सोमवार, १५ मे, २०१७

पाहा विचार करून...

आफ्रिका सोडून संपूर्ण जगावर मोठा सायबर हल्ला झाला. आपल्या येथे सुद्धा रिझर्व्ह बँकेने काही सूचना जारी केल्या. जगभरातच याची चर्चा सुरु आहे. हा हल्ला आटोक्यात आला असून सुरक्षेची चर्चा सुरु झाली आहे. परंतु जी माहिती नको त्याच्या हाती लागून गेली त्याचे काय? त्याचा वापर तर तो करणारच. त्या माहितीच्या आधारे जगभरात उत्पात करून होईपर्यंत नव्याने करण्यात आलेल्या सुरक्षा उपायांचा भेद करण्याची क्षमता व कौशल्य हे लोक विकसित करणार आणि पुन्हा हल्ला करणार. डिजिटल व्यवहारांचे आक्रमकपणे व अभिनिवेशाने समर्थन करणारेही आता बिचकू लागले आहेत. तुमचे-आमचे, तूतू-मीमी हे होईलच. संपूर्ण जगाची कबर खोदल्या गेली तरीही तूतू-मीमी सोडायचं नाही, सुटणार नाही असा शाप देऊनच माणसाला जन्माला घातलं असणार. मात्र या माणसांमधीलच काही हाताच्या बोटावर मोजावेत असे अपवाद असलेल्यांनी याचा अधिक खोलात जाऊन विचार करायला हवा.

एक गोष्ट निर्विवाद आहे की, सत्ताकांक्षा आणि सुखलोलुपता अन सुखसाधनांची अखंड वाढ; या दोन तत्वांवर वर्तमान सभ्यता- संस्कृती- जीवन- उभे आहे. यावर या जीवन पद्धतीचे समर्थक आणि टीकाकार दोघेही एकमत होतील. पण गमतीची गोष्ट म्हणजे- या जीवनपद्धतीने ज्या समस्यांच्या गर्तेत माणसाला लोटले आहे, त्या समस्यांची सोडवणूक करण्याचे, त्या समस्यांवर केले जाणारे उपाय सुद्धा; सत्ताकांक्षा आणि सुखलोलुपता अन सुखसाधनांची अखंड वाढ; या दोन गोष्टींवरच आधारित असतात. नव्हे- सत्ताकांक्षा आणि सुखलोलुपता अन सुखसाधनांची अखंड वाढ; याच दोन संदर्भात विचार करण्याचं आमच्या बुद्धीचं प्रचंड conditioning झालेलं आहे. अगदी प्रामाणिकातल्या प्रामाणिक व्यक्ती अन प्रयत्नसुद्धा याला अपवाद नाहीत. जे ही बाब समजू शकतात त्यातील ९० टक्केहून अधिक तूतू-मीमी मध्ये अडकलेले असतात. काही चांगला बदल खरंच घडून यायचा असेल तर या जगातील ७०० कोटी लोकांपैकी बहुसंख्य लोक विचारी अन सुजाण झाले पाहिजेत; हे लक्षात घेऊन त्यासाठी प्रयत्न करण्याची त्यांची तयारी नाही.

वर्तमान जगण्याच्या मूळ तत्वांना खूप आदर्श, आध्यात्मिक तत्वांचा मुलामा देण्याचे सुद्धा प्रयत्न होतात. हे अगदी सहज शक्य आहे. पण आध्यात्मिकता अथवा आदर्श ही आंतरिक प्रकृती आहे. चराचराला कवेत घेणे, चराचराशी एकरूप होणे, चराचराशी समत्वाचा व्यवहार, चराचराचं एकत्व; इत्यादी गोष्टी आंतरिक प्रकृतीशी संबंधित आहेत. बाह्य व्यवहारात विषमता, विविधता, अल्पता, वेगवेगळेपणा, आटोपशीरपणा; याच गोष्टी असू शकतात. आंतरिक प्रकृतीचा अखंड विस्तार आणि बाह्य व्यवहार छोट्या छोट्या मर्यादांमध्ये; हेच जीवनाचे सूत्र असू शकते.

शांतपणे विचार करणाऱ्यांसाठी फक्त एक संकेत- भारताच्या आर्थिक इतिहासाचे नवनवे अध्ययन आणि त्याचे निष्कर्ष आता समोर येत आहेत. त्यावर वेगळ्या भाष्याची गरज नाही. परंतु भारताच्या त्या वैभवकाळात - भारत राजकीय दृष्टीने अशांत होता, आजच्यासारखे केंद्रीभूत शिक्षण- संशोधन नव्हते, जातीव्यवस्था अतिशय भक्कम होती, संपन्नता असूनही सुरक्षेचे उपाय वाढवण्याची गरज तर पडत नव्हतीच उलट घरांना कुलूपे न घालण्याचे प्रयोग यशस्वी होत असत, सारे काही कोणाच्या तरी हातात घट्ट धरून ठेवण्याची पद्धती नव्हती, एकच एक सत्ताकेंद्र नसल्याने नियमांची विस्कळीतता होती. या सगळ्या गोष्टींचा विचारही व्हायला नको?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा