शनिवार, १५ ऑक्टोबर, २०१६

नाण्याची दुसरी बाजू


नाण्याची एकच बाजू आपण पाहू शकतो. नाण्याच्या दोन्ही बाजू एकाच वेळी पाहणे कोणालाही शक्य नाही. कोणीही कितीही विद्वान, कर्तृत्ववान वगैरे असला तरीही नाण्याच्या दोन्ही बाजू एकाच वेळी पाहणे जमुच शकत नाही. ती आपली अंगभूत मर्यादा आहे. हां, पण एकदा एक बाजू; त्यानंतर दुसरी बाजू; असे पाहता येते. दोन्ही बाजू पाहिल्यानंतर त्या स्मृतीत साठवून, एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात हे समजून नाणे मात्र एकच आहे ही धारणा पक्की होते. त्यामुळे नाण्याची देवाणघेवाण करताना आपण नाण्याच्या दोन्ही बाजू पाहत नाही. ते नाणे आहे एवढेच पाहतो. हाच विवेक. दुर्दैवाने आज हा विवेक आपण गमावून बसतो आहोत. आपल्या अहंमन्य दांभिकतेपोटी अनेक चुकीच्या गोष्टी आपण करतो आहोत आणि त्यातून एक सार्वत्रिक निराशा, असंतोष, हतबलता आणि त्याच्या परिणामी उद्रेक घडवून आणतो आहोत. विचार करण्यासारखा आणखी एक पैलू म्हणजे, ही एकांगी अहंमन्य दांभिकता भलेपणातूनदेखील आलेली असू शकते. चांगले असण्याचा, भले करण्याचा देखील प्रचंड अहंकार असतो. तो वाईटाच्या अहंकारापेक्षा घातक असतो. कारण वाईट गोष्ट ही मुळातच वाईट असते, त्रासदायक असते. तिला सहानुभूती मिळत नाही आणि जो वाईट वर्तन करतो तोदेखील मनातून त्या कृतीला पाठींबा देत नाही. चांगल्या गोष्टीला मात्र सहानुभूती आणि समर्थन असते. त्यामुळे त्यातील दुसरी बाजू लक्षात घेतली जात नाही आणि प्रचंड एकांगीपणा जन्माला येतो. आजच्या तारखेतील दोन उदाहरणे यासाठी पुरेशी आहेत. त्यांच्यात तसे कोणतेही साम्य नाही. मात्र त्याच्या हाताळणीमागील मानसिकता सारखीच आहे. भलं करण्याच्या अहंमन्य एकांगीपणातून आलेली.
आजच एक बातमी वाचली. मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी हेल्मेटबाबत केलेल्या सर्वेक्षणाची. हेल्मेट कसे योग्य इत्यादी गोष्टी त्यात ओघानेच आल्या. आपल्याला जो निष्कर्ष काढायचा आहे त्यासाठी अशी सर्वेक्षणे बेमालूमपणे करवून घेणे, त्याचे निष्कर्ष ढोल बडवत प्रचारित करणे, त्यातून दडपण उभे करणे आणि आपले निष्कर्ष गळी उतरविणे ही आज नवीन बाब राहिलेली नाही. हे सर्वेक्षणदेखील त्यातीलच म्हणायला हवे. अन्यथा- हेल्मेटच्या फायद्यांचा अभ्यास करताना, ते अडचणीचे आणि uncomfortable असू शकते याचाही अभ्यास का होऊ नये. नाण्याची एकच बाजू पाहण्याचा एकांगी अहंमन्यपणा याशिवाय दुसरे कारण असू शकत नाही. एखाद्या गोष्टीचा प्रामाणिक, कळकळीने विचार करत असतानाही, त्याची दुसरी बाजू असू शकते आणि ती तेवढीच खरी असू शकते हे २१ व्या शतकातही समजू नये ही मानवी शोकांतिका आहे. पण भलेपणाची समज आणि ठेका आम्हालाच मिळालेला आहे हा समज जर सोडायचाच नसेल तर `गाढवापुढे वाचली गीता...' याशिवाय दुसरे काहीही प्रत्ययाला येऊ शकत नाही.
दुसरा विषय सध्या सुरु आहे तो- समान नागरी कायद्याचा. अनेकांना धक्का बसेल, अनेकांना पटणार नाही आणि हा किंवा तो गट असाच विचार करू शकणाऱ्यांना बंडखोरी वाटेल; पण समान नागरी कायदा करणे मला मान्य नाही. मुळात असे कायद्यावर कायदे करत जाणे निरर्थक आहे. प्रत्येक कायदा करताना आता सारे काही छान सुरळीत होईल अशी प्रचंड आशा बाळगली जाते. अन काहीच काळात तसे काहीही होत नसल्याचा प्रत्यय येतो. हा जगभरातील हजारो वर्षांचा अनुभव आहे. याचा अर्थ कायदे नकोत असाही नाही. परंतु कायदे म्हणजे काय? कायदे कशासाठी? कायद्याच्या मर्यादा आणि बलस्थाने कोणती? कायदा राबवणे आणि त्यामागील मानसिकता? समाजाची जडणघडण आणि वाटचाल, मानवी वर्तन यासारख्या अनेक गोष्टींची जी समज विकसित व्हायला हवी ती झालेलीच नाही. ही समज विकसित होण्याची प्रक्रिया कायम दुर्लक्षित राहते. त्याऐवजी कायदे करून टाका ही `टोळी मानसिकता' सोपी आणि सोयीची वाटते. मुळातच परिवर्तन म्हणजे काय? कशासाठी? कसे? परिवर्तन सत्तेद्वारे होते का? होऊ शकते का? तसे केल्यास होणारे परिणाम काय असतात? परिवर्तनाची एखाद्याची कल्पनाच योग्य, तीच सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे का? एखाद्याची परिवर्तनाची कल्पना राबवण्यासाठी सत्तेचा वापर हा राक्षसीपणा नाही का? नाण्याची एकच बाजू पाहून तेवढीच खरी मानण्याचा दुराग्रह एवढेच त्याचे स्वरूप म्हणावे लागेल.
समान नागरी कायद्याचे उदाहरण घेतल्याने त्याच्या थोड्या तपशीलाची चर्चा अप्रस्तुत ठरू नये. विवाहपद्धती आणि कुटुंब व्यवस्था हा यातील कळीचा मुद्दा आहे. या दोन्हीही गोष्टी मानवी गरज, सामाजिक व्यवस्था, आर्थिक बाजू, धार्मिकता या सगळ्यांचे संमिश्रण असते. विवाह केवळ मानवी गरजेसाठी आहे असे म्हणणे जसे चुकीचे, तसेच ती फक्त सामाजिक व्यवस्था आहे किंवा त्याला फक्त आर्थिक वा धार्मिक अर्थ आहे हे म्हणणेही चुकीचे. सगळ्याच गोष्टी त्यात अंतर्भूत आहेत. अन या सगळ्या बाबी प्रत्येक व्यक्तीसाठी आणि समाजासाठी वेगवेगळ्या असतात. मूलतः प्रत्येक व्यक्ती ज्या एका परिपूर्णतेकडे कळत वा नकळत चालतो, त्याला साहाय्य करेल अशाच पद्धतींचा अवलंब माणूस करीत असतो. ही अतिशय धीमी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असते. त्यात घिसाडघाई करणे, अन्य कोणी अवाजवी लुडबुड वा हस्तक्षेप करणे यामुळे खरे तर त्या त्या व्यक्तीच्या अथवा व्यक्तीसमूहाच्या वाटचालीचा बट्ट्याबोळ होतो. त्यासाठी अवाजवी दंडव्यवस्था सर्वनाशाला कारणीभूत ठरते. जात आणि जातीयता यांचे आजचे चित्र याची साक्ष ठरावे. एक पत्नी वा एक पती ही आदर्श व्यवस्था आपण म्हणू शकतो. परंतु तसेच असले पाहिजे ही एकांगी भूमिका होईल. काही लोक लग्न न करताही राहू शकतील, तर दोन बायका किंवा दोन पती ही काहींची आवश्यकता असू शकेल. प्रभू राम एकपत्नीव्रती होते, तर त्यांचे पिता दशरथ यांनी तीन विवाह केले होते. भगवान कृष्णांनी एक सहस्र विवाह केले, तर त्यांचे आईवडील तसे नव्हते. शिवाजी महाराजांनी एकाहून अधिक विवाह केले म्हणून ते वाईट ठरत नाहीत किंवा स्वामी विवेकानंदांनी विवाह केला नाही म्हणून तेही अयोग्य ठरत नाहीत. जास्त विवाह करणाऱ्या लोकांबद्दल जशा चर्चा होतात, तशाच विवाह न करणाऱ्या लोकांबद्दलही होतात. कमी किंवा जास्त विवाह याची अनेक कारणे असू शकतात. एकाच आयुष्यात पाच-सहा लग्न केले तर चालते, तेवढेच घटस्फोट घेतलेत तरीही चालते; पण घटस्फोटाशिवाय एकाच वेळी एकाहून अधिक लग्न चालत नाहीत. का? कोणी जर ते सांभाळू शकत असेल तर त्याचे स्वातंत्र्य का हिरावून घ्यावे? हां, त्याच्या कृत्याची जबाबदारी त्याची राहील एवढे पुरेसे. ती जशी पुरुषाची राहील तशीच स्त्रीचीही राहील. जबाबदारी घ्यावी आणि आपापला मार्ग निवडावा. विवाह कसा करायचा याचीही एकसमान तऱ्हा असण्याची गरज नाही.
बुरखा किंवा तलाक हेदेखील मुद्दे आहेत. मानवीयता आणि मुस्लिम महिलांचा विकास यासंदर्भात ते योग्य असले तरीही परिवर्तन हे आतून आणि त्याच्या अंगभूत गतीने व्हावे. बुरखा प्रथा असणाऱ्या मुस्लिम समाजात सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या महिला नाहीत का? राष्ट्राध्यक्ष होणाऱ्या महिला नाहीत का? अमेरिकेत अजून महिला राष्ट्राध्यक्ष झालेली नाही पण पाकिस्तान, बांगलादेशात झाल्या आहेत. तीन वेळा तलाक म्हणून तलाक देणाऱ्या मुस्लिम समाजात तसे न वागणारेही भरपूर आहेत. बहुविवाह न करणारेही आहेत. आजवर झालेले परिवर्तन कसे अन कशाच्या आधारे झाले? तोच प्रवाह पुढे कसा जाईल एवढेच पाहणे पुरेसे असते. उगाच आक्रस्ताळेपणा करणे, जिथेतिथे दंडशक्ती वापरणे; मुख्य म्हणजे मला वाटते ते, मला वाटते त्या गतीने व पद्धतीने व्हायला हवे हा दुराग्रह पथभ्रष्ट करतो. परिवर्तने हिंदूंची असोत की मुस्लिमांची; भले याचे असो वा त्याचे अंगभूत रीतीने व गतीने व्हावे. मुख्य म्हणजे चांगलेपणाचे साचे बनवणे आणि सगळ्या जगाला त्या साच्यात घालणे, त्यासाठी सत्ता राबवणे; कधीच इष्ट नाही. लाल, काळ्या, पिवळ्या, पांढऱ्या, निळ्या, भगव्या, बहुरंगी सगळ्याच रंगांना हे लागू होते. मानवाच्या आंतरिक वातावरणाचा, आंतरिक पर्यावरणाचा सत्तानिरपेक्ष विकास व्हायला हवा. त्यावर भर देणे मानवी इतिहासात अजून तरी सुरु झालेले नाही. ते व्हायला हवे एवढे मात्र खरे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १३ ऑक्टोबर २०१६

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०१६

`प्रामाणिक पण अयोग्य' हिंदू वा भारतीय विचार विश्वापुढील आव्हान

पाकिस्तानी कलाकारांच्या संदर्भात सध्या बरीच चर्चा सुरु आहे. कलाकारांवर अशी बंधने असू नयेत, असाही त्यातील एक सूर आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, अनेकांना तसे प्रामाणिकपणे वाटते. कला, कलाकार, सादरीकरण यांचा आणि दहशतवाद, दोन देशातील संघर्ष- वाद यांचा काय संबंध असा त्यांचा प्रामाणिक प्रश्न असतो. याचा अर्थ त्यांचा युक्तिवाद बरोबर असतो असे नाही, पण त्यांचे वाटणे प्रामाणिक असते. या अयोग्य पण प्रामाणिक मताचा अधिक खोलवर विचार करण्याची गरज आहे. या विश्वातील प्रत्येक वस्तू, विचार, व्यक्ती, घटना वेगवेगळी आहे; हा सिद्धांत या विचारांच्या मुळाशी आहे. वर्तमानात ज्याला `वैज्ञानिक विचारपद्धती' म्हटले जाते ती हीच. या विश्वातील यच्चयावत प्रत्येक बाब सुटी सुटी आहे. हे सगळे सुटे भाग जोडून हे विश्व आकारास आलेलं आहे असा विचार हे लोक करतात. कधी काही समस्या आली तर संबंधित सुटा भाग काढून टाकायचा, त्याजागी दुसरा बसवायचा म्हणजे झाले. या विश्वातील प्रत्येक वस्तू, विचार, व्यक्ती, घटना परस्परांशी जैविक पद्धतीने जोडल्या असून त्यांचा एकमेकांवर परिणाम होत असतो. त्या विलग करता येत नाहीत. खाणेपिणे, कपडेलत्ते, वागणेबोलणे, चालणेफिरणे यासारख्या मोजमाप करता येईल अशा गोष्टी; मन आणि त्याच्या चलनवलनावर परिणाम करतात हे त्यांना मान्य नसते. शरीर वेगळं, मन वेगळं, बुद्धी वेगळी, भावना वेगळ्या, विचार वेगळे, बाह्य घडामोडी वेगळ्या असा त्यांचा समज असतो. यातील काहीही वेगळं नसून त्यातील प्रत्येक गोष्टीचा प्रत्येकीवर परिणाम होतो हे त्यांना मान्य नसते. परिणामांचा हा आंतरिक फापटपसारा शरीरातील सूक्ष्म रक्तवाहिन्यांसारखा म्हणता येईल. कुठून कुठे काय पोहोचवतं माहीत नाही. त्यासाठी बुद्धीची सूक्ष्मता हवी. अर्थात रक्तवाहिन्या हे फक्त उदाहरण आहे. त्या प्रत्यक्ष दिसू शकतात आणि भावभावना आणि बाह्य गोष्टी यांना जोडणाऱ्या वाहिन्या दिसत नाहीत हा त्यातील ठळक भेद होय. त्यामुळेच अनेकदा- `पुरावे काय?' या प्रश्नावर येऊन चक्रव्यूह सुरु होतो. परंतु पुरावे नसतानाही अनेक गोष्टी वास्तव असतात. एखाद्या गोष्टीचे पुरावे नाहीत म्हणजे ती गोष्टच नाही असे होत नाही आणि एखाद्या गोष्टीचे पुरावे आहेत म्हणजे ती आहेच असेही होत नाही. मन कोणीही दाखवू शकत नाही पण ते नाही असे नाही. अन पुरावे असून ती गोष्ट नसते याचे उदाहरण म्हणून मकरंद अनासपुरे यांचा `कायद्याचं बोला' चित्रपट पाहावा. `कळते पण वळत नाही' अशी माणसांची स्थिती का असते याला तुकड्यात विचार करणाऱ्यांकडे काहीही उत्तर नसते. अशा वेळी ते फक्त चिडचिड करतात. आधुनिक विज्ञान (relativity and quantum mechanics च्या आधीचे) आणि त्या आधारावर विकास पावलेली विचारपद्धती, त्यातून घडलेले प्रबोधनपर्व हे सगळे याच्या मुळाशी आहे.

relativity and quantum mechanics यांच्यानंतरचे विज्ञान मात्र वेगळे आहे. ते या विश्वाला सुटे भाग एकत्र करून assemble केलेले समजत नाही. हे संपूर्ण विश्व एक एकसंघ एकक आहे. आपण त्या विश्वाच्या अंतर्गत असल्याने त्याचे संपूर्ण आकलन करू शकत नाही असे त्याचे म्हणणे आहे. हा विचार वेदांताकडे घेऊन जाणारा आहे. मात्र या आधुनिकोत्तर विज्ञानाच्या आधारावरील विचारपद्धती अजून विकसित झालेली नाही. त्यानुसार प्रबोधन ही त्याही पुढील पायरी. दुर्दैवाने या विश्वाच्या चुकीच्या धारणांवर आधारित विचार, कल्पना, संकल्पना, पद्धती, रचना, मान्यता, शब्दावली घेऊन आम्ही समस्यांची उत्तरे शोधीत आहोत. हिंदू वा भारतीय विचारविश्व हेदेखील या जंजाळात अडकले आहे. गेली तीन-चारशे वर्षे ज्या चुकीच्या रस्त्यावरून चालतो आहोत त्याच चुकीच्या रस्त्यावर आम्ही हवा असलेला पत्ता शोधत भटकतो आहोत. त्यामुळे आम्हाला पत्ता सापडणारच नाही. आम्ही मुक्कामावर पोहोचूच शकणार नाही. हिंदू अथवा भारतीय विचारविश्वापुढे हे खरे आव्हान आहे. आम्ही चालतो आहोत तो रस्ता, त्यावरील ओळखीच्या खाणाखुणा, त्याची दिशा हे सगळेच चुकलेले आहे हे समजावून देणे आणि योग्य रस्ता, दिशा आणि खाणाखुणा सांगणे; ही हिंदू अथवा भारतीय विचारविश्वाची पुढील दिशा असायला हवी. प्रथम त्यांनाच हे समजावून घ्यावे लागेल. त्यासाठी प्रचंड मोठा सायास लागेल आणि धीट व्हावे लागेल. राजकारणापल्याड जाऊन `प्रामाणिक परंतु अयोग्य' असा हा विचारव्यूह भेदावा लागणार आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, ८ ऑक्टोबर २०१६