मंगळवार, १६ जून, २०१५

डाळींचा प्रश्न आणि विवेकानंद

सध्या डाळींचा विषय ऐरणीवर आला आहे. आपल्या राज्यकर्त्यांमधील दूरदृष्टीचा अभाव आणि कर्मदरिद्रीपणा यांचे हे उत्तम उदाहरण आहे. डाळींचा हा प्रश्न आजचा नाही, तर गेल्या चार-पाच दशकात तो विकसित झाला आहे. दुर्दैवाने आजही आमचे राज्यकर्ते त्याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत आणि त्यानुसार नियोजनाची योग्य ती दिशा स्वीकारताना दिसत नाहीत. डाळींच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेल्या आपल्या देशाला आज डाळींच्या आयातीवर अवलंबून करण्यात आले आहे. आणि डाळींची निर्यात करून रोखीच्या रूपानेही देशाला संपन्न करण्याऐवजी ऑस्ट्रेलिया, कॅनडा यासारख्या देशांची अर्थव्यवस्था उंचावण्याला मदत करीत आहोत.

या डाळींच्या संदर्भात शे-सव्वाशे वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंदांनी विचार केला होता आणि तो पाहिला की, आपले कर्मदरिद्रीपण अधिकच नजरेत भरते. आपल्या सगळ्या गुरुबंधूंना उद्देशून स्वामीजींनी स्वामी रामकृष्णानंद यांना १८९४ साली एक पत्र लिहिले होते. त्यात ते लिहितात- `उडीद किंवा इतर कोणत्याही डाळी इकडे नाहीतच. असल्या वस्तू असल्याचेही इकडच्या लोकांना माहीत नाही.' सुमारे वर्षभरानंतर स्वामी त्रिगुणातीतानंद यांना न्यूयॉर्क येथून १७ जानेवारी १८९५ रोजी लिहिलेल्या पत्रात पुन्हा याच विषयाची चर्चा करताना स्वामीजी लिहितात- `मुगाच्या, तुरीच्या डाळीचा व्यापार इंग्लंड व अमेरिकेत किफायतशीरपणे चालू शकेल, असे रामदयालबाबूंना कळवा. डाळींच्या वरणाचा जर योग्य रीतीने प्रचार झाला तर लोक त्या आवडीने वापरू लागतील. लहान लहान डब्यात घालून व त्यावर त्या कशा तयार करावयाच्या हे छापून जर डाळी घरोघर खपविल्या तर त्यांना खूप मागणी राहील. तसेच त्या येथे साठवून ठेवण्याचीही काही व्यवस्था करायला हवी. त्याचप्रमाणे मुगवड्या वगैरेसारख्या वस्तूदेखील येथे मोठ्या प्रमाणावर खपू शकतील. साहसयुक्त उद्योगाची आवश्यकता आहे.'

आज जगातील अनेक देश असे आहेत जे काहीही पिकवित नाहीत. आपल्या अन्नगरजांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून असलेल्या या देशांना अन्न मिळणे बंद झाले तर काय होईल? माणूस, अन हो- केवळ भारतीयच नव्हे तर पृथ्वीच्या पाठीवरील कोणताही माणूस अन्नाशिवाय राहू शकणार नाही. अगदी शुद्ध मांसाहारी माणूससुद्धा भाजीपाला, धान्य, डाळी, तेल, मसाले इत्यादींशिवाय राहू शकणार नाही. एवढेच नाही तर मांसाहारासाठी लागणाऱ्या प्राण्यांचे पोटसुद्धा वनस्पतींवरच अवलंबून असते. अन्न आणि अन्य वनस्पती यांच्यासाठी जमीन हवी, माती हवी. स्वत:ला `कोणीतरी' आणि `काहीतरी' समजून माणूस या मुलभूत गोष्टीकडे जे दुर्लक्ष करीत आहे ते त्याच्याच मुळावर यायला फार वेळ लागणार नाही.

अवघ्या काही दशकात येऊ घातलेल्या या परिस्थितीचा- संगणक, भ्रमणध्वनी, गाड्या आणि विकासाच्या कल्पनांमध्ये रममाण झालेला आणि `युवा'पणाची टिमकी वाजवणारा आजचा युवा कसा सामना करेल? की आमची मानसिक, बौद्धिक दृष्टीच अधू झालेली आहे? `आपला देश शेतीप्रधान आहे. शेतीतून किती रोजगार मिळणार? त्यासाठी शेतीवरील भार कमी करण्याची गरज आहे,' अशी वाक्ये आमचे नेतेच नव्हे तर तुम्ही आम्हीही अशा थाटात उच्चारतो की, शेती म्हणजे खूप काहीतरी वाईट गोष्ट आहे. शेतीवरील भार कमी करायला हवा याचा आमचा व्यवहारातील अर्थ शेती कमी करायला हवी हाच आहे. शेतीचा विचार अर्थकारणाच्या संदर्भात व्हावा की समग्र जीवनाच्या संदर्भात? आम्हाला जगायचे आहे की पैसा साठवायचा आहे? आम्हाला जगायचे आहे की विकास (?????) साधायचा आहे? शेतीप्रधान अर्थव्यवस्था शेतीविहीन करणे शहाणपणाला धरून होईल का? तरीही जमिनी अकृषक करण्याचा सपाटा लावायचा, त्यावर टोलेजंग व्यावसायिक वा निवासी इमारती बांधायच्या, आम्ही त्यामागे धावायचे, असेच चालू द्यायचे का?

स्वातंत्र्य मिळाले त्यावेळच्या लोकसंख्येत केवळ तिप्पट वाढ झाली आहे. इमारती मात्र त्याहून कितीतरी पटीने वाढल्या; संख्या आणि मजले या दोन्ही अर्थाने. तरीही आम्हाला घरे पुरत नाहीत. याचे गौडबंगाल काय आहे हा प्रश्नही न पडण्याइतके आंधळे झालो आहोत आम्ही? एकीकडे बाईचे आरोग्य चांगले राहावे म्हणून तिची बाळंतपणे मर्यादित करण्याचा प्रयत्न करायचा आणि जमिनीतून वर्षाला तीन तीन पिके घेण्याचा खटाटोप करायचा? भूमाता म्हणून जाणीव वगैरे ठेवा बाजूला, पण जमिनीचाही कस वगैरे असतो हे तरी लक्षात घेणार की नाही? आपला स्वार्थ, हेकेखोरपणा, विक्षिप्तपणा, अफलातील कल्पना सोडण्यासाठी आम्हाला किती किंमत मोजायची आहे? किती किंमत मोजली म्हणजे आमचे समाधान होणार आहे तो निर्माताच जाणे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, १६ जून २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा