शुक्रवार, १२ जून, २०१५

पुलंची भाषणे- भावानंदाचे सचैल स्नान

(पुलंच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त लिहिलेला लेख)

पुलंची भाषणे- भावानंदाचे सचैल स्नान

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेले पु. ल. देशपांडे स्वर्गवासी झाल्याला एक वर्षं झालं. विनोदी लेखक, संगीतज्ञ, नट, वक्ता, नाटककार, चित्रपट अभिनेता, सामाजिक जाणीवा सतेज असणारा कार्यकर्ता अशा विविध नात्यांनी साऱ्यांना त्यांचा परिचय होता. परंतु या साऱ्या भूमिकांमधील विनोदी लेखक हीच त्यांची भूमिका जनमानसात अधिक दृढमूल झाली होती. मात्र, दर्जेदार विनोदनिर्मितीसाठी जीवनाचं सर्वगामी दर्शन घेण्याची प्रज्ञा असावी लागते. स्वत: पु. ल. याविषयी एका ठिकाणी म्हणतात की, `विनोदी लेखकालाही नुसतेच विसंगतीवर बोट ठेवून भागत नाही. त्यामागच्या कारुण्याचे दर्शन घडावे लागते.' त्यांना स्वत:ला जीवनातलं कारुण्याचं हे दर्शन घडलं होतं. त्यांचा निर्भेळ विनोद चिंतनशील आत्ममग्नतेतून प्रसूत झालेला असतो. पुलंची भाषणे त्यांच्या व्यक्तिमत्वातील या चिंतनशीलतेचा, परिपक्व जाणिवांचा, नीरक्षीरविवेकाचा व प्रसंगी निर्भयतेचाही मनोज्ञ साक्षात्कार घडवतात.

पु. ल. देशपांडे यांच्या भाषणांचे तीन संग्रह मुंबईच्या परचुरे प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहेत. `श्रोतेहो!', `मित्रहो!', `रसिकहो!' अशा शीर्षकांनी प्रसिद्ध झालेल्या या तीन खंडांमध्ये त्यांची ४३ भाषणे संकलित करण्यात आलेली आहेत. या भाषणांच्या अनुक्रमणिकेवरून साधी नजर फिरवली तरीही आपण स्तिमित होऊन जातो.

`मित्रहो!' या पुस्तकात त्यांची साहित्यविषयक १४ भाषणे संकलित करण्यात आली आहेत. त्यात इचलकरंजी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणापासून तो बडोद्याच्या मराठी वाड्ग्मय परिषदेतील अध्यक्षीय भाषणांपर्यंत व वाईच्या साहित्य संस्कृती मंडळापुढे केलेल्या भाषणापासून तर दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी केलेल्या भाषणांचा समावेश आहे. मॉरिशस व न्यू जर्सिच्या परदेशस्थ मराठी भाषिकांपुढील भाषणेही त्यात आहेत. या सर्वच साहित्य विषयक भाषणातून त्यांनी रसिक व समीक्षक या दोन्ही नात्यांनी मराठी साहित्य क्षेत्राचा विविधांगी आढावा घेतला आहे. साहित्यातील गहन प्रश्नांचा वेध घेण्यापासून त्यातल्या अनेक अंतर्विरोधांची चिकित्सा करण्यापर्यंतचा आवाका व पल्ला या भाषणांमधून दृग्गोचर होतो. साहित्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन आनंदवादी आहे. जुन्याचा अभिमान व नव्या जाणिवांचे मन:पूर्वक स्वागत यांचा नितांतसुंदर मिलाफ त्यांच्या साहित्यविषयक चिंतनातून जाणवतो. या ग्रंथाच्या प्रस्तावनेत शांताबाई शेळके म्हणतात त्याप्रमाणे, `पुलंच्या वाड्ग्मय अभिरुचीची पाळेमुळे भूतकालीन साहित्यात रुजली आहेत, पण स्वागतोत्सुक दृष्टी मात्र भविष्यकाळाचा वेध घेत आहे.' साहित्यातील नवता, अभिव्यक्ती, विविध प्रवाह, त्यांची ताकद व त्यांच्या कमतरता, भाषा; याविषयीचे सखोल चिंतन पुलंनी या भाषणांमधून मांडले आहे.

`साहित्यात जसे असामान्य लेखक असतात तसे असामान्य वाचक हवेत,' असे ज्यावेळी पुलं आपल्या भाषणात म्हणतात त्यावेळी त्यांना साहित्याच्या व्यवहाराचीही डोळस जाण असल्याचे दिसून येते. पुलं जुन्या जमान्यात वावरतात असा आरोप त्यांच्यावर अनेकदा होत असे. त्याबद्दल ते म्हणतात, `आयुष्यात जिथे जिथे काव्य आढळलं ती स्थानं आणि ते प्रसंग विसरता येत नाहीत. मी मूर्तीपूजा करीत नाही, पण लहानपणी देवळात पंचारतीने उजळलेल्या गाभाऱ्याची पाहिलेली शोभा मी विसरू शकत नाही. मला विजेचा दिवा आवश्यक वाटतो, उपयुक्त वाटतो, पण समईची ज्योत जिवंत वाटते.' साहित्यातील सुगमता व दुर्बोधता यावरील चिंतन श्रोत्यांपुढे मांडतानाही पुलं एक सुवर्णमध्य साधतात. `सर्वांनीच अगदी शालोपयोगी लिहिले पाहिजे, असा आग्रह का असावा?' असा सवाल करतानाच, `एखाद्याला प्रसादयुक्त लिहिता येते हा मात्र त्याचा अवगुण ठरू नये !' असा इशाराही ते देतात. मानवी जीवनातल्या सुख व दु:ख या दोन्हींचे साहित्यात काय स्थान असते हा मुद्दा स्पष्ट करताना ते म्हणतात, `ज्येष्ठ साहित्यिकांनी सुखाची व दु:खाची भव्य चित्रे काढली आहेत. डोतोव्हस्की सारख्यांनी अत्यंत दु:खमय जीवनातून ललितकृतींच्या सुवर्णमूर्ती निर्माण केल्या ! दु:खाचे चित्र रडके असते म्हणून कुणी सांगितले?'

साहित्याचा कस व साहित्याची प्रत यांचीही चर्चा पुलंनी आपल्या भाषणातून केली आहे. साहित्यातील अनेक निकृष्ट बाबींचेही विश्लेषण त्यांनी केले असून जागतिक रंगमंचावरील दोन महाभयंकर युद्धांचे परिणाम साहित्यावर कसे झाले आहेत याची त्यांनी फोड करून दाखवली आहे. साहित्य व साहित्य निर्मितीला अत्यंत उदात्त पातळीवर नेउन ठेवताना पुलं म्हणतात, `आजच्या भयग्रस्त जगाला, सामाजिक आणि राजकीय आपत्तींनी त्रस्त झालेल्या समाजाला धीर देण्याचे कामही द्रष्ट्या साहित्यिकाचेच आहे.'

नाट्य व संगीत विषयक चिंतन

`रसिकहो' या संकलनात पुलंची नाट्य व संगीत विषयक नऊ भाषणे संग्रहित केलेली आहेत. विषयांची विविधता हे याही भाषणांचे वैशिष्ट्य आहे. नागर रंगभूमी, तमाशाचा फड, अभिनयसाधना, नाट्य सादरीकरण प्रक्रिया, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत शिक्षणाचे तंत्रमंत्र आदी मार्गांनी त्यांचा चिंतनप्रवास उलगडत जातो. ही भाषणे निव्वळ तात्विक नाहीत व ती आपल्याला नाटकाकडे पाहण्याचा एक निकोप दृष्टीकोन देतात. नांदेडच्या अ.भा. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना पुलंनी आपली नाट्यविषयक भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणतात, `माझी भूमिका ज्ञात्याची नसून भक्ताची आहे. साहित्य, संगीत, नाट्य हे माझ्या भक्तीचे विषय आहेत. कलेची गुढे चिकित्सक बुद्धीने उलगडण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही. नाटके लिहिणे, नाटके करणे, नाटके पाहणे यात मी रमतो !' परंतु यात त्यांच्या विनयशीलतेचा भाग मोठा आहे. नाट्यकृतींचे वाड्ग्मयीन सौंदर्य, सादरीकरणाची प्रक्रिया, तसेच जातिवंत रसिकाची मनोभूमिका यांचे समरस होऊन विश्लेषण करतानाच, रंगभूमीवरील उणीवा व रसास्वादनातील विघ्ने यांचेही चित्र ते परिणामकारकपणे उभे करतात. नाट्यकला, नाट्यव्यवसाय, त्याची सांस्कृतिक व आर्थिक बाजू इत्यादी अनेक बारीकसारीक बाबींचाही उहापोह ते आपल्या भाषणांमधून करतात.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या शिक्षणावरील त्यांची दोन भाषणे या संग्रहात आहेत. शास्त्रीय संगीताचं त्यांचं ज्ञान वादातीत आहे. या क्षेत्रातील आव्हानांचीही त्यांना जाण आहे. पण शास्त्रीय संगीताच्या शिक्षणाबद्दल त्यांनी व्यक्त केलेले विचार शिक्षण तज्ञान्नाही अंतर्मुख करणारे आहेत. नाट्याचार्य खाडिलकरांच्या नाट्यलेखनाचा परामर्श घेणारी तीन विस्तृत भाषणे `नाट्यतीर्थावरचा तपस्वी सेनापती' या शीर्षकाखाली समाविष्ट करण्यात आली आहेत. हा केवळ खाडिलकरांचा गुणगौरव नसून त्यांच्या लेखनातील सलग सूत्र शोधण्याचा प्रयत्न आहे. `लोकमान्य टिळक हे त्यांचे दैवत असून देशभक्ती हीच त्यांच्या नाट्यलेखनामागील प्रेरणा होती,' असा निष्कर्ष पुलं काढतात. मात्र, गद्य नाटकांमधून प्रखर व आवेशपूर्ण देशभक्तीचे धडे देणारे खाडिलकर संगीत नाटकांकडे वळल्यावर त्यांच्या नाटकातले ओज, तेज व आवेश हळूहळू मावळत गेल्याचेही ते तटस्थपणे मांडतात.

`रसिकहो' या संग्रहातील `स्निग्धच्छाया - रवींद्रनाथांची' हे अंतिम भाषण एकदम वेगळ्या धाटणीचे आहे. रवींद्रनाथ, शांतीनिकेतन, विश्वभारती याबाबत अत्यंत मृदू, तरल व काव्यमय शब्दात ते आप्तभाव व्यक्त करतात. शांताबाई शेळके म्हणतात त्याप्रमाणे, `साऱ्या निर्मितीकडेच एक अविभाज्य संपूर्णता म्हणून बघणाऱ्या आणि कवीच्या रसलीन वृत्तीतही एक सुंदर अलिप्तता सतत राखणाऱ्या टागोरांचे एक अगदी वेगळे आणि मनाला भारावून टाकणारे दर्शन पुलंच्या या भाषणातून होते.'

कोणत्याही कलेला ओंगळपणाचं वावडं असतं असं नमूद करतानाच `नाटकसुद्धा नाटकी वाटता कामा नये. ही तर या कलेची खरी गंमत आहे' याचं भान ते आणून देतात. नाजूक, सूक्ष्म, तरल संवेदना समजायला समाजाची संवेदनशीलता वाढावी लागते ही जाणीव ते साऱ्यांना करून देतात. `एखाद्या व्यक्तीच्या वागण्यातील विसंगती दाखवून तात्पुरता हशा पिकवता येईल; पण प्रवृत्तीतली विसंगती दाखवून हशा निर्माण करणारं नाटक प्रेक्षकांना हसवतं आणि अंतर्मुख होऊन विचार करायलाही लावतं' असं पुलं म्हणतात, त्यावेळी या विनोदी लेखकाची उंची आपल्याला नतमस्तक करते.

विविधरंगी `श्रोतेहो'

`श्रोतेहो' हे पुलंच्या भाषणाचे तिसरे संकलन. यात विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्था, उपक्रम, समारंभ या निमित्तांनी केलेली २० भाषणे संकलित करण्यात आली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर, बॅ. नाथ पै, न. चिं. केळकर, कुसुमाग्रज, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, गजाननराव वाटवे आदी महनीयांवरील पुलंची भाषणे या संग्रहात वाचायला मिळतात. नाट्य, साहित्य, संगीत, चित्रपट क्षेत्रातील हा बहुरूपी `खेळीया' ग्राहकपेठ पुणेने आयोजित केलेल्या समारंभात `सहकारी चळवळ' या विषयावर भाषण करतो हेदेखील या संग्रहातून वाचकांच्या लक्षात येते व आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. साने गुरुजींच्या `स्वप्न आणि सत्य' या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगीचे पुलंचे भाषणही असेच हृद्य आहे. साने गुरुजी `मातृधर्मी' होते असे सुंदर विशेषण पुलं त्यांना लावतात. नरहर कुरुंदकरांच्या `गोदातटीचे कैलासलेणे' या पुस्तकाचे प्रकाशन करताना केलेल्या भाषणात आजच्या वास्तवाचे परखड विश्लेषण करताना पुलं म्हणतात, `या जगात कोट्यधीशांचे ध्येय माणसांचे गिऱ्हाईक तरी बनवा किंवा मतदार तरी बनवा हेच असते.' याच उथळ प्रवृत्तीचा समाचार घेताना लोकमान्य सेवा संघाच्या षष्ट्यब्दीपूर्ती निमित्त केलेल्या भाषणात ते म्हणतात, `काळाबरोबर चालायचं म्हणजे काळातल्या कोठल्या प्रवृत्तीबरोबर चालायचं याचा विचार क्षणोक्षणी करण्याची पाळी आली आहे.'

वक्ता व श्रोता यांच्यातील अंतर कमी करून जणू काही श्रोत्यांशी साधलेला संवादच आहे असे पुलंची ही भाषणे वाचताना वाटत राहते. ते श्रोत्यांना सहजपणे आपलेसे करून घेतात. अत्यंत रसाळपणे, गोष्टीवेल्हाळपणे ते श्रोत्यांशी बोलतात. विविध वाड्ग्मयीन संदर्भ, अवतरणे, प्रसंग पेरत पेरत पुलं भाषणाची रंगत वाढवतात. चिंतनशीलता, बहुश्रुतता, गाढ व्यासंग यामुळे त्यांची भाषणे श्रवणीय व वाचनीय ठरतात. `विनोदी वक्ता' अशी त्यांची रूढ प्रतिमा असली तरीही विनोदाचा अंशही नसलेले त्यांचे भाषण श्रोत्यांना बसल्या जागी खिळवून ठेवते. गंभीर, भावनोत्कट, विचारांना प्रवृत्त करणारे भाषणही पुलं सारख्याच ताकदीने करू शकतात. विनोद हे श्रोत्यांना आपल्या काबूत आणण्याचे वक्त्याचे प्रभावी अस्त्र असते; परंतु वर्ण्य विषयाच्या गांभिर्यात किंवा उत्कटतेत ते विक्षेप आणून श्रोत्यांना विचलित करू लागले तर त्या अस्त्राचा अवलंब करू नये याची त्यांना सुयोग्य जाण आहे व विनोदाच्या अस्त्राचा त्यांनी याच पद्धतीने संयमित उपयोग केलेला आहे. त्यांच्या प्रत्येक भाषणातून त्यांची चिंतनशीलता, बहुश्रुतता व गाढ व्यासंग डोकावतो. विविध विषयांवरील भरपूर ज्ञानभांडार ते श्रोत्यांपुढे खुले करतात. पण त्यात ज्ञातेपणाची आढ्यता नसते. प्रत्येक विषयाचा भरगच्च तपशील ते श्रोत्यांना पुरवतात.

संदर्भसंपन्नता हे पुलंच्या भाषणाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. कोणत्या काव्यपंक्ती, वचने, सुभाषिते, कथा, म्हणी, अनुभव श्रोत्यांच्या कानी केव्हा पडतील सांगता येत नाही. उपनिषदे, कालिदास, भवभूती, पतंजली, भरत मुनींपासून केशवसुत, कवी अनिल, कुसुमाग्रज यांच्यापर्यंत; स्टालिनवस्की, ओस्बोर्न, बेकेट, सार्त्र, कर्केगार्द, टॉलस्टॉय, चार्ली चॅप्लिन पर्यंत; तुकाराम, रामदास वा तुलसीदासांपर्यंत; भातखंडे, पलुस्करांपासून नत्थनखां पर्यंत; रागरागीण्यांपासून भजने, ठुमरी, कजरी, होली, कव्वालीपर्यंत अगणित प्रकारची संदर्भसंपृक्तता श्रोत्याला, वाचकाला प्रमुदित करते. कोट्या, विनोद, सुंदर काव्यपंक्ती यांची सतत उधळण सुरु असते. उपरोध, उपहास, अत्युक्ती, उनोक्ती, हजरजबाबीपणा, चतुरालाप यांचा सतत मारा सुरु असतो. देव, धर्म, भक्ती, आध्यात्म यापासून चार हात दूरच राहणाऱ्या पुलंना त्याचे सोवळे मात्र नव्हते. एवढेच नव्हे तर त्यापासूनचे दूरत्व जाणीवपूर्वक जोपासण्याचा बेगडीपणाही नव्हता. त्यातील सौंदर्याची आणि भावसंपन्नतेची तर त्यांना ओढ असावी असे म्हणता येईल. समाजवादी असूनही हिंदुत्वनिष्ठ सावरकरांचे गुणगान करण्यात त्यांना कमीपणा वाटला नाही. मुळातच वृत्तीतील कद्रूपणा सोडून देऊन मध गोळा करणाऱ्या मधमाशीप्रमाणे गुणग्राहकता, जीवनातलं सत्य- शिव- सुंदर टिपणारी विचक्षणता हाच पुलंचा स्थायी भाव, त्यांच्या सर्व भाषणांमधून डोकावतो. तीन संग्रहातील ही भाषणे हे माहितीचे जसे अफाट भांडार आहे, तसाच तो चिंतनशीलतेचा सुंदर प्रत्यय आहे. ही भाषणे श्रोत्याला, वाचकाला भावश्रीमंत करतात. पुलंच्या या भाषणांमध्ये टाळ्या घेणारी अनेक वाक्ये तर आहेतच, सुभाषिते वाटावीत अशीही वाक्ये जागोजागी आढळतात. एके ठिकाणी पुलं म्हणतात, `ज्यामुळे आपल्या मनाला स्नान घडतं ते तीर्थ असं मी मानतो.' पुलंची ही भाषणं आपल्या मनाला सचैल स्नान घालतात व म्हणूनच त्यांना तीर्थाचं पावित्र्य आलेलं आहे.

१२ जून २००१ रोजी पुलंच्या स्वर्गवासाला एक वर्षं झालं. आपल्या रावसाहेब या व्यक्तिचित्राचा समारोप करताना, रावसाहेबांच्या मृत्यूवर भाष्य करताना पुलं म्हणतात- `आमची लहानशी जीवनं समृद्ध करण्यासाठी परमेश्वरानं दिलेल्या या देणग्या; न मागताच दिल्या होत्या, न सांगताच परत नेल्या.' खुद्द पुलंबद्दल यापेक्षा वेगळं काय म्हणता येईल?

- श्रीपाद कोठे
नागपूर
(शुक्रवार, १५ जून २००१ रोजी लोकसत्तेत प्रकाशित)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा