रविवार, २९ जुलै, २०१८

बंगदेशी ७


दार्जिलिंग तर लक्षात राहणारे आहेच, पण कोलकाता दार्जिलिंग प्रवास कायमचा, आयुष्यभर लक्षात राहणारा झाला. रात्री आठची गाडी होती. स्थानकावर पोहोचलो आणि कुठे लागते गाडी पाहिले तर ती लागली होती `७-ब’ फलाटावर. माझ्या ज्ञानात ही भर होती. फलाट क्रमांक ठीक आहे, पण त्या क्रमांकाला अ, ब, क अशी उपपदे ही माझं ज्ञान upto date करणारी होती. गाडीत बसलो. गाडी धावू लागली. शेजारी चांगले होते. दोघी बहिणी, त्यांचे नवरे, प्रत्येकीची एकएक लग्नाळू मुलगी. कुटुंबवत्सल. त्यांनी डबे उघडले. मलाही निमंत्रण दिले. पण माझे जेवण झाले होते. त्यामुळे निमंत्रण स्वीकारण्याचा प्रश्नच नव्हता. सगळे झोपी गेले.
सकाळी जेथे उतरायचे ते जलपाइगुडी स्थानक यायला एखादा तास असावा. छान ढगाळ वातावरण होते. पाऊस भुरभुरत होता. गाणं गुणगुणावं किंवा कविता फुलावी असा निसर्ग आणि वातावरण खिडकीबाहेर होतं. तेवढ्यात वाफाळता चहा आला. स्वाभाविकच सगळ्यांनी घेतला. चहापान झाल्यावर दोन बहिणींपैकी मोठीने एक छान मोठ्ठा डब्बा काढला. तो होता विड्याच्या पानांचा. त्यात विड्याची बांगला पाने, विड्याचे बाकी सगळे साहित्य नीट ठेवले होते. तिने विचारले- पान खाणार का? नेकी और पूछ पूछ. म्हटले- बिलकुल खाणार. फक्कड चहावर मस्त बांगला पान. ती पान लावत होती. अगदी छान शिरा काढून वगैरे. अधूनमधून विचारत होती, हे टाकू का, ते टाकू का? मीही हो-नाही सांगत होतो. लक्ष मात्र बाहेर होते. तिने असंच काहीतरी विचारलं. मला कळलं नाही. म्हणून मी काय असं विचारलं. त्यावर तिचा नवरा म्हणाला- काथ चालेल का? मी अर्थात हो म्हणालो. ती तीन पानं लावत होती. मी विचारलं- कोण खाणार नाही? नवरोबा म्हणाला- आम्ही दोघे नाही खाणार. म्हणजे दोन पुरुष नाही खाणार. त्यावर विडा लावणारी त्यांना चिडवत म्हणाली- ते गरीब आहेत. त्यामुळे त्यांना शौक परवडत नाहीत. आम्ही श्रीमंत आहोत त्यामुळे आम्ही सगळे शौक करतो. बंगाली कुटुंबाचंही असं छान लोभस चित्र पाहायला मिळालं.
बोलता बोलता तिने तयार झालेला विडा हाती दिला. विडा तोंडात टाकला. चघळायला सुरुवात केली. नजर खिडकीबाहेरच. विड्याची थोडीशी पिंक पोटात गेली.... आणि सगळं शरीर झिणझिणलं. बाहेरचं सगळं सौदर्य वगैरे क्षणार्धात लोप पावलं. पोट ढवळून निघालं, डोकं बधीर झालं. स्वत:ला सावरणं कठीणच्या पलीकडे गेलं. कसा तरी बेसिनजवळ गेलो. सगळं पान थुंकलं. पण तेवढ्या वेळात पोटात जो रस गेला त्याचा प्रताप मात्र सुरूच होता. त्या शौकवालीने पानात मस्त तेज तंबाखू टाकला होता. मी कामातून गेलो होतो आणि त्या दोघी मात्र तंबाखूच्या छान बंगाली पानाचा तब्येतीने आनंद घेत होत्या. थोड्याच वेळात गाडी जलपाइगुडीला टेकली. चक्कर येत होतीच. पोट ढवळत होतंच. काय अन कसं होईल या विचारातच उतरलो. इनमिन दोनच bags पण त्याही उचलवत नव्हत्या. तसाच रिक्षा केला. कारण जलपाइगुडीहून जायचे होते सिलीगुडीला. तेथून दार्जिलिंग.
रिक्षातून जाताना जवळचा बिस्कीटचा पुडा काढला. कारण पाणी पिणे शक्य नव्हते. ते उलटून पडले असते. मात्र आत जे acid secretion सुरु होते ते थांबायलाही हवे होते. म्हटलं, बिस्कीट खाऊन पाहू. चिमणीच्या दाताने कोरत कोरत दोन बिस्किटे कशीबशी खाल्ली. सोपेची डब्बी काढली. हा अनुभव नसल्याने प्रयोग करण्याला पर्याय नव्हता. सोप खात राहिलो चिमुट चिमुट. सिलीगुडी बस स्थानकावर पोहोचलो. उतरण्यापूर्वी पैसे दिले. उतरताना त्याला म्हटलं- या दोन bags तेवढ्या रस्त्याच्या पार करून देतो का? तोवर अगदी गोड बोलणाऱ्या रिक्षावाल्याने पैसे हाती पडले असल्याने थातूरमातुर कारण सांगून नकार दिला. कसेतरी करीत बाकड्यावर जाऊन बसलो. बसला अर्धा तास होता. तंबाखू किती तेज होता कोणास ठाऊक ताळ्यावर येण्याचं काही चिन्ह नव्हतं. किती वेळ आता हे चालणार कळत नव्हतं. बरं एक वेळ चक्कर ठीक आहे, पण उलटी हा त्रासदायक भाग. स्थानकावर सुद्धा दोनदा उलटी करून आलो. सोप खाणे, सोबत खडीसाखर सुरूच होते. तेवढ्यात बस आली. मार्गाला लागली. अन १५-२० मिनिटांनी थोडं शांत वाटायला लागलं. परिणाम सोपेचा होता की हिमालयाच्या नितांतसुंदर हवेचा अन वातावरणाचा माहित नाही. मात्र नंतरचा दोन तासाचा प्रवास अपार रमणीय झाला.
दार्जिलिंग. हिमालयाच्या कुशीत वसलेलं एक छोटं शहर. बाहेरगावाहून शहरात येणारा एक रस्ता. तोच पुढे शहराच्या बाहेर काढून देतो. या रस्त्याचा साधारण ८-१० किमीचा पट्टा आणि त्या रस्त्याच्या खाली दोनेक किमी आणि वर दोनेक किमी एवढं हे दार्जिलिंग. साधारण दोन लाख वस्तीचं. तसं हे इंग्रजांनी वसवलं. इथे वस्ती करू लागल्यावर त्यांनी पहाडाच्या उतारावर चहाचे मळे लावले. त्यात काही संशोधने केली. अन येथील चहा जगात सर्वतोमुखी झाला. नंतर हळूहळू पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आले. वर्षाचे ३६५ दिवस लोक सतत येत जात असतात. परंतु गेल्या वर्षी स्वतंत्र `गोरखास्थान’साठी सात-आठ महिने बंद होता तेव्हा मात्र औषधालाही कोणी आले नाही. कारण मुळात येथील नागरिकच बंदमध्ये १०० टक्के सहभागी होते. जीवनावश्यक सेवा सुद्धा कठीण झाल्या होत्या. एकही दुकान उघडत नव्हते. एकही वाहन चालत नव्हते. आता पुन्हा सगळे सुरळीत सुरु झाले आहे.
शहराचा मुख्य रस्ता पहाटेपासूनच म्हणजे सूर्योदयापूर्वीच फुलू लागतो. कारण सगळ्यांना tiger hill ला जायचे असते. सूर्योदय आणि मुख्य म्हणजे उगवत्या सूर्याची किरणे पडून सोन्यासारखी चमचमणारी कांचनजंगा शिखरे पाहण्यासाठी. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे हे सगळ्यात उंच शिखर. इ.स. १८५२ पर्यंत हे जगातील सर्वोच्च शिखर समजले जात होते. परंतु १८४९ पासून इंग्रजांनी केलेल्या मोजमाप व अभ्यासानुसार १८५६ मध्ये हे जगातले तिसरे शिखर म्हणून घोषित केले गेले. भारत सरकारने पुन्हा एकदा मोजमाप व अध्ययन करायला काय हरकत आहे? ते असो. अशाच पहाटवारीने अस्मादिक देखील tiger hill ला पोहोचले. पण समुद्र आणि डोंगर किंवा पहाड येथे हवामान कधी साथ देईल आणि कधी दगा देईल सांगता येत नाही. येथेही तसेच झाले. त्या दिवशी सूर्य उगवलाच नाही. त्यामुळे `ही समोर दिसतात ती कांचनजंगा शिखरे’ असे म्हणत परतावे लागले. चहाचे मळे तर रस्ताभर भेटतातच. काही वाटाडे विशिष्ट चहा मळ्यात नेऊन आणतात. त्यात फारसा अर्थ नसतो. सिलीगुडीहून दार्जिलिंगमध्ये प्रवेश करतानाच दार्जिलिंग हिमालयन रेल्वेचे चिमुकले स्थानक लागते. तेथून दार्जिलिंग-जलपाइगुडी अशी चिमुकली गाडी चालते. ती गाडी पाहणे आणि त्या इवल्याशा स्थानकावर टाईमपास करणे हा आनंद आहे. त्या गाडीसाठी आधीच आरक्षण करावे लागते. शिवाय वेळ खूप लागतो. त्यामुळे तो प्रवास केला नाही. पण त्या छोट्याशा गाडीने हिमालयाच्या डोंगररांगा पाहत प्रवास करण्यासाठी पुन्हा दार्जिलिंगला जायचे आहे.
कांचनजंगा, मिनी ट्रेन, चहामळे आणि डोळे निवविणारे मुबलक निसर्गसौंदर्य; यासोबत येथे असलेली महत्वाची गोष्ट म्हणजे भगिनी निवेदिता यांची समाधी. अर्थात तिचे महत्व अगदी बोटांवर मोजता येणाऱ्या लोकांसाठी. बाकी कोणाला ते नावही माहिती नसते. मी मात्र आवर्जून गेलो. नव्हे दार्जिलिंगला जाण्याचे ते प्रमुख कारण देखील होतेच. स्वत:चा देश, माणसे, नाती, भाव सगळे सगळे सोडून पूर्ण अंतर्बाह्य भारतमय होऊन, भारतमातेच्याच चरणी देह समर्पित करणाऱ्या भगिनी निवेदितांना वंदन करणे क्रमप्राप्तच होते. शहराच्या मुख्य रस्त्याच्या खूप खाली उतरत उतरत आपण दार्जिलिंगच्या स्मशान भूमीत पोहोचतो. येथेच निवेदितांची समाधी आहे. आताआतापर्यंत ती पडून होती. अलीकडील १०-२० वर्षात तिची देखभाल होऊ लागली आहे. रामकृष्ण मिशनने ती जबाबदारी घेतलेली आहे. तिथे गेलो तेव्हा स्थानिक वाहिनीचे काही लोक तिथे आले होते. त्यांचे चित्रांकन सुरु होते. मी नागपूरहून आलो म्हटल्यावर कौतुक स्वाभाविक होते. बाहेर पडल्यावर कशाचेही कौतुक होऊ शकते अन कशाचेही .......... असो. तर त्या निमित्ताने तिथल्या टीव्हीवर दिसलो असेन. दिसलो की नाही कोणास ठाऊक. की एडिटिंगमध्ये कट झालो. पण स्मशानभूमीत, तेही एवढ्या दूर हिमालयातल्या एक कोपऱ्यातील स्मशानभूमीत टीव्हीसाठी शूट होऊ असं स्वप्नातही कधी कोणाला वाटू शकेल का? हेच जीवन. साधारण अर्धा तास त्यात गेला. त्यानंतर निवेदितांना निवांत भेटलो. त्यांची छोटीशी मूर्ती आणि त्यावर एक छत्री त्याठिकाणी आहे. चारही बाजूंनी कुंपण घातले आहे. आजूबाजूला झाडी अन अंत्यसंस्कारासाठी काही चौथरे. शिवाय एक शिवमंदिर. निवेदितांच्या मूर्तीपुढे जरा वेळ बसलो. एका अनिर्वचनीय भावाने मन भरून गेले. याच ठिकाणी निवेदिता नावाचा तो देह होत्याचा नव्हता झाला होता. हिमालयाचा शीतल वारा त्यांच्याशी त्या क्षणी काय बोलला असेल? काय हितगुज झाले असेल त्या दोघात? कैलासराणाच्या या घरी तो कैलासपती आपल्या या लाडक्या लेकीशी काय बोलला असेल? ज्या कार्यासाठी देह धारण केला होता ते कार्य आटोपून घरी परतलेल्या आपल्या लेकीला त्या चंद्रमौळीने कसे जवळ घेतले असेल? त्या अलौकिक लेकीलाही काय काय वाटले असेल? तिच्याही भावनांची आंदोलने याच हिमसमीराने कान देऊन ऐकली असतील !! असेच काहीबाही. थोडा वेळ त्या भावात घालवून परत माघारी वळलो. उतरताना काही वाटत नाही, पण तेथून पुन्हा वर येताना मात्र चांगलाच दम निघतो. दोन ठिकाणी टेकावे लागले होते.
दुपारी रामकृष्ण मिशनच्या आश्रमात गेलो. तिथे निवेदिता राहत होत्या. वास्तविक ते डॉ. जगदीशचंद्र बोस यांच्या नातेवाईकांचे निवासस्थान. निवेदिता डॉ. बोस यांच्या पाहुण्या म्हणूनच तेथे मुक्कामाला होत्या. बोस पतीपत्नीही त्यांच्यासोबत होते. तेथेच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. बोस दांपत्य त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांच्याजवळ होते. ते पडीक घर आता मिशनने घेतले असून ते जसे होते तसे ठेवण्याचे आणि त्यात नवीन भर घालण्याचे काम सुरु आहे. निवेदिता राहत असत ती खोली नीट करण्यात आली आहे. तेथे निवेदितांची तैलचित्रातील मोठी तसबीर आहे. शिवाय मां सारदादेवी आणि निवेदिता यांच्या भेटीचे छायाचित्र फ्रेम करून भिंतीवर लावले आहे. निवेदितांच्या वापरातील वस्तू आहेत. तेथे बसता येते. खालील मजल्यावर श्रीरामकृष्ण प्रार्थना कक्ष आहे. कोणीही नसल्याने आणि कसलाही अडथळा वा गतिरोध नसल्याने दोन्ही ठिकाणी निवांत बसता आले. या महान आत्म्यांसोबत मौन सुखसंवाद करता आला. खिडकीतून होणारे हिमालयाचे दर्शन, हिरव्यागार दाट वनराईचे दर्शन, क्षणात सूर्यप्रकाश तर क्षणात अंधारगुडूप अशा विलक्षण खेळाची साथ आणि सोबतीला हिमशिखरांवरून येणारा शीतल वारा... वेळ कसा गेला कळलेच नाही. पलीकडच्या कक्षात तरुण विद्यार्थ्यांसाठी काही वर्ग चालतात. त्यासाठी काही विद्यार्थी आले तेव्हा गडबड झाली आणि भानावर आलो. येथील आवारातूनही कांचनजंगा पर्वतराजी दिसते. पण निसर्गराजा फार काही दाखवण्याच्या मनस्थितीत नव्हता त्या दिवशी. रामकृष्ण मिशनचा हा प्रकल्प गावाच्या थोडा बाहेर आहे. तिथून रमतगमत पुन्हा शहरात आलो.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, १३ जुलै २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा