र आहे. पण फक्त चार घटकाच, उरलेल्या घटीकांचे काय? त्याचे गांभीर्य राहायला आणि राखायला हवे की नाही? दुसरे म्हणजे- माणूस त्याला वाट्टेल तसा, वाट्टेल त्या मृगजळामागे धावत सुटणार, त्याविषयी काहीही ऐकून घेण्याची त्याची तयारी नसणार आणि वरून त्याच्यावरील दाब आणि त्याचा ताण यांचे बहाणे करून take it easy चे तत्वज्ञान बनवणार. ही सरळ सरळ विकृत मानसिकता आहे. विनोदाने आजवर जग घडवलेले नाही. जगात जे काही चांगले, आनंददायी, सुखपूर्ण, सुखपोशक, आधार देणारे, घडवले आणि निर्मिले गेले आहे; ते ते अतिशय गांभीर्याने घडलेले वा घडवलेले आहे, हे विसरता कामा नये. नेते असोत वा वैज्ञानिक, सामाजिक कार्यकर्ते असोत वा तत्वज्ञानी, कारखानदार असोत वा सैनिक; यांच्यावर विनोद वगैरे झाले असतील, पण हे कोणीही विनोदाच्या वगैरे भानगडीत पडले नाहीत. कोणासोबत हसणे आणि कोणाला हसणे यातील फरक समजायला अगोदर गांभीर्य समजावे लागते. जीवनातील हास्य नाकारणारे गांभीर्य सुतकी असतेच, पण जीवनातील गांभीर्य नाकारणारे हास्य पोरकट असते; हे त्याहून खरे आहे. एक वेळ एखादी व्यक्ती गंभीर राहत असेल, आपल्याशी बोलत नसेल ते चालू शकते, पण आपल्याला कुणी हसले तर चालेल काय? स्मितहास्याची प्रसन्नता आणि दात विचकण्याचा निलाजरेपणा यातील फरक पुसून टाकणे श्रेयस्कर ठरेल का? म्हणूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय, विनोद काय, व्यंगचित्र काय; सगळ्याची जाण आणि समज वाढायला हवी आणि त्याला अनुसरूनच कायदे-नियम असायला हवेत. आज त्याची वानवा आहे. म्हणूनच `पिके'तील थिल्लरपणा चूक आणि `शार्ली हेब्डो'चे व्यंगचित्रही चूकच.

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २७ जानेवारी २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा