तो दिवस शांतीनिकेतनचा होता. त्या दिवसाची सुरुवात आदल्या रात्रीच झाली होती. शांतीनिकेतनसाठी बोलपुरला जावे लागते. रेल्वे स्थानक बोलपूरचे. तेथून २-३ किमीवर शांतीनिकेतन. बोलपूरसाठी गाडी सकाळी सहा वाजता सियालदावरून. सकाळची वेळ असल्याने वेळ कमी लागणार तरीही बेफिकीर राहून चालणार नाही. त्यामुळे जाण्याचा अर्धा तास. Taxi वेळेवर मिळते न मिळते त्यासाठी अर्धा तास. म्हणजे पाच वाजता तरी निवास सोडावा लागणार. त्याआधी तासभर आवरायला, तयारीला. म्हणजे चार वाजता उठणे भाग. सकाळी उठण्यासाठी स्वत:वर अमाप विश्वास असल्याने अर्धा तास आधी म्हणजे साडेतीन वाजताचा गजर लावला. शिवाय चौकीदाराला आवाज द्यायला सांगून ठेवले. त्याआधी निवासापुढे taxi नाही मिळाली तर कुठे मिळेल त्याची विचारणा करून तेथवर पायी जाऊन आलो. किती वेळ लागेल इत्यादी गणिते मनाशी करून ठेवली. स्वत:ला स्वत:ची साथ चांगली मिळाली. साडेतीनला गजर वाजल्यावर पावणेचारला उठलो. तयारी करून रस्त्यावर आलो. हमखास taxi मिळेल या आश्वासनाचा काहीही उपयोग नाही हे लक्षात यायला फार वेळ लागला नाही. मग आदल्या रात्री पाहून आलेल्या सार्वजनिक इस्पितळाच्या दिशेने पावले उचलली. तिथे पोहोचण्यापूर्वीच एक गडी आपल्या गाडीला अभ्यंगस्नान घालीत असलेला दिसला. त्याला भीतभीतच विचारले. हो, आंघोळीला किती वेळ लागतो अन किती नाही. पण तो तयार झाला. म्हणाला घड्याळ लावा- दहा मिनिटात निघू. गड्याने शब्द पाळला. सियालदाला वेळेत पोहोचून बोलपूरचा प्रवास सुरु झाला. झुंजूमुंजू होण्याच्या वेळेचा सियालदा-बोलपूर प्रवास... बस, एकदा करावा... एवढेच. दोन तासाच्या प्रवासात अखंड सोबत असते कमलपुकुरांची. खिडकीबाहेरची नजर आत वळवण्याची इच्छाही होत नाही अन आठवणही. छोटेमोठे तलाव. त्यात फुललेली वा फुलणारी कमलपुष्पे. त्यांचे फुलणे उत्सुकतेने पाहणाऱ्या कमलकलिका. त्यांच्यावर मायापाखर करणाऱ्या कोवळ्या सुवर्णरश्मी. चुकार पाखरे, त्यांचे बागडणे, त्यांचे गाणे, बोलणे; सगळे आपल्याला सोबत घेऊन जाणारे.
बोलपूर छोटेसे स्थानक. रवींद्रनाथांच्या विश्वभारतीमुळे लोकांची येजा असते त्यामुळे दखलपात्र. अन्यथा कोणत्याही मुक्या स्थानकात गणना व्हावी असे. स्थानकाबाहेर आले की, सरळ `टोटो’त बसायचे. टोटो म्हणजे ई-रिक्षा. हे रिक्षा तुम्हाला सरळ विश्वभारतीला घेऊन जातात. हवं असेल तर संपूर्ण विश्वभारती फिरवून आणतात आणि परत बोलपूरला सोडूनही देतात. तुमचा कार्यक्रम असेल तसे. अशाच एका टोटोने शांतीनिकेतनात दाखल झालो. इ.स. १८६१ मध्ये देवेंद्रनाथ ठाकूर यांनी ही जागा घेतली. त्यावेळी तेथे असलेल्या एकमेव इमारतीत निरीश्वर ब्रम्हाची उपासना सुरु केली. त्यासाठी लोकांना हाकारले. लोकही आलेत. आश्रम सुरु झाला. आज त्या इमारतीला काचेचे असल्याने काच मंदिर, उपासना मंदिर, ब्रम्हमंदिर म्हटले जाते. या ठिकाणी देवेन्द्रनाथांना शांती लाभल्याने त्यांनी नामकरण केले शांतीनिकेतन. हळूहळू लोक येऊ लागले. भोवती गाव वसले. त्या गावाचे नाव पडले शांतीनिकेतन. त्या दिवशी विश्वभारतीत विशेष कार्यक्रम होता. काच मंदिरातील प्रार्थना आटोपली होती आणि आम्रकुंजात `माधोबी वितान’च्या पार्श्वभूमीवर रवींद्र संगीताचा कार्यक्रम सुरु होत होता. टोटोतून उतरून कार्यक्रमात जाऊन बसलो. ब्रम्ह कसं आहे यावर उपनिषदे म्हणतात- आनंदम ब्रम्हेती. त्यामुळे ब्रम्होपासक ठाकूरांच्या या विश्वभारतीत सगळा आनंदाचा बाजार. कोण, कुठला, कुठे चालला काही नाही. संगीताचं नवीन दालन विकसित करून समृद्ध करणाऱ्या रवींद्रनाथांच्या नावानेच पुढे ओळखल्या जाऊ लागलेल्या रवींद्र संगीताचा श्रुतीमधुर कार्यक्रम दोनेक तास चालला. आजी माजी विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक, पाहुणे, आगंतुक असे सारे मिळेल तेथे बसून संगीतात रमले होते. विश्वभारतीच्या वैशिष्ट्याप्रमाणे झाडांच्या सावलीतच कार्यक्रम सुरु होता. कार्यक्रम आटोपला. परिसर न्याहाळत थोडा वेळ घालवला. सगळे हळूहळू आपापल्या मार्गाने जात होते. मैदानात पलीकडे संध्याकाळच्या नाटकासाठी मंच उभारणे सुरु होते. एका झाडाखाली चार-पाच जण बोलत उभे होते. त्यांच्याजवळ गेलो. परिचय दिला आणि विश्वभारती पाहायला आल्याचे सांगितले. त्यातील एक होते सलील सरकार. विश्वभारती हेच ज्यांचे विश्व आहे असे एक शिक्षक. अन त्यांच्याशी बोलत होता केरळचा अरिजित राय. अरिजितने येथील institute of rural reconstruction मध्ये शिक्षण घेतले आहे. मी विश्वभारती पाहायला आलो याचा त्यालाच माझ्याहून जास्त आनंद झाला. तो स्वत:च म्हणाला- चला, मी दाखवतो. सलील सरकार यांचा निरोप घेऊन निघालो. अरिजित समरसून दाखवत होता, सांगत होता. हे ब्रम्ह मंदिर, हा आम्रकुंज, ही माधवीलता, हे पाठभवन, हे संगीत भवन, हे कला भवन, हे घंटाघर, हे छातीमताला, या मुलींच्या वसतिगृहात इंदिरा गांधी राहत असत... दमट हवामानामुळे येणारा घाम पुसत अरिजित सांगत होता. जाताजाता वाटेत बकुळ लागली. एकीकडे त्याचे बोलणे ऐकत बकुळीची ओंजळभर फुले वेचून घेतली. तेवढ्यात तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीकडे बोट दाखवून अरिजित सांगू लागला- `हा माणूस रोज इथे येतो. ३६५ दिवस. काहीही काम नसतं. फक्त येतो. बसतो मनास येईल तेवढा वेळ अन निघून जातो. तो इथे वर्तमानपत्र टाकत असे. वेडा झाला. पण विश्वभारती मनात तसंच राहिलं.’ हे ऐकताना मानवी वेडेपण डोक्यात नाचू लागलं. अरिजितला म्हटलं- `रवींद्रनाथ नावाच्या वेड्याला भेटायला हा दुसरा वेडा येतो.’ तोही हसला.
अरिजितसोबत कलाभवनला पोहोचलो. तिथे त्याने एका मराठी मुलाची ओळख करून दिली. पण त्यांची परीक्षा सुरु असल्याने त्याच्याशी बोलताबसता आले नाही. अरिजितलाही काम होते. मी काही त्याची वेळ घेऊन गेलो नव्हतो. तो निरोप घेऊन गेला. सूचना देऊन गेला. समजावून गेला. तो गेल्यावर कलाभवनच्या परिसरात एका झाडाखाली बसलो. शेजारीच रामकिंकर दा या प्रसिद्ध शिल्पकाराने घडवलेला गांधीजींचा पुतळा आहे. प्रतिकात्मक अशा पद्धतीने गांधीजींच्या पायाखाली एक मानवी सांगाडा शिल्पित केला आहे. त्या पुतळ्यावरून बराच वाद झाला होता अन त्यावर बंदीही घालण्यात आली होती. पण तो सारा इतिहास आहे. परिसरात विद्यार्थी येत जात होते. थोडा वेळ परिसराचा आस्वाद घेऊन शेजारच्या खानपानगृहात गेलो. तिथे चविष्ट पुरीभाजीचा आणि फक्कड चहाचा आनंद घेऊन बाहेर पडलो. आवाराबाहेर येऊन रस्त्याने जाणारी टोटो पकडली. त्याने विश्व भारतीचा सगळा परिसर दाखवला. सोबत त्याची running commentary पण होतीच. अर्थात त्याशिवाय फिरण्याला अर्थही राहिला नसता. रवींद्रनाथांचे घर, संग्रहालय, विद्यापीठाच्या विविध वास्तू, जुनी झाडे, इमारती तो दाखवत आणि सांगत होता. अमर्त्य सेन जिथे राहत त्या बंगल्यासमोर अनेक मे-फ्लॉवर दाटीवाटीने फुलले होते. बंगाली संस्कृतीची ओळख करून देणारे एक शिल्पग्राम देखील विद्यापीठ परिसरात आहे. तिथे राणी मां गैदिन्ल्यू, बिरसा मुंडा, तिलक मांझी यांच्यासह अन्य काही वनवासी योद्ध्यांचे पूर्णाकृती पुतळे आहेत. तसेही विश्वभारतीच्या मूळ प्रकृतीशी हे साजेसेच आहे. विश्वभारतीला सुरुवात झाली तेव्हा तेथे वार्षिक हिंदू मेळा आयोजित करण्यात येत असे. त्याद्वारे देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्याचा प्रयत्न होत असे. पुढे ते मागे पडले. त्याच्या स्मृतीही मागे पडल्या. परंतु हे पुतळे मात्र त्या भावनेशी सुसंगतच ठरतात. या शिल्पग्रामात ओरिसातील ग्रामीण घर, मंदिर यांचीही रचना पाहायला मिळते. ओरिसा आणि बंगाल तसे एकमेकांशी पुष्कळ जोडलेले आहेतच. हस्तकलेचा एक इवलासा हाटही तिथे भरला होता. बाऊलसाठी वापरले जाणारे एकतारी वाद्य हे एक आकर्षण अन लोभ होता, पण प्रवासात ते आणणे शक्य नसल्याने मनाला आवरले. त्या वाद्यालाच बाऊल म्हणतात अशी माहिती एकाने दिली. अर्थात माझ्या माहितीप्रमाणे बाऊल हा एक भक्तीपंथ आहे. अर्थात तो विषय विद्वानांचा अन अभ्यासकांचा आहे. आपण आपले ऐकून हो म्हणावे. कसे? हाटाशेजारच्या मैदानावर एका कार्यक्रमाची तयारी सुरु होती. अन तेथे लडिवाळ असे `आमी चीनी गो चीनी’ वाजत होते.
टोटोने विश्व भारतीजवळील हरिणांसाठी राखीव असलेले जंगल, चामडी वस्तू तयार करणारा, ग्रामीण महिला पुरुषांना रोजगार मिळवून देणारा कारखाना, चामडी वस्तू, बटिक प्रिंटचे कापड विक्रीचे दुकान असे सगळे दाखवले. या दुकानाच्या शेजारीही एका झाडाखाली एक कलाकार बाऊल गीते गात बसला होता. त्याच्या गाण्याच्या तालावर सात बदकांची एक रांग त्याच्या डावीकडून आली आणि डौलात चालत चालत, परिसरातील सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आणि पाहणाऱ्या साऱ्यांकडे दुर्लक्ष करत; उजव्या बाजूच्या अमलताश, चाफा, बकुळ, जास्वंद यांच्या बनात निघून गेली. तेथे थोडा वेळ घालवल्यावर परतताना टोटोने विश्वभारतीला जोडून उभारण्यात आलेले श्री निकेतन दाखवले. ग्रामीण पुनरुत्थान आणि महिला सबलीकरण ही श्री निकेतनची उद्दिष्टे. उन उतरणीला लागलं होतं. विश्वभारती पाहून झालं होतं. रवीन्द्रनाथ आठवून, साठवणं सुरु होतं. रवींद्रस्मृतींचा, श्यामोलीचा, आम्रकुंजाचा, अन तेथील लाल मातीचा गंध भरून घेत निरोप घेतला. अरिजितला फोन करून बोलावून घेतले. त्याचे हात हाती घेऊन त्याचाही निरोप घेतला. त्याच टोटोने बोलपूर स्थानकावर परतलो. गाडीला अवकाश होता आणि त्यातच भर म्हणजे एक तास विलंबाने येणार होती. करायला काहीच नव्हते. पण करायला काहीच नसणे ही समस्या नसलेल्या लोकांपैकी मी असल्याने, चहाचा पेला घेतला आणि एका सिमेंटच्या बाकड्यावर जाऊन बसलो निवांत. अशा वेळी जे जे आपल्या वाट्याला येतं, तो बोनस असतो. माणसांचा, अनुभवांचा, निसर्गाचा, आनंदाचा, दु:खाचा; कशाचाही. दोन घोट घेतले आणि पायाशी एक कुत्रा येऊन बसला. पुढला तासभर तो तसाच पायाशी बसला होता. त्याचा उद्योग एकच- बाकड्याच्या पाच फूट अंतरावरून जाणाऱ्या लोकांवर ओरडणे. बाकी काहीच नाही. कोणी जवळ आलं की ओरडायचं, पुन्हा गुपचूप बसून राहायचं. कधी कधी झोपल्याचं सोंग घेऊन. कारण झोपून असला तरीही माणूस जवळ आलं की हा पठ्ठा ताडकन उठणार. तासभर हा प्रकार सुरु होता. मी तिथून गाडीसाठी जाईपर्यंत. जणू माझा राखणदार म्हणूनच त्याची नियुक्ती होती. काहीच नसताना अशा गोष्टीही मौज वाटतात. परंतु आणखीन एक छान बोनस माझ्या पदरी पडणार होता, ज्याची मला कल्पना नव्हती.
चहा पिऊन झाला. पैसे देऊन झाले. इकडे तिकडे पाहत असतानाच पल्याडच्या फलाटाला लागून असलेल्या भल्या मोठ्या चिंचेच्या झाडाने लक्ष वेधून घेतले. शेकडो कावळ्यांचे त्या झाडावर संमेलनच भरले होते जणू. सगळे एका सुरात कावकाव करत. थोडा वेळ कावकाव झाली की सगळे एकसाथ आकाशात भरारी घेत. थोड्या घिरट्या घालत. मग इकडे तिकडे; कुणी फलाटावर, कुणी बाकड्यांवर, कुणी गाड्यांवर, कुणी जिन्यावर, कुणी कुठे, कुठे; जाऊन बसत. हळूहळू पुन्हा चिंचेच्या झाडाकडे परतत. सगळे गोळा झाल्याचे कसे कळत असेल ठाऊक नाही. पण सगळे जमले की पुन्हा एकाच सुरात कावकाव. ही कावकाव सुरु होई त्यावेळी एकही कावळा अन्यत्र दिसत नसे. कावकाव संपली की उड्डाण. पुन्हा सगळे चक्र. अगदी तल्लीन होऊन त्यांचा हा संध्याखेळ सुरु होता. मीही तल्लीन होऊन निसर्गाचा तो सुंदर विभ्रम पाहत होतो. मनात आले- रवींद्रनाथांनी असे कावळे पाहिले असतील का? त्यांनी कावळ्यांवर लिहिले आहे का मला ठाऊक नाही. पण लिहिण्याचा मुद्दा आला तेव्हा सहजच माउली आठवून गेलीच. अर्थात माउलीचा कावळा एकच होता. इथे अनेक कावळे कोकत होते. अन मीही त्यातील प्रत्येक काऊ कोणता शकून सांगतोय हे शोधत होतो. बोलपूर स्थानक मनात घट्ट बसलं आणि परतीच्या गाडीत बसलो.
कोलकात्याला पोहोचलो. प्रीपेड taxi केली. गाडीत जाऊन बसलो. गाडी बाहेर काढता काढता चालक म्हणाला- अमुक रस्त्याने वाहतूक खोळंबली आहे, आपण अमुक रस्त्याने जाऊ. अमुक एवढ्यासाठी की मी कोलकतेकर नसल्याने रस्ते लक्षात नाहीत. म्हटले- बरे. तर म्हणाला- तीस रुपये जास्त द्याल. मध्ये टोल पण आहे. मी काही बोललो नाही. गाडी चालू लागली. मधे टोल नाका आला. त्याने हात मागे केला. म्हणाला- १० रुपये. मी २० ची नोट दिली. त्याने पैसे दिले. पावती अन दहा रुपये परत घेतले अन समोर ठेवले. मुक्कामी पोहोचलो. त्याने हात पुढे केला. तो तीस रुपये म्हणाला होता. २० मी दिले होते. म्हणून १० ची नोट पाहिली. ती नव्हतीच. गाडी चालकच बोलला- जाऊ द्या २० देऊन टाका. म्हणजे वाहतूक खोळंबा हे कारण यासाठी होते. माझ्या स्वभावाप्रमाणे एखादा शब्द तरी बोलायला हवा होता पण विश्वभारतीच्या तंद्रीतून बाहेर पडायला मन तयार नव्हतं. त्यामुळे सोडून दिलं. उतरताना मनाने एक नोंद मात्र केली. ही taxi नवीन आलेल्या पांढऱ्या निळ्या taxi पैकी होती. काळ्यापिवळ्या जुन्या taxi पैकी नव्हती. आधीचे जुन्या गाडीवाल्यांचे दोन अनुभव आणि हा नवीन गाडीवाल्याचा अनुभव; मानसिकतेचा बदल सांगून गेले.
विश्वभारतीचा दिवस संपला होता. आज अशी विद्यापीठे, त्यांचे परिसर, निसर्गाच्या साथीने शिक्षणाचे प्रयोग, गुरुकुल पद्धतीचे प्रयोग अन्यत्रही सुरु झाले आहेत. त्यामुळे त्या अर्थाने कदाचित तिथे खूप काही मिळेल असे नाही. पण आजपासून शंभर वर्षांच्या आधी असा प्रयोग करण्याचे ऐतिहासिक महत्व, धाडस, जमीनदार असून शिक्षण- कला- साहित्य- देशभक्ती- यांचा घेतलेला ध्यास; अन हा ध्यास घेणारे मोठ्या उंचीची प्रतिभा लाभलेले रवींद्रनाथ तेथे ३०-३२ वर्षे वावरलेत, तिथल्या मातीशी- निसर्गाशी एकरूप झालेत; त्या निसर्गात त्यांचे श्वास मिसळून गेलेत, अन तेथील लाल मातीत त्यांची पदचिन्हे रुतली- रुजली हा भाव; हे मात्र फक्त शांतीनिकेतनातील विश्वभारतीतच लाभू शकते. सकाळी वेचलेली बकुळफुले खिशातून काढून टेबलवर ठेवली. त्यांचा सुगंध पसरला आणि दिवा मालवून निद्रेला पालवू लागलो.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, ७ जुलै २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा