jack dorsey या ट्विटर सीईओचा आगाऊपणा गाजतो आहे. काही दिवसांनी तो शांत होईल. पण त्या निमित्ताने जे मुद्दे, जे विषय चर्चेत आलेत आणि येताहेत ते समाजमंथनाचे विषय आणि मुद्दे आहेत. ब्राम्हण आणि पुरुषसत्ताक असे दोन विषय आणि हे दोन विषय ज्या तिसऱ्या विषयाशी जोडण्यात आले तो तिसरा विषय म्हणजे महिला. एक बाब सुरुवातीलाच नमूद करण्याची गरज आहे की, या तिन्ही विषयाबाबत शांतपणे, गांभीर्याने आणि साधकबाधक चर्चा आज केली जात नाही आणि कोणाची तसे करण्याची फारशी तयारी नाही. ऐतिहासिक कारणांमुळे या विषयांबाबत बोटचेपी, उथळ, भरकटलेली अशीच चर्चा अधिक होते. मुख्य म्हणजे मनात भय बाळगून भीतीयुक्त विचार होतो. बचावात्मक चर्चा होते. त्यामुळे गाभा सुटून जातो. ऐतिहासिक कारणे दोन प्रकारची आहेत. एक म्हणजे मूळ भारतीय समाजाचा विकासक्रम, त्याचा जीवनप्रवाह आणि दुसरे म्हणजे या समाजाचा बाहेरील जगाशी गेल्या दोन शतकात आलेला संबंध. कोणत्याही जीवनप्रवाहात स्वाभाविकपणे येणारे अडथळे, साचलेपण, त्यातील तात्कालिक आणि स्थायी तत्वे, त्यांचे स्थलकालत्व, उपयुक्तता, उपयुक्ततेच्या कक्षेत न येणाऱ्या गोष्टी; असे अनेक घटक असतात. भारतीय समाजातही हे सारे आहेच. भरीसभर हा जीवनप्रवाह सुदीर्घ असल्याने या सगळ्या घटकांची गुंतागुंत आणि त्याचे स्वरूप समजून घेणे, समजावून देणे अधिकच जिकीरीचे आणि कष्टाचे आहे. त्यामुळे वारंवार वाद आणि गोंधळ होतो अन पुन्हापुन्हा या विषयांची मांडणी करावी लागते.
पहिला मुद्दा ब्राम्हण, ब्राम्हणवाद, ब्राम्हणीपणा इत्यादी. सर्वप्रथम लक्षात घेण्याची गोष्ट ही की अन्य अनेक शब्दांप्रमाणे ब्राम्हण या शब्दाचे विविध अर्थ होतात. त्याच्या संदर्भानेही त्याचे अर्थ बदलतात. मुळात ब्रम्ह जाणतो तो ब्राम्हण येथपासून एक जातीविशेष असे त्याचे अर्थ होतात. पण या वेगवेगळ्या अर्थातून ब्राम्हणपणाची जी लक्षणे डोकावतात ती कोणती? एक म्हणजे नियमबद्ध असणे आणि दुसरे म्हणजे श्रेष्ठत्व भावना. या दोन गोष्टीत ब्राम्हण आणि त्यापासून निघणाऱ्या सगळ्या शब्दांच्या अर्थछटा येऊन जातात. प्रश्न असा की, नियमबद्धता आणि श्रेष्ठत्व भावना यात वावगे काय आहे? आणि हे दोन्ही निर्मूल करता येतात का? ज्या twitter सीईओ वरून हा वाद सुरु आहे त्याचेच उदाहरण घेता येईल. हा वाद सुरु झाल्यावर अशी एक माहिती आली की, तो विपश्यना करण्यासाठी गेलेला आहे. त्यामुळे त्याची प्रतिक्रिया मिळू शकत नाही. तो विपश्यनेला गेल्याने बाहेरील जगाशी संबंध नाही, फोन आदी नाही. हा ब्राम्हणीपणा नाही का? वेगळेपण, नियमबद्धता, व्रतस्थता, त्यातून येणारी मी श्रेष्ठ आहे ही भावना; हे सारे ब्राम्हणत्व नाही तर काय? पण आपल्याला तसे वाटत नाही कारण तो विपश्यना करून परत आल्यावर त्याची मानगूट धरता येईल. मात्र एक गोष्ट खरी की, ब्राम्हण ही वृत्ती आहे. ती मानवाची मूलभूत वृत्ती तर आहेच शिवाय काही प्रमाणात आवश्यक आणि मानवी विकासासाठी योग्य अशीही आहे. हीच वृत्ती संपत्ती संग्रहावर आधारित क्लब मेम्बरशीप इत्यादीत सुद्धा झळकते. शशी थरूर ज्यावेळी विमानातील सामान्य वर्गाला cattel class म्हणून हिणवतो त्यावेळी हीच वृत्ती असते. मग भारत आणि अन्य जग यात फरक काय आहे? भारताने या वृत्तीची सांगड ज्ञान, तपश्चर्या, आध्यात्म, स्वाध्याय, अध्ययन, अध्यापन यांच्याशी घातली आणि व्रतस्थ साधेपणाची बंधने घालून तिला प्रवाहित केले. अन्य जगाने तिचा शास्त्रशुद्ध विचार न करता मोकळे सोडून दिले. स्वाभाविकच मानवाच्या उतरणीला लागण्याच्या स्वभावाप्रमाणे ती वृत्ती आकार घेत गेली आणि सत्ता आणि संपत्तीची बटिक बनली. ब्राम्हण वृत्तीला विशेषाधिकार दोन्हीकडे मिळाले. पण भारतात विशेषाधिकार हे पैसा आणि सत्ताविहीन राहिले. भारताबाहेर ते पैसा आणि सत्ताश्रीत राहिले. म्हणूनच स्वामी विवेकानंद ठणकावून सांगत असत- `तुमच्या डॉलरवर आधारित जातिभेदापेक्षा भारतीय जातीव्यवस्था खूप सरस आहे.’ मात्र, कोणत्याही जीवमान घटकाप्रमाणे त्या व्यवस्थेत दोष आले, त्या व्यवस्थेची वाताहत झाली. परंतु त्या व्यवस्थेने जे काही पोषण केले होते त्याचे काही गुण कायमही राहिलेत. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर किंवा गाडगे बाबा जेव्हा या साऱ्याबाबत बोलत तेव्हा त्यात जो विवेक राहत असे, त्यात आक्रस्ताळेपणाचा अभाव राहत असे आणि त्यात जी सुजाण समजूत राहत असे ती बाकीच्यांमध्ये राहत नाही. ब्राम्हण ही काही हलक्याने घेण्याची गोष्ट नाही, काहीतरी अंगात आल्यासारखे करून जाळून टाका, फोडून टाका, फेकून द्या; असे करण्याची गोष्ट नाही. त्यातील दुष्टपणा, स्वार्थीपणा काढून टाकायला हवा एवढेच. त्यामुळेच गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून ब्राम्हणी आचारांचे, उच्चारांचे अनुकरण करायला सांगत. मिलिंद महाविद्यालयात शिक्षक नियुक्त करताना बाबासाहेब आंबेडकर यांनी आवर्जून ब्राम्हण शिक्षक नियुक्त केले. किंवा रोष व्यक्त करण्यासाठी आणि प्रतिकात्मक म्हणून मनुस्मृती जाळली तरीही तिच्यातील त्यांना योग्य वाटलेल्या गोष्टींचा आणि मनूचाही त्यांनी गौरव केला आहे. भारतीय समाज व्यवस्थेने सगळ्या समाज घटकांना काही ना काही आर्थिक संरक्षण दिलेले आहे, असे गौरवोद्गार देखील कोकणातील खोत कायद्याबाबत विधिमंडळात बोलताना त्यांनी काढले होते. समग्रतेने विचार करून विवेकाने वागणे, बोलणे हीच त्यांची महानता होती.
ज्यांना आपले अन्य हेतू साध्य करायचे होते आणि आहेत त्यांना मात्र हा विवेक आणि विचार करण्याची गरज नसते. त्यामुळेच ब्राम्हण या शब्दाबाबतही असाच भ्रम, अविचार, विवेकशून्यता सहेतूक पसरवली गेली. ब्राम्हण शब्दही काळाच्या ओघात लोप पावला असता तरीही हरकत नव्हती पण आपले दुष्ट हेतू साध्य करण्यासाठी तो जिवंत ठेवण्यात आला आणि त्याला सगळ्या वाईट गोष्टी, हिणकस गोष्टी जोडण्याची जणू स्पर्धा लागली. महात्मा गांधींच्या हत्येसारख्या घटनांनी त्या प्रयत्नांना बळही दिले. राजकीय सत्तालाभासाठी झालेले असे प्रयत्न तर अगदीच बटबटीत असतात. हे प्रयत्न देशातच होतात असे नाही तर विदेशातील सहेतूक प्रयत्नही असतात. माणसाची एक वृत्ती असते. गोष्टी एकमेकांना जोडण्याची. जसे अनेकांना सवय असते मोठ्या व्यक्तींबरोबर फोटो काढून घ्यायची. कुठेतरी, कोणत्या तरी निमित्ताने फोटो काढला जातो. मग तो फोटो दाखवून स्वत:ची पत वाढवून घ्यायची. किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या बातमीत आभार प्रदर्शनाच्या निमित्ताने का होईना आपले नाव येण्यासाठी खटपट करणारे असतातच. का? वलय प्राप्त होते. वास्तविक संबंध नसतो, पण तो असल्याचे भासवून काही साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. ही जी गोष्टी जोडण्याची वृत्ती आहे त्याचा उपयोग अनेकदा अक्कलहुशारीने केला जातो. मग संस्कृत, शुद्ध बोलणे, जेवणापूर्वी श्लोक- मंत्र म्हणणे, वागण्या- बोलण्याच्या, खाण्यापिण्याच्या सवयी, अगदी पान वाढण्याची पद्धत, आवडीनिवडी, वेशभूषा, मर्यादा अशा छोट्या छोट्या गोष्टींना सुद्धा `ब्राम्हणी’ असा शब्द चिकटवायचा आणि या गोष्टींचे साहचर्य, ऐक्य लोकांच्या मनावर बिंबवायचे. हेटाळणीच्या अंगाने त्याची चर्चा करायची आणि त्याबाबत नकारात्मक मानस तयार करायचे. सगळ्यांना सुरक्षात्मक पवित्र घ्यायला लावायचा. अशी ही खेळी असते.
एक उदाहरण या निमित्ताने आठवतं. नागपूर श्रमिक पत्रकार संघाने ज्येष्ठ संपादक मामासाहेब घुमरे यांच्या मनोगताचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. तेव्हा बोलताना त्यांनी एक किस्सा सांगितला होता. नागपूरला बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर चंद्रपूरलाही असा एक कार्यक्रम झाला होता. पत्रकार म्हणून मामासाहेब घुमरे त्यासाठी गेले होते. त्यानंतर झालेल्या भोजनाच्या वेळी, बाबासाहेबांनी वाढणाऱ्या लोकांना आवाज देऊन सांगितले होते की- `तो घुमरे आहे ना तो बामन आहे. त्याला आपले हे (मांसाहारी) चालत नाही. त्याला वाढताना काळजी घ्या.’ बाबासाहेबांचा आक्षेप आणि अन्य लोकांचे विरोध यातील फरक समजून घ्यायला हा एक प्रसंग पुरेसा आहे.
ब्राम्हण वृत्ती ही मानवाची मूलभूत वृत्ती आहे. तिला वळण लावणे आणि योग्य पोषण देणे मानवी विकासासाठी आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट साध्य करायची असेल तर त्यासाठी मर्यादा आखून घ्याव्या लागतात, काही यम नियम निश्चित करून पाळावे लागतात, काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात, काही गोष्टी करता येणार नाहीत हे लक्षात घ्यावे लागते, नियमपालन करावे लागते. अमुक गोष्ट साध्य करून आपल्याला श्रेष्ठत्व प्राप्त करावयाचे आहे ही भावना एक प्रबळ प्रेरणा असते. श्रेष्ठत्वाची ही भावना नसेल तर माणूस हीनत्व भावनेने ग्रासतो, निराशेत जातो आणि हळूहळू संपत जातो. यासाठी साध्य विचारपूर्वक ठरवावे लागते. भारताने दीर्घ विचारांती हे साध्य भारतीय जनसमुहापुढे ठेवले. जीवनाचा आध्यात्मिक आशय हे ते साध्य होय. ऐहिकता ही साधनांपुरती आहे आणि आध्यात्मिकता हेच शाश्वत जीवन आहे, हा विचार भारतीय चिंतकांनी समाजापुढे ठेवला. याने अनेक गोष्टी साध्य झाल्या. जीवनातील विफलता निपटून काढण्यात आली. ऐहिकतेसंबंधीचे वखवखलेपण नियंत्रित केले गेले. एकाच वेळी आंतरिक समाधान आणि बाह्य व्यवस्था यासाठी आवश्यक मानस तयार केले. या पायावरच भारताच्या धार्मिक, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, सांस्कृतिक व्यवस्था; जाणीवा, कल्पना, संकल्पना, कला, क्रीडा या सगळ्यांनी आकार घेतला. हळूहळू नियमबद्धता, व्रतस्थता, श्रेष्ठत्व जाणीव ब्राम्हण जातीच्या (अध्ययन, अध्यापन, पौरोहित्य) बाहेर नेण्याचे प्रयत्नही झाले. वारकरी संप्रदाय हे असे उदाहरण म्हणता येईल. आजही लोक श्रावणात मांसाहार करत नाही, हेदेखील ब्राम्हणत्व संपूर्ण समाजात; जात निरपेक्षपणे रुजवण्याच्या प्रयत्नाचे उदाहरण म्हणता येईल. ऐहिक उपभोग मर्यादित प्रमाणात आणि मर्यादित रीतीने घ्यावेत हा विचार समाजभर रुजवण्याचे प्रयत्न होत राहिले. हे सगळे जबरीने नव्हते. सत्तेच्या आधारे तर नव्हतेच. म्हणूनच आचार विचारांचे असंख्य नमूने पाहायला मिळतात. याने ऐहिकतेला अडथळा केला होता असेही नाही. सोन्याचा धूर निघत असे किंवा भिकारी सापडत नव्हते किंवा घरांना कुलुपे लावत नसत अशा प्रकारची जी वर्णने ऐकायला, वाचायला मिळतात ती काय सांगतात? खाणेपिणे, वस्त्रप्रावरणे, इमारती, भाषा, गणित, आयुर्वेद, पारिभाषिक शब्द, कथाकहाण्या, नृत्य- नाट्य- साहित्य-, दर्शने, सिल्क रूट, विविध देशांचे लोक इथे येऊन जाणे, विविध देशांची आक्रमणे, विविध राजे, राजघराणी, व्यवसाय याबाबत उपलब्ध माहिती; हे सगळे ऐहिकतेला नाकारून कसे शक्य होईल. हां, दोनच गोष्टी होत्या एक म्हणजे सातत्याने विविध प्रकारे जीवनाच्या संपूर्णतेचा संस्कार आणि व्यावहारिक मर्यादा आणि विवेक. अर्थात ही मर्यादा आणि विवेक यामागेही संपूर्ण समाजाचा विचार हीच प्रेरणा होती. इसवी सनाच्या सातव्या शतकापासून झेललेल्या विविध आक्रमणांनी दोन गोष्टी झाल्या. एक म्हणजे विस्कळीतपणा आला आणि सुरक्षात्मक उपाय मोठ्या प्रमाणावर करावे लागले. चिंतन, सुधार, व्यवस्था थांबून गेले.
आक्रमकांनी हे सगळे समजून न घेणे स्वाभाविक होते. आकलन न झाल्याने आणि स्वत:चे वर्चस्व टिकवण्याच्या गरजेपोटी; अशा दोन्ही रीतीने त्यांनी भारतीय समाजाचे चित्रांकन आणि मूल्यांकन केले. शिवाय वीज, वाहने, उद्योग, दळणवळण, विज्ञान तंत्रज्ञान, इंटरनेट, संगणक; हे तर जगभरातच अगदी अलीकडचे. त्यांचा आर्थिक, सामाजिक परिणाम सगळ्या जगावर कसा झाला आणि होत आहे; हे नजरेआड करून जुन्याचे विश्लेषण, मूल्यांकन केले जाते. या सगळ्या आधुनिक गोष्टींच्या आधी, म्हणजे तीनचारशे वर्षे पूर्वी जगभरातील समाज कसे होते याचा विचार करण्याची फुरसत फारशी कोणाला नसते. त्यातच गेल्या शंभरेक वर्षात, विशेषतः गेल्या ६०-७० वर्षात जगभरात मानवी मूल्यांची जागा उपभोगवादी आणि उपयुक्ततावादी मूल्यांनी कशी घेतली हे न पाहता आणि त्याची अनुभवावर आधारित साधकबाधक चर्चा न करता; ती उपभोगवादी आणि उपयुक्ततावादी मूल्येच योग्य आणि आवश्यक आहेत असे गृहित धरून; मतप्रदर्शन आणि विचार केला जातो. jack dorsey ला देण्यात आलेले आणि त्याने प्रदर्शित केलेले पोस्टर आणि त्यात उल्लेखित ब्राम्हणी, पुरुषसत्ताक हे उल्लेख आणि महिला वर्गाशी ते जोडून देण्याची चलाखी; याचाच परिणाम आहे. पुरुषसत्ताक आणि महिला हे दोन मुद्दे पुढील भागात.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २४ नोव्हेंबर २०१८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा