शुक्रवार, ५ जून, २०१५

शेवटची विनवणी...

दि. ४ जून १९७३. रात्रीचे सुमारे ९.३० वाजले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील महाल मुख्यालयात- डॉ. हेडगेवार भवनात- दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या डोक्याला तेल लावण्यासाठी नागपुरातील ज्येष्ठ स्वयंसेवक बाबुराव चौथाईवाले यांनी बाटली हातावर आडवी केली. त्याच वेळी बाटलीतील तेल संपले. बाबुराव चौथाईवाले तेलाची दुसरी बाटली आणण्यासाठी वळले. त्यावर गुरुजी त्यांना लगेच म्हणाले- `तेल संपले? ठीक. आता उद्या कोण तेल लावतंय?' कालपुरुषच जणू त्यांच्या मुखाने बोलत होता.

त्यावेळी श्री गुरुजी साधारण तीन वर्षांपासून कर्करोगाने आजारी होते. तरीही अगदी तीन महिने आधीपर्यंत म्हणजे १९७३ च्या मार्च महिन्यापर्यंत त्यांचे देशभर प्रवास, भाषणे, बैठकी, पत्रलेखन, कार्यक्रम सुरूच होते. त्यानंतर मात्र त्यांना चालणे फिरणे अवघड होऊन बसले होते. त्यामुळे महालच्या डॉ. हेडगेवार भवनातील मागच्या बाजूची वरच्या मजल्यावरील खोली हेच त्यांचे विश्व झाले होते. त्याच ठिकाणी शेकडो लोक त्यांना भेटून जात होते. त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यापासून जनसंघाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत; तसेच राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका आणि प्रमुख संचालिका मावशी केळकर यांच्यापासून कामगार नेते जॉर्ज फर्नांडीस यांच्यापर्यंत विविध क्षेत्रातील असंख्य लोक होते. संघ स्वयंसेवकांची तर मोजदादच नाही.

दि. ४ जून १९७३ ला डोक्याला तेल लावून झाल्यावर गुरुजी अंथरुणावर झोपले नाहीत. रात्रभर खुर्चीतच बसून होते. पहिल्यांदाच असे झाले होते. त्रास खूप वाढला होता. श्वास घेणे खूपच जड जात होते. त्यामुळे प्राणवायूचे सिलेंडर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसरे दिवशी दि. ५ जून १९७३ रोजी सकाळी लवकरच त्यांचे स्नान उरकण्यात आले. स्नानानंतर नित्याप्रमाणे संध्या केली. गुरुजींचे स्वीय सचिव डॉ. आबाजी थत्ते त्यांना प्राणवायू देत होते, तेव्हा गुरुजी त्यांना म्हणाले- `अरे आबा, आज घंटी वाजणार असे दिसते. त्याची काळजी नाही. परंतु संघ शिक्षा वर्ग चालले आहेत. सर्व प्रवासात आहेत. त्यात व्यत्यय येऊ नये अशी इच्छा आहे.' जीवनाच्या शेवटच्या घटिकांमध्येही चिंता एकच होती, संघाच्या कामात व्यत्यय येऊ नये. त्याच दिवशी सकाळी ८.१५ वाजता अटलबिहारी वाजपेयी भेटायला आले. सकाळी स्नानापूर्वी गुरुजींनी हातापायाची नखे काढली. स्नानसंध्या झाल्यावर खुर्चीवर बसले अन कमंडलू उजवीकडे ठेवला. नेहमी कमंडलू डावीकडे ठेवीत असत. पण त्यावेळी उजवीकडे ठेवला. जणू प्रवासाला निघताना सोयीचे व्हावे म्हणून. दुपारी अगदी घोटभर चहा घेतला. उपस्थित डॉक्टरांनी नर्सिंग होममध्ये चलण्याचा आग्रह केला. त्यावर, `उद्या बघू' असे म्हणाले.

दुपार नंतर प्रकृती झपाट्याने घसरू लागली. त्यावेळी सरकार्यवाह बाळासाहेब देवरस यांना नागपूरला बोलावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी त्यांना फोन लावण्यात आला. त्यावेळी मोबाईल तर दूरच, साधे दूरध्वनीही सर्वत्र नव्हते. शिवाय, कोड नंबर फिरवून परगावी फोन लावता येत नसे. ट्रंक कॉल बुक करावा लागे. संघ कार्यालयात असलेल्या एकमेव दूरध्वनीवरून निरोपांची सगळी धावपळ कृष्णराव मोहरील करीत होते. संध्याकाळी डॉक्टरांनी इंजेक्शन दिले. दम लागण्याचे प्रमाण वाढले होते. संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटे झाली. तेव्हा संघाच्या नित्य प्रार्थनेसाठी जाण्याची तयारी त्यांनी सुरु केली. तेव्हा, `आज इथूनच प्रार्थना करायची आहे' असे डॉ. आबाजी थत्ते म्हणाले. त्यानुसार तिथे उपस्थित सगळ्यांनी तिथेच ध्वज लावून प्रार्थना केली. नेहमीप्रमाणे उभे राहणे शक्यच नव्हते त्यामुळे बसूनच पण स्पष्ट स्वरात गुरुजींनी प्रार्थना म्हटली.

रोजच्याप्रमाणे संध्याकाळी ७.३० वाजता चहा आला. गुरुजींनी चहा घेतला नाही. डॉ. आबाजी थत्ते, बाबुराव चौथाईवाले, विष्णुपंत मुठाळ खोलीतच रेंगाळत होते. त्यांना गुरुजी थोडे रागावले. म्हणाले, चहा घेऊन या. एकेक करून तिघेही चहा घेऊन आले. आठच्या सुमारास दूरध्वनी आला म्हणून डॉ. थत्ते खाली गेले. गुरुजींना लघुशंका लागली. ते उठू लागले. बाबुराव म्हणाले, भांडे आणतो. उठू नका. पण गुरुजी म्हणाले, स्नानगृहातच घेऊन चल. लघुशंका झाल्यावर हातपाय धुतले. ११ चुळा भरल्या. जणू काही महाप्रवासासाठी संपूर्ण शुद्धता. स्नानगृहातून बाहेर पडण्यासाठी वळले आणि बाबुरावांच्या कमरेला धरून त्यांनी त्यांच्या खांद्यावर मान टाकली. विष्णुपंत मुठाळ स्नानगृहाच्या दाराजवळच उभे होते. दोघांनी मिळून त्यांना खोलीत आणून खुर्चीवर बसवले. डोळे बंद, चलनवलन बंद. श्वास मात्र संथ लयीत सुरु होता. बाबुराव पाय चोळू लागले. आबाजी धावत वर आले. त्यांनी प्राणवायू दिला. डॉक्टरांना दूरध्वनी केले. प्रथम डॉ. परांजपे पोहोचले. त्यांनी तपासले आणि म्हणाले, `सर्व संपत आले आहे. let him die peacefully.' पाठोपाठ डॉ. पेंडसे, डॉ. वेचलेकर, डॉ. शास्त्री, डॉ. पांडे, डॉ. इंदापवार आले. संघाचे अधिकारी बाबासाहेब घटाटे, बापूराव वऱ्हाडपांडे, विनायकराव फाटक हेदेखील पोहोचले. सगळे भोवती उभे होते. श्वास हळूहळू कमी कमी होत होता. रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी एक जोरदार श्वास बाहेर पडला आणि गुरुजींची कुडी निष्प्राण झाली.

श्री गुरुजींचे पार्थिव संघ कार्यालयाच्या खालील मोठ्या दालनात आणले गेले. गुरुजी गेल्याची वार्ता नागपुरात आणि देशभर वाऱ्यासारखी पसरली. काही मिनिटातच लोकांचे लोंढे महालच्या डॉ. हेडगेवार भवनाकडे लोटले. त्याचवेळी रेशीमबागेत सुरु असलेल्या संघ शिक्षा वर्गात हे वृत्त कळताच स्वयंसेवकांनी महाल कार्यालयाकडे धाव घेतली. आकाशवाणीने गुरुजींच्या महायात्रेचा कार्यक्रम जाहीर केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ जून १९७३ ला सकाळपासून देशभरातील लोक येउन पोहोचू लागले. श्री. एकनाथजी रानडे, श्री. बाळासाहेब देवरस, श्री. लालकृष्ण अडवाणी, श्री. अटलबिहारी वाजपेयी, आचार्य दादा धर्माधिकारी, श्री. चंद्रशेखर धर्माधिकारी, न्या. पाध्ये, न्या. चांदुरकर, राजे फत्तेसिंगराव भोसले, श्री. राजाराम महाराज भोसले, वसंतराव साठे, जांबुवंतराव धोटे, त्र्यं. गो. देशमुख, लोकमतचे संपादक पां. वा. गाडगीळ अशी अनेक मंडळी येउन गेली. गुरुजींच्या पार्थिवाजवळ अखंड गीतापाठ सुरु होता.

दुपारी चारच्या सुमारास ध्वनिवर्धकावरून शांततेचे आवाहन करण्यात आले. सगळीकडे शांतता पसरली. महाराष्ट्र प्रांताचे प्रांत संघचालक बाबाराव भिडे यांच्या आवाजाने शांततेचा भंग केला. गुरुजींनी २ एप्रिल १९७३ रोजी लिहिलेल्या तीन ऐतिहासिक पत्रांपैकी पहिले पत्र ते वाचू लागले. संघकार्याची धुरा आपल्यानंतर सरसंघचालक म्हणून श्री. बाळासाहेब देवरस सांभाळतील असे त्यांनी पहिल्या पत्रात नमूद केले होते. त्यानंतरची दोन पत्रे नूतन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी रुद्ध कंठाने वाचली. तिसऱ्या पत्राचा समारोप करताना गुरुजींनी लिहिलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग तर बाळासाहेब वाचूच शकले नाहीत. त्यानंतर नूतन सरसंघचालकांनी महायात्रेला निघालेल्या द्वितीय सरसंघचालकांना पुष्पहार अर्पण केला. भगव्या वस्त्राने झाकलेला या अद्भुत संन्याशाचा पार्थिव देह फुलांनी सजवलेल्या ट्रकवर ठेवण्यात आला आणि गुरुजींची अंत्ययात्रा सुरु झाली.

महालच्या डॉ. हेडगेवार भवनातून सुरु झालेली अंत्ययात्रा पाहण्यासाठी, गुरुजींचे अंतिम दर्शन व्हावे यासाठी अफाट जनसंमर्द मार्गावर सगळीकडे जमला होता. संध्याकाळी पावणेसहाला सुरु झालेली ही अंत्ययात्रा दोन तासांनी पावणेआठ वाजता रेशीमबाग मैदानावर पोहोचली. जवळ जवळ तीन लाख लोक या महायात्रेत सहभागी झाले होते. गुरुजींचे पार्थिव रेशीमबाग मैदानात पोहोचल्यावर गीतेच्या पंधराव्या अध्यायाचे पठण झाले. त्याचवेळी श्री. माधवराव मुळे, राजमाता विजयाराजे शिंदे, नानाजी देशमुख आदी मंडळी पोहोचली. त्यांनी अंत्यदर्शन घेतल्यावर गुरुजींचे पार्थिव चंदनाच्या चितेवर ठेवण्यात आले. १९४० साली ज्या ठिकाणी संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांना अग्नी देण्यात आला होता, त्याच स्थानाच्या बरोब्बर समोर पूर्वेला गुरुजींच्या चितेला अग्नी देण्यात आला. सरसंघचालकांना प्रणाम देण्यात आला. प्रार्थना झाली. आदल्या दिवशी, ५ जून १९७३ रोजी प्रार्थना म्हणून आणि शेवटी `भारत माता की जय' म्हणून गुरुजींनी पार्थिव देहाची शीव ओलांडली होती. ६ जून १९७३ रोजी तशीच प्रार्थना म्हणून आणि `भारत माता की जय' म्हणून त्यांच्या आत्म्याने पार्थिव विश्वाची सीमा ओलांडली.

स्वत:चे श्राद्धही स्वत:च्या हातांनी उरकून घेतलेल्या या वीतरागी संन्याशाने जाताना हात जोडून सगळ्यांची क्षमा मागितली होती. आपला स्वभाव, आपल्या त्रुटी, आपले दोष यामुळे कोणी दुखावला असेल तर क्षमा करावी अशी विनंती करून अखेरीस संत तुकाराम महाराजांचा अभंग उद्धृत केला होता-

शेवटची विनवणी, संतजनी परिसावी
विसर तो न पडावा, माझा देवा तुम्हासी
आता फार बोलो कायी, अवघे पायी विदित
तुका म्हणे पडतो पाया, करा छाया कृपेची

त्यांची स्मृती म्हणून ज्या ठिकाणी त्यांना अग्नी देण्यात आला त्याच ठिकाणी यज्ञकुंडाची एक प्रतिकृती उभारण्यात आली आहे. राष्ट्रयज्ञात समिधेप्रमाणे आपले जीवन समर्पित करणाऱ्या गुरुजींच्या या समाधीवर तुकाराम महाराजांचा हाच अभंग गुरुजींच्या अक्षरातच लिहिण्यात आलेला आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ५ जून २०१५

1 टिप्पणी: