दहावी उत्तम प्रकारे उत्तीर्ण झालेल्या पुतण्याला भेटायला पुण्याला
गेलो होतो. एवढ्या दूर आलोत तर चार दिवस भटकून येऊ असा विचार केला.
नेहमीप्रमाणेच पर्यटन, सहल असे नसल्याने धोपटी उचलायची अन चालू लागायचे.
सोबत, जाण्यायेण्याची व्यवस्था, राहण्याखाण्याच्या सोयी इत्यादी गोष्टी
ध्यानात घ्यायच्या नसतातच भटकताना. भटकंती म्हणजे भटकंती. यावेळी होते
शिवथरघळ आणि रायगड. त्यातील शिवथरघळ पहिल्यांदाच जाणार होतो. रायगड शाळेत
असताना सुमारे ४० वर्षांपूर्वी चढलेला. राज्य परिवहनाच्या पुण्याच्या
स्थानकावरून सुरुवात झाली. चौकशीच्या खिडकीवर विचारले तर तिथला माणूस
म्हणाला- महडची बस हवी की महाडची. म्हटलं शिवथरघळला जायचं आहे. तो म्हणाला,
त्यासाठी महाडची बस. देशाटनाने ज्ञानात भर पडते, असे एका संस्कृत
सुभाषितात सांगितले आहे. यावेळी त्याची अशी सुरुवात झाली. महड म्हणजे
अष्टविनायकातील एक स्थान. महाड म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांनी जिथे चवदार
तळ्याचा सत्याग्रह केला होता ते. सुमारे पाच तासांचा प्रवास करून बस महाडला
पोहोचली. दुपारचा एक वाजला होता. महाड स्थानकावर शिवथरघळच्या बसची चौकशी
केली. तिथला माणूस म्हणाला- दीड वाजता बस आहे, पण ड्रायव्हर मिळाला तर
जाईल. ज्ञानात भर पडणे सुरूच होते. वाट पाहण्याशिवाय दुसरा इलाज नव्हता.
दुसरेही ८-१० लोक होते. त्यांना घळीच्या पायथ्याशी असलेल्या शिवथर गावी
जायचे होते. या वाट पाहण्याच्या वेळात बरेच प्रबोधन झाले. या बसची समस्या
काय, त्यातील खाजगी वाहनांच्या व्यवसायाचा भाग, कोणाकोणाचे काय काय
हितसंबंध, गावातील गट इत्यादीची आपसूक माहिती झाली. अधुनमधून माझी साक्ष
काढणेही सुरु होते. मी पहिल्यांदाच महाडला आलो आहे याच्याशी त्यांना
सोयरसुतक नव्हते. अखेर बहुप्रतिक्षित बस आली. पण ती शिवथरला जाणार की नाही
हे जाणून घेणे महत्वाचे होते. म्हणजे चालक-वाहक तयार असणे महत्वाचे होते.
नुसती बस असून उपयोग नव्हता. त्यात पुन्हा पाचेक मिनिटे गेली अन बस जाणार
हे निश्चित झाले.
महाडहून साधारण ३०-४० किमीचा प्रवास. हा प्रवास
मात्र रमणीय. दुसरा शब्दच नाही. बस चांगली होती, चालवणारा चांगला होता,
बसमध्ये गर्दी नव्हती, बाहेर ढग आणि भुरभूर पाऊस होता, आजूबाजूला सर्वत्र
हिरवाई अन डोंगर होते. साधारण सव्वादोनला बस शिवथरघळला पोहोचली. २-४ वाहने
उभी होती. दोन झोपडीवजा हॉटेल्स. अन पलीकडून प्रचंड आवाज येत होता न
दिसणाऱ्या धबधब्याचा. पावले अर्थातच घळीकडे वळली. पन्नासेक मीटर चालून गेलो
तर समोर १०० फूट उंच अन वीसेक फूट रुंद धबधबा शिवथर नदीत कोसळत होता. पाच
मिनिटे होतो तिथेच उभा राहिलो. मग ही रौद्रसुंदरता जवळून अनुभवण्यासाठी
घळीच्या पायऱ्या चढू लागलो. दोन पायऱ्या चढलो अन सर आली धावून. पुढच्या
२०-२५ पायऱ्या चढून होईपर्यंत चिंब. मजाच मजा. घळीच्या अगदी समोर
कोसळणाऱ्या त्या धबाबा धारांचे वर्णन काय करावे? `सावधान' हा शब्द कानी
पडताच ज्यांची विरक्ती जागी झाली त्या विरक्त समर्थांनासुद्धा त्या
धबाब्यावर लिहावेसे वाटले यातच सारे आले. नितांत रमणीय अशी ती रौद्रसुंदरता
साठवत साठवत घळीत पोहोचलो. मनात आलं- आजही जगाच्या कोलाहलापासून दूर निबिड
एकांतात असलेलं हे स्थान साडेतीनशे वर्षांपूर्वी समर्थांनी कसं शोधून
काढलं असेल, इथे २२ वर्षं ते कसे राहिले असतील आणि जगापासून दूर अज्ञात अशा
या ठिकाणी जगाच्या नेमक्या दुखण्यावर कालातीत असं औषध श्रीदासबोधाच्या
रुपात कसं तयार केलं असेल...
समर्थ स्मरणात मन असतानाच घळीतील
समर्थांच्या मूर्तीचे अन प्रभू रामाचे दर्शन घेतले. तिथेच टेकलो. समोर
धबधबा कोसळत होता. त्याचा जादुई आवाज आसमंतात भरून राहिला होता. घळीत तुषार
येत होते. मिणमिणत्या दिव्यांनी दूर न झालेला अंधार मनावर गारुड जमवीत
होता. समर्थ आणि श्रीदासबोध मनात पिंगा घालीत होते. तासभर कसा गेला कळलेच
नाही. शेजारी एक सज्जन येऊन बसले. ते धुळ्याचे. नोकरीनिमित्त महाडला. सुटी
घालवण्यासाठी आले होते. त्यांच्याशी चार गोष्टी झाल्या. त्यांना म्हटले-
तुमच्या धुळ्याचे स्व. शंकरराव देव यांनीच ही जागा १९३० साली शोधून काढली.
त्यांना ते माहीत नव्हते. त्यांना माझ्याबद्दल उगाचच आदर निर्माण झाला.
म्हणाले- तुमचा चांगला अभ्यास आहे दिसतो. मीच खुलासा केला- अहो, अभ्यास
वगैरे काही नाही. तिथे पाटी आहे. त्यावर लिहिलेली माहिती आहे ही. आपण लोक
कुठे जातो तेव्हा फारसं लक्ष देऊन (attentive राहून) पाहत नाही, फिरत नाही
हे पुन्हा प्रत्ययाला आलं. ते सज्जन गेले, मीही बाहेर पडलो. तिथल्या
व्यवस्थापनाचे एक दोघे जण समोर बसले होते. त्यांना विचारले- येथे निवासाची
काही सोय? त्यांनी पुणेरी कोरडेपणाने अन तटस्थतेने उत्तर दिले- काहीही
नाही. मी काही लगेच हार मानणारा नाही. रेटून धरले. नागपूरहून आलोय. चार
वाजत आलेत. परतायला बस नाही. इत्यादी. पुणेरी असल्याने त्यांना याचे काहीही
वाटायचे कारण नव्हते. दोन मिनिटे उभा राहिलो. मग म्हटले- त्या
विकीपेडियावर तर माहिती दिली आहे की, इथल्या हॉलमध्ये राहता येते म्हणून.
आता दोघांपैकी एकाला स्वर सापडला. त्यांनी विचारले- किती जण आहात? म्हटलं-
एक. एकटा जीव सदाशिव. हे उत्तर ऐकताच लगेच उत्तर आले- नाही सोय राहण्याची.
एकट्या माणसाला आम्ही नाही राहू देत. असा अनुभव यापूर्वीही गाठीशी असल्याने
मी म्हणालो- मला तुमच्या अडचणी माहीत आहेत. अमुक अमुक ठिकाणीही असेच झाले
होते. पण आधार कार्ड किंवा अन्य ओळखपत्र (कार्ड) पाहून त्यांनी परवानगी
दिली होती. ते निष्ठावंत मात्र माझा सहानुभूतीने विचार करायला तयार नव्हते.
अखेर मी माघार घेतली आणि घळीच्या पायऱ्या उतरलो.
खालच्या हॉटेलात
गेलो. मालकाला म्हटले- जेवायचे आहे. `उशीर झाला हो' अशी तक्रार त्याने
केली. तरीही जेऊ मात्र घातले. मग त्यालाच विचारले मुक्कामाचे. म्हणाला-
नाही. आता आली ना पंचाईत... चहू बाजूंनी उंच डोंगर, निवासाची व्यवस्था
नाही, परतायला गाडी नाही, अन संध्याकाळचे पाच वाजलेले. शहरातले संध्याकाळचे
पाच आणि डोंगरदऱ्यातले पाच यातील फरकाचे ज्ञान झाले. अर्थात घाबरून
जाण्याचं, निराश होण्याचं वगैरे काही कारण नव्हतं. `समर्थाचिया सेवका' कोण
वक्र पाहे? मनाशी ठरवलं, अंधार पडायच्या आत शिवथर गावात पोहोचायचं. कोणी
घरात घेतलं तर ठीक, नाही तर घराबाहेर घराच्या आडोशाने ताणून द्यायची. सकाळी
ताजेतवाने होण्यासाठी नदी आहेच अन मग महाडला पोहोचू. ठरवले अन डोंगर उतरू
लागलो. पाच-दहा मिनिटे चाललो अन समोरच्या झाडाआडून एक माणूस सामोरा आला.
हातात कोयता असलेला तो, बाजूच्या शेतातील शेतकरी होता. पण हे ध्यानी
यायच्या आतच मारुततुल्य वेगाहून अधिक वेगाने मनात काय काय येऊन नाही
गेले... गेले काही तास मनात समर्थ, श्रीराम, हनुमान आदींच्या सोबतीला
श्रीदासबोध, श्रीरामायण अन त्यामुळेच वाल्मिकीही होते. म्हटले- हा वाल्या
कोळी तर नाही. पण मी काही देवर्षी नारद नाही. हा आपल्याला लुटेल का? मारून
टाकेल का? अन लगेच हेही आले- लुटले तर लुटले, मारले तर मारले. या शिवथर
नदीतून वाहत वाहत अंती तर सागरालाच भेटायचे आहे. पण काहीही झाले नाही.
आम्ही एकमेकांना ओलांडून पुढे गेलो.
थोडे आणखीन पुढे चाललो अन एक
ऑटोरिक्षा येताना दिसली. म्हटले, याला चमत्कार, प्रभूची कृपा इत्यादी
म्हणायला हरकत नाही. त्याला हात दाखवला. महाडला नेशील का विचारले. हो
म्हणाला. तो कोणाला तरी शिवथरघळला घेऊन चालला होता. प्रवास पुन्हा घळीकडे
सुरु झाला. घळीत भेटलेले धुळ्याचे सज्जन त्याच रिक्षात होते. त्यांनाही
उशीर झाला होता अन इकडे येणारी ही रिक्षा त्यांनी पकडली. मला पाहून त्यांना
आश्चर्य वाटले. म्हणाले- तुम्ही मुक्काम करणार होता नं. काय झाले? मी
त्यांना सगळा प्रकार सांगितला. आमच्याशिवाय त्या रिक्षात एक महीला अन एक
पुरुष, असे दोघे होते. त्या महीला माझे म्हणणे लक्ष देऊन ऐकत होत्या. माझे
बोलणे झाले. दोन मिनिटांनी त्यांनी मला विचारले- तुम्ही संघाचे काम करता
का? माझ्या आश्चर्याला सीमा नव्हती. मी म्हटले- हो. पण तुम्ही कसे काय
विचारले? त्या म्हणाल्या- मला वाटले. तोपर्यंत घळ आलीच होती. त्या
म्हणाल्या- चला वर. मी म्हटले- तुम्ही जाऊन या. आम्ही जाऊन आलो मघाशीच. तशा
त्या म्हणाल्या- चला तर. आम्ही वर गेलो. त्यांच्यासोबत आलेल्या गृहस्थांना
त्या म्हणाल्या- तुम्ही या दर्शन करून. अन त्या वळल्या व्यवस्थापक
मंडळींकडे. अन सुरु झाला तोफखाना- यांना का राहू देत नाही? इतक्या दुरून
लोक येतात. काय करायचे त्यांनी? सोय असून नकार का? कोणाशी बोलू सांगा?
त्यांची सरबत्ती आणि व्यवस्थापकांचे ना, सुरूच होते. त्या परिसरातून फोन
लागत नाही. पण त्या महीला त्यांना म्हणाल्या- मला माहीत आहे एक जागा. तिथून
फोन लागतो. चला माझ्यासोबत आपण फोन करू. अखेरीस मी मध्ये पडलो. म्हटले-
त्या एवढं म्हणतायत तर फोन लावून पहा ना... नाही तर मी जाईन परत. त्यावर
व्यवस्थापक राजी झाले. ते इमारतीच्या आत गेले. आत बाकीही काही मंडळी होती.
मी बाहेरच थांबलो. आत काय झाले कोणास ठाऊक. सगळे बाहेर आले. अन व्यवस्थापक
मला म्हणाले- तुमचं एखादं ओळखपत्र दाखवा अन सामान आत घ्या. दर्शनाला
आलेल्या गृहस्थांना रात्री मुंबईला परतायचे होते. त्यामुळे त्या महिलेने
माझे नाव, फोन नंबर लिहून घेतले अन ती मंडळी परतली.
नागपूरहून
पुण्याला जातानाच ठरवले होते- शिवथरघळला मुक्काम करायचा. ऐन वेळी नकार
मिळाला होता अन तासा दीड तासातच नाट्यमय रीतीने माझा शिवथरघळ येथील मुक्काम
सुरु झाला होता
एकदाचे मुक्कामाचे निश्चित झाल्यावर मात्र काही अडचण
झाली नाही. व्यवस्थापक मंडळीही `नागपूरकर, नागपूरकर' म्हणून बोलू लागले.
संध्याकाळी तेथील प्रार्थना झाली. त्यात सहभागी झालो. प्रार्थना आटोपून
बाहेरच्या जागेत उभे होतो तेवढ्यात `हे लोक राजकारणी आहेत' हे सांगण्याची
गरज पडू नये अशा पद्धतीने १५-२० लोक घळ चढून आले. त्यातील एक जण माझ्याचकडे
आले. म्हणाले- रायगडचे उपजिल्हाधिकारी आहेत. मी त्यांना व्यवस्थापकांकडे
पाठवले. थोडी धावपळ वाढली. सुमारे अर्धा तास तो गट होता. मला त्या साऱ्याशी
काहीही करावयाचे नव्हते. मिट्ट काळोखात काही दिसतं का, जाणवतं का हे
शोधण्याचा माझा खेळ सुरु होता. रात्री कळले, आलेले पाहुणे उपजिल्हाधिकारी
नव्हते तर कोणत्या तरी राजकीय पुढाऱ्याचे पी.ए. होते. ज्यांना राजकारणाची
थोडीफार ओळख आहे तेही जाणतातच की, तिथे पी.ए.चे सुद्धा पुष्कळ पी.ए. असतात.
असो. थोड्या वेळाने व्यवस्थापकांनी आवाज दिला- `नागपूरकर चला जेवायला.'
वरण, भात, भाजी, पोळी, कढी असे छान जेवण झाले. व्यवस्थापक मंडळींपैकीच
एकाच्या कोणाचा तरी त्या दिवशी वाढदिवस होता. त्यामुळे जिलबी आली होती.
तिचाही आस्वाद घेतला. जरा वेळ शतपावली, गप्पाटप्पा झाल्यावर झोपायच्या
मार्गाला सगळे लागले. तिथे राहणाऱ्या लोकांची नियमित व्यवस्था आहे. ते
तिकडे गेले. मुक्कामाला येणाऱ्या बसचे चालक वाहक रोज तिथेच मुक्कामाला
असतात. त्यामुळे त्यांचीही व्यवस्था आहेच. माझी सोय मोठ्या हॉलमध्ये होती.
थोड्या वेळाने चालक वाहक आले. त्यांची जेवणे झाली. थोड्या शिळोप्याच्या
गप्पा. तेही झोपायला गेले. मी एकटाच होतो. मुख्य व्यवस्थापक जवळ आले.
त्यांच्या मनात गेले काही तास असलेला प्रश्न त्यांनी केला- `त्या महिला कोण
तुमच्या?' म्हटलं- `कोणीही नाहीत. त्या मला रिक्षात भेटल्या.' त्यांचं
समाधान झालं नाही हे स्पष्ट दिसत होतं. पण बोलले काही नाहीत. मीच म्हणालो-
`माझी तीव्र इच्छा होती. प्रभूने ती अशी पूर्ण केली असं मला वाटतं. यावर
फार डोकं खर्च करावं हेही माझ्या स्वभावात नाही.' त्यांना काय वाटलं कोणास
ठाऊक? किंचित हसले अन म्हणाले, `विश्रांती घेऊ या. शुभ रात्री.' ते झोपायला
गेले. शे-दोनशे माणसे झोपू शकतील एवढ्या त्या दालनात आता मी अन बाहेरील
धबधब्याच्या पार्श्वसंगीताच्या साथीने मूर्तीतून माझ्यावर कृपावर्षाव
करणारे समर्थ एवढेच होतो. पांघरूण घेतले अन डोळे मिटले.
पहाटे ४
वाजता प्रसन्न जाग आली. आवरून बाहेर आलो तर काळोख रुपयात एक आणा कमी झाला
होता. मंडळींची सकाळच्या प्रार्थनेची तयारी सुरु होती. बाहेर बसूनच मी त्या
प्रार्थनेत सहभागी झालो. लगेच गरमागरम चहा झाला. आंघोळ उरकून निघण्याची
तयारी करावी या विचारात होतो. थंड पाण्याची सवय असूनही गरम पाणी मिळाल्यास
बरे असे वाटण्याएवढी थंडी होती. नजर टाकली तर आचाऱ्याने भला मोठा गंज पाणी
तापायला ठेवला होताच. आंघोळ उरकून, तयारी करून अन घळीत जाऊन आलो.
शिवथरघळच्या भेटीची अन निवासाची पुरचुंडी बांधून घेतली अन पायऱ्या उतरलो.
सव्वासातला बस हलली. डोंगर पार करत फोनच्या रेंजमध्ये पोहोचलो तर फोन
वाजला. नंबर ओळखीचा नव्हता. फोन घेतला अन खुलासा झाला. पलीकडून काल
माझ्यासाठी व्यवस्थापनाशी भांडणाऱ्या ताई बोलत होत्या. काही अडचण आली का,
निघालात का इत्यादी विचारपूस. अन शेवटी निमंत्रण- `तुम्ही महाडला येताहात.
स्थानकाच्या मागेच चालत येण्याच्या अंतरावर माझे घर आहे. चहा नाश्त्याला
या.' नाही म्हणणे असभ्य ठरले असते. एक तर त्यांनी माझी मदत केली होती अन
अचानक आपल्याला मदत करणारी व्यक्ती कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकताही
होतीच. त्यांच्या घरी पोहोचलो. छोटेसे नीटनेटके दोनच खोल्यांचे घर. म्हणजे
मुळात तो मोठा वाडा. वाटण्या वगैरे झाल्या अन प्रत्येकाच्या वाट्याला जे
आले त्यात प्रत्येकाने आपापले संसार थाटलेले. अर्थात ही सगळी माहिती नंतर
झाली. गेल्यावर आगत स्वागत झाले. परिचयाची देवाणघेवाण झाली. तेव्हा कळले-
त्या ताई विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा महिला प्रमुख आहेत. विश्व हिंदू
परिषदेच्या कामाशिवायही पुष्कळ सामाजिक कामात त्या अग्रेसर असतात. कपाटात
शोभणारी मेडल्स, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्रे त्याची साक्ष पटवतात.
बोलण्याच्या ओघात त्यांनी सांगितले की, प्रशांतजी हरताळकर (आता दिल्लीत
मुक्काम, विश्व हिंदू परिषदेचे विदेश विभागाचे काम पाहतात.) सुद्धा
त्यांच्याकडे बरेचदा राहून गेले आहेत. त्यानंतर दुराव्याचे कारण उरले नाही.
कारण प्रशांतजी ओळखीचेच. शिवाय विदर्भातले. मूळ अकोल्याचे पण अनेक वर्षे
नागपुरात राहिलेले. त्यामुळे औपचारिकता गळून पडली. चहा नाश्ता झाला.
आता काय कार्यक्रम? त्यांचा प्रश्न. म्हटले- रायगडला जायचे आहे. आमचे
खाणेपिणे सुरु असतानाच एक दोन काका लोक आले होते. एक त्यांच्या परिचयातील
निवृत्त शिक्षक श्री. भुस्कुटे. स्वत: चांगले लेखक. त्यांचा मुलगा संजय
भुस्कुटे मुंबईला प्रसार माध्यमात. अन दुसरे बँकेतून निवृत्त झालेले. ताई
डबे देण्याचा व्यवसायही करतात. अन्य अनेक कमाईच्या अन बिन कमाईच्या
कामांसह. ते काका डबा घ्यायलाच आले होते. त्यांना ताईंनी काही सूचना दिल्या
आणि त्या काकांनी मला रायगडला जाणाऱ्या गाडीत बसवून दिले. निघताना मलाही
सूचना दिल्या- पायऱ्यांनी जाऊ नका. पाऊस आहे, त्यामुळे निसरडे असेल. शिवाय
धुकं आहे. काहीही दिसणार नाही. अन तुम्ही एकटे जाताहात. त्यामुळे रोप वे ने
जा. रोप वे च्या मालकांनाही त्यांनी फोन केला, आपले पाहुणे येताहेत
म्हणून. निघताना म्हणाल्या- संध्याकाळी आले की इकडेच यायचे. रात्रीचे जेवण
इथेच. त्यानंतर मी काही बोलणार तर त्या म्हणाल्या- रात्रीच्या मुक्कामाचं
मी पाहते. शेजारी काका आहेत. एकटेच असतात. त्यांच्याकडे होईल सोय.
समजूतदारीचा विशिष्ट स्तर असला की अनेक गोष्टी सोप्या, सहज होतात त्या अशा.
रायगडावर पोहोचलो. रोप वे चे तिकीट काढले. नजर इकडे तिकडे फिरवली. तिथे
संघाचे चौथे सरसंघचालक रज्जुभैयांचा एक फोटो लागलेला दिसला. कुठल्या तरी
कार्यक्रमाला ते आले असतानाचा. रोप वे च्या माझ्या capsule मध्ये दोन तरुण
पोरे अन कर्नाटकचा एक हौशी फिरस्ता होता. capsule वर सरकू लागली अन
क्षणार्धात खालचे सगळे तर गायब झालेच पण समोरचा भलाथोरला रायगड सुद्धा
दिसेनासा झाला. प्रचंड धुके दाटले होते. गडावर कसे होणार. फिरता येईल की
नाही अशी चर्चा करीतच चढणे सुरु होते. दोघा तरुणांपैकी एक जण फारच बहाद्दर
होता. एवढा की, पहिल्या मिनिटाला त्याने मिटलेले डोळे त्याला उतरायला
सांगितले तेव्हाच उघडले. रायगडावर उतरलो तेव्हा धुके थोडे कमी झाले होते अन
भुरभूर सुरु झाली होती. आमच्या चौघांचा एक गट तयार झाला होता. त्या
गटासाठी एक वाटाड्या केला आणि भ्रमंती सुरु झाली. ४० वर्षांपूर्वी पाहिले
होते त्यातील काही आठवते का हे पाहण्याचा निष्फळ प्रयत्न केला. राणीवसा,
राजमहाल, टांकसाळ, राजदरबार, सिंहासन असे करत करत होळीच्या माळावर पोहोचलो.
वाटाड्याने जाहीर केले. आम्ही इथवरच येत असतो. बाजारपेठ, केदारेश्वर
मंदिर, महाराजांची समाधी तुमची तुम्ही पाहा. त्याचा निरोप घेऊन निघालो.
होळीचा माळ पार केला. तिथेच स्थानिक बाया, मुली चहा, बिस्किटे विकत होत्या.
चहा घेतला. त्याच पिठले भाकरी जेवणाची सोयही करतात. जेवण कराल का म्हणून
त्यांनी विचारले. जेवायचे होतेच. मी आणि दोघे तरुण यांनी होकार दिला.
बाजारपेठेतून मधल्या वाटेने शे-दोनशे फुटाची ढलान उतरते तिथे पाच-सहा
झोपड्या आहेत. तिथेच आम्हाला जेऊ घालणाऱ्या लीलाबाईची झोपडी. आम्हाला तिने
ती दाखवली. तिला झोपडी दिसत होती. त्यावरचा झेंडा दिसत होता. आम्हाला मात्र
धुक्यामुळे काहीही दिसत नव्हते. अखेर तिच्यासोबत खाली उतरून मी प्रत्यक्ष
पाहून आलो अन पावले केदारेश्वराकडे वळली.
मंदिरात पोहोचलो.
गाभाऱ्यात गेलो. त्या ओल्या अंधारात गुडघे खाली टेकवले. केदारेश्वराच्या
पिंडीला स्पर्श केला अन अंगांग शहारले. हीच ती ज्योतिर्मय पिंडी जिला; त्या
मृत्युंजय महापुरुषाने अन त्याला जन्म देणाऱ्या पुण्यश्लोक माऊलीने
अनेकवार स्पर्श केला असेल. हीच ती ज्योतिर्मय पिंडी; जिच्याजवळ त्यांच्या
मनातील कैक आशा निराशेच्या ओंजळी रीत्या झाल्या असतील. अन हीच ती पिंडी
जिच्या छायेत त्या मृत्युन्जयाने अनंताच्या प्रवासाला पाऊल उचलले होते.
थोडा वेळ निरव शांततेत तिथेच घालवला. बाहेर आलो. समोरच्या प्रांगणातील
महाराजांच्या समाधीपुढे नतमस्तक झालो. स्वराज्यासाठी बेलाग राजधानी
वसवणाऱ्या हिरोजी इंदोलीकरच्या पायरीला भक्तिभावाने स्पर्श केला अन परतीची
वाट धरली. पीठ मळून ठेवून अन पिठले तयार करून लीलाबाई आमची वाटच पाहत होती.
हातपाय धुवून झोपडीत शिरलो. पाच मिनिटात पिठलं, भाकरी, कांदा, मिरची, चटणी
अशा थाळ्या समोर आल्या. तुटून पडलो, पण मांडीला अंग घासत म्याऊ म्याऊ
करणाऱ्या मनिला भाकरीचा तुकडा टाकल्यानंतरच. जेवताना चारदोन गोष्टी झाल्या.
रोज गिऱ्हाईक मिळतात का? त्यावर उत्तर होते- हो, रोज मिळतात. कधी एक, कधी
दोन, कधी चार-पाच. काही कार्यक्रम असला की मग मात्र गर्दी होते. पुढचा
प्रश्न होता- तेवढं पुरतं का? त्यावर उत्तर होतं- हो पुरतं. मनोमन माहीत
होतं की त्यांच्या झोळीत अजून पडायला हवं आहे. पण समाधान काय असतं हे
अनुभवायला मिळालं अन त्याच वेळी बाहेर थैमान घालणारं असमाधान डोक्यात चमकून
गेलं. पूर्ण उभं राहून बाहेर पडता येणं अशक्य असलेल्या त्या कुडातून बाहेर
पडताना विचार करून पाहिला, कशी राहत असतील या पाच-सहा झोपड्यातील लोकं
इथे. अंधार पडल्यावर काय करीत असतील. दिनचर्या कशी असेल, सण उत्सव कसे
असतील, सुख दु:ख कशी असतील, भीती वाटत असेल का... इत्यादी. फारसा
कल्पनाविलास नाही करता आला.
रायगड दर्शन करून महाडला परतलो. ताईंना
फोन केला. म्हटले- रायगड दर्शन छान झाले. आता चवदार तळ्याला कसे जायचे
सांगा. दलितोद्धाराच्या चळवळीचे ते ऐतिहासिक प्रतिक पाहून येतो. त्यांनी
रस्ता सांगितला. त्यानुसार गेलो. ते ऐतिहासिक तळे पाहिले. आता तो परिसर
राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात आला आहे. मोठ्ठा तलाव, बगीचा, डॉ.
आंबेडकरांचा पुतळा अन एक इमारत तेथे आहे. तिथे थोडावेळ घालवून परतलो. ताई
वाटच पाहत होत्या. चहा झाला. सोबतच गप्पाही. ताईंना दोन मुली. दोघींचीही
लग्न झालेली. यजमान एका मुलीकडेच गेलेले होते. त्या मूळ मराठा. ब्राम्हण
तरुणाशी प्रेमविवाह केला. त्यामुळे गेली ३३ वर्षं माहेरच्यांनी त्यांचं नाव
टाकलेलं. सासरी मात्र सगळ्यांनी स्वीकारलं. गणपतीला त्यांच्याच हातचे मोदक
हवेत. लग्नाच्या वेळी शिक्षण फक्त दहावीपर्यंत. नंतर बारावी केलं. आता
मुलीपासून प्रेरणा घेऊन एलएलबी करणार आहेत. पण शिक्षण नसूनही कामात,
संघटनेत, कार्यक्रमांच्या, उपक्रमांच्या, मिरवणुकांच्या आयोजनात वाघ;
पोलिसांशी भांडायलाही कमी नाही की, मुलींना लाठीकाठी शिकवण्यात कमी नाही;
भाषणही देणार अन रायगडावर दोन हजार वृक्षही लावणार. चहासोबत हा सगळा इतिहास
कळला. मग म्हणाल्या मी थोडी बाहेर जाऊन येते. तुम्हाला आंघोळ करायची असेल,
कपडे धुवायचे असतील तर उरकून घ्या. त्या बाहेर गेल्या. मी आंघोळ, कपडे
धुणे उरकले. तोवर त्या आल्याच. संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला
लागल्या. मी सह्याद्री पाहू लागलो. निग्रहाने अन्य वाहिन्या नाकारणारे लोक
आहेत हे नक्की.
थोड्या वेळाने जेवणे झाली. मग त्या म्हणाल्या, मी
जाऊन येते. माझी एक मुस्लिम मैत्रीण आहे. शाळेत असतानाची. तिला आज रमजान
ईदच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा तिने निमंत्रण दिले- कितीही वेळ झाला तरीही
ये. अगदी मध्यरात्री सुद्धा चालेल. मी तिच्याकडे जाऊन येते. साधारण नऊ
वाजले होते. तासाभरात त्या जाऊन आल्या. थोड्या वेळ बोलून शेजारच्या
काकांकडे गेलो. ते सानिया मिर्झाचा खेळ पाहत होते. त्यांनी स्वागत केले.
बिछाना तयारच होता. मला त्यांच्याकडे सोपवून ताई घरी गेल्या. आम्ही जरा वेळ
गप्पा मारल्या. काका ६५ वर्षांचे. अविवाहित. एकटेच असतात. इलेक्ट्रिकची
कामे करतात. दुकान होते. बंद केले आहे. अजून हिमालयात ट्रेकिंगला जातात.
छान गट्टी जमली. रात्री झोप झाली. सकाळी उठलो. त्यांना उठवले. त्यांनी लगेच
चहा केला. पाणी तापवले. आंघोळ वगैरे करून तयार झालो. नागपूरला येण्याचं
निमंत्रण दिलं. निरोप घेण्यासाठी शेजारी ताईंकडे गेलो. पाच मिनिटे टेकलो.
त्यांनी हातावर बर्फी ठेवली. पाणी दिले. त्यांनाही नागपूरचे निमंत्रण दिले.
रस्त्यापर्यंत त्या सोडायला आल्या. त्यांचा निरोप घेतला अन पुढचा प्रवास
सुरु झाला.
त्यांनी मला का विचारले असेल- तुम्ही संघाचे आहात का
म्हणून? का माझ्यासाठी भांडल्या असतील? विश्वास का टाकला असेल? हे प्रश्न
घेऊनच बसमध्ये चढलो. एक मात्र खरं की, सर्वत्र अविश्वासाचे वातावरण
असतानाही लोक परस्परांवर विश्वास ठेवतात अन तो सार्थही ठरवतात. सगळ्यांनाच
असा अनुभव येईल का? संघाचे सगळेच लोक असे वागतील का? संघाचे आहोत म्हणून
कोणी त्यांच्याकडे गेलेत तर त्यांनाही अशीच वागणूक मिळेल का? या प्रश्नांची
उत्तरे नकारार्थीच राहतील. कुठला तरी ऋणानुबंध तर नक्कीच असेल, पण
त्यासोबतच या अनुभवातील दोन्ही घटकांचा - माझा व ताईंचाही - विश्वास की, हे
संघाचे संस्कार आहेत आणि जे काही घडत असतं ते ती अज्ञात शक्तीच घडवीत असते
हेही कमी महत्वाचे नक्कीच नाहीत.
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २७ जुलै २०१६