दर आषाढी कार्तिकीला येते तशीच आजही अरुण कोलटकर यांची `वामांगी' ही कविता वाचायला मिळाली. नेहमीच मनोरंजन आणि उथळपणा म्हणून त्याकडे पाहतो. आजही तसेच पाहिले. पण त्यासोबतच त्यावर मत मांडावे असेही वाटले.
कोलटकर यांची ही कविता आता भरपूर परिचित झालेली आहे. त्यामुळे कविता येथे देत नाही. ज्यांना ठाऊक नसेल त्यांना ती सहज उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे मूळ मुद्यावर येतो. पंढरपुरात विठ्ठलाच्या शेजारी रखुमाई नाही. त्यावर ही कविता. कोलटकर यांनी त्यांना वाटला तो अर्थ लावून स्त्रीवादाच्या अंगाने ही कविता लिहिली. पण म्हणून ते सत्य ठरते का? अशीच पुरुषवादी भूमिका घेऊन कविता लिहिता येईलच. ती विठ्ठलाची भूमिका म्हणून मांडता येऊ शकेल. हा सगळाच त्यामुळे पोरखेळ ठरतो. साहित्यिकाने स्वातंत्र्य किती आणि कशाचे घ्यायचे हा महत्वाचा मुद्दा आहे. आपले प्रश्न, आपली मते मांडताना शतकानुशतके ज्या गोष्टी घडत-बिघडत आल्या आहेत, त्यांचा आधार किती घ्यावा हा मूळ प्रश्न आहे. त्यातल्या त्यात देव, धर्म, रूढी, परंपरा, भावना यांना हात घालताना किमान तर्कबुद्धी तरी वापरायलाच हवी. या कवितेच्या संदर्भात ती किमान तर्कबुद्धी वापरायची म्हटले तर प्रश्न निर्माण होतो विठ्ठल-रुक्मिणी यांना खरेच अस्तित्व आहे का? असे कोणी आज वा कधीकाळी होते का? उत्तर स्पष्ट आहे- त्याबद्दल काहीही सांगता येत नाही. मग सांगता येत नाही तर त्यावर समग्र जीवनाच्या संदर्भात भाष्य का करायचे? तो प्रश्न भावनांचा, श्रद्धांचा म्हणून दूर ठेवायचा. आपली मते, आपले विचार, आपल्या समस्या मांडण्यासाठी त्यांना वेठीला धरण्याचे कारण नाही. ते काम अन्य प्रकारे होते आणि होऊ शकते. त्यामुळे अशा बाबतीत आक्रस्ताळेपणा करत विनाकारण श्रद्धाभंजन करत सुटणे चुकीचे ठरते. त्यामुळे ही कविता अयोग्य आणि चुकीची म्हणावी लागते.
दुसरा मुद्दा येतो, कवितेच्या आशयाचा. याबाबतीत असे म्हणता येईल की, देव, ईश्वर, धर्म इत्यादींची समज नसलेली ही कविता आहे. मुळात देव, धर्म, ईश्वर, आध्यात्म यांची बांधिलकी आणि श्रद्धा जपणारे सुद्धा याबाबत फारसा विचार करीत नाहीत. मग ज्यांना ते मान्य नाही किंवा त्याला विरोध करायचा आहे त्यांची गोष्टच वेगळी. अरुण कोलटकर असो किंवा `पिके' तयार करणारा अमीर खान असो; एकाच माळेचे मणी. ही दोन नावे फक्त उदाहरण म्हणून घेतली. परंतु असे अक्षरशः असंख्य आहेत. साहित्यिक, विचारवंत, लेखक, कलाकार, पत्रकार आणि प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे समाजमानस घडवणारे बहुतांश लोक या गोष्टींचा मुळातून, सखोल अभ्यास वगैरे करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. किमान असा अभ्यास करणाऱ्यांकडून थोडा सल्ला वगैरे घेण्याच्या भानगडीत पडत नाहीत. उलट आपले मत लादण्याचा प्रयत्न करतात. शेकडो वर्षे वारकरी, भागवत संप्रदाय, संत काय म्हणत आहेत याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. आम्ही म्हणतो तोच अर्थ खरा आहे असा दावा करणे हास्यास्पद ठरते. भारतीय तत्वज्ञान, देवदेवता कल्पना, प्रतिकांचे अर्थ, प्रतिकांचा विकास, या साऱ्याचा मानवी जगण्याशी संबंध यांचा सखोल विचार न करता अनेकदा लिहिले जाते. आजचे बहुसंख्य साहित्य हे impulsive साहित्य आहे. कोलटकर यांची ही कविताही तशीच आहे. अतिशय धाडसाने मी हेही म्हणेन की, पुराणे, कथाकहाण्या हे साहित्य देखील impulsive साहित्य आहे. मूळ भारतीय तत्वज्ञान, आध्यात्म, जीवनदृष्टी समजण्यासाठी उपनिषदे हाच संदर्भबिंदू आहे. लोकश्रुती किंवा अन्य साहित्य नाही. अलीकडच्या काळात यावर भाष्य करणारे विवेकानंद, योगी अरविंद असोत किंवा डॉ. राधाकृष्णन यांच्यासारखे विद्वान यांचे अध्ययन न करता, जीवन, जगणे इत्यादींचा गांभीर्याने विचार न करता लिहिले जाते. असे लिहावे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. त्यांनी असे लिहू नये म्हणून काही ते थांबणार नाहीत. मात्र एका गोष्टीवर आक्षेप घ्यावाच लागेल आणि आग्रहाने ती गोष्ट मांडावी लागेल की, impulsive लिहून ते सिद्धांत म्हणून प्रचारित करू नका.
कोलटकर किंवा त्यांच्या पद्धतीने लिहिणारे लोक ज्या विचारांना प्रमाण मानून लेखन करतात ते विचार आज केवळ भारतात नव्हे संपूर्ण जगात प्रश्नांकित झालेले आहेत. गेली काही शतके हे विचार आपल्या कानीकपाळी इतके ठसवले गेले आहेत की, आम्ही त्यांचा नीट विचार करूच शकत नाही. व्यक्तिवाद, इहवाद, विकास, स्वातंत्र्य, जीवन, जगणं, माणूस इत्यादींच्या संकल्पना, त्यामागील भावना, जगण्याच्या संदर्भातील या सगळ्याचे अनुभव हे सगळेच आज कोलमडून पडले आहेत. सगळ्या गोष्टींचा विचार तुकडे तुकडे करून, पृथकपणे करणे आणि सगळ्या गोष्टींचा विचार जोडत जोडत सलगपणे करणे असा मूळ विचारांचा फरक आहे. जोडत जाणे हा भारतीय विचार आणि भाव आहे. तो समजत नाही तोवर अनेक गोष्टी उलगडणे कठीणच. देव ईश्वर असा विषय असल्याने फक्त एक सिद्धांत म्हणून मांडतो. त्याचा विस्तार वाचकांवर सोपवतो. सिद्धांत- भारतीय आध्यात्मदृष्टी सुद्धा अखेरीस ईश्वर सोडून देते. भारतेतर इहवादी, लौकीकवादी दृष्टी तर ईश्वर टाकूनच देते. दोन्हीत ईश्वर संपून जातो. मात्र भारतीय दृष्टी सगळ्या लौकिक, अलौकिक, आध्यात्मिक बाबी सामावून घेत घेत जगण्याचं संपूर्णत्व प्रकट करते. त्यात ईश्वर संपणे याचा अर्थ ईश्वराचा विलय आहे. मात्र भारतेतर दृष्टी ईश्वराची तोडफोड करत, जगण्याची चिरफाड करत, तुकडे तुकडे करत, अखेरीस फक्त चिंध्या हाती ठेवते आणि जगणे हा वैफल्याचा उत्सव म्हणून साजरा करते. रखुमाईच्या प्रतिकातून कोलटकर यांनी मांडलेला विचार याला अपवाद नाही.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ४ जुलै २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा