रविवार, ४ ऑक्टोबर, २०१५

गांधी जयंतीचे अरण्यरुदन

२ ऑक्टोबरला गांधी जयंती साजरी झाली. देशात अन जगभरातही. गेल्यावर्षीपासून देशात या दिवसाला वेगळा रंग चढलेला आहे. तो आहे स्वच्छतेचा. ही चांगलीच बाब आहे. संयुक्त राष्ट्रसंघ हा दिवस अहिंसा दिन म्हणून साजरा करतं. जगातील हिंसाचार मात्र वाढतोच आहे. अगदी या अहिंसा दिनाच्या दिवशीच अमेरिकेतील एका महाविद्यालयात एका माथेफिरूने वर्गात घुसून, विद्यार्थ्यांचा धर्म विचारून त्यांना गोळ्या घातल्या आणि त्यात तब्बल १० विद्यार्थी जागीच मरण पावले. यानंतर पुन्हा एकदा अमेरिकेतील शस्त्र परवाना कायद्यावर चर्चा सुरु झाली आहे.

दहशतवाद आणि हिंसा यांचा अतूट संबंध आहे. नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेत असताना खुद्द संयुक्त राष्ट्रसंघालाच प्रश्न केला की, दहशतवादाची व्याख्या काय? म्हणजे ज्या गोष्टीचा मुकाबला करायचा आहे, त्यावर जो साधकबाधक विचार व्हायला हवा, तोही जगाने अद्याप केलेला नाही असेच म्हणावे लागेल. दहशतवाद म्हणा वा हिंसाचार म्हणा; जगाची चर्चा अजूनही कायदे, नियम, शस्त्रे, परवाने, शिक्षा, व्यवस्था, साधने याच वरवरच्या उथळ बाबींवर चालते. एखाद्याच्या हाती शस्त्र नसतानाही हिंसा होत नाही का? किंवा बॉम्बस्फोट वा सामुहिक हत्याकांड यापेक्षा वेगळा असा दहशतवाद नसतो का? कौटुंबिक हिंसा किंवा आर्थिक दहशतवाद यासारख्या बाबींचा विचार हिंसा आणि दहशतवादाच्या संदर्भात किती होतो?

मुळात हिंसेचे मूळ कुठे आहे? या जगातील बहुतेक सगळ्या कृतींमागे सत्ताकांक्षा ही प्रेरणा असते. कोणाला राजकीय मार्गाने, कोणाला आर्थिक मार्गाने, कोणाला ज्ञानमार्गाने, कोणाला माहितीच्या मार्गाने, कोणाला सौंदर्याच्या मार्गाने, कोणाला पद-प्रतिष्ठेच्या मार्गाने, कोणाला शस्त्राच्या मार्गाने, कोणाला संख्येच्या मार्गाने, कोणाला नीतीच्या मार्गाने, कोणाला अन्य विविध मार्गांनी सत्ता गाजवायची असते. अगदी व्यक्तिगत जीवनापासून जागतिक पातळीपर्यंत ही सत्ताकांक्षा दिसते. आपलं ऐकलं पाहिजे, आपल्या म्हणण्याप्रमाणे झालं पाहिजे, आपल्या मार्गाने चाललं पाहिजे, आपली भाषा- आपली शब्दावली- वापरली पाहिजे; अशी त्याची खूप रूपं पाहायला मिळतात. आपल्याजवळ जे आहे त्याचा उपयोग करून सत्ता राबवणे किंवा नसलेल्या गोष्टींवर ताबा मिळवून सत्ता गाजवणे हे दोन्ही प्रकार पाहायला मिळतात.

अनेकदा सत्ता गाजवण्यासाठी अतिरेकी आग्रह केला जातो. गंमत म्हणजे कधीकधी यात प्रामाणिक कळकळ देखील असते. पण म्हणून व्हायचे परिणाम टाळता येत नाहीत. ही सत्ताकांक्षा जशी स्वार्थाने बरबटलेली असते तशीच जगाच्या कल्याणाच्या करुणेतून सुद्धा आलेली असते. १- मी म्हणजे जग, २- मला जे आणि जसं समजतं ते आणि तेवढंच जग आहे, ३- जगाचं भलं करण्याची जबाबदारी माझीच आहे, ४- माझ्यासमोर जग म्हणजे `किस झाड कि पत्ती', ५- हे जग, येथील माणसे, येथील निसर्ग, येथील सारे काही माझ्यासाठी आहेत, ६- येथील जेवढ्या गोष्टी (पैसा, माणसे, जमीन, साधने, शस्त्रे, यंत्रे, ज्ञान) माझ्या ताब्यात तेवढा मी श्रेष्ठ, ७- अधिकाधिक ताबा म्हणजे अधिक सुख अन अधिक शक्ती; अशा अनेक प्रकारांनी ही सत्ताकांक्षा अभिव्यक्त होते. एकाने सांगितले की हिंसेचे ८१ प्रकार आहेत. या हिंसेलाच संघटीत शक्तीचे बळ लाभते तेव्हा त्यातून दहशतवाद जन्माला येतो. आयएसआयएसचा दहशतवाद तर आम्हाला समजतो, पण जगाच्या ७०० कोटी लोकसंख्येपैकी १२५ कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व न देण्याला आम्ही दहशतवाद म्हणत नाही.

पैशाचा लोभ, तो वाढवणाऱ्या बाबी (उदा. फोर्ब्सतर्फे प्रसिद्ध होणारी जगातील श्रीमंतांची यादी), श्रेष्ठत्वाची लालसा इत्यादी गोष्टी हिंसेचे मूळ आहेत. खुद्द गांधीजी म्हणत असत- poverty is the greatest violence. या दारिद्र्याची चिंता आज कोणाला आहे? गरिबी दूर करायला हवी, असे म्हणून गरिबी दूर होत नाही. नव्हे त्यासाठी जगभरात जे उपाय अवलंबिले जातात त्यानेही गरिबी दूर होत नाही. गेल्या कित्येक दशकांचा (शतकांचाही म्हणता येईल) हा अनुभव आहे. कारण गरिबी दूर करा म्हणताना, ती मुळात निर्माण का व कशी होते यावर विचार करायला कोणीही तयार नाही. उद्योग वाढवा, शेती वाढवा, रोजगार वाढवा, कौशल्य वाढवा, तंत्रज्ञान विकसित करा; अशी धावपळ कितीही केली तरीही गरिबी दूर होत नाही, होऊ शकत नाही. कारण गरिबी निर्माण होण्याचा संबंध मानसिकतेशी आहे. जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीशी आहे. बाकी साऱ्या बाबी पूरक आहेत. मानसिकता व जीवनदृष्टी योग्य असेल तरच त्यांचा उपयोग होईल, त्याचे अपेक्षित परिणाम मिळतील. आजचा खरा प्रश्न हा आहे. माणसाच्या मनातील ही सत्ताकांक्षा कशी कमी करता येईल? योग्य जीवनदृष्टी काय आहे अन ती कशी रुजवता येईल? हे मूळ प्रश्न आहेत. या प्रश्नांना भिडल्याशिवाय हिंसाचार काय वा अन्याय काय संपुष्टात येणे अशक्य आहे. कोणी अमुक म्हणाले, अमक्याने अमुक उपदेश केला आहे, अमक्याने अमुक विश्लेषण केले आहे, अमुक पुस्तकात अमुक सांगितले आहे, अमक्या संस्थेचा अमुक अहवाल आहे, अमक्या सर्वेक्षणात अमुक आढळले... यातील काहीही माणसाला त्याच्या व्यवहाराला प्रवृत्त करीत नाही. कोणीही काहीही सांगो, काहीही म्हणो; त्याने फरक पडत नाही. म्हणूनच दरवर्षी गांधी जयंती साजरी होते अन अरण्यरुदन करण्याशिवाय दुसरे काहीही माणूस करू शकत नाही.

काही गोष्टी अत्यंत स्पष्टपणे बोलण्याचीही गरज आहे. मुळातच सत्ताकांक्षा माणसाच्या मनात असली तरीही सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीच्या अलेक्झांडरच्या विश्वविजयाच्या प्रयत्नातून राजकीय सत्ताकांक्षा जगभरात पोसली गेली. क्रियाप्रतिक्रियातून त्याचे आजचे बीभत्स रूप आकारास आले. सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीच्या इस्लामच्या उदयाने धार्मिक सत्ताकांक्षा फोफावली. तिच्या क्रियाप्रतिक्रियातून आजची परिस्थिती उद्भवली. अन १६ व्या- १७ व्या शतकातील औद्योगिक क्रांतीने आर्थिक सत्ताकांक्षा जन्माला घातली. त्यापाठोपाठच्या क्रियाप्रतिक्रियातून व तिच्या पोषणासाठी राबवण्यात आलेल्या युरोपीय प्रबोधनपर्वातून आजचे ताणतणाव जन्माला घातले आहेत. आजच्या स्थितीचे तात्विक, वैचारिक, व्यावहारिक संपूर्ण श्रेय पश्चिमेला आहे.

भारतीय औपनिषदिक चिंतन पूर्णत: वेगळी जीवनदृष्टी देते. गांधीजींनी देखील हेच म्हटले होते. ईशावास्योपनिषदाचा प्रथम मंत्र या जगात असेपर्यंत जगाला आशा आहे असे ते म्हणाले होते, तेव्हा त्यांना हेच अभिप्रेत होते. आजची सभ्यता, आजची जीवनशैली, आजची शब्दावली, आजची जीवनदृष्टी, आजची विचारपद्धती यात आमूलाग्र परिवर्तन होणे त्यासाठी गरजेचे आहे. त्यासाठी प्रथम विश्वव्यापी अन समाजव्यापी वैचारिक मंथन सुरु व्हायला हवे. नियोजन, रचना, व्यवस्था, आकडेवारी वगैरे जंजाळ पूर्णत: बाजूला सारून मुळाशी भिडणारी, व्यवहाराला जोडून असणारी तत्त्वचर्चा ही प्राथमिक आवश्यकता आहे. हे झाले तर पुढील पाच-पन्नास वर्षात त्याचे चांगले परिणाम दिसतील. अन्यथा, `बापू असे म्हणाले होते अन आम्ही त्याला हरताळ फासला' असे अरण्यरुदन करत बसण्याला पर्याय नाही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, ४ ऑक्टोबर २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा