मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

संघनेतृत्व

येत्या विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला ९२ वर्षे पूर्ण होतील. संपूर्ण समाजाचे नेतृत्व संघ करतो आहे की काय, असे वाटण्यासारखी स्थिती सध्या आहे. वास्तविक अजून ती अवस्था आलेली नाही. परंतु राष्ट्रजीवनाच्या सगळ्या पैलूंवर प्रभाव टाकीत, सगळे विषय, सगळ्या चर्चा आपल्या शक्तीने वळवण्याची स्थिती मात्र संघाने प्राप्त केलेली आहे. कोणताही मुद्दा संघाशिवाय अपूर्ण राहतो. संपूर्ण समाजाचे नेतृत्व करायचे ही संघाचीही आकांक्षा आहेच. ती संघाने लपवूनही ठेवलेली नाही. त्यात वावगेही काही नाही. संघाचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना एकदा एका नेत्याने विचारले होते- तुम्ही एकेक संस्था सुरु करता आहात. सगळ्या क्षेत्रात संस्था सुरु करण्याचा विचार आहे का? त्यावर गुरुजींनी स्पष्ट उत्तर दिले होते- `होय, आम्हाला राष्ट्रजीवनाच्या सगळ्या क्षेत्रांना, आमच्या विचाराने व व्यवहाराने प्रभावित करायचे आहे. संपूर्ण समाज आपल्या विचाराने भारून टाकण्यासाठी संघाने अनेक संस्था निर्माण केल्या, अनेक आंदोलने यशस्वीपणे राबवली, वेळोवेळी अनेक विषय चर्चेत आणले. ते लावून धरले. अर्थात संघ व संघ प्रभावातील संस्था हा एक स्वतंत्र विषय आहे. काही संस्था, संघटना संघाने पुढाकार घेऊन, योजना करून उभारल्या आहेत, तर काही संस्था, संघटना स्वयंसेवकांच्या स्वतंत्र पुढाकारातून आकारास आल्या आणि नंतर संघाने त्यामागे पाठबळ उभे केले. या सगळ्या संस्था, संघटना या संघाच्या frontal organizations मात्र नाहीत. संघ आणि संघ प्रेरित अन्य संघटना यांचा संबंध समजून घेणे थोडे किचकट आहे हे खरेच. त्यामुळेही असेल की, संघ या संस्था संघटना चालवीत नाही, संचालित करीत नाही, यावर पुष्कळांचा विश्वास नसतो. परंतु प्रत्यक्ष संघात वा या संघटनांमध्ये काम केल्याशिवाय या संबंधांचा नीट उलगडा होणे कठीण आहे. अगदी अनेक स्वयंसेवकांना आणि विविध संस्था संघटनांची कामे करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनाही याचं आकलन नसल्याचं कधीकधी आढळून येतं. त्यातून कधीकधी समाजात किंवा संघटनेत गोंधळ निर्माण होतो. या संघटनांच्या द्वारे संपूर्ण समाजाचे नेतृत्व संघ कसे करणार? काय आहे संघाची कल्पना? हे समजून घ्यायचे असेल तर मूळ रा. स्व. संघाचे नेतृत्व समजून घेतले पाहिजे.
`एकचालकानुवर्तीत्व' या एका शब्दाने बरेचदा घोळ होतो. त्यामुळे सरसंघचालक सांगतात आणि सगळे त्यानुसार वागतात, काम करतात असा अर्थ काढला जातो. त्यांच्या संमतीशिवाय काहीही होऊ शकत नाही. प्रत्येक बारीकसारीक गोष्ट तेच सांगतात आणि बाकीचे त्यानुसार वागतात. कोणालाही विचाराचे, आचाराचे स्वातंत्र्य नाही, अशी काहीशी समजूत दिसून येते. ती पूर्णत: चुकीची आहे. वास्तविक `एकचालकानुवर्तीत्व' ही कल्पनाच सामूहिक विचारविनिमयातून पुढे आली आहे. संघाचे कार्य वाढू लागले तेव्हा त्याची नीट बांधणी करण्यासाठी ९ आणि १० नोव्हेंबर १९२९ रोजी नागपूरला डोके यांच्या मठात वेगवेगळ्या ठिकाणचे संघचालक आणि काही प्रमुख कार्यकर्ते यांची एक बैठक झाली. या बैठकीत विश्वनाथराव केळकर, बाळाजी हुद्दार, आप्पाजी जोशी, कृष्णराव मोहरील, तात्याजी काळीकर, बापूराव मुठाळ, बाबासाहेब कोलते, चांद्याचे देवईकर व मार्तंडराव जोग सहभागी झाले होते. अर्थात डॉ. हेडगेवारही या बैठकीला होतेच. या बैठकीत `एकचालकानुवर्ती' असे संघटनेचे स्वरूप निश्चित करण्यात आले. त्याबाबत डॉक्टर हेडगेवार यांचे चरित्रकार ना. ह. पालकर लिहितात- `सर्वांनी मनमोकळी चर्चा करून, देशाची सध्याची परिस्थिती व लोकांची मनस्थिती ध्यानी घेतली व अनुशासनाच्या दृष्टीने संघटनेचे स्वरूप `एकचालकानुवर्ती' ठेवण्याचे निश्चित केले.' एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, डॉ. हेडगेवार तोपर्यंत संघाचे पदाधिकारी सुद्धा नव्हते. बैठकीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १० नोव्हेंबर १९२९ रोजी संध्याकाळच्या शाखेत वर्धेचे आप्पाजी जोशी यांनी डॉ. हेडगेवार यांची सरसंघचालक म्हणून निवड झाल्याचे घोषित केले. तोवर, म्हणजे संघ स्थापनेनंतर तब्बल चार वर्षे संघाला सरसंघचालक नव्हतेच. संघ कोणाही चालकाविनाच, स्थानिक चालकांच्या कष्टाने आणि सामूहिक विचारविनिमयाने वाढत होता.
`एकचालकानुवर्तीत्व' ही कल्पनाच सामूहिक चिंतनातून पुढे आली आहे. त्यामुळे त्यात एकाधिकारशाहीचा भाव कणभरदेखील नाही. एवढेच नाही तर, सरसंघचालक म्हणून डॉक्टर हेडगेवार यांच्या नावाची घोषणा झाली त्या कार्यक्रमातही त्यांचे भाषण झालेच नाही. `एकचालकानुवर्तीत्व' ही कल्पना स्पष्ट करणारे विश्वनाथराव केळकर यांचे भाषण झाले. खुद्द डॉ. हेडगेवार यांनी याबद्दल थोडी नाराजी व्यक्त केली होती. परंतु कार्याच्या सोयीसाठी व वाढीसाठी हा निर्णय स्वीकारण्यात आला. त्यावेळी असलेले परकीय शासन; संघटनेचे बाल्यरूप; व्यवस्थांचा, विचारांचा होऊ घातलेला विकास; सामाजिक स्थिती अशा विविध कारणांनी `एकचालकानुवर्तीत्व' स्वीकारण्यात आले. मात्र, संघाची काम करण्याची, निर्णय घेण्याची पद्धत सामूहिक अशीच राहिली. संघाचा पहिल्या दिवसापासूनचा इतिहास याचा साक्षीदार आहे. अर्थात डॉ. हेडगेवार यांचे मत अंतिम राहत असे हेही खरे. परंतु जसजसा संघाचा विस्तार झाला, देशभर संघ पसरला, मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपलब्ध झाले, कार्यकर्त्यांची संघजाणीव प्रगल्भ होऊ लागली, मोठाल्या जबाबदाऱ्या लीलया पार पाडणारे कार्यकर्ते उभे राहू लागले, व्यवस्था आणि विचारांचा विकास झाला; तसतशी `एकचालकानुवर्तीत्व' ही कल्पना मागे पडत गेली. तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी तर स्पष्ट भूमिका मांडली की, आता संघाचे स्वरूप `एकचालकानुवर्ती' असे नाही. काही दशकांपूर्वी संघ शिक्षा वर्गांच्या बौद्धिक वर्गातून सुद्धा हा विषय वगळण्यात आला आहे. आणीबाणीच्या काळात तेव्हाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस म्हणाले होते- `एक सरसंघचालक कारागृहात आहे, पण पाच सरसंघचालक बाहेर आहेत.' संघनेतृत्व काय चीज आहे हे सांगायला हे एक वाक्यही पुरेसे आहे. संघाचे `एकचालकानुवर्ती' असे स्वरूप आणि नंतर त्यातून संघाने स्वत:ला मुक्त करवून घेणे, हे कोणाच्या सल्ल्याने वा टीकाटिप्पणीने झालेले नाही. संघाच्या स्वाभाविक विकासाच्या त्या अवस्था आहेत एवढेच.
मात्र सामूहिक नेतृत्व एवढे म्हटल्याने संघ नेतृत्वाचे आकलन होऊ शकत नाही. त्यासाठी रचना, गुणात्मकता आणि वैशिष्ट्ये यांचा विचार क्रमप्राप्त ठरतो. आज समाजात प्रचलित असलेल्या नेतृत्व कल्पनेत संघनेतृत्व कुठेच बसत नाही. तरीही समाजात प्रचलित नेतृत्वापेक्षा ते कितीतरी सरस आहे. बहुस्तरीय नेतृत्व हे संघाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. अगदी शाखा स्तरापासून अखिल भारतीय स्तरापर्यंत नेतृत्व विकसित होत असतं. असे असंख्य नेते आपापल्या ठिकाणी नेतृत्व करीत असतात. जसे एखाद्या शाखेचा मुख्य शिक्षक वा कार्यवाह त्या ठिकाणी संघाचा नेता असतो. त्या भागातील नागरिक सुद्धा संघ म्हणजे त्या शाखेचा मुख्य शिक्षक वा कार्यवाह असेच समजत असतात. शाखेचे कार्यक्रम, रचना, व्यवस्था, नियोजन हे सगळे स्थानिक मुख्य शिक्षक वा कार्यवाह ठरवतात. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना आदेश लागत नाहीत आणि असे आदेश दिलेही जात नाहीत. इतकेच नाही तर शाखा क्षेत्रापेक्षा मोठ्या क्षेत्रातील कार्यक्रमांची सुद्धा सूचना असते. तो कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी काय करता येईल हे स्थानिक कार्यकर्तेच ठरवतात. कार्यकर्ते वा पदाधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातील नेते असतात. तेथील निर्णय त्यांनीच घ्यायचे असतात. हे निर्णय संघाच्या ध्येयधोरणांना, सिद्धांतांना, विचारांना, रीतीनितीला छेद देणारे नसावेत एवढेच अपेक्षित असते. बाकी पूर्ण स्वातंत्र्य.
एक व्यक्तिगत प्रसंग आठवतो. मी एका शाखेचा मुख्य शिक्षक होतो. आमच्या शाखेत सरसंघचालक बाळासाहेब देवरस येणार होते. सगळी तयारी जय्यत झाली होती. शाखेची वेळ होत आली तसे आभाळ भरून येऊ लागले. अधिकाऱ्यांनी ठरवले की, शाखा ठरल्याप्रमाणे लागेल पण ध्वज जवळ राहणाऱ्या स्वयंसेवकाच्या घरी उभारावा. त्यानुसार शाखा लागली. थोड्या वेळाने बाळासाहेब आले. सगळ्यांना दक्ष होण्याचा संकेत शिटीने देण्यात आला. मोटारीतून उतरून बाळासाहेबांनी पाहिले तर ध्वज मैदानावर नव्हता. त्यांना तसे सांगितले आणि पुढची शाखा पार पडली. शाखेनंतर कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली तेव्हा बाळासाहेबांनी विचारले ध्वज त्या घरी का होता? त्यावर अधिकाऱ्यांनी त्यांना सगळी माहिती दिली. तेव्हा ते म्हणाले- `छान. असेच असले पाहिजे. कार्यकर्त्यांनी सगळा विचार करून स्वत: निर्णय घ्यायला हवे. प्रत्येक गोष्टीसाठी कोणाच्या आदेशाची वाट पाहू नये.'
आणखीन एक आठवण सांगता येईल. नागपूरचे ज्येष्ठ संघचालक दिवंगत बापूराव वऱ्हाडपांडे यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन होते. त्यावेळी केलेल्या भाषणात विद्यमान सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी स्वत:च ही आठवण सांगितली होती. मा. मोहनजी त्यावेळी नुकतेच नागपूरला प्रचारक म्हणून आले होते. संघचालक बापूराव वऱ्हाडपांडे यांना भेटायला गेले. त्यावेळी बापुरावांनी काही सूचना केल्या. त्यात एक सूचना होती- केंद्रीय कार्यालयाच्या व्यवस्थेत तू अजिबात लक्ष घालायचे नाही. मा. मोहनजी प्रांत प्रचारक म्हणून आले होते. केंद्रीय कार्यालयात त्यांचा निवास होता आणि सगळ्या प्रांताच्या कामाची जबाबदारी त्यांच्यावर होती. पण बापुरावांनी ही सूचना केली आणि अर्थात त्याप्रमाणेच काम होत राहिले. संघात नेतृत्व कसे असते याची चर्चा करतानाच मा. मोहनजींनी ही आठवण सांगितली होती. आणखीनही एक उल्लेख केला होता. त्या प्रकाशन कार्यक्रमात मा. रामभाऊ बोंडाळे हे ज्येष्ठ वयोवृद्ध प्रचारक देखील उपस्थित होते. त्यांचा उल्लेख करून मा. मोहनजी म्हणाले- `रामभाऊ माझे शाखेतील पहिले शिक्षक होते. त्यांनीच दक्ष आरम पासून अनेक गोष्टी शिकवल्या, पण आज ते समोर बसले आहेत आणि मी सरसंघचालक म्हणून भाषण देतो आहे. सिनियर ज्युनियर वगैरे प्रकार संघात नसतो.' संघ समजून घेणे हे किती किचकट काम आहे हे यावरून लक्षात येईल. थोडक्यात म्हणजे, संघ नेतृत्व बहुस्तरीय आहे आणि त्या त्या स्तरावर स्वतंत्रपणे काम करीत असते. संघाचा विचार आणि रीतीनिती या चौकटीत राहावे एवढीच अपेक्षा असते.
संघटना आणि कार्यक्रमांची गरज या दोन गोष्टी वगळता; सामान्य स्वयंसेवक, कार्यकर्ता, अधिकारी यांच्यात फरक वा भेदभाव नसणे ही संघ नेतृत्वाची विशेषता आहे. कार्यक्रमात ज्येष्ठ अधिकारी मंचावर बसतील आणि बाकीचे समोर रांगांमध्ये. हा फरक व्यवस्था म्हणून राहीलच. पण सर्वोच्च अधिकारी सुद्धा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत उपस्थित राहतात. अपेक्षित वेशात आणि निर्धारित वेळेत उपस्थित राहतात. मध्येच निघून गेले असे नसते. अधिकारी आहेत, नेते आहेत. गेले मध्येच निघून तर काय होते किंवा आले उशिरा तर काय हेते, असे नाही. दिल्या जाणाऱ्या आज्ञा वा सूचना व्यवस्थेचा भाग असतो आणि स्वयंसेवक आणि अधिकारी सारख्याच रीतीने त्या आज्ञा पाळतात. मुख्य शिक्षकाने दक्ष आज्ञा दिल्यानंतर स्वयंसेवकांसोबत सरसंघचालक देखील दक्ष करतात. भोजनात सगळ्यांसाठी भोजन सारखेच असते. भोजनमंत्र होण्यापूर्वीच अधिकारीही बसलेले असतात आणि भोजन मंत्र झाल्याशिवाय तेही जेवायला सुरुवात करीत नाहीत. अन्य एखाद्या स्वयंसेवकाचा, अधिकाऱ्याचा बौद्धिक वर्ग आहे आणि सरसंघचालक तो पूर्ण ऐकतात. त्या कार्यक्रमात ते एक शब्दही बोलत नाहीत. पूर्ण वेळ उपस्थित राहून फक्त ऐकतात. संघ सोडून हे कुठे होत असेल? आल्यानंतर बोलल्याशिवाय राहायचे नाही किंवा यायचेच नाही, हीच सामान्य प्रचलित रीत. एखाद्या वेळी, एखाद्या प्रसंगी, दाखवण्यापुरता समत्वाचा व्यवहार आणि नियमितपणे स्वभाव आणि पद्धत म्हणून सहजतेने असा व्यवहार; हा संघनेतृत्व आणि समाजात प्रचलित नेतृत्व यातील मोठा फरक आहे.
संघ नेतृत्वाचे एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य म्हणजे येथे नेते फिरत असतात. अगदी सर्वोच्च नेतृत्वापासून स्थानिक मुख्य शिक्षक कार्यवाह पर्यंत सगळे लहानमोठे नेते फिरत असतात. स्वयंसेवकांकडे, हितचिंतकांकडे, अन्य लोकांकडे नेते स्वत: जातात. अन्यत्र नेते स्थिर असतात एका जागी आणि लोक, अनुयायी त्यांना भेटायला जातात. संघात त्याच्या अगदी उलट आहे. सगळे अखिल भारतीय अधिकारी सुद्धा सतत सर्वत्र फिरत असतात. निरनिराळे उत्सव, शिबिरे, मेळावे, कार्यक्रम; इतकेच नव्हे तर शाखांना भेटी, परिचय यासाठीही नेते फिरत असतात. स्वत:हून लोकांकडे जाणे, परिचय करून घेणे, परिचय करून देणे, विचारपूस अशा असंख्य गोष्टींसाठी भ्रमंती सुरु असते. अन हे सारे वर्षानुवर्षे. तेही अगदी संघाच्या स्थापनेपासून. आता साधनांची उपलब्धता आहे हा भाग वेगळा, पण डॉक्टर हेडगेवार यांच्या काळात सुद्धा हे फिरणे होते. स्वत: डॉ. हेडगेवार अखंड प्रवास करीत असत. साधनांची कमतरता असूनही. एकदा लाहोरला हिंदू युवकांच्या मेळाव्यासाठी जाताना अर्थाभावाचा त्रास त्यांना कसा झाला याचे वर्णन त्यांच्या चरित्रात आहे. तरीही प्रवास चालत असेच. संघाच्या सुरुवातीच्या काळात अधिकारांचे वर्गीकरण, पदे फार नव्हतं. त्यामुळे बाबासाहेब आपटे असोत की दादाराव परमार्थ; यांच्याकडे निश्चित जबाबदारी नसतानाही संघाच्या कामासाठी प्रवास करीत असत. संघनेत्यांचे हे फिरणे म्हणजे फक्त शाखा, कार्यक्रम, भाषणे एवढेच नसते. लग्नमौंजीसारखे असंख्य कार्यक्रम, मृत्युसारख्या दु:खद घटना, अपघात, आजारपणे अशासारख्या निमित्तानेही सामान्य साध्या स्वयंसेवकापासून मोठ्या लोकांच्या घरी सुद्धा संघाचे नेते सातत्याने जात असतात. सरसंघचालक वा सरकार्यवाह एखाद्या लग्नाला वा मृत्यूप्रसंगी जातात तेव्हा काही विशेष व्यवस्था वा वागणूक नसते. जसे एखादी घरची व्यक्ती वा आप्त यावे तसेच असते. बोलण्याचे, विचारपूस करण्याचे विषय सुद्धा संबंधितच असतात.
रोज प्रवास, वेगवेगळ्या ठिकाणी राहणे, वेगवेगळ्या अनेक लोकांना भेटणे, वेगवेगळे जलवायू, वेगवेगळे खाणेपिणे; याची सामान्य माणूस कल्पनाही करू शकत नाही. अन शेकडो संघनेते हे सातत्याने करीत असतात. मधुमेह असणारा एखादा अखिल भारतीय स्तराचा कार्यकर्ता सुद्धा ईशान्य भारतात १५-१५ दिवस प्रवास करतो आणि मधुमेह असूनही फक्त भात खाऊन राहतो. कारण तेथील जेवण भात हेच असते. हे सारे या २०१७ मध्ये. १९२५ पासूनच्या संघ प्रवासात या नेत्यांनी किती अन कशा अडचणी आणि त्रास सोसले असतील याची कल्पनाच केलेली बरी. शिवाय आपला प्रांत सोडून दुसऱ्या प्रांतात संघकार्यासाठी जाणाऱ्या कार्यकर्त्यांची गोष्टच वेगळी. भाषा शिकण्यापासून सारे काही आत्मसात करीत ते तिथलेच होऊन जातात. दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी ज्यांच्या जन्मशताब्दीचे उद्घाटन केले ते दिवंगत लक्ष्मणराव इनामदार हे अशांपैकीच एक. या नेतृत्वात प्रचारक आणि गृहस्थ असे दोन प्रकार. त्यातील प्रचारक हा अविवाहित राहून, स्वत: नोकरी व्यवसाय असे काहीही न करता संपूर्ण वेळ संघाच्या कामासाठी देतो, तर गृहस्थ कार्यकर्ते स्वत:चा संसार, नोकरी व्यवसाय, कुटुंब हे सगळे करून प्रवास इत्यादी करीत असतात. कित्येकांचे शनिवार-रविवार संघकार्यातच कामी आले आहेत, येत आहेत. नेतृत्वाचं एक विलक्षण जाळं संघाने विकसित केलं आहे.
हे सारं करीत असतानाही विविध विषयांचं वाचन, अध्ययन हेही सुरु असतं. समाजात अभ्यासू, विचारवंत म्हणून काहीही ओळख नसणारा एखादा कार्यकर्ता जेव्हा प्रत्यक्षात भेटतो, त्याला ऐकण्याची वा त्याच्याशी बोलण्याची संधी मिळते तेव्हा कळतं की, त्याच्याजवळ माहितीचं, ज्ञानाचं, चिंतनाचं मोठं भांडार आहे. ते सारं तो सतत वाटत असतो. फुकट. ना पैसा, ना पदप्रतिष्ठा, ना नावलौकिक. `शहाणे करून सोडावे सकळ जन' एवढेच. अनेकदा तर कोणी सांगितल्या शिवाय कळतदेखील नाही की, ज्या व्यक्तीशी आपण बोललो वा भेटलो ती अमुक अमुक आहे. या अमुक मध्ये मोठे पद, शिक्षण, हुद्दा, कर्तृत्व असे काहीही असू शकते. गेल्या ९२ वर्षात अशा प्रकारे काम केलेल्या शेकडो कार्यकर्त्यांची यादी देता येईल आणि आज असे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचीही शेकडो नावांची यादी देता येईल. हे जसे प्रत्यक्ष रा. स्व. संघात आहे तसेच साधारणपणे संघप्रेरित सगळ्या संस्थात आहे. उदाहरण म्हणून- योगेंद्रजी हे नाव सांगितले तर, कोण हे? असा स्वाभाविक प्रश्न येईल. परंतु या वयोवृद्ध तपस्व्याला देशाच्या सगळ्या भागात (अक्षरश: सगळ्या जिल्ह्यात) लाखो लोक प्रत्यक्ष ओळखतात, एवढेच नाही तर त्यांच्याविषयी निरतिशय आदर आणि प्रेम या लाखो लोकांना आहे. हजारो लोकांना कामाला लावण्याचे श्रेय या माणसाचे आहे, हे सांगूनही खरे वाटणार नाही.
अनेक पदरी, अनेक स्तरीय असं हे नेतृत्वजाळं संघाने विणलेलं आहे. सातत्य, साधेपणा, समत्वभाव, सहजता आणि समर्पण हे या नेतृत्वाचं वर्णन. ९२ वर्षे अखंडपणे संघाला असं नेतृत्व लाभतं आहे हा ईश्वरी प्रसाद आहे. सध्या हे नेतृत्व संघटनात्मक स्तरावर ठळक स्वरुपात आहे. वैचारिक स्वरुपात कमी आहे. मात्र येणाऱ्या काळात ज्यावेळी वैचारिक आणि भावनिक स्तरावर हे नेतृत्व व्यापक आणि सशक्त होईल त्यावेळी समाजावरील त्याचा प्रभाव कल्पनातीत असेल. मुख्य म्हणजे वर्तमान नेतृत्व कल्पनेला पूर्णतः मोडीत काढणारा तो प्रभाव असेल.
- श्रीपाद कोठे
नागपूर
रविवार, २४ सप्टेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा