शनिवार, १६ मे, २०१५

भाषणानंतर जबाबदारी कोणाची?

चीनमधील भारतीयांपुढे पंतप्रधान मोदी यांचे अप्रतिम भाषण झाले. मोदी ज्या देशात जातात तेथे त्यांचे भारतीय नागरिकांसमोर भाषण होते. आता ती एक परिपाठी झाली आहे. मोदींचे आणि भाजपचे समर्थक, हितचिंतक त्याचे गुणगान करतात, टाळ्या वाजवतात, कौतुक करतात आणि त्यांचे विरोधक टीका करतात, नावे ठेवतात, बोटे मोडतात. प्रसार माध्यमांना काही भूमिकाच नसते. ते काहीही करतात. पंतप्रधानांच्या भाषणात साधारण मुद्दे तेच असतात. पण भारतातील नवीन सरकार, त्याची वैशिष्ट्ये, विकास, विकासासाठीचे प्रयत्न अशा मुद्यांचाच उहापोह होतो. काही सूक्ष्म परंतु खऱ्या महत्वाच्या मुद्यांकडे मात्र कोणीही लक्ष देत नाही. त्यावर चर्चाही होत नाही. प्रत्यक्ष भाषण ऐकणारे लोकही त्या मुद्यांवर फारसा प्रतिसाद देत नाहीत, विचार करतात की नाही कोणास ठाऊक. आजच्याही भाषणात असे मुद्दे होते.

पहिला मुद्दा होता, `वसुधैव कुटुंबकम'. जगात पसरलेल्या दहशतवादाचा मुकाबला करून त्याला पराभूत करायचे असेल तर त्यासाठी भारताने जगाला दिलेला `वसुधैव कुटुंबकम'चा संदेश व्यवहारात आणण्याला पर्याय नाही, असा पंतप्रधानांचा मुद्दा होता. हा मुद्दा नवीन नाही आणि त्यातील शब्द तर चोथा वाटावेत इतके गुळगुळीत झाले आहेत. पण त्यातील भाव किती जणांच्या मन बुद्धीपर्यंत पोहोचतो? `वसुधैव कुटुंबकम' हे केवळ शब्द नाहीत. त्याच्याप्रती बांधिलकी व्यक्त करून काहीही होणार नाही. खरे तर भारतातील कोणत्याही विचाराचे, संदेशाचे, तत्वज्ञानाचे हे वैशिष्ट्य आहे की, ते आचरणात आणण्यासाठी असते. त्याची बौद्धिक चर्चा करून किंवा विश्लेषणे करून उपयोग नसतो. त्या अंगाने विचार केला तर कुटुंबापासून तर जागतिक सत्ताकारणापर्यंत सहअस्तित्वासाठी भरपूर तयारी हवी. त्यासाठी माणसांच्या मनाला, विचाराला वळण लावण्याची गरज आहे. अन हे काम दीर्घ काळ चालणारे आहे. अर्थात मोदींनी आपल्या भाषणात त्याचा सूत्रपात करणे ही सुरुवात आहे आणि ती स्वागतयोग्य अशीच आहे. परंतु, तो विचार आणि त्यातील भाव, त्यातील आशय जगभर पसरावा, जगण्यात उतरावा यासाठी opinian makers ने आणि मोदींच्या पाठीशी उभे असलेल्या पक्षाने आणि कार्यकर्त्यांनी जे आणि जेवढ्या प्रमाणात करणे अपेक्षित आहे ते केले जाते का? या मुद्याचाही सखोल परामर्श घ्यायला हवा.

दुसरा मुद्दा होता, `निसर्गाचे दोहन व्हावे, शोषण नव्हे.' जगभरात उभे राहिलेले प्रदुषणाचे संकट लक्षात घेता, ही संकटे निर्माण होण्यापूर्वीच हजारो वर्षे आधी भारताने दिलेली, जगाकडे- निसर्गाकडे- पाहण्याची दृष्टी किती महत्वाची आहे याचे पंतप्रधानांनी विश्लेषण केले. अगदी सकाळी उठल्यावर भूमीला पाय लावण्यापूर्वी क्षमायाचना करण्याच्या संस्काराचाही त्यांनी उल्लेख केला. खरी सुरुवात तिथून व्हायला हवी. पण त्या मुद्यांचा आणि संस्कारांचा भाषणानंतर कुठे उल्लेखही होत नाही. आजच्या विकासाच्या व्याख्येत आणि आशा आकांक्षांच्या झंझावातात `निसर्गाचे दोहन व्हावे, शोषण नव्हे,' हा विचार पालापाचोळ्यासारखा उडून जातो. यासाठी मोदींना दोष नाही देता येणार. उलट, भारतासारख्या विशाल आणि महत्वाच्या देशाचे शक्तिशाली पंतप्रधान म्हणून बोलतानाही ते समस्यांच्या इतक्या मुळाशी जातात, याबद्दल आनंदच व्हायला हवा. खरा प्रश्न - या जगाचे भले व्हावे असे वाटणारे आणि मोदी व भाजप यांचे चाहते व हितचिंतक काय करणार हा आहे. आज मोदींसमोर बसून त्यांच्या भाषणाला जोरदार टाळ्या वाजवणारे लोक त्यांच्या या विचाराचे मर्म किती समजू शकतात आणि त्यानुसार वागू शकतात हा महत्वाचा प्रश्न आहे. एका भ्रमणध्वनीने काम होत असतानाही आपले स्टेटस वाढवण्यासाठी जेव्हा दुसरा भ्रमणध्वनी घेतला जातो, तेव्हा निसर्गाचे दोहन संपून शोषण सुरु होते, हे कोण आणि केव्हा सांगणार आणि समजून घेणार. दर दोन चार वर्षांनी नवीन गाडी घेण्याची इच्छा निसर्गाच्या शोषणाला जन्म देते, weekend home ची कल्पनाच निसर्गाच्या शोषणाला हातभार लावते हे कधीतरी समजून घेण्याची गरज आहे.

मुळात तारांकित आणि स्पर्धेवर आधारित जीवनशैली आणि जीवनदृष्टी ही निसर्गाचे शोषण करणारी आहे. सगळ्यांना माणूस म्हणून जगता येण्यासाठी आवश्यक अशा गरजांची पूर्तता व्हायलाच हवी. पण जगण्याच्या गरजांची पूर्तता आणि हव्यास, वखवख यांच्यातील फरक समजून घ्यावा लागेल. आज अगदी दरीद्रातील दरीद्रापासून जगातील पहिल्या क्रमांकाच्या श्रीमंतांपर्यंत सगळ्यांची धाव हव्यासात मोडेल अशीच आहे. जगातील चार पाच टक्के लोक सोडले तर आज कोणाला साधेपणा, सात्विकता वगैरे हवी आहे? प्रत्यक्षात शक्य होत असेल किंवा नसेल, धाव मात्र हव्यास याच गोष्टीकडे आहे. अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा `माझ्याकडे अमुक ब्रांडची अमुक वस्तू आहे' किंवा `मी विदेशात इतके वेळा गेलो आहे' किंवा `मी अमुक गोष्टींवर अमुक इतका इतके वेळा खर्च करतो' अशासारख्या फुशारकीतून व्यक्त होणारा पुरुषार्थ निसर्गाच्या शोषणालाच हातभार लावतो. एवढेच काय, प्रवासात घरून पाण्याची बाटली भरून न घेता पाणी विकत घेण्याची सवय ही सुद्धा, मोदींनी भूमीची क्षमायाचना करण्याच्या ज्या संस्काराचा उल्लेख केला त्या संस्काराशी विसंगत अशी गोष्ट आहे. आपण सगळेच निसर्गाच्या या शोषणाला कळत वा नकळत किती हातभार लावत असतो, याचा विचार जगातील ७०० कोटी लोक करतील तेव्हा अनुकूल बदल होईल. जगातील ७०० कोटींचा विचार नंतर करता येईल. आज मोदींच्या आपल्यांनी, हा विचार करायला नको का?

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १६ मे २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा