ब्राम्हण ही जात वा व्यवस्था म्हणून अस्तित्वात नाही. खरे तर कोणतीच जात अस्तित्वात नाही. जे काही असेल तर ते त्याचे विखुरलेले निष्प्राण अवशेष. मात्र ब्राम्हणत्व कधीच संपले नव्हते, आजही संपलेले नाही. ऋषीमुनींच्या माध्यमातून, संतमहंतांच्या माध्यमातून, भिक्खुंच्या आणि श्रमणांच्या माध्यमातून; ब्राम्हणत्व सतत वाहते राहिले. संपूर्ण जगाला आर्य, ब्राम्हण, ऋषी स्तरावर पोहोचवणे हेच भारताने आपले ध्येय उराशी बाळगून ठेवले. विचार आणि व्यवहार अधिकाधिक निर्मळ होणे हा त्याच प्रयत्नांचा भाग. महात्मा गांधींनी स्वत:च्या आईला दिलेल्या वचनापोटी विलायतेत शाकाहारासाठी केलेली भटकंती किंवा अलीकडे जगाने `जागतिक शाकाहार दिवस’ साजरा करणे आणि जगभरात शाकाहार करणाऱ्या लोकांची संख्या वाढत जाणे हे ब्राम्हणत्व विस्तारत असल्याचेच लक्षण आहे. केवळ शाकाहार हा मुद्दा नाही. मानवाच्या जगण्याचा स्वरच बदलणे ही मुख्य बाब. कोणता स्वर आहे ब्राम्हणत्वाचा? या स्थूल जगण्यातील प्रत्येक शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्रिया अथवा संवेदन; विनाशी आणि तात्पुरते आहे. जीवनाचा एक याहून वरचा स्तर आहे. तो लौकिक नाही. त्या सर्वोच्च स्तरावर संपूर्ण स्वातंत्र्य, संपूर्ण आनंद, संपूर्ण समाधान, अमरता आहे. उलट या स्थूल जगण्यात प्रत्येक पावलावर मर्यादा, पारतंत्र्य, असमाधान, नश्वरता, ओढाताण आहे. हे जे जीवनाचं वास्तव स्वरूप आहे तो आहे ब्राम्हणत्वाचा स्वर. त्यामुळेच व्यवहारातील नाव, पैसा, प्रतिष्ठा, सन्मान, कौतुक; अशा सगळ्याच गोष्टींची मर्यादा मानवी मनावर बिंबवण्याचा प्रयत्न होत राहिला. मर्यादित जीवन आणि अमर्याद जीवनाची स्वयंभू ओढ यांचा मेळ, समन्वय घालत घालत जगणं बहरत राहिलं. यातूनच श्रेष्ठत्वाचा वेगळा दृष्टीकोन भारतात विकसित झाला.
एक गोष्ट वारंवार लक्षात घ्यायला हवी की, भारताच्या दृष्टीने श्रेष्ठत्व आणि सत्ता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अन्य जगाने या दोन्ही गोष्टी एक केल्या, एकत्रच पाहिल्या, त्यांचा एकत्रित बोध धरून ठेवला. भारताने मात्र श्रेष्ठत्व आणि सत्ता या दोन निराळ्या गोष्टी आहेत असे प्रतिपादन केले. किंबहुना सत्ता नाकारणे हे श्रेष्ठत्वाचे लक्षण ठरले. जोवर हा फरक नीट ध्यानात घेतला जात नाही तोवर अनेक गोष्टींचा उलगडा कठीणच. या चिंतनातूनच `उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा’ अशी नीतीतत्वे विकसित झाली. दुसऱ्याचा विचार, समन्वित विचार, साकल्याने विचार हेच भारताचे विशेष राहिले. व्यक्तिगत लाभहानी किंवा ऐहिकाचा ध्यास नव्हता असे नाही. त्याचे महत्व नव्हते असेही नाही. परंतु त्यासाठी किती आकांत वा उरस्फोड करायची याचा विचारही होत असे. आमच्या सामाजिक पद्धती, व्यवस्था, धारणा, कल्पना या अंगाने पहाव्या लागतात. उलट भारताबाहेरील विचारात या सगळ्याच्या विरोधी सूर दिसतात. भारताने खूप विचारपूर्वक या विश्वातील मर्यादांचा स्वीकार केला. त्याउलट अन्य जगाने या मर्यादा म्हणजे कटकारस्थान असल्याचा तर्क मांडला. अन त्याला अनुसरून संघर्ष हा स्थायीभाव विकसित केला. समन्वय फेटाळला. समन्वय म्हटले की तडजोड येते, कोणाला तरी पाऊल मागे घ्यावे लागते, मनाची, भावनांची, गरजांची ओढाताण होते. ते सारेच त्रासदायक असतेच. परंतु विचारपूर्वक भूमिका घेत राहिले, परिस्थिती- क्षमता- इत्यादी समजून घेत अशा तडजोडी केल्या तर त्रास कमी होतो. याचा अर्थ तडजोडच करायची असा नाही. लढायचे सुद्धा. पण लढण्यापूर्वी कृष्णशिष्टाई आणि गीतेचा आसरा घ्यायला विसरायचे नाही. हे समजून घेतल्याशिवाय भारतातील कोणतीही गोष्ट समजणे कठीण. ती जातीव्यवस्था असो की कुटुंबव्यवस्था. एक लक्षात घेतले पाहिजे की या दोन्ही आज वास्तवात अस्तित्वात नाहीत. परंतु पुढील व्यवस्थांचा विकास करताना कोणती तत्वे विचारात घ्यावी लागतील हे ध्यानात येण्यासाठी हा विचार आवश्यक ठरतो. या पार्श्वभूमीवर पुरुषसत्ताक आणि महिला यांचा विचार करावा लागतो.
श्रेष्ठत्व म्हणजे सत्ता आणि सत्ता म्हणजे श्रेष्ठत्व याच विचारातून भारताबाहेरील लोकांनी भारताकडे पाहिले. अन त्यानुसार विविध जातींचा संघर्ष, स्त्री-पुरुष संघर्ष, जुन्या-नव्याचा संघर्ष, परंपरा-आधुनिकता यांचा संघर्ष, विज्ञान-आध्यात्म यांचा संघर्ष, उत्तर-दक्षिणेचा संघर्ष; अशी मांडणी केली. पण तसे नव्हते. एक तर प्रत्येक व्यक्तीने, गटाने स्वतंत्रपणे फुलण्यातून विविध आचारविचार, भाषा-भूषा इत्यादी विकसित झाले होते. किंवा श्रमविभागणी हे तत्व होते. किंवा सुव्यवस्था हे तत्व होते. हे सगळे लादलेले होते असा निष्कर्ष कशाच्या आधारावर काढला जातो हे समजण्यापलीकडचे आहे.
मुळात व्यवसायांचे स्वरूप गृहउद्योग अशाच स्वरूपाचे होते. लोहार, सुतार, गवळी, तेली वा अन्य व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या घरील महिला घरातच व्यवसायात सहभागी होऊ शकत. काही व्यवसाय घरीच करण्याचे नव्हते पण ते महिलांनी करू नये असा कुठे आदेश नव्हता. शिक्षणाची आजची कल्पना मनात ठेवून जर आम्ही त्यावेळी शिक्षण नव्हते असे म्हणू लागलो तर ते हास्यास्पद म्हणावे लागेल. कष्ट, साधनांची उपलब्धता, सुख या गोष्टी फारशा नव्हत्याच. मी जिथे राहतो त्या ठिकाणी अगदी ५० वर्षे पूर्वी वीज नव्हती, रस्ते नव्हते. यावरून कल्पना करावी. खरं तर आपण कल्पनाही करू शकत नाही. कृष्णधवल चित्रपट पाहून सुद्धा त्या काळाची किती कल्पना आपण करू शकतो? अन तरीही आपण शेकडो, हजारो वर्षांच्या वाटचालीवर बेधडक टिप्पणी करीत राहतो. हे विचित्र आहे. अगदी १९७० च्या दशकात आलेल्या शोले चित्रपटात डाकूंच्या दहशतीचे चित्रण आहे. अगदी अलीकडेपर्यंत चंबळ वगैरे सारखे प्रदेश होतेच. रात्री लुटल्या जाऊ नये म्हणून रेल्वे गाड्या विशिष्ट भागातून रात्री न चालवण्याच्या घटना अगदी दशकभरातल्या आहेत. असे असताना समाजाने, स्त्रियांनी आणि पुरुषांनी मिळून; एकत्रित विचारविनिमय करून कामांचे विभाजन, वाटणी केली नसेल कशावरून? की आम्हीच फक्त विचार करणारे आणि संवेदनशील म्हणून जन्माला आलो आहोत?
सगळा साधकबाधक विचार न करता काहीतरी शब्द प्रचलित करायचे. त्यावर आपल्या मनातील अर्थ चिकटवायचे आणि गोंधळ अन संघर्ष निर्माण करायचा. परस्पर अविश्वास, तणाव, भय निर्माण करायचे; हे शहाणपणाचे नक्कीच नाही. घरची कामे म्हणजे दुय्यम, हिणकस, अन्याय, टाकावू; असं एकदा ठरवलं की मग वाद सुरु होतात. पण मुळात अशी भावना होती का? अशी भावना निर्माण होण्यासारखे जगणे होते का? जे काही जगण्याचे स्वरूप होते त्यातही महिला सण, खेळ, महिलांचे म्हणून काही प्रसंग असे सारे करीत होत्याच. त्यांचं दु:ख व्यक्त होत नव्हतं म्हणताना आपल्या डोक्यात त्यांची पुस्तके एवढाच विचार राहत असेल तर कठीण आहे. मुळात पुस्तके, छापखाने, मुद्रण हे सारे किती जुने आहे. आज सगळे काही बोटांच्या टोकावर येऊनही किती स्त्रिया वा पुरुष लिहितात, वाचतात. किती जणांना त्याची गरज वाटते? आज वेद, उपनिषदे, पुराणे सगळे उपलब्ध असताना किती ते वाचण्याचे, त्याचे अध्ययन करण्याचे कष्ट घेतात? वेद ऐकले की शिक्षा होत असे की नाही ठाऊक नाही, पण आज किती जण त्याचे अध्ययन करतात? मूळ मानवी वृत्ती आज अनेक गोष्टी सुकर झाल्या असताना जर अशी आहे, तर जेव्हा एखाद्या पुस्तकाची प्रत काढायची म्हणजे महिनोनमहिने मान खाली घालून लिहून काढावी लागत असेल; त्यावेळी मानवी वृत्ती कसा विचार करीत असेल? कसला म्हणजे कसला विचार करायचाच नाही असे जर ठरवले तर मात्र गोष्ट वेगळी. मूळ मुद्दा हा की जुन्याचा फार अधिक गूळ न पाडता, त्या समाजाची स्वीकार शीलता किती आहे; बदलांना सामोरे जाण्याची वृत्ती किती आहे; हे बदल स्वीकारताना जुन्याशी असलेला धागा जोडून ठेवून पुढे जाण्याची वृत्ती किती आहे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नव्याचा स्वीकार करताना त्यातील पोषक आणि विनाशक यांचे तारतम्य करण्याची वृत्ती किती आहे; यावर समाजाची पत आणि प्रत ठरते. भारतीय समाजात महिलांना दुय्यम स्थान होते, त्यांना चरकात ढकलणे हेच भारतात केले जात होते; इत्यादी अवास्तव, अर्थहीन, अतिरंजित वादात न अडकता; किंबहुना असे वाद, अशी शब्दावली, अशी भावना प्रयत्नपूर्वक बाजूस सारून वर्तमानाला योग्य प्रतिसाद कसा देता येऊ शकतो याची चर्चा हवी.
या विषयाचा आणखीन एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. वर्तमानाचा स्वीकार करताना उभे राहणाऱ्या आव्हानांचा. तो पुढील भागात.
- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २७ नोव्हेंबर २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा