सोमवार, २६ मार्च, २०१८

खारुताई...

खारुताई... तू काल व्यक्त केलेल्या भावना पोहोचल्या. छान वाटलं गं. असं मनमोकळं बोललं की छान वाटतं. माणसाला काय अन देवाला काय. अन तुला म्हणून सांगतो- माणसं मोकळ्या मनाने न बोलता लपवाछपवी करतात ना आपसात, तशीच ती लपवाछपवी करतात देवांशीही. जाऊ दे. कोणी कसं वागावं हे काय कोणाच्या हाती असतं होय? ते अगदी देवांच्याही हाती नसतं बघ. तुला गंमत वाटेल माझं म्हणणं वाचून, पण असतं मात्र तसंच. आता हेच बघ ना- काल तू म्हणालीस, `माझं खारपण अक्षय राहो'. चांगलं अन योग्यच आहे गं तुझं मागणं. हळवं सुद्धा. अन प्रेरक सुद्धा म्हणता येईल. पण मी जर असं मागणं मागितलं की बाबा- `माझं रामपण अक्षय राहो'; तर सगळ्यांना नाही गं आवडणार ते. लोक म्हणतील- आला मोठा राम. लागून गेला मोठा. देव झाला म्हणून काय झालं? मोठेपणा चढला याच्या डोक्यात, असं म्हणतील. अन मला हे देवपण टाकून देऊन खार व्हावंसं वाटलं तर? ऐकणार आहे का कुणी माझं? बरं दुसरंही आहेच ना... १०० योजने जाऊ शकणारा हनुमंतही लागतोच ना गं... शिवाय कोणी सुषेण, कोणी रागे भरणारा पण पाठ राखणारा लक्ष्मण, नल नील जांबुवंत अंगद हेही हवेतच ना? नुसत्या वाळूने बांधता आला असता का समुद्रावर पूल... आणि सांगू का हवा असतो रावणही- माझं रामपण, अन तुझं खारपण सिद्ध व्हायला. हे काहीच नसतं आपल्या हाती... ना तुझ्या ना माझ्या... आपण फक्त एवढंच करायचं- चालत राहायचं... मनातून काढून टाकायचं लहानमोठेपण... सोडून द्यायचे हट्ट लहान वा मोठे होण्याचे किंवा कसलेही... कोणास ठाऊक- कालचक्राच्या फेऱ्यात कधीतरी; तू होशील राम आणि मी होईन खार... होईलच असेही नाही, नाहीच होणार असेही नाही... कोणाला ठाऊक? गणितं मांडण्याची खोड टाकून देण्याचा प्रयत्न, एवढंच ठेवलंय त्या नियतीने आपल्या हाती... हो, आपल्या हाती- तुझ्या नि माझ्याही... नियती म्हणजे पराभव नाही, नियती म्हणजे कर्मशून्यता नाही, नियती म्हणजे संपून जाणे नाही... प्रगल्भ ज्ञानाच्या अत्युच्च विनयशीलतेला मानवी हुंकाराने बहाल केलेला शब्दालंकार आहे `नियती'... म्हणून सोडून द्यावे स्वत:ला त्या अगम्य चिरंतन प्रवाहावर... ठेवू नये कुठलीच अभिलाषा `रामपणाची' किंवा `खारपणाची' किंवा याची वा त्याची... वाहत राहावे प्रवाहासोबत... अन अंतरी निर्माण होणाऱ्या प्रत्येक उर्मीनुसार कृती करताना फक्त म्हणत राहावे- तत्त्वमसी तत्त्वमसी तत्त्वमसी...
- श्रीपाद कोठे
सोमवार
२६ मार्च, २०१८

शनिवार, २४ मार्च, २०१८

`खारपण'


ठाऊक आहे मला मी खार आहे. ना शक्ती, ना युक्ती, ना शिक्षण. पण मला ठाऊक आहे मी खार आहे आणि मला कळतं - रामकार्य कोणतं ते. मला रामकार्यच करायचं आहे हेही कळतं. मी ना सैनिक सुग्रीवाचा, ना सदस्य रामसैन्याचा. मी खार आहे अन खारीसारखंच काम करते. तसंच करू शकते. तुमच्या मोठाल्या गोष्टी तुमच्या तुम्ही पाहा, तुमची मोठाली कामे तुमची तुम्ही पाहा. मला नाही ठाऊक तुमचा राम अन मला ठाऊक करूनही घ्यायचा नाही. कसे नाही ठाऊक... पण मला फक्त रामकार्य ठाऊक आहे अन ते खारीच्या शक्तीने, खारीच्या पद्धतीने करणे ठाऊक आहे. वाळूचे चार कण उचलण्याची फक्त माझी शक्ती. ट्रकभर वाळू का नाही उचलता येत याची तक्रारही नाही, खंतही नाही अन मागणेही नाही. किनाऱ्यावर ये जा करता करता होणाऱ्या त्रासाचीही तक्रार नाही. होत असतील वादावादी, होत असेल बाचाबाची त्या वानरांशी... होत असेल तर होत असेल. मला काय त्याचे? कामात खंड पडू नये, बास. कसली भीती नाही, कसली क्षिती नाही. कोणी कोणी म्हणतात- जिवंत असेपर्यंत काम करत राहावं. तेही मनात नसू दे. कारण मला काय ठाऊक जिवंत म्हणजे काय, मरण म्हणजे काय, जन्म म्हणजे काय? अन कशाला शीण हवा. अन हो, आधी होऊन गेलीय म्हणतात एक खार. आलंय कानावर. म्हणून हे द्वाड मन आठवतं- त्या रामाची बोटे तिच्या पाठीवर उमटलेली. ती आठवण तेवढी काढून टाक. त्या खारीला कुठे ठाऊक होतं राम जवळ घेणार आहे आपल्याला. अन तिची इच्छा तरी कुठे होती तशी काही? तशी इच्छा असती तर ती खार राहिलीच नसती. ती झाली असती कोणी तरी दुसरी काही. बस... मी खार आहे अन मला राहू दे तशीच खार... `मी खार आहे, चार वाळूचे कण उचलण्याची माझी शक्ती आहे, अन रामकार्यासाठीच मला चार चार कण उचलत राहायचे आहेत' एवढं आणि एवढंच कळणारी. याहून अधिक काहीही देऊ नकोस, काहीही कळू देऊ नकोस... माझं `खारपण' अक्षय राहो... माझं `खारपण' अक्षय राहो... माझं `खारपण' अक्षय राहो...
- श्रीपाद कोठे
रविवार
२५ मार्च, २०१८

शुक्रवार, ९ मार्च, २०१८

'अब तेरा दर्द नासुर नहीं रहेगा'


काल रात्री 'बेगम जान' पाहिला. जागतिक महिला दिनानिमित्त 'स्टार गोल्ड'ने दाखवला. भारत-पाक फाळणीच्या पार्श्वभूमीवर सीमेवरील बेगम जानच्या कोठ्याची ही कहाणी. दोन देशांना अलग करणारी Radcliff रेषा या कोठ्यातून जाते. तिथे निरीक्षण चौकी होणार असते. त्यासाठी ही जागा रिकामी करायला सांगण्यात येते. स्वाभाविकच बेगम जान, तिथल्या मुली, जानने तिथे आणलेली एक वृध्द स्त्री या सगळ्यांचा जागा सोडायला विरोध. त्यातून प्रशासनाशी निर्माण होणारा संघर्ष. या संघर्षासाठी केली जाणारी तयारी. त्या संघर्षात बेगम जान व अन्य मुलींना येणारे अपयश. अखेर गुंडांना हाताशी धरून जागा रिकामी करण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नात आगीच्या भक्ष्यस्थानी पडणारा कोठा. सरतेशेवटी पद्मिनीच्या कथेच्या निरुपणासोबत बेगम जान आणि तिच्या साथीदार महिलांनी त्याच जळत्या कोठ्यात दिलेली स्वतःची आहुती. साधारण चित्रपट हा असा.
सर्वसाधारणपणे आपण कथा पाहतो. त्यामुळे शरीरविक्री करणाऱ्या महिलांच्या एका कोठ्याची शोकांतिका, असाच अर्थ मनात उतरतो, उरतो. पण सामान्य कथेच्या पलीकडे जीवनदर्शन म्हणून जेव्हा कलाकृतीकडे पाहिले जाते तेव्हा त्याचे वेगवेगळे पदर, कोन दिसतात, जाणवतात. मला ते तसे जाणवले. म्हणूनच बेगम जानच्या जौहारासोबतच त्यांना वेळोवेळी मदत करणारे, देश स्वतंत्र झाला तेव्हा कोठ्यावर दिवाळी साजरी करणारे मास्टरजी आणि कोठ्याचे रक्षण करणारा, सगळ्या महिलांना बंदूक चालवायला शिकवणारा रखवालदार; या दोघांचे चित्रपटात फोकस न झालेले बलिदान देखील मनात घर करून जाते.
प्रत्यक्ष संघर्ष सुरू होण्यापूर्वी तयार केलेल्या पार्श्वभूमीतील एक प्रसंगही असाच जीवनदर्शन घडवणारा. एक मुलगी कोठ्यावर आणलेली. तिचा पहिलाच दिवस. पूर्ण शून्य झालेली ती मुलगी बेगमच्या खाटेजवळ बसलेली. दगड झालेल्या त्या मुलीला ती घेऊन जायला सांगते. अन चार पावले पुढे गेलेल्या तिला परत आणायला सांगते. परत आल्यावर तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत ती विचारते 'बहुत दर्द हो रहा क्या मेरे बच्चे?' अन ती समजावते आहे असं वाटत असतानाच बेगम एक सणसणीत तिच्या कानाखाली ठेवून देते. या प्रकाराने भांबावलेली ती मुलगी प्रचंड आक्रोश करते. तेव्हा बेगम तिला घेऊन जायला सांगते आणि म्हणते - 'अब तेरा दर्द नासुर नहीं रहेगा. अब तू जीएगी.' एक प्रचंड जीवनसत्य. वेदनेला आवाज मिळाला की जगण्याचा मार्ग प्रशस्त होतो. मुकी वेदना जीवन संपवून टाकते. म्हणूनच वेदनेला स्वर लाभलेली ती मुलगी अंतिम संघर्षाच्या वेळी तिच्या भावना व्यक्त करताना म्हणते - 'ये तो हमरा घर है. घर पे जितनी स्वतंत्रता नहीं थी उतनी यहां मिली.'
कोणासाठी कोठा हेच घर होऊन जातं तर कोणासाठी घर वा हे जगच कोठा होऊन जातं. आजच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सशर्त इच्छामरणावरील निकालात हेच तत्व मान्य करण्यात आले आहे. परिस्थिती कोणावरही येऊ शकते. परिस्थिती स्त्री, पुरुष, बालक, गरीब, श्रीमंत, अमुक तमुक भाषाभाषी, लहान मोठे असा कोणताही भेद करीत नाही. परिस्थितीची कारणेही खूप वेगवेगळी असू शकतात. अनेकदा कारणांचे आकलन होतेच असेही नाही. जीवन हे कोणासाठी अन कशामुळे स्वर्ग वा नरक होईल, घर वा कोठा होईल सांगता येत नाही. ज्योतिष विषयाचा थोडाफार व्यासंग ज्यांचा असेल त्यांना हे लवकर लक्षात येईल. ज्योतिषाचा जो भाव पक्ष आहे (बारा घरे, त्यांचे भाव, त्या घरांमध्ये असणारे ग्रह, त्यांचा अर्थ) तो या दृष्टीने लक्षणीय आहे. बाकी तर असो पण आई वडील आणि मुले यांचं नातं सुद्धा शत्रुत्व पूर्ण करण्यासाठी असू शकतं, इतक्या धीटपणे ज्योतिष शास्त्र जीवनाचं प्रतिपादन करतं. आपल्या मनावरची, बुद्धीवरची झापडं बाजूला करून निरपेक्ष जीवन समजून घेणं जीवनाला समृद्ध करीत असतं. चांगलं, वाईट वगैरे खूप सापेक्ष असतं. जीवनाचं सोलीव दर्शन महत्वाचं. बेगम जान मध्ये मला ते जाणवलं. म्हणूनच तो केवळ शरीरविक्री करणाऱ्या महिलांचा किंबहुना महिलांचा शोकार्त चित्रपट न वाटता जीवनदर्शन घडवणारा चित्रपट वाटला.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ९ मार्च २०१८

गुरुवार, ८ मार्च, २०१८

सारस्वतांपुढील आव्हान

(डॉ. राजन जयस्वाल यांच्यावरील नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या गौरव ग्रंथासाठी लिहिलेला व त्यात समाविष्ट लेख.)

साहित्य-संस्कृती हे शब्द जोड शब्दासारखेच पुष्कळदा वापरले जातात. त्यातील साहित्य या शब्दाचा काही ना काही बोध तर सगळ्यांना होतो. कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन, प्रवासवर्णन, समीक्षा, वैचारिक लिखाण, निबंध, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन; अशा विविध प्रकारांनी साहित्याचा कमीअधिक परिचय माणसाला असतो. साहित्य दाखवता येतं, सांगता येतं, त्याचं वर्णन सहजतेने करता येतं. `संस्कृती' या शब्दाचे मात्र तसे नाही. संस्कृती म्हणजे काय हे दाखवता येत नाही, तिचे वर्णन करता येत नाही. आजकाल नृत्य- गायन- नाट्य- चित्रपट- लोककला- इत्यादींना विस्कळीत अर्थाने संस्कृती म्हटले जाते, समजले जाते. परंतु ते योग्य नाही. या कला आहेत. संस्कृती ही अधिक जीवनानुगामी अमूर्त भावात्मक वस्तू आहे. वस्तू हा शब्द मुद्दाम वापरला आहे. कारण ती आहे, ती असते. ती केवळ कल्पना नाही. एवढेच की ती अमूर्त आहे. एखाद्या भौतिक पदार्थासारखे तिचे मोजमाप वा वर्णन करता येत नाही एवढेच. अर्थात हेही तेवढेच खरे की, साहित्य वा विविध कलांमधून संस्कृती अभिव्यक्त होत असते. प्रकट होत असते. एवढेच नाही तर, साहित्य वा विविध कला आणि त्यांचे आविष्कार संस्कृतीला घडवीत किंवा बिघडवित असतात. संस्कृतीला आकार वा घाट देत असतात. दुसरीकडे संस्कृतीही साहित्य वा कलांना घडवीत किंवा बिघडवित असते. त्यांना आकार आणि घाट देत असते. या दोन्ही बाबी अन्योन्याश्रयी असतातच असे नाही. परंतु त्यांचा प्रवास सोबत सोबत, हातात हात घालून होत असतो. साहित्य आणि कला या जीवनानुभवाकडे थोड्या अधिक झुकलेल्या असतात. मनोरंजन, मनोविनोद, मनोरुची त्यात प्रधान असतात. संस्कृती ही जीवनार्थाकडे थोडी अधिक झुकलेली असते. जीवनदृष्टी, जीवनाचे तत्वज्ञान त्यात प्रधान असते एवढेच. म्हणूनच साहित्याचा वा कलेचा विकास आणि संस्कृतीचा विकास वेगवेगळ्या पद्धतीने समजून घ्यावे लागते. साहित्य वा कलांचा विकास होतो आहे का? त्यांची घडण होते आहे का? त्यांची वृद्धी होते आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधताना वेगळ्या पद्धतीने शोधावी लागतात. जसे- लोक लिहितात की नाही, वाचतात की नाही, लिहीणाऱ्यांची अथवा वाचणाऱ्यांची संख्या, ग्रंथालये, ग्रंथालयांची संख्या, पुस्तक प्रकाशने, त्यांची आकडेवारी, साहित्य संमेलने, साहित्य विषयक अन्य कार्यक्रम आणि आयोजने, या साऱ्यासाठी दिला जाणारा वेळ आणि पैसा, अन्य सोयी- सवलती- साधने- यांची उपलब्धता; हे सारे विचारात घ्यावे लागते. त्यांचा ताळेबंद मांडावा लागतो. अन्य कलांच्या बाबतीतही असाच विचार करावा लागतो. त्यातून त्यांचे घडणे वा बिघडणे, त्यांची वृद्धी वा घट समजून घेता येते; समजून घेतली जाते. संस्कृतीची वाढ-घट कशी मोजायची? कशी समजून घ्यायची? त्याचं माप कोणतं? संस्कृतीचं घडणं बिघडणं अथवा वाढ-घट अशी बाह्य एककांनी समजून घेता येत नाही. संस्कृतीचा विकास समजून घेण्याचे मापदंड आंतरिक आहेत. ज्या मानवाच्या जीवनाचा तो अविच्छेद्य भाग आहे; त्या मानवाच्या भावना, विचार, जाणीवा, दृष्टी किती व्यापक होत आहेत वा संकुचित होत आहेत; त्यांचा विस्तार होतो आहे की आकुंचन होते आहे; हाच संस्कृतीच्या विकासाचा मापदंड असू शकतो. साहित्य अथवा कला; संस्कृतीच्या या विकासाला किती साहाय्य करतात, त्यासाठी किती पूरक ठरतात, यावरून साहित्य वा कलांच्या दर्जेदार असण्यावर वा नसण्यावर मोहोर उठवता येते.
मानवाच्या भावना, विचार, जाणीवा, दृष्टी किती व्यापक होत आहेत वा संकुचित होत आहेत; त्यांचा विस्तार होतो आहे की आकुंचन होते आहे; हे तरी कसे ठरवायचे? या प्रश्नाचे उत्तर, म्हटले तर फार सोपे आहे. अर्थांची, शब्दांची फार ओढाताण न करता त्याचे उत्तर देता येते. मोठी पिशवी ती, ज्यात अधिक वस्तू सामावू शकतात, लहान पिशवी ती ज्यात कमी वस्तू सामावू शकतात. त्याचप्रमाणे भावना, विचार, जाणीवा, दृष्टी मोठी अथवा व्यापक तेव्हाच म्हटली जाईल, जेव्हा त्याचा परीघ अधिकाधिक मोठा असेल; अधिकाधिक भावना, विचार, जाणीवा, दृष्टी यांना सामावून घेऊ शकेल. याउलट ज्या भावना, विचार, जाणीवा, दृष्टी यांचा परीघ लहान असेल, त्या भावना, विचार, जाणीवा, दृष्टी लहान म्हणाव्या लागतील. अन आपला लहान परीघ मोठा करण्याचे नाकारत, अधिकाधिक भावना, विचार, जाणीवा, दृष्टी यांना सामावून घेण्याचे नाकारत जाणे; याला संकुचितपणा म्हणावे लागेल. आणखीन एका गोष्टीची नोंद घेणेही गरजेचे आहे. आपला परीघ मोठा करणे, अधिकाधिक भावना, विचार, जाणीवा, दृष्टी सामावून घेणे ही; चांगली अन योग्य असली तरीही धोकादायक प्रक्रिया आहे. त्यासाठी विवेक जागा असणे नितांत गरजेचे. परीघाबाहेरील व्यक्ती वा विचार यांना परिघात सामावून घेणे विवेकाधिष्ठित असायला हवे. हिंसा, एखाद्याचे अस्तित्व संपवणे वा नाकारणे, स्वार्थ, समग्र जीवनाच्या संदर्भात विचार करण्याला नकार देणे, आततायीपणा; यासारख्या बाबी व्यापकतेच्या नावाखाली सामावून घेता येत नाहीत, सामावून घेऊ नयेत. त्यातून फक्त आत्मनाशी भस्मासूर निर्माण होतात. हिंसा, एखाद्याचे अस्तित्व संपवणे वा नाकारणे, स्वार्थ, समग्र जीवनाच्या संदर्भात विचार करण्याला नकार देणे, आततायीपणा; इत्यादी बाबी समजून जरूर घेतल्या पाहिजेत. परंतु समजून घेणे आणि सामावून घेणे यातील भेद दुर्लक्षित करणे चुकीचे ठरते.
संस्कृतीच्या जडणघडणीत समाजजीवनाच्या विविध घटकांचा कळत वा नकळत सहभाग असतो. वर्तमानाचा विचार केल्यास काय चित्र डोळ्यासमोर येते? प्रसारमाध्यमे आणि संवाद माध्यमे आजच्या युगावर सर्वाधिक प्रभाव गाजवीत असल्याचे पाहायला मिळते. कधी नव्हे एवढा हा प्रभाव वाढला आहे. ही मानवी प्रवासातील `न भूतो' अशी प्रक्रिया आहे. संवाद आणि संवादाची विविध माध्यमे मानवी सभ्यता व संस्कृतीएवढीच पुरातन आहेत यात वाद नाही. भाषा आणि वाणीचा किंवा मानवी खाणाखुणांचा उपयोग तर होतच असे, पण पशुपक्ष्यांचा संवाद माध्यम म्हणून वापर; तसेच `मेघा'सारख्या गोष्टींचा साहित्यिक प्रतिभेने संवाद माध्यम म्हणून केलेला उपयोग; नवीन नाहीत. तरीही, संवाद आणि संवाद माध्यमे यांचा पसारा, वैविध्य, राजापासून रंकापर्यंत असलेली त्याची उपलब्धता, सहजता, गती; हे सारे अभूतपूर्व आहे. प्रसार माध्यमे ही तर अगदी अलीकडच्या दोन शतकांची देणगी आहे. त्यातही गेल्या दोनेक दशकात झालेले बदल हे क्रांतिकारी या शब्दालाही उल्लंघून गेलेले आहेत. संवाद माध्यमे आणि प्रसार माध्यमे यांच्या या पसाऱ्याने मानवाच्या व्यक्त होण्याचे सगळे संदर्भच बदलून टाकले आहेत. `खाजगी किंवा व्यक्तिगत' या बाबी तर पातळ होऊ लागल्या आहेतच; पण व्यक्त होण्यातील स्त्री- पुरुष- तृतीयपंथी- हे लिंगभेद; भाषाभेद, भौगोलिक सीमा, जाती- भाषा- प्रांत- देश- विषय- वय- या साऱ्या सीमाही पुसट झाल्या आहेत. आपल्या घरात बसून जगातील कोणाशीही संवाद साधण्याची सोय आता उपलब्ध आहे. कोणतीही माहिती जाणून घेणे किंवा कोणतीही माहिती विशिष्ट व्यक्ती वा व्यक्तीसमूह यांच्यापर्यंत किंवा यच्चयावत सगळ्यांपर्यंत पोहोचवणे यात काहीही नवीन राहिलेले नाही. विचारांचे आदानप्रदान सहजसोपे झाले आहे. मोबाईल आणि आंतरजाल या संवादमाध्यमांनी माहिती आणि विचारांच्या आदानप्रदानातील मर्यादा तर पुसल्याच, सोबतच `प्रसार माध्यमे' हा मध्यस्थही बाजूस सारला आहे. माहिती आणि विचारांच्या आदानप्रदानासाठी असलेली अवलंबिता पुसून टाकली आहे. प्रसारमाध्यमांचे भविष्य काय असेल असाही एक प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
आपल्या त्या त्या वेळच्या निवडीप्रमाणे कधी व्यक्तिगत, तर कधी समष्टीशरण अशा या संवादसाधनांनी चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम होत आहेत. त्यांचे नेमके आकलन होण्यास अजून काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे. तरीही त्यातील प्रवाह स्पष्टपणे पाहता, अनुभवता येतील इतके ठळक निश्चित आहेत. चांगल्या आणि वाईट गोष्टींची सहज उपलब्धता हे त्याचे एक लक्षण आहे. मोठाले धार्मिक वा तात्विक ग्रंथ, सगळ्याच भाषांमधील मोकळे होत असलेले कथा, कादंबरी- कविता- इत्यादी साहित्य, वैचारिक वाङ्ग्मय, वैज्ञानिक माहिती, इतिहास, पुराणे, राज्यघटना, नियम, कायदे, बँकांचे आणि कंपन्यांचे ताळेबंद, शास्त्रीय आणि अन्य संगीत, जुने व नवे चित्रपट, नाटके, भूगोल, पर्यटन, निसर्ग हे सगळे बोटांच्या टोकावर आले आहे. केवळ माहिती म्हणून नव्हे तर प्रत्यक्ष व्यवहार म्हणूनही हे एका क्लिकचे काम होते आहे. प्रवासापासून निवासाच्या आरक्षणापर्यंत किंवा प्रत्यक्ष पैसा कमावणे- खर्च करणे- देवाणघेवाण- अन्य व्यवहार हेही जागचे न हलता होऊ लागले आहेत. शिक्षण वा वैद्यकीय उपचार हे दोन व्यक्तींचा थेट संपर्क न होता होऊ लागले आहेत. खरेदी-विक्री डाव्या हाताचा मळ झाला आहे. यासोबतच फसवणूक, अधिकृततेचा अभाव, एकलकोंडेपणा, संशयीवृत्ती, गैरफायदा घेणे, लुबाडणूक, अनिश्चितता, आरोग्याच्या तक्रारी यांचीही भरमसाठ वाढ होते आहे. आपल्याला दुष्ट लोकांचा वा वृत्तींचा फटका बसू नये याचा मोठा तणाव प्रत्येकाला जाणवू लागला आहे. शिवाय जशा चांगल्या गोष्टी उपलब्ध आहेत तशाच पोर्नोग्राफी, ड्रग्ज, मादक द्रव्य, जुगार, वेश्यावृत्ती हेही सहज उपलब्ध आहे. एकीकडे माणसे एकलकोंडी होऊन दुरावू लागली आहेत, तर दुसरीकडे आपापल्या आवडीनुसार गट तयार करून आवडीच्या विषयात रममाण होऊ लागले आहेत. असंख्य साहित्यिक, वैज्ञानिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय गट तयार होत आहेत. त्यात देवाणघेवाण होत आहे. आभासी वास्तवातून भेटणारे लोक आणि विचार, भावना, माहिती, साहित्य यांची देवाणघेवाण करणारे लोक; प्रत्यक्ष भेटून एकमेकांना समजून घेऊ लागले आहेत. त्यांचे लहानमोठे कार्यक्रम होऊ लागले आहेत. अन अशा गटांची सभासद संख्या लाखात सुद्धा पोहोचू लागली आहे. लिहिणारा, व्यक्त होणारा, वाचणारा वर्ग विकसित होऊ लागला आहे; वाढू लागला आहे. कधीकधी हे व्यसन सुद्धा होत आहे. कौटुंबिक गटात सुद्धा आजवर माहिती नसलेल्या अनेक गोष्टींचा, गुणांचा परिचय होऊ लागला आहे. यातून प्रत्येकाला चांगल्या व वाईट दोन्ही अर्थाने; संधी, सन्मान आणि ओळख प्राप्त होऊ लागली आहे.
संवाद माध्यमांमुळे प्रसार माध्यमांचे स्वरूपही बदलले आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर, तसेच पैशासाठी जाहिरात शरणता हा प्रसार माध्यमांचा धर्म झाला आहे. राजकारण, चित्रपट, मनोरंजन, गॉसिप, तंत्रज्ञान यांच्याशी संबंधित कार्यक्रम आणि लिखाण यांना प्रमुखता मिळाली आहे. संवाद माध्यमांच्या प्रभावातून ही माध्यमेही सुटू शकत नाहीत. संवाद माध्यमातील घडामोडी, प्रवाह, त्यांचा खरेखोटेपणा हेदेखील त्यांचे विषय होऊ लागले आहेत. तांत्रिक प्रगतीमुळे अन्य देशांशी live देवाणघेवाण करणे शक्य झाले आहे. दोन देशातील वृत्तवाहिन्या एकत्र येऊन वृत्त वा चर्चा लोकांपर्यंत पोहोचवू लागले आहेत. देशविदेशातील वृत्तपत्रे आंतरजालात सहजपणे उपलब्ध होऊ लागली आहेत. जेवण, झोप, अभ्यास, कौटुंबिक कार्यक्रम, पाहुणेराहुणे, भेटीगाठी, आवडीनिवडी, इच्छा, अपेक्षा, मानसिकता यांच्यावर या साऱ्याचा प्रभाव होऊ लागला आहे. क्रीडास्पर्धा, राजकीय घडामोडी, अन्य महत्वाच्या घटना, चित्रपट यांची माहिती सर्वजनसुलभ होऊ लागली आहे. मानवी जीवन आणि त्याचे असंख्य पैलू यांचा परहस्ते अनुभव का होईना, घरबसल्या मिळू लागला आहे. माहिती, प्रतिमा, दृश्य, मतमतांतरे, घडामोडी यांनी माणसाचे मन, बुद्धी तुडुंब भरून जाऊ लागली आहे. reality show या प्रकाराने इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांचे मोठे विश्व व्यापले आहे. अस्पर्शित प्रतिभांना अवकाश प्राप्त होणे हा त्याचा सकारात्मक परिणाम आहे, तर उथळ कौशल्यविकास आणि अकाली प्रगती खुंटणे हे त्याचे नकारात्मक परिणाम आहेत. काही बाबतीत या reality show मधून गरजू आणि अभावग्रस्तांना मदत मिळते आहे; तर अनेकदा `सोपा आणि पापमय पैसा' वाहतो आहे. सुमार लोक celebrity होत आहेत. सार्वजनिक कार्यक्रमातील त्यांचा वावर वाढला आहे. त्यामागे लोक धावत आहेत अन त्या तथाकथित celebrity उखळ पांढरे करून घेत आहेत. प्रादेशिक वृत्तवाहिन्या आणि मुद्रित माध्यमे लोकांमध्ये जाऊन; लोकहिताचे वा लोकानुरंजनाचे उपक्रम करीत आहेत. राजकीय चर्चा हे बौद्धिक दंगलीचे क्षेत्र झाले आहे. मुद्रित माध्यमातील संपादकांचे महत्व कमी होऊ लागले आहे. गंभीर, उच्च अभिरुचीचे लिखाण हद्दपार होऊ लागले आहे. दोन्ही प्रकारच्या प्रसार माध्यमांनी दैनंदिन जीवन तर व्यापून टाकले आहेच; सोबतच अर्थकारणालाही आकार दिला आहे, देत आहेत. राजकीय निर्णय प्रभावित करण्याची या माध्यमांची शक्तीही वाढली आहे.
प्रसार माध्यमे आणि संवाद माध्यमे यांच्या चांगल्या वाईट परिणामांची चर्चा बाजूला ठेवून, केवळ सकारात्मक बाबी लक्षात घेतल्या तरीही संस्कृती संदर्भात काही प्रश्न समोर येतात. विचारांच्या, भावनांच्या, माहितीच्या देवाणघेवाणीतून, अभिव्यक्त होण्याच्या प्रक्रियेतून, समजून घेण्याच्या प्रयत्नातून; काय येणेजाणे करते आहे? कशाची देवाणघेवाण होते आहे? या देवाणघेवाणीने मानवी मन आणि जगणे किती आणि कसे समृद्ध होत आहे? वरवर नजर टाकली तरीही लक्षात येईल की; चित्र फारसे आशादायक नाही. संवाद माध्यमातून असंख्य स्त्री-पुरुष व्यक्त होऊ लागले आहेत. पण या व्यक्त होण्याचे स्वरूप कुरकुर, तक्रारी, कुरघोडी, टवाळकी असेच मोठ्या प्रमाणावर आहे. राजकीय गटात लोकांनी स्वत:च स्वत:ला वाटून घेतले आहे. अन्यथा प्रामाणिक आणि कळकळीचे असलेले लोकसुद्धा राजकीय हमरीतुमरी सोबतच, एकमेकांचा द्वेष करू लागले आहेत. संपूर्ण मानवी जीवनाचे अपार राजकीयीकरण झाले असून त्याने परस्पर संबंधांनाही गिळंकृत करणे सुरु केले आहे. मानवी मनातील सत्ताकांक्षा भस्मासूर होऊन समोर येते आहे. यात राजकीय सत्ता तर आहेच, सोबतच व्यक्ती, परिवार, विचार, संस्था, संघटना यांच्याही सत्ताकांक्षा तीव्र, तिखट आणि कडू होऊ लागल्या आहेत. एकाच छताखाली राहणारे चार जीवसुद्धा आपली सत्ता कशी चालेल किंवा सत्ता आपल्या हाती कशी राहील याचा प्रयत्न करताना दिसतात. सत्ताकांक्षेच्या भस्मासुराप्रमाणेच संपत्तीकांक्षेच्या भस्मासुरानेही अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. कोणत्याही गोष्टीचा संदर्भबिंदू पैशाशी येऊन थांबतो आहे. प्रतिष्ठा, मोठेपणा, न्याय, योग्यता, आदर पैशाच्या संदर्भात तोलले जाऊ लागले आहेत. `सर्वेगुणाः काञ्चनम् आश्रयन्ते' हे मानवी वृत्तीच्या अपरिपक्वतेचं लक्षण, मानवी पुरुषार्थ म्हणून पुढे येतं आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या मनात आढ्यता आणि ज्याच्याकडे नाही त्याच्या मनात आशाळभूतपणा निर्माण होतो आहे. शिक्षण, संस्कार, जाहिराती, वातावरण, धोरणे, भाषा, चिकित्सा, विश्लेषण, चर्चा, जीवनाचे आदर्श आणि मापदंड; या साऱ्यातून सत्ता आणि संपत्ती यांचाच महापूर आला आहे. चांगल्या चांगल्या समाजोपयोगी योजना आदींचे `दूत' म्हणूनदेखील सत्ता, संपत्ती आणि भ्रष्ट जीवन यात बुडालेले लोकच पुढे येत आहेत. जीवन आणि तत्वज्ञान, जीवन आणि धर्म, जीवन आणि आध्यात्मिकता यांचा संबंधविच्छेद होऊ लागला आहे. `साधी राहणी, उच्च विचारसरणी' हा थट्टामस्करीचा विषय झाला आहे. माणसाने माणसाला समजून घेण्यासाठी, माणसाने जीवन समजून घेण्यासाठी आवश्यक अशी मनाची घडण गमावून बसतो आहोत आणि त्याची गरज आहे याकडेही दुर्लक्ष होत आहे. ज्ञान, सद्गुण, सदाचार, सद्भाव, साधेपणा, सहृदयता, संवेदनशीलता, विचारीपणा, संतुलन; या साऱ्यांना तिलांजली देणे सुरु झाले आहे. कधी भलेपणाचा अतिरेक, तर कधी व्यवहारचातुर्याचा अतिरेक पाहायला मिळतो. गैरफायदा घेणे आणि बळी जाणे दोन्ही वाढते आहे. यातून असुरक्षितता, अविश्वास, संशयीपणा, रिक्तता वाढत चालले आहे. मन, बुद्धी, भावना, विचार, जाणीवा; सशक्त, सार्थक आणि व्यापक होण्याऐवजी संकुचित, विसविशीत होत आहेत. संघर्षाची आणि समन्वयाची दोन्ही ताकत माणूस आणि समाज गमावून बसतो आहे. जीवनदृष्टी अशी काही राहिली आहे का असा प्रश्न पडू लागला आहे. जीवन म्हणजे केवळ वाहत राहणे अशीच भूमिका दिसून येते. गरिबी, दुर्बलता, अन्यायग्रस्तता म्हणजे आक्रस्ताळेपणाला सूट; तसेच श्रीमंती, बलसंपन्नता म्हणजे अधिकाराची सूट असेच चित्र पुढे येते आहे. संस्कृती म्हणजे जर जीवनदृष्टीचा विस्तार आणि त्याला अनुसरून व्यवहार हा असेल; तर दुर्दैवाने म्हणावे लागेल की संस्कृतीची घसरण सुरु आहे. व्यक्ती आणि समाजाच्या जीवनातील सत्ता आणि संपत्तीकडे झुकलेला लंबक जोवर ज्ञान, गुणसंपन्नता आणि आत्मभावाच्या विकासाकडे झुकत नाही तोवर ही घसरण सुरूच राहील. ढळलेला हा तोल प्रस्थापित करण्याचे आव्हान विचारी सारस्वतांपुढे आ वासून उभे आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर