शुक्रवार, ९ जून, २०१७

अन्नदाता सुखी भव- १


देशभर सध्या शेतकरी गाजतो आहे. तूतू मीमी ला अंत नाही. समाज, त्याचे सारे व्यवहार, त्याचे विचार आणि विचारशक्ती सारेच राजकारणाच्या दावणीला बांधले गेल्याने सगळंच कठीण झालं आहे. त्यामुळे त्या संदर्भात काहीही न बोललेलेच बरे. मात्र हा विषय त्यापलीकडे जाणारा आहे, अन त्या पल्याडच्या गोष्टी बोलणे, लिहिणे आवश्यक आहे.
शेती अन शेतकरी यांची मूळ समस्या काय आहे? पैसा आणि प्रतिष्ठा या दोन मूळ समस्या आहेत. शेतकऱ्याजवळ पैसा नसणे, शेतीसाठी पैसा नसणे, सरकार वा अन्य यंत्रणा यांनी शेतीसाठी पुरेसा पैसा न देणे किंवा खर्च न करणे, उपलब्ध पैशाचा अयोग्य वापर; हे पैशाच्या समस्येचे रूप आहे. शेतकरी, शेती, शेतकरी कुटुंब, जमीन, माती, ग्रामीण जीवन, कष्ट याकडे अप्रतिष्ठा दृष्टीने, हिणकस दृष्टीने पाहणे; त्याची मस्करी करणे; त्याविषयी तुच्छता; हे प्रतिष्ठेच्या समस्येचे रूप आहे. शिवाय या दोन्ही समस्या परस्परात गुंतल्या आहेत आणि परस्परांशी निगडीत आहेत. या दोन्हीचा सखोल विचार आवश्यक आहे.
आज किती जण चार-आठ दिवस खेड्यात जाऊन राहतात? किती खासदार, आमदार गावातल्या घरी राहतात? मदत करणारे किती celebrity आठ दिवस गावात जाऊन राहतात? शेती वा शेतकऱ्यांवर बेंबीच्या देठापासून चर्चा करणारे मुद्रित वा दृकश्राव्य माध्यमातील किती लोक खेड्यात जाऊन राहू शकतील? पर्यटन म्हणून का होईना गावात मुक्कामाला जाणारे किती आहेत? गाव सोडून शहरात आलेले किती गावी जाण्यास इच्छुक आणि उत्सुक असतात? का ही अनास्था? खराब रस्ते, वीज, पाणी, स्वच्छतागृहे यांची समस्या, मोबाईल रेंज न मिळणे, शहराचा आकार- स्वरूप- सोयी- खाणेपिणे- सिनेमे- भाषा- बोलणेचालणे- यापासून थोडा वेळ सुद्धा दूर राहण्याची तयारी नसणे; ही काही कारणे. यातून मार्ग काय? गावी जाऊन राहायला सुरुवात करणे. सुरुवातीला त्रास होईलच. दहा, शंभर, हजार, काही हजार अशी संख्या वाढत गेली तर त्यातूनच आज गावखेड्यात असलेला सुविधांचा अभाव दूर होईल. फक्त अभाव दूर करा म्हणून किंवा ते दूर करण्यासाठीच्या इमारती, रचना, व्यवस्था उभ्या करून अभाव दूर होणार नाही. आधी लोकांनी गावाकडे जावे लागेल, तिथे राहावे लागेल. त्रास सोसावा लागेल. पायवाट कशी तयार होते? सुरुवातीला चालणाऱ्यांना त्रास सोसावाच लागतो. जेवढे अधिक लोक ही तयारी करतील तेवढा समस्या सुटण्याला हातभार लागेल. आजही पुष्कळ जण जातात, पण नव्हाळीचे भाकरी-भरीत, हुरडा आदी खाण्यासाठी; तिथून येताना पिशव्या भरून आणून; `त्यांनी येताना आग्रहाने हे दिले' म्हणून फुशारकी मारता यावी यासाठी जातात. मात्र गावात गेल्यानंतर जसा त्रास सहन करू तसेच आपल्या पदरात काही पाडून घेण्यापेक्षा त्यांच्या पदरात काही टाकण्यासाठी जाऊ, ही भावना घेऊन जायला हवे. तिथे जे काही मिळेल ते धान्य फळे, घरगुती तयार केले जाणारे पदार्थ, वस्तू इत्यादी; तिथे जाऊन, पुरेसे पैसे देऊन घेऊ हा विचार व्हावा लागेल. केवळ गावातून आणलेल्या मालाची शहरात फुशारकी मारणे किंवा गावातल्या लोकांवर आपल्या चकाचक गाडीची, भारी मोबाईल, कपडेलत्ते, पादत्राणे, बोलणेचालणे आदींची मोहिनी घालणे याहून वेगळा विचार करावा लागेल. गावी जाऊन राहण्यातून त्यांच्यापर्यंत स्नेह आणि पैसा पोहोचावा याची काळजी घ्यावी लागेल. आहे तयारी?
प्रतिष्ठेच्या प्रश्नाचा आणखीन एक महत्वाचा पैलू म्हणजे- शेती करण्याची, असलेली शेती सोडून न देण्याची मानसिकता तयार होणे. त्यासाठी पैसा आणि नियोजनबद्ध प्रयत्न हवेत. शहरांमध्ये मेट्रो, सिमेंट रस्ते, पाण्यावरील विमाने, बुलेट ट्रेन, मॉल्स इत्यादी उभारण्यापेक्षा त्या पैशातून तालुका स्थानी शीतगृहांची साखळी उभारणे, साठवणुकीची व्यवस्था उभारणे, शेतमालाच्या बाजारपेठा शहरात उभारण्यापेक्षा तालुक्याला उभारणे, तालुका केंद्र करून शाळा, महाविद्यालये, दवाखाने, इस्पितळे उभारणे ही दिशा धरावी लागेल. ग्राहकांच्या फुकट्या मानसिकतेला आवाहन करून ग्रामीण मालाला उठाव देण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा, ग्राहकाच्या सदसद्विवेकाला आवाहन करून तालुक्याच्या बाजारपेठेला जाण्याची त्याची मानसिकता तयार करावी लागेल. जाहिराती, प्रसार माध्यमे, मनोरंजन, प्रबोधनाचे अन्यान्य मार्ग यांचा वापर त्यासाठी आग्रहाने करावा लागेल. आहे तयारी?
याशिवाय पैशाचा प्रश्न महत्वाचा आहे. तो पुढील भागात.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ९ जून २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा