रविवार, २९ जुलै, २०१८

बंगदेशी ८


ती संध्याकाळ दार्जिलिंगच्या मॉल रोडवर घालवली. माझा मुक्काम होता मुख्य रस्त्याच्या खालच्या दिशेला. चांदमारी नावाच्या भागातील botanical garden च्या जवळ. एका स्थानिक घरी. अन मॉल रस्ता म्हणजे दार्जिलिंग शहराच्या सगळ्यात वरच्या पठारावर घेऊन जाणारा मार्ग. मुख्य रस्ता, तेथून मॉल रस्त्याला घेऊन जाणारे वेगवेगळे रस्ते, अन मॉल रस्ता म्हणजे दुकानांची दाटीवाटी. बाजारच बाजार. सतत फुललेला. दार्जिलिंग हा पश्चिम बंगाल राज्याचा भाग असला तरीही जवळपास पूर्ण नेपाळी प्रभावात. भाषा, खाणेपिणे, कपडे, जगणे, वृत्तपत्रे; सगळे नेपाळी. दोन बंगाली व्यक्ती सुद्धा आपसात सहजच नेपाळीत बोलतात. नेपाळी भाषा न बोलणारी स्थानिक व्यक्ती सापडणे कठीण. मुख्य रस्त्यावरील एकमेव पुस्तकांच्या दुकानात डोकावलो. दोन-चार बंगाली पुस्तिका अन एक-दोन इंग्रजी वर्तमानपत्रे सोडली, तर सगळी पुस्तके आणि वर्तमानपत्रे नेपाळी. मोमोशिवाय खाण्यासाठी काही मिळेल का हे शोधणे म्हणजे एक मोठे कामच. अर्थात फरसाण, फळे, बिस्किटे, ब्रेड हे असतंच. परंतु उभ्या आडव्या भारतात मिळणाऱ्या असंख्य पदार्थांपैकी एखादा सुद्धा मिळणे कठीण. हॉटेल्समध्ये तर मोमो असतातच, पण रस्त्याने पाणीपुरीच्या दुकानांसारखी मोमोची दुकाने. अन कोणत्याही शहरातील एका रांगेतल्या पाणीपुरीच्या दुकानांपेक्षा जास्त संख्येने. अन मोमोचा हा व्यवसाय सांभाळणाऱ्या बहुतेक नेपाळी महिला. आपल्याला फक्त उनी कपड्यांच्या व्यवसायात दिसणाऱ्या या महिला सगळ्या व्यवसायात दिसतात. शाकाहार मिळेल का अशी घनदाट शंका यावी इतकी मांसाची दुकाने. भर रस्त्यावर टांगलेले प्राण्यांचे देह. काही ठिकाणी नियमानुसार दुकानासमोर आडोशाची भिंत आहे पण नियमांची पर्वा फारशी नाहीच. मुख्य रस्त्याच्या थोड्या आतल्या अंगाला शनि मंदिराजवळ एक मारवाडी खानावळ आहे तिथे फक्त शाकाहारी जेवण मिळते.
बाजारात मुख्य व्यवसाय उनी कपड्यांचा. लोकर, शाली, स्वेटर्स, विंड चिटर्स, रजया असे सगळे. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानात भाव होणार, पक्क्या दुकानात नाही. सगळे सारखेच. उन्हाळाच आहे. राहून राहून किती थंडी राहणार असा विचार करून गेलेल्या अस्मादिकांना विंड चिटर खरेदी करणे भाग पडले. दार्जिलिंगच्या जगप्रसिद्ध चहाची दुकाने मात्र नाहीतच जमा. चहापत्ती घरी घेऊन जावी किंवा कोणाला भेट घेऊन जावी असा विचार केला तर ते शक्य होणे नाही. चहा प्यायचा असेल तरीही तुरळक दुकान सापडेल. असे सगळे पाहत, नोंदी घेत; मॉल रस्त्याचा चढ आणि मग मॉल रस्ता चढून दार्जिलिंगच्या सर्वोच्च स्थानी पोहोचलो. हे मोठे मैदान खास फिरणाऱ्या लोकांसाठी. तेथे पाहण्याच्या दोनच गोष्टी- एक शिवमंदिर आणि एक स्तंभ. या स्तंभावर एका नेपाळी कवीची माहिती आणि त्याच्या कवितेतील रामायणावर लिहिलेल्या काही ओळी आहेत. त्या कवीच्या स्मृतीतच तो स्तंभ उभारला गेला आहे.
दार्जिलिंगचे नेपाळीपण मोठे आहे. सिलीगुडीला पोहोचतो त्याहून कमी वेळात आपण नेपाळला पोहोचू शकतो. लोकांची ये-जा सुरूच असते. मला निवासाजवळ भेटलेला एक मुलगा भारतातल्यापेक्षा नेपाळच्या अधिक गावांना जाऊन आलेला होता. या मैदानावर लोक फिरत होते, खेळत होते, मुले बागडत होती आणि सगळे चारही बाजूंनी दिसणारे हिमालयाचे प्राकृतिक सौंदर्य साठवून घेत होते. गर्दी होतीच पण सगळा कारभार निवांत. या निवांतपणाला गंमत आणण्यासाठी गरमागरम भुट्टा मदतीला आला. गर्दी नसलेल्या एका ठिकाणी गेलो. एक नेपाळी महिला कणसं भाजत होती. तिथेच एका दगडावर टेकलो. खरपूस भाजलेला भुट्टा तिने हाती दिला. तिच्याशी चारदोन शिळोप्याच्या गप्पा केल्या. ती मुंबईला येऊन गेलेली. अर्थात उनी कपडे विकायला. काही महिने होती. पुन्हा परत गावी. भुट्टा खाणे सुरु असतानाच गिऱ्हाईक देखील येत जात होते. एक साहेब आले. त्यांनी तीन कणसं घेतली. भाव होता प्रत्येकी वीस रुपये. त्यांनी मात्र महाग देते म्हणत, साठऐवजी पन्नास रुपयेच दिले. माझ्याकडे वळून ती म्हणाली- `पहा, तीन कणसं विकली तर आठ रुपये मिळतात. अन यांनी दहा रुपये कमी दिले.’ असा छोटा व्यवसाय करणाऱ्या लोकांशी भाव करू नये हे पुन्हा प्रकर्षाने जाणवले. हां, शालीचे हजार रुपये सांगणाऱ्या अशाच नेपाळी महिलांशी भाव जरूर करावा, पण कणीस घेताना नको. भाव कुठे करायचा अन कुठे नाही याचेही तारतम्य हवेच ना? निवासाजवळ असलेल्या हिंदी भाषी लोकांच्या `बडा ठाकूर मंदिरात’ रात्री सुंदरकांडाचा आनंदही घेतला. दोन दिवस दार्जिलिंगचा आनंद घेऊन, यजमानांनी बनवलेला खास दार्जिलिंग चहा घेऊन दार्जिलिंग सोडले. हां- एक आवर्जून सांगायचे म्हणजे, दार्जिलिंगला पाण्याची खूप मारामार आहे. पावसाचे पाणी साठवून साठवून लोक जगतात. पडणारा पाऊस सगळा खाली वाहून जातो. त्यातल्या त्यात एक बरे की, येथील लोकांना आंघोळीची गरज नसते. आणि सरासरी आठवड्यातून एकदाच आंघोळ करणारेच बहुसंख्य आहेत. तपशिलात गेलो तर महिन्यातून एकदा आंघोळ करणारेही सापडतात !!
दार्जिलिंगहून सिलीगुडी, तिथून जलपाइगुडी, तिथून सुमारे दोन तास विलंबाने आलेल्या `हिमकन्या एक्स्प्रेस’ने कोलकात्याला परत. कोलकात्याला सकाळी पोहोचलो. गाडी दोन तास विलंबाने आली पण पोहोचवले एक तास विलंबाने. दुपारी नागपूरची परतीची गाडी होती. बोसपुकूरला राहणाऱ्या भाचीचा आग्रह होता – आल्याशिवाय जायचे नाही. गाडीतून उतरताच बोसपुकूरची taxi केली. खाणाखुणा लक्षात होत्या पण ज्या चौकातून आत वळायचे त्या चौकातला हिरवा दिवा सुरु होता आणि चालकाला थांब सांगेपर्यंत स्वाभाविकच त्याने गाडी पुढे काढली होती. त्याचेही बरोबरच होते. पुन्हा हिरव्या दिव्याची वाट कोण पाहणार? पण त्यामुळे पंचाईत ही झाली की, गाडी आत नेणार कशी? वळवून यायचे म्हणजे दोनेक किमी पुढे जाऊन वळसा घेऊन या. ते अशक्य. मग, मुख्य रस्त्यावर उतरून तंगडेतोड करत भाचीच्या घरी जावे लागले. हाताशी वेळ फारसा नव्हता. चहा, आंघोळ, १५-२० मिनिटांची झपकी, भाचीच्या बेटीशी थोड्याशा गप्पा, जेवण, bags आवरणे; असे सगळे आटोपले. थोड्याशा वेळाच्या त्या धावपळीतही भाचीने बाजारात जाऊन खास `हिमगिरी आंबे’ आणलेत. त्या हिमगिरी आंब्याचा रस तृप्त करून गेला. त्याच दिवशी मुलीचा दहावीचा निकाल होता दुपारी. तिला काय द्यावे? बोलताबोलता लक्षात आले तिला वाचनाची आवड आहे. मग जवळचे भगिनी निवेदितांचे चरित्र तिला दिले आणि त्यांचा निरोप घेतला. मुख्य रस्त्यापर्यंत ती निरोप द्यायला आली. Taxi साठी थांबलो असतानाच एसी बस आली. तिने विचारले- चालेल का? हरकत असण्याचे काहीच कारण नव्हते. बसने स्थानकाच्या बाहेर सोडले. बसने आल्याने एक निरीक्षण खाती आणखीन जमा झाले. कोलकात्यात बस आणि taxi यांच्या भाड्यात फारसा फरक नाही. जवळपास सारखेच. एवढेच की, taxi त तुम्ही एकटे असलात तरीही चार जणांचे भाडे द्यावे लागते. बसमध्ये एकाचेच. नागपुरात मात्र रिक्षा आणि बस यांच्या भाड्यात कुठेही ताळमेळ नाही.
कोलकाता स्थानकावर पोहोचलो. अन एक लक्षात आले, स्थानकाच्या अवाढव्यतेच्या मानाने सोयी वा मदतकेंद्रे, मदतनीस, चौकशीच्या सोयी, पोलीस फार तोकडे आहेत. गर्दी आणि विस्तार लक्षात घेता वास्तविक जागोजागी सोय हवी. तर गाडी कुठल्या फलाटाला हे शोधण्यातच वेळ खूप गेला. त्यात गंमत म्हणजे- चौकशीच्या खिडकीवर मी विचारलेल्या प्रश्नाला खिडकीच्या आतील माणसाने आधीच्या पृच्छ्काचे उत्तर दिले. ते होते फलाट क्रमांक ८. त्यानुसार गेलो तर तिथे भलतीच गाडी. आता आली का पंचाईत. पुन्हा चौकशी खिडकीवर जाणे, रांगेत लागणे, विचारणे... गाडीची वेळ जवळ येत होती. इकडेतिकडे नजर टाकली कुणी कुली दिसतो का? मिनिटभर नाही दिसला. अस्वस्थता वाढली अन योगायोगाने कुली दिसला. मुख्य म्हणजे सामान न घेतलेला. त्याला विचारले तर म्हणाला- फलाट क्रमांक २१. अरे देवा !! ८ वरून २१ वर जाणे. मुख्य म्हणजे २१ आहे कुठे? त्याला विचारले- कुठे आहे? त्याला लक्षात आले. तो खुणेनेच म्हणाला, सामान गाडीवर ठेवा. मला पर्याय नव्हता. पैसे वगैरे न बोलता सामान गाडीवर ठेवले. अन दोघेही फलाट २१ कडे सुटलो. वेळेत पोहोचलो. त्याने सामान आत नेऊन ठेवले. मी आसन क्रमांक कन्फर्म केला अन वळून पाहिले. त्या क्षणभरात तो देवासारखा धावून आलेला कुली खाली उतरला होता. मी त्याच्या मागे खाली धावलो. डब्यातून उतरलो तेव्हा तो त्याची ढकलगाडी वळवून चालू लागला होता. जाऊन त्याला पकडले. म्हटले- बाबा रे पैसे तर घेऊन जा. किती देऊ? तो फक्त हसला. पुन्हा विचारले, तर म्हणाला- तुमची मर्जी. त्यावेळी मनात अन हातात आले तेवढे पैसे काढले. त्याला दिले अन जागेवर परतलो. लगेच दोन मिनिटात गाडी सुटली. कोण होता तो? बंगदेशीचा स्मृतिगंध मनाच्या कुपीत भरत भरत परतीचा प्रवास सुरु झाला.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १४ जुलै २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा