राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दरवर्षी उन्हाळ्यात होणाऱ्या संघ शिक्षा वर्गांचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. संघाचे काम करण्यासाठी कुशल कार्यकर्ते तयार करण्यासोबतच, संघाची कार्यपद्धती, तंत्र आणि भाव जागृती या अंगाने या संघ शिक्षा वर्गांकडे पाहता येते. या संघ शिक्षा वर्गांची सुरुवात १९२७ च्या उन्हाळ्यात झाली. कार्यकर्ता कोठेही जाऊन काम करू शकला पाहिजे, हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून हा उपक्रम सुरु झाला. संघात त्यावेळी मुख्यत: तरुण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचाच भरणा होता. त्यांना उन्हाळ्यात सुटी राहत असे. त्यामुळे उन्हाळा सोयीचा होता. पहिल्या संघ शिक्षा वर्गात १७ तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यावेळचे स्वरूपही वेगळे होते. त्यात सकाळ, संध्याकाळ शारीरिक कार्यक्रम, खेळ, कवायत यासोबतच दुपारी ४-४.३० तास चर्चा, गप्पागोष्टी, टिपणे असे चालत असे. आठवड्यातून तीनदा बौद्धिक वर्ग होत असे. डॉक्टर हेडगेवार कधी कधी स्वयंसेवकांना पोहायलाही घेऊन जात. जेवण व निवास मात्र प्रत्येकाचा आपापल्या घरीच राहत असे. सारेच स्वयंसेवक नागपूरचेच असल्याने वेगळी व्यवस्था करण्याची गरजच पडली नाही. तशी व्यवस्था करण्याची त्यावेळी कल्पनाही नव्हती आणि शक्तीही नव्हती. त्यावेळी चालणाऱ्या university officers training camp च्या धर्तीवर या वर्गाचे नामकरणही officers training camp असेच झाले. त्याचे लघुरूप OTC हेच त्यानंतर बरीच वर्षे रूढ होते. अजूनही अनेकांच्या ओठी OTC रुळलेले आहे. आता मात्र सर्वत्र देशभरात संघ शिक्षा वर्ग असेच रूढ झाले आहे.
त्यानंतर हळूहळू या उन्हाळी संघ शिक्षा वर्गांना आकार प्राप्त होत गेला. नागपूरबाहेर पुण्याला संघ शिक्षा वर्ग सुरु झाला. कार्यकर्त्यांच्या उपलब्धतेनुसार नंतर हळूहळू देशभरात संघ शिक्षा वर्ग सुरु झाले. शारीरिक व बौद्धिक अभ्यासक्रमाची रचनाही हळूहळू झाली. त्यानंतर त्याचे प्रथम, द्वितीय, तृतिय वर्ष असे विभाजन करण्यात आले. तृतिय वर्षाचा वर्ग फक्त नागपुरात होतो. स्वयंसेवकांना संघाच्या या स्थापना भूमीतून आणि संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या कर्मभूमीतून प्रेरणा मिळावी, हा यामागील हेतू. नागपूरच्या शुक्रवारी भागातील डॉ. हेडगेवार यांचे घर, तसेच संघाचे मुख्यालय असलेले आणि दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्यापासून पुढील सर्व सरसंघचालकांचे निवासस्थान असलेले; डॉ. हेडगेवार भवन म्हणून ओळखले जाणारे; नागपूरच्या महाल भागातील संघाचे कार्यालय पाहण्याचाही एक कार्यक्रम तृतिय वर्षाच्या वर्गात असतो. शिवाय ज्या ठिकाणी हा वर्ग होतो तेथे डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाध्याही आहेत. या साऱ्याशी असलेले स्वयंसेवकांचे भावनिक नाते लक्षात घेऊनच तृतिय वर्षाची योजना नागपुरात करण्यात आली आहे.
संघ शिक्षा वर्गाचे आयोजन जसजसे नागपूर बाहेर होऊ लागले, तसतसे प्रथम व द्वितीय वर्षाचे वर्ग प्रत्येक प्रांताचे स्वतंत्रपणे होऊ लागले. अर्थात हे टप्प्याटप्प्याने होत गेले. सगळ्या प्रांतात एकदम उन्हाळी वर्गांची सुरुवात झाली नाही. सुरुवातीला जे स्थान जवळ असेल तेथे स्वयंसेवकांनी जावे, अशी योजना होत असे. आता मात्र सगळ्या प्रांतात वर्ग होऊ लागले आहेत. साधारण २५ वर्षांपूर्वी या आयोजनात थोडा बदल करण्यात आला आणि प्रथम वर्षांच्या वर्गाचे आयोजन प्रांत स्तरावर, द्वितीय वर्षाच्या वर्गांची योजना क्षेत्रीय स्तरावर आणि तृतिय वर्षाची योजना अखिल भारतीय स्तरावर नागपूर येथे होऊ लागली. प्रथम व द्वितीय वर्षाच्या वर्गांची स्थाने दरवर्षी वेगवेगळी असतात. तृतिय वर्षाचे स्थान मात्र ठरलेले आहे. त्यात बदल होत नाही. या वर्गांच्या कालावधीतही वेळोवेळी बदल होत आले आहेत. सुरुवातीला संघ शिक्षा वर्ग ४० दिवसांचा राहत असे. मग हा कालावधी एक महिन्याचा करण्यात आला. त्यानंतर प्रथम व द्वितीय वर्षांचा कालावधी बदलून १५ दिवस व २१ दिवस करण्यात आला. याच वर्षीपासून (इ.स. २०१३) तृतिय वर्षाचा कालावधीही २५ दिवस करण्यात आला आहे.
नागपूरचा विचार करायचा तर १९८१ पर्यंत नागपूरचा प्रथम, द्वितीय व अखिल भारतीय असलेला तृतिय वर्षाचा वर्ग एकत्रच होत असत. सगळ्यांची भोजनाची व्यवस्था एकत्रच राहत असे आणि संघस्थानही एकत्रच राहत असे. निवास आणि बौद्धिक वर्ग मात्र वेगवेगळे राहत असत. १९८२ पासून मात्र तृतिय वर्षाचा वर्ग पूर्णपणे स्वतंत्र रुपात होऊ लागला. निवासासाठी इमारती नसल्याने परिसरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये निवासाची सोय राहत असे. त्या निवासस्थानाहून संघस्थानासाठी आणि भोजनासाठी येणेजाणे करावे लागत असे. अगदी प्रारंभीच्या काळात तर सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचीही निवास व्यवस्था मोहता विज्ञान महाविद्यालयातच राहत असे. बौद्धिक वर्ग आणि भोजनासाठी तट्ट्याचे मांडव असत. पंखे वगैरे नसत. मोहता विज्ञान महाविद्यालयात काही खोल्यात असलेले पंखे तेव्हाचे नागपूरचे अधिकारी स्व. विनायकराव फाटक यांनी वर्ग काळासाठी काढायला लावले होते, अशीही आठवण सांगितली जाते. नंतर हळूहळू रेशीमबागेत सुसज्ज निवासव्यवस्था उभी राहिली.
सुरुवातीला नागपूरच्या स्वयंसेवकांना शुल्क कमी भरून, घरून जेवणाचा डबा मागवण्याची सोय होती. संबंधित शाखांचे स्वयंसेवक रोज डबे पोहोचवून देत असत. आर्थिक दृष्ट्या दुर्बल स्वयंसेवकांनाही वर्गापासून वंचित राहावे लागू नये म्हणून ही सोय होती. काही कारणांनी नंतर ही सवलत बंद करण्यात आली. एखादा कार्यकर्ता चांगला असेल आणि त्याची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसेल तर त्याचे शुल्क गोळा करून त्याला वर्गाला पाठवण्याचे प्रसंगही नागपुरात आणि देशभरातही घडले आहेत. एक स्वयंसेवक अतिशय गरीब होता, पण त्याची इच्छा होती वर्गाला येण्याची. त्यावेळी डॉ. हेडगेवार यांनी त्याला वर्गातील मोकळ्या वेळात शिक्षार्थ्यांच्या गणवेशाच्या इस्त्रीचे काम करण्यास परवानगी दिली. त्या स्वयंसेवकाने आनंदाने ते काम केले आणि त्यातून जमा झालेल्या पैशातून वर्गाचे शुल्क भरले, अशीही एक आठवण जुने लोक सांगतात.
संघ शिक्षा वर्गाच्या स्वरुपासोबतच त्यातील शारीरिक व बौद्धिक कार्यक्रमातही वेळोवेळी बदल होत आले आहेत. पूर्वी सर्वत्र आखाड्यांमध्ये प्रचलित असलेले खड्ग, छुरिका आदी प्रकार होते. वेत्रचर्म होते. आता ते प्रकार नाहीत. योगासन, योगचाप, नियुद्ध हे प्रकार बरेच उशिरा शारीरिक अभ्यासक्रमात समाविष्ट झाले. बौद्धिक वर्गांचे विषय काळानुरूप बदलले आहेत. पूर्वी प्रवचन हा भाग राहत नसे. आता त्याचा समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीला संघाबाहेरील मान्यवरांनाही बौद्धिक वर्गासाठी बोलावले जात असे. हळूहळू अभ्यासू कार्यकर्ते तयार होऊ लागले, संघाचा व्याप वाढला, अनुभव वाढू लागला; तसे हा प्रकार बंद झाला. आता प्रवचनांसाठी मात्र बाहेरील मान्यवरांनाही बोलावले जाते.
विविध प्रयोगही वर्गात केले जातात. एखादा दिवस मौन पाळले जाते. म्हणजे, सारी कामे न बोलता करायची. अशा वेळी, सुमारे हजारेक स्वयंसेवक त्या परिसरात असूनही एकदम शांतता असते. वस्तू भांडारातून आपल्याला हवी ती वस्तू घ्यायची. त्याचे पैसे तेथील पेटीत आपणच ठेवायचे. जो काही हिशेब असेल तो आपणच नीट पार पाडायचा. कोणी `दुकानदार’ न राहता व्यवहार करायचे. असे प्रयोग केले जातात. सेवा हा विषयही त्या मानाने नवीन असून, त्याची तात्त्विक बैठक आणि प्रत्यक्ष कार्यानुभव या दोन्हीचा समावेशही वर्गात असतो.
अनेक वर्षे रेशिमबागचा वर्ग पार पाडण्याची जबाबदारी नागपूरच्या स्वयंसेवकांवरच राहत असे. शारीरिक शिक्षक, चर्चा प्रवर्तक, व्यवस्था सांभाळणारे स्वयंसेवक सारे नागपूरचे. नागपूरबाहेरील वर्गातही आवश्यकतेनुसार नागपूरहून स्वयंसेवक पाठवले जात. बाहेरील प्रांतात शिक्षक, मुख्य शिक्षक म्हणून अनेक वर्षे गेलेले स्वयंसेवक आजही नागपुरात आहेत. आता मात्र सर्वत्र स्वयंसेवक उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे तर नागपूरच्या वर्गातही मुख्य शिक्षक, शिक्षक वेगवेगळ्या ठिकाणांहून येत असतात. एका अर्थाने नागपूरचा भार किंचित हलका झाला आहे. अगदी अलीकडेपर्यंत सर्व वयोगटातले स्वयंसेवक या वर्गात राहत असत. आता मात्र ४० वर्षावरील ज्या स्वयंसेवकांनी संघ शिक्षा वर्गाचे शिक्षण पूर्ण केलेले नाही, त्यांच्यासाठी स्वतंत्र वर्गांची योजना करण्यात आली आहे.
तृतिय वर्षाचा वर्ग हा अखिल भारतीय स्वरूपाचा असल्याने सगळ्या प्रांतांचे, विविध भाषा बोलणारे स्वयंसेवक त्यात असतात. गणांची रचना करताना, प्रत्येक गणात जास्तीत जास्त विविधता आणण्याचा प्रयत्न करण्यात येतो. विविध भाषांचे स्वयंसेवक एकत्र राहतात. भाषा कळत नसली तरीही त्यांच्यात व्यवहार तर होतातच, पण स्नेह आणि सौहार्दही निर्माण होते. अनेक जण दुसऱ्या भाषा शिकण्याचा प्रयत्नही करतात. वेगवेगळ्या भाषांची गीते गायली जातात. एखादी भाषा येत नसतानाही त्या भाषेचे गीत मात्र पाठ झालेले असते. भाषांबद्दलचा टोकदारपणा गळून पडणे आणि आपुलकी वाढीस लागणे हे या वर्गात गेली अनेक दशके सहजपणे होत आले आहे. ज्या प्रांतात हिंदी प्रचलित नाही, त्या प्रांतातील स्वयंसेवकांसाठी बौद्धिक वर्गाचा अनुवाद सांगितला जातो. हाच भाव भोजनाच्या बाबतीतही पाहायला मिळतो. प्रत्येक प्रांतातील आहार अन त्याच्या सवयी वेगळ्या असतात. पण सगळे स्वयंसेवक वर्गात जी व्यवस्था असेल त्यानुसार सहज व्यवहार करतात. नागपूरचा उन्हाळा हा तर सगळ्या देशातच प्रसिद्ध आहे. पण भर मे महिन्यात सूर्य आग ओकत असताना स्वयंसेवक धुंदीत राहत असतात. अर्थात वैद्यकीय सेवा उपलब्ध असतेच. महिनाभराचा हा वर्ग ही एक प्रकारची तपश्चर्याच असते. अर्थात नुसते काही गोष्टींचे शिक्षण देणे हा केवळ या वर्गाचा हेतू नसून संघाच्या कामासाठी आवश्यक असा कार्यकर्ता निर्माण करणे हा उद्देश असल्याने, हे तप स्वाभाविकच ठरते.
संघ शिक्षा वर्गांचा विचार करताना तीन-चार वर्गांचा विशेष उल्लेख आवश्यक ठरतो. एक म्हणजे, १९४० चा पुण्याचा संघ शिक्षा वर्ग. या वर्गातच सर्वप्रथम आज प्रचलित असलेली संघाची संस्कृत प्रार्थना म्हणण्यात आली. तोवर एक हिंदी श्लोक व एक मराठी श्लोक असलेली प्रार्थनाच शाखा, शिबिरे, संघ शिक्षा वर्ग सर्वत्र म्हटली जात असे. दुसरा उल्लेख त्याच वर्षीच्या नागपूरच्या वर्गाचा करावा लागेल. कारण त्याच वर्गात प्रथम देशाच्या सगळ्या प्रांतातून स्वयंसेवक सहभागी झाले होते. अन डॉ. हेडगेवार यांनी त्यांचे ऐतिहासिक आणि अखेरचे भाषणही याच वर्गात केले होते. त्यात `मी आज संपूर्ण भारताचे लघुरूप माझ्यापुढे पाहत आहे,’ असे उद्गार त्यांनी काढले होते. त्यानंतर १९७३ च्या वर्गाचा उल्लेख करावा लागेल. हा वर्ग सुरु असतानाच, दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे देहावसान झाले होते. उल्लेखनीय हे की, उरलेला साधारण एक आठवड्याचा वर्ग त्यानंतरही पूर्ण करण्यात आला होता. फक्त अंत्यसंस्काराचा एक दिवस वर्गाचे दैनंदिन कार्यक्रम स्थगित होते.
संघावरील पहिल्या दोन्ही बंदी नंतरच्या वर्षी संघ शिक्षा वर्ग झाले नव्हते. बंदीची वर्षे अन त्यानंतरचे वर्ष एवढा अपवाद वगळला तर १९२७ पासून सुरु झालेले हे वर्ग अखंडपणे सुरु आहेत. गांधीजींच्या हत्येनंतर जी बंदी आली होती, त्याने संघाचे कार्य खूपच विस्कळीत झाले होते. खूप पडझड झाली होती. मानसिकताही खचली होती. पुन्हा सारे सावरून धरण्यासाठी खंबीर कार्यकर्त्यांची गरज होती. त्यामुळे १९५१ साली वर्षभर नागपुरात संघ शिक्षा वर्ग झाले होते. एक वर्ग संपला की दुसरा, अशी आठवण सांगितली जाते. त्याचा नेमका तपशील मात्र उपलब्ध नाही.
१९४० च्या नागपूरच्या वर्गात देशभरातील १४०० स्वयंसेवक सहभागी झाले होते. देश विभाजनाच्या वेळी १९४७ साली पंजाबच्या संगरुर व भोगपूर या दोन ठिकाणी वर्ग झाले होते. यात २५८६ स्वयंसेवक सहभागी झाले होते. यात आज पाकिस्तानात असलेल्या लाहोर शहरातील अनेक स्वयंसेवकही होते. १९४७ च्या उन्हाळ्यात त्या भागात जी परिस्थिती उत्पन्न झाली होती त्यामुळे हे वर्ग १० दिवस आधीच संपवण्यात आले होते. प्रत्यक्ष लाहोर शहरात १९३८ व १९३९ साली संघ शिक्षा वर्ग आयोजित करण्यात आले होते. १९३८ साली डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजी त्या वर्गाला गेले होते. १९३९ साली मात्र डॉ. हेडगेवार प्रकृती बरी नसल्याने लाहोरला गेले नव्हते, पण गुरुजी गेले होते. १९७१ साली १८ स्थानी वर्ग होते. गेल्या वर्षी ५२ स्थानी वर्ग झाले होते आणि त्यात साडेसोळा हजार स्वयंसेवक सहभागी झाले होते. वर्गांचा व्याप खूप वाढला, कालावधी मात्र तेवढाच (एप्रिल, मे, जून) आहे, प्रत्येक ठिकाणी पुरेसा वेळही दिला गेला पाहिजे; यामुळे सरसंघचालक आणि सरकार्यवाह सगळ्या वर्गांना भेटी देऊ शकत नाहीत. अर्ध्या वर्गांना सरकार्यवाह भेट देतात तर, अर्ध्या वर्गांना सरसंघचालक भेट देतात. नागपूरच्या तृतिय वर्षाच्या वर्गात मात्र दोन्ही सर्वोच्च अधिकारी आणि सगळे अखिल भारतीय अधिकारी भेट देतात. एक अखिल भारतीय अधिकारी पूर्ण दिवस वर्गात उपस्थित असतात. सगळ्या स्वयंसेवकांशी संपर्क, संवाद व्हावा यासाठी ही योजना करण्यात आली आहे.
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २९ मे, २०१३
बुधवार, ८ मे, २०१३
बोलाचीच कढी, बोलाचाच भात
पुन्हा एकदा जुनाच खेळ सुरु झाला आहे. भारतीय जनता पार्टी संसद बंद पाडते आहे आणि सत्तारूढ कॉंग्रेस पक्ष चर्चा करण्याचे आवाहन करीत आहे. कोण योग्य, कोण अयोग्य याच्याही चर्चा झडत आहेत. त्याच्या पलीकडे पाहण्याची मात्र आमची तयारी नाही. `त्यांची तयारी' असे न म्हणता, `आमची तयारी' म्हटले याला कारण आहे. कारण हे की, राजकीय पक्ष व त्यांचे आखाडे सोडून बाकी जो समाज आहे त्याचीही मुळात जाऊन विचार करण्याची तयारी नाही. नोकरी, व्यवसाय, बँक बॅलन्स, निरनिराळे ब्रान्डस, हॉटेल्स, फॉरिन ट्रिप्स यात गुंतलेला मोठा समाज; उन्हातान्हात चार बादल्या पाणी कसं मिळवायचं यात गुंतलेला समाज; विविध पक्षांचे झेंडे खांद्यावर घेऊन उभा असलेला समाज; यांना या साऱ्याशी देणेघेणे नाही. जे यावर चर्चा वगैरे करतात त्यातील बहुसंख्य लोकांचे या ना त्या प्रकारे हितसंबंध गुंतलेले. त्यामुळे त्यांच्या चर्चेतून काही निष्पन्न होत नाही. पण या सगळ्या परिस्थितीत एका गोष्टीकडे आमचे दुर्लक्ष होते. ते म्हणजे, आपली इच्छा असो वा नसो; आपल्याला आवडो वा नावडो राजकारण आणि राजकीय व्यवस्था आपल्या जगण्यावर परिणाम करीत असतात. म्हणूनच त्याबद्दल सजग, संवेदनशील, विचारी असणे आवश्यक आहे. पण हे विचारी असणे म्हणजे कोणत्या तरी पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणे नव्हे.
आज आम्ही स्वीकारलेल्या व्यवस्थेत संसद सर्वोच्च आहे. लोकशाहीचे मंदिर वगैरे प्रकारे त्याचे वर्णन केले जाते. पण त्या मंदिरातील देव कोण? पंतप्रधान, मंत्री, खासदार, की सभागृहाचे अध्यक्ष? संसदेला दिलेली ही उपमा थोडी अधिकच ताणली जाते असे म्हटले आणि एका मर्यादेत त्याचा विचार करायचे म्हटले तरी काय दिसते. संसदेत जाणारे सगळे लोकशाहीचे पुजारी आहेत असे समजले वा भक्त आहेत असे समजले तर, हे पुजारी वा भक्त मंदिरात कसे वागतात? मंदिराचं पावित्र्य टिकवतात का? बरे येथे चालणारे कामकाज म्हणजे तरी काय? एका शब्दात उत्तर द्यायचे तर, `चर्चा' असे उत्तर द्यावे लागेल. कोणी यावर विचारेल की, मग आणखीन काय करणे अपेक्षित आहे वा काय करता येऊ शकते? हा प्रश्न अगदी सोळा आणे खरा आहे. चर्चेशिवाय काहीच करता येणे शक्य नाही. पण आम्ही तेथेच थांबून जातो.
संसदेत केवळ चर्चाच करता येण्यासारखी आहे या निष्कर्षाचा दुसरा अर्थ हाच काढता येऊ शकतो की, हीच संसदेची मर्यादा आहे. अनेक शतकांपूर्वी संत तुकाराम महाराज सांगून गेले, `बोलाचीच कढी, बोलाचाच भात; खाऊनिया तृप्त कोण झाला?' आम्ही मात्र ते समजून घ्यायला तयार नाही. आजवर किती चर्चा संसदेत झाली आणि त्यातून साध्य काय झाले. चर्चा केल्या आणि ठराव केले की सारे काम संपले का? चर्चा आणि ठराव म्हणजेच समस्यांचे समाधान मानायचे का?
काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, असा ठराव संसदेने एकमुखाने केला आहे. समस्या संपली का? पाकिस्तानबाबत अनेक चर्चा झाल्या, पण त्या आघाडीवर सारे आलबेल झाले का? चीनबाबत दुसरे काय पाहायला मिळते? भ्रष्टाचार असो वा महागाई, कायदा सुव्यवस्था असो वा नद्यांची दुरवस्था; किती चर्चा आणि किती ठराव; हाती मात्र काहीच लागत नाही. असे का होते हे आम्ही कधीतरी समजून घेणार आहोत का?
याचा अर्थ चर्चा, विचारविनिमय आवश्यक नाही असा नाही. पण ती फक्त सुरुवात आहे. साधकबाधक चर्चेनंतर कामाला खरी सुरुवात होते. प्रत्यक्ष काम करणारे आणि चर्चा करणारे यांच्यात सगळ्याच अर्थाने खूप मोठे अंतर आहे. शिवाय प्रामाणिकता आणि सत्ता गाजवण्याची वृत्ती हे अडथळे आहेतच. सगळे सारखे असतात, सगळे प्रामाणिक असतात, सगळे सर्वगुणसंपन्न असतात, अन हे सगळे अगदी जन्मजात असते; असे आम्ही गृहीतच धरून चालतो. अन याच ठिकाणी फसगत होते. वास्तव हे आमच्या गृहितकापेक्षा विपरीत आहे. हे वास्तव लक्षात घेऊन व्यवस्था निर्माण करणे किंवा उपाययोजना करणे व्हायला हवे. तसे न होता, कोणी तरी एका वा अनेकांनी एकत्र येउन उपाय वा व्यवस्था अन्यांवर लादायच्या असा प्रकार सुरु आहे.
दुसरी अतिशय महत्वाची बाब म्हणजे आम्ही स्वतंत्रपणे विचार करायलाच तयार नाही. मानवी विचार, मानवी प्रतिभा वा मानवी प्रज्ञा आटली आहे का? संपुष्टात आली आहे का? की त्या विश्वनिर्मात्याने सांगितले आहे की, यानंतर तुम्ही विचार वगैरे करायचा नाही. संसद, न्यायपालिका, कार्यपालिका आणि प्रसार माध्यमे हे चार लोकशाहीचे आधारस्तंभ मानले जातात. हे सगळेच खांब आज; प्रश्नांकित झालेले आहेत आणि प्रभावहीन झालेले आहेत. या साऱ्याचाच मुळातून फेरविचार करण्याची गरज आहे. पण फेरविचार करण्याची गरज आहे असे म्हटले की, लगेच कावकाव सुरु होते. जणू काही मानवी सभ्यतेचा हा अंतिम बिंदूच आहे की काय? यापेक्षा वेगळी व्यवस्था नसू शकते का? किती हा कर्मदरिद्रीपणा? किती हे बुद्धीदारिद्र्य?
असा काही वेगळा विचार मांडला तर लगेच दोन आक्षेप तयार असतात. एक म्हणजे ही बंडखोरी आहे किंवा हा राजद्रोह आहे. वास्तविक राजद्रोह आणि पर्यायी व्यवस्थेचे चिंतन या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. सगळे कायदे- नियम पायदळी तुडवावेत, राज्यव्यवस्थेशी सहकार्य करू नये, अराजक माजवावे वगैरे कोणी म्हणत असेल तर ती बंडखोरी वा राजद्रोह म्हणता येईल. पण आजची व्यवस्था कुचकामी झाली आहे आणि त्याचे विश्लेषण करून त्याला पर्याय सुचवणे; अन त्याबाबत लोकात जागृती करणे किंवा लोकांना ते पटवून देणे यात वावगे काय?
दुसरा आक्षेप भावनिक स्वरूपाचा असतो. तो म्हणजे, वेगळ्या व्यवस्थेचा विचार हा राज्यघटनेच्या विरुद्ध आहे. घटनाभंग आहे. पर्यायाने ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी प्रतारणा आहे, म्हणजेच महिलांसहित सर्व दलित, पिडीत, शोषित यांच्या विरोधातील हा विचार आहे. हा अतिशय उथळ आणि अपरिपक्व असा आक्षेप आहे. परंतु त्यातील भावनिकता आणि संवेदनशीलता यामुळे कोणी या विषयावर बोलत नाहीत. खरे म्हणजे एक मुलभूत प्रश्नही या निमित्ताने विचारात घ्यायला हवा; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी मतभेद असणे हा गुन्हा किंवा पाप ठरावे का? किंवा त्यांच्यापेक्षा वेगळा विचार मांडणे म्हणजे दलित शोषितांचा विरोध ठरतो काय?
आपल्या आधीचे विचारक वा व्यवस्थाकार यांना बाजूला करीतच मानवसमाज पुढे पुढे चालत आला आहे. हाच जगाचा इतिहास आहे. आपल्या आजूबाजूची परिस्थिती, समस्या, गरजा, व्यवस्था यांचा समग्र विचार स्वतंत्रपणे करणे आवश्यकच असते. काळ जसजसा पुढे जातो तसतसा हा फेरविचार अधिकच आवश्यक ठरतो. खरे तर ठरवून एका विशिष्ट काळानंतर सगळा आढावा (गरज असो वा नसो) घेणे अनिवार्य असायला हवे. हे म्हणजे आपल्या पूर्वसुरींबद्दल अनादर नव्हे, तसेच स्वत:विषयी दुरभिमान नव्हे. हा साधा मानवी जीवनप्रक्रियेचा एक भाग आहे. आम्ही मनाने आणि बुद्धीने किती परिपक्व आहोत याचे ते निदर्शक आहे.
एक व्यवस्था राबवीत असतानाच त्याबाबत साधकबाधक विचार करणे, तो सगळ्यांसमोर मांडणे हेही व्हायला हवे. एक व्यवस्था स्वीकारली की ती अपरिवर्तनीय आहे असे समजण्याचे कारण नाही. अहंगंड आणि न्यूनगंड यापासून दूर राहून वास्तवाच्या आधारे विचार करण्याची सवय लावून घेण्याची गरज आहे. आज अशा प्रकारच्या विचारांची, चिंतनाची वानवा जाणवते. असे चिंतक आणि द्रष्टे ही आजची गरज आहे. त्यांच्या अभावी विचारवंत म्हणवून घेणारे भाट वटवट करीत राहतील. संसद नावाचा बडबडखाना असाच आरडाओरडा करीत राहील आणि तुम्ही आम्ही हतबुद्धपणे पाहत राहू.
- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, ८ मे २०१३

शुक्रवार, ३ मे, २०१३
व्यवस्थापक स्वामी विवेकानंद- ३
रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशन यांच्या कल्पनेपासून तर स्थापना व नंतर ते काम पुढेही अव्याहत सुरु राहावे, यासाठी स्वामीजींनी कसे व्यवस्थापन केले हे पाहण्यासारखे आहे. रीतसर रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना व्हावयाची होती. तशी काही चर्चाही फारशी नव्हती. परंतु रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य व त्यांचे भक्त एकत्रित राहत असत आणि भजन-पूजन, शास्त्राध्ययन, शास्त्रचर्चा वगैरे करीत असत. हे लोक राहत असत त्याला आलमबाजार मठ म्हणत असत. स्वामी विवेकानंद त्यावेळी अमेरिकेत होते. पण त्यांच्या गुरुदेवांनी त्यांना जी जबाबदारी सोपविली होती आणि त्यांच्या जन्माचे जे प्रयोजन त्यांना सांगितले होते त्याची जाण आणि त्याचे भान त्यांना पूर्ण होते. २७ एप्रिल १८९६ रोजी अमेरिकेतूनच आलमबाजार मठातील गुरुबंधूंना लिहिलेले प्रदीर्घ पत्र मुळातून वाचण्यासारखे आणि समजून घेण्यासारखे आहे. स्वामीजींच्या अद्भुत व्यवस्थापन कौशल्याचे ते प्रत्यक्ष प्रमाण आहे.
अगदी सुरुवातीलाच तुम्हाला (म्हणजे गुरुबंधूंना) या जगात फार मोठे काम करावयाचे आहे हे त्यांनी सांगितले आहे. त्यासाठी व्यक्तिश: काय काळजी घ्यायला हवी हे लिहिताना त्यांनी, मत्सर आणि अहंकार यापासून कटाक्षाने दूर राहण्यास सांगितले आहे. नियमाची अपरिहार्यता आणि गरज पटवून दिली आहे. त्यानंतर मठाच्या व्यवस्थेविषयी बारीकसारीक सूचना दिल्या आहेत. त्यात जागा, जागेची विभागणी, जागेचे व्यवस्थापन, भेटायला येणारे लोक, त्यांच्या भेटण्याच्या वेळा, त्यांना अटेंड करणे, परस्पर संबंध, दिनचर्या, मठाचे कार्यालय, कार्यवाह, मठातील सामानसुमान; अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यानंतर मठाच्या संचालक मंडळाची चर्चा केली आहे. अध्यक्षाची निवड, कार्यवाहाची निवड, कामाची विभागणी, मठात नवीन व्यक्तीला दाखल करून घेण्याविषयी; आदी गोष्टींची चर्चा आहे. त्यानंतर कार्यविभाग या मथळ्याखाली १) अध्ययन विभाग, २) प्रचार विभाग, ३) साधना विभाग; या तीन विभागांची चर्चा आहे. त्यानंतर काही सामान्य सूचना आहेत. जेवणाच्या वेळा निश्चित असाव्यात, जेवणाची व्यवस्था कशी असावी, स्वच्छता असलीच पाहिजे, महिलांचे मठात येणेजाणे, पदाधिकारी वगैरे अनेक गोष्टी नमूद केल्या आहेत.
२० मे १८९७ रोजी अल्मोडा येथून स्वामी ब्रम्हानंद यांना लिहिलेले पत्रही उल्लेखनीय आहे. कोलकाताच्या मठासाठी जागा पाहण्याचे वगैरे काम तेव्हा सुरु होते. पैसा गोळा करण्याचे कामही सुरु होते. या विषयावर स्वामीजी म्हणतात, पैसा अजून हातात आलेला नाही. त्यासाठी थोडा वेळ लागेल. पण तोवर स्वस्थ बसून चालणार नाही. स्वामी ब्रम्हानंद यांना पसंत असलेली जागा दलालाला बयाणा रक्कम देऊन पाहून घ्यावी. ती जागा मिळाली नाही तर तेवढी रक्कम वाया जाईल, याच भावनेने ती जमीन पहावी, असा सल्ला विवेकानंदांनी दिला आहे व्यवहारावर त्यांची इतकी जोरदार पकड होती. यासोबतच आपला गुरुबंधू गंगाधर याने उपाशी राहू नये. भिक्षा मिळाली नाही तर पैसे खर्च करून पोट भरावे हेही त्यांनी कटाक्षाने लिहिले आहे. कामासाठी माणसे जमवण्याची चर्चा करताना ते म्हणतात, `गोड शब्द फार दूरवर ऐकू जातात हे लक्षात ठेवा.'
यानंतर बरोब्बर एका महिन्याने २० जून १८९७ रोजी भगिनी निवेदिता यांना लिहिलेल्या पत्रात त्यावेळची परिस्थिती स्पष्ट होते आणि किती वज्रसमान हृदयाने स्वामीजींनी कार्य केले हे दिसून येते. ते म्हणतात, `एव्हाना पुष्कळसे तरुण शिक्षण घेऊ लागले आहेत. परंतु नुकताच जो भूकंपाचा धक्का बसला त्याने आमच्या एकुलत्या एक, दरिद्री आश्रयस्थानाचा विध्वंस करून टाकला. बाकी ते भाड्यानेच घेतले होते म्हणा. काही हरकत नाही. याची तमा बाळगण्याचे कारण नाही. आश्रयस्थान असो वा नसो, आपत्ती कितीही येवोत, काम हे केलेच पाहिजे. अर्थात काही थोडे संन्यासी, काही फाटलेले कपडे व कधी कधी मिळणारे जेवण यावरच अद्यापि भागवावे लागत आहे. यात बदल झालाच पाहिजे आणि तो निश्चित होणार, कारण आम्ही मन-प्राण अर्पण करून कार्य करीत आहोत. नाही का?'
स्वामी ब्रम्हानंद यांना लिहिलेल्या अन्य एका पत्रात मठासाठी काशीपुर येथील कृष्णगोपाल यांची बाग मिळवण्याबद्दल त्यांनी लिहिले आहे. याच बागेत त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी देह ठेवला होता. त्यामुळे १५-१६ हजार रुपयात ही बाग मिळाली तर चांगले, असे लिहितानाच, तुम्हाला हे योग्य वाटले तरच हा व्यवहार करा असेही नमूद करून, स्वामी ब्रम्हानंद यांच्या अध्यक्षपदाचा मान राखायचे सौजन्यही त्यांनी दाखवले आहे. अर्थात या कामाचा बोभाटा होऊ नये, असा इशारा देताना ते म्हणतात, `योजना गुप्त ठेवल्या नाहीत तर कार्य बिघडते.' आपण ही जमीन घेणार असे कळले तर मालक भाव वाढवतील, याकडे लक्ष वेधून त्यासाठी गुप्तता आवश्यक असल्याचे स्वामीजींनी म्हटले आहे. अर्थात जे काही करायचे ते लवकर करावे. `दीर्घसूत्रीपणाने कार्याचा नाश होतो', असा इशाराही त्यांनी दिला आहे. स्वामीजींची अशी सुविचारवजा वाक्ये गोळा केलीत तरीही त्यातून व्यवस्थापन या विषयाची सांगोपांग मांडणी होऊ शकेल. याच पत्रात त्या वेळच्या दुष्काळाची चर्चा करून उपयुक्त सूचनाही त्यांनी दिलेल्या आहेत.
वेगवेगळ्या ठिकाणी रामकृष्ण संघाची केंद्रे स्थापन करणे, गुरुबंधू- शिष्य यांच्या गरजा पूर्ण होणे, पुस्तके लिहिणे, त्या पुस्तकांचे भाषांतर, पुस्तकाची भाषा सुबोध करणे, भाषांतर करू शकणाऱ्या व्यक्तींची माहिती अशा कित्येक गोष्टींकडे त्यांचे सतत व बारीक लक्ष असे. त्याविषयी ते सतत लिहित, बोलत असत.
१८९७ पासून त्यांच्या पत्रव्यवहारात एक प्रकारची निवृत्तीपरता दिसून येते. सगळ्या व्यापातून बाहेर पडण्याची धडपडही पाहायला मिळते. परंतु त्या मानसिकतेतही व्यवहाराकडे दुर्लक्ष वा ढिसाळपणा झालेला दिसत नाही. उलट आपल्यानंतरच्या व्यवस्थेची त्यांनी काळजी घेतलेलीही दिसते. आपल्या मनातील विरक्ती स्पष्टपणे मांडणारे एक पत्र त्यांनी स्वामी ब्रम्हानंद यांना मरी येथून ११ ऑक्टोबर १८९७ रोजी लिहिले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी १२ ऑक्टोबर १८९७ ला त्यांनी पुन्हा एक पत्र स्वामी ब्रम्हानंद यांना लिहिले. त्यात त्यांनी ५ अत्यंत महत्वाच्या सूचना केल्या आहेत. त्या अशा-
१) जे लोक पैसे गोळा करून मठाकडे पाठवतील त्यांना मठाकडून पावती दिली जाईल.
२) या पावतीच्या दोन प्रती असणे आवश्यक आहे. एक पैसे पाठविणाऱ्याकडे धाडली जाईल व दुसरी मठाच्या फाइलमध्ये राहील.
३) मठाजवळ सर्व दात्यांची नावे व पत्ते यांची नोंद असलेले एक मोठे रजिस्टर असले पाहिजे.
४) मठाच्या निधीसाठी दान म्हणून दिलेल्या रकमांचा अगदी पै-पै पर्यंतचा बिनचूक हिशेब ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सारदाला किंवा इतर कुणाला पैसे दिल्यास त्याचा बिनचूक हिशेब त्यांच्याकडून घेतला पाहिजे. पैशांचा हिशेब बरोबर न ठेवल्यामुळे मला कोणीही फसवा किंवा पैसेखाऊ म्हणणार नाही याची काळजी घ्या. हे सर्व हिशेब पुढे छापून प्रसिद्ध करावे.
५) ताबडतोब एका वकिलाकडे जाऊन त्याच्या सल्ल्याने आपल्या दोघांच्या मृत्युनंतर आपल्या मठामध्ये जे काही असेल ते सर्व हरी व शरद यांना मिळावे असे मृत्युपत्र दाखल करा.
आश्रमातील आपल्या गुरुबंधूकडूनही चोख हिशेब घेण्याची सूचना आणि वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी मृत्युपत्राची केलेली तरतूद या लक्षणीय बाबीच म्हटल्या पाहिजेत.
ज्या उद्देशासाठी देणग्या गोळा केल्या जातात त्या उद्देशापासून थोडेदेखील ढळण्याचा आपल्याला अधिकार नाही, असेही स्वामीजी बजावत असत. अनेकदा विशिष्ट कामासाठी गोळा केलेला पैसा दुसऱ्या एखाद्या कामासाठी वापरायला त्यांनी मना केले आहे. काम चालवताना प्रत्येक माणसाला त्याच्या आवडीचे काम देता यायला हवे याकडेही ते लक्ष वेधत असत.
आपल्या कामाच्या संबंधात एक व्यवस्थापक म्हणून ते कसा विचार करीत असत, हे स्वामी ब्रम्हानंद यांना श्रीनगर येथून लिहिलेल्या १ ऑगस्ट १८९८ च्या पत्रावरून दिसून येते. ते लिहितात, `तुम्ही नेहमी एक चुकीची समजूत करून घेता. मी ज्या ज्या वेळी हिशेबासंबंधाने तुम्हाला काही लिहितो त्या त्या वेळी माझा तुमच्यावर विश्वास नाही असे तुम्हाला वाटते. मला नेहमी जी काळजी वाटते ती सांगतो. कसे का होईना आपल्या कार्याला आता सुरुवात झालेली आहे. हे कार्य सतत सुरु राहावे आणि आपण निघून गेल्यानंतरही त्याची प्रगती होत राहावी याबद्दलचे विचार मला अहोरात्र भंडावून सोडत असतात. एखाद्या माणसाजवळ तात्त्विक ज्ञान जरी भरपूर असले तरी एखादे कार्य प्रत्यक्ष केल्याशिवाय त्याला खऱ्या अर्थाने शिकण्याची संधी मिळत नाही. आपल्यापैकी प्रत्येक माणसाने कार्याची जबाबदारी स्वीकारावयास तयार राहिले पाहिजे, असे मला वाटते. म्हणून मी निवडणूक, हिशेब, चर्चा यांचा पुन्हा पुन्हा उल्लेख करीत असतो. कार्यकर्त्यांपैकी एक माणूस जरी दगावला तरी दुसरा, किंबहुना जरूर पडली तर त्याच्यासारखे इतर दहा लोक ते कार्य अंगावर घेण्यास तयार असले पाहिजेत. दुसरे म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी माणसाच्या ठायी आवड निर्माण केली नाही तर तो जिवाभावाने काम करणार नाही. म्हणून प्रत्येकाला असे वाटले पाहिजे की- या कार्यात, या संस्थेच्या मालमत्तेत आपला वाटा आहे. हे कार्य चालविण्यात मत प्रकट करण्याचा आपल्याला अधिकार आहे. ही गोष्ट आपण आताच सुरु केली पाहिजे. आळीपाळीने प्रत्येकाला जबाबदारीची जागा द्या. प्रत्येकावर लक्ष ठेवा. जरूर पडल्यास तुम्हाला सर्व गोष्टींचे नियंत्रण करता आले पाहिजे. असे यंत्र उभे करा की, कोणीही मरो, कोणीही उरो ते यंत्र आपोआप चालू राहिले पाहिजे. आपण भारतीय लोक एखादी कायमच्या स्वरुपाची संस्था उभी करू शकत नाही हा आपला फार मोठा दोष आहे. याला कारण एकच आणि ते म्हणजे आपण सत्ता विभागून घ्यावयास तयार नसतो. आपल्या पश्चात कार्याचे काय होईल याचा विचारच करीत नसतो.' किती दूरगामी आणि मुलभूत विचार स्वामीजी करीत होते आणि कार्याला घाट देत होते, हे दाखवणारे हे पत्र आहे.
कामाच्या बाबतीत स्वामीजी अतिशय खमके होते आणि वेळप्रसंगी कडक कानउघाडणी करण्यासही ते कमी करीत नसत. नियतकालिकाच्या संबंधाने स्वामी ब्रम्हानंदांना एका पत्रात ते म्हणतात, `नियतकालीकाकडे विशेष लक्ष द्या. मी तुमच्यात नाही असेच गृहीत धरून चला. स्वतंत्रपणे कार्य करा. धन, विद्वत्ता आणि सगळ्याच बाबतीत आम्ही आमच्या वडील भावावर अवलंबून आहोत, अशी भावना असणे म्हणजे विनाशाचा मार्ग होय. नियतकालिकासाठी लागणारा सगळा पैसा मीच गोळा करायचा आणि त्यातले सगळे लेखही मीच लिहायचे, तर मग तुम्ही सगळे लोक काय करणार? आपले सर्व साहेब काय करीत आहेत? माझ्या वाट्याचे काम मी केले आहे. आता राहिलेले तुम्ही करा. कुणाला पैसा गोळा करता येत नाही., प्रचार करण्याचे कुणालाही जमत नाही, स्वत:ची कामे करणेही कुणाला जमत नाही, एक ओळ लिहिण्याचीही कुणाची कुवत नाही; आणि सगळे म्हणे संत आहेत !!' अशी कडक कानउघाडणी केल्यानंतर पुन्हा पैशाबाबत सूचना देताना ते म्हणतात, पैशाच्या बाबतीत प्रत्येक तपशीलासाठी कमिटीचा सल्ला घ्या. खर्चाच्या प्रत्येक मुद्यावर कमिटीच्या सर्व सदस्यांच्या सह्या घ्या.
आपण अतिशय कठोर भाषा वापरतो याची त्यांना जाण होती. त्याबाबत जोसेफाईनला इ.स. १९०० च्या एप्रिल महिन्यात लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `आम्ही भारतीय लोक बराच कालपर्यंत अगदी पराधीन होतो. त्यामुळे आम्हाला कोणत्याही कार्याला प्रवृत्त करण्यासाठी कठोर भाषेचा उपयोग बराच करावा लागतो. हे सांगताना मला वाईटच वाटते. या खेपेस आमच्या वार्षिक उत्सवाची जबाबदारी आमच्यातील एका सर्वात आळशी असलेल्या माणसाने अंगावर घेऊन ती पार पाडली. हेच लोक सध्या दुष्काळग्रस्तांच्या सेवेची कामे माझी मदत न घेता अगदी योजनाबद्ध आणि यशस्वी पद्धतीने स्वत:च पार पाडीत आहेत. हा सगळा माझ्या अत्यंत कठोर कानउघाडणीचाच परिणाम आहे यात शंका नाही.'
काही काळानंतर स्वामीजी आणि त्यांचे अन्य गुरुबंधू यांचेही शिष्य होऊ लागले होते. त्यापैकी एक स्वामी शुद्धानंद यांना अल्मोडा येथून ११ जुलै १८९७ रोजी लिहिलेल्या पत्रात कार्यकर्त्यांचे मनोबल स्वामीजी कसे वाढवीत असत हे पाहायला मिळते. ते लिहितात, `माझ्या बंधुंपेक्षा मी माझ्या संतानांकडून अधिक अपेक्षा करतो हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. मी जितका मोठा होऊ शकलो असतो त्याच्या शंभर पट मोठे माझ्या सर्व मुलांनी व्हावे अशी माझी इच्छा आहे. तुमच्यापैकी प्रत्येक जण अचाट कर्मे करणारा झाला पाहिजे - झालाच पाहिजे असे मी म्हणतो. आज्ञाधारकपणा, तत्परता आणि प्रेम या तीन गोष्टी जर तुमच्याजवळ असतील तर मग कोणताही अडथळा तुम्हाला रोखू शकणार नाही.'
व्यवस्थापन या बाबीचा विचार करताना साधारणपणे १) नियोजन, २) संघटन, ३) कार्यकर्ते/ कर्मचारी, ४) निर्देशन, ५) नेतृत्व, ६) संवाद, ७) प्रेरणा, ८) समन्वय, ९) नियंत्रण या गोष्टींचा विचार केला जातो. स्वामीजींनी त्यांच्या सर्व प्रकारच्या कामाचे जे काही व्यवस्थापन केले ते अभ्यासले, तर या सगळ्या गोष्टी त्यांनी किती उत्तम प्रकारे केल्या हे पाहायला मिळते. यातील आणखीन वैशिष्ट्य हे की, या साऱ्याचे कुठले शिक्षण वगैरे त्यांनी घेतले नव्हते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे असा कुठला अनुभवही त्यांच्या गाठीशी नव्हता. तिसरे वैशिष्ट्य म्हणजे केवळ हे एकच काम त्यांनी केले नाही, तर अन्य अनेक कामे करीत असताना हे काम केले आहे. चौथे वैशिष्ट्य म्हणजे, कुठे एका जागी बसून त्यांनी हे केलेले नसून सतत फिरत फिरत हे काम त्यांनी केले आहे. पाचवे वैशिष्ट्य म्हणजे व्यवस्थापनाचे फक्त मार्गदर्शन तेवढे त्यांनी केले असे नसून, पैसा जमवणे; माणसे जमवणे वगैरे कामेही प्रत्यक्षपणे केली आहेत.
- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ३ मे २०१३
व्यवस्थापक स्वामी विवेकानंद – २
`प्रबुद्ध भारत' आणि `ब्रम्ह्वादिन' या दोन नियतकालिकांचे व्यवस्थापन विवेकानंदांनी कसे केले हे पाहण्यासारखे आहे. व्यवस्थापक म्हणून किती आणि कशी अवधानं स्वामीजींनी ठेवली आहेत हे ११ जुलै १८९४ च्या त्यांच्या पत्रावरून पाहायला मिळते. पेरूमल यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, `नियतकालिक चालू करा. मी वेळोवेळी तुम्हाला लेख पाठवीत जाईन. नियतकालिकाचा एक अंक, त्यासोबत एक आभारदर्शक पत्र बोस्टन येथील हार्वर्ड विश्वविद्यालयातील प्रा. जे.एच. राईट यांना पाठवून द्या. कारण असे की, त्यांनीच मला प्रथम मदत केली. ते पत्र वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यास त्यांना विनंती करा. तसे केल्याने मिशनऱ्यांचे म्हणणे खोटे आहे असे आपोआपच सिद्ध होईल.' पुढे ते म्हणतात, `डेट्रोइट येथील व्याख्यानात मला ९०० डॉलर्स म्हणजे २७०० रुपये मिळाले. दुसऱ्या एका व्याख्यानात एका तासात मला २५०० डॉलर्सची म्हणजे ७५०० रुपयांची प्राप्ती झाली. परंतु प्रत्यक्षात माझ्या हातात २०० डॉलर्सच पडले. एका भामट्या व्याख्यान मंडळाने मला ठकविले. मी त्या मंडळाशी असलेला माझा संबंध तोडून टाकला आहे.'
अनुभवांची देवाणघेवाण, त्यातून सावधतेचा इशारा, वास्तवाची जाण, वेगवेगळ्या लोकांमध्ये मेळ घालण्याचा प्रयत्न, काम करण्याचे शिक्षण, कामातील आपला सहभाग कोणता राहील याचे स्पष्ट निर्देश; अशा असंख्य गोष्टींचे व्यवधान स्वामीजी ठेवीत असत. स्वामीजी सतत प्रवासात राहत असत. त्यामुळे त्यांचा पत्ता सतत बदलत असे. त्याविषयीच्या सूचनाही स्वामीजींनी वारंवार केल्या आहेत.
मद्रासचेच त्यांचे अन्य एक शिष्य डॉ. नांजुंदा राव यांनाही त्यांनी व्यवस्थापकीय मार्गदर्शन केले आहे. `ब्रम्ह्वादिन' मासिक सुरु झाल्यावर मुलांसाठी एक मासिक सुरु करावे असा विचार डॉ. राव यांच्या मनात आला. त्याविषयी समाधान व्यक्त करून स्वामीजींनी त्यांना अनेक उपयुक्त सूचनाही केल्या. संस्कृत साहित्यातील अनेक कथा लिहवून घेऊन त्या लोकप्रिय करण्याची ही सुसंधी आहे असे नमूद करून ते म्हणतात, कथांच्या द्वारे तत्वांची शिकवण देणे हे या नियतकालिकाचे उद्दिष्ट असायला हवे. पण त्यात तात्त्विक चर्चा मात्र नको. प्रस्तावित मासिक मुलांसाठी असल्याने ते विद्वत्तापूर्ण नसावे असेही त्यांनी आवर्जून सांगितले होते. आपण त्यासाठी कथा लिहू असे सांगून स्वामीजी डॉ. राव यांना सांगतात, मुखपृष्ठाचे चित्र विचारपूर्वक ठरवा. ते साधे आणि आकर्षक असले पाहिजे. संघटनेसाठी आज्ञापालन ही अतिशय महत्वाची गोष्ट असल्याचेही स्वामीजींनी डॉ. राव यांना लिहिले होते.
अळसिंगा पेरूमल यांना ८ ऑगस्ट १८९६ रोजी स्वामीजींनी स्वित्झर्लंड येथून एक पत्र लिहिले आहे. त्या पत्राचा पहिलाच परिच्छेद वाचताना असे वाटते की, एखाद्या नियतकालिकाच्या व्यवस्थापकाने आपल्या संपादकालाच व्यावसायिक पत्र लिहिले आहे की काय. या पत्रात ते म्हणतात, `काही दिवसांपूर्वी तुम्हाला पत्र लिहिल्यानंतर `ब्रम्हवादिन'ला हातभार लावण्याचा मार्ग मी शोधून काढला आहे. त्याविषयीच मी आज तुम्हाला लिहिणार आहे. मी तुम्हाला एक-दोन वर्षांपर्यंत दरमहा १०० रुपये म्हणजेच वर्षाला ६० ते ७० पौंड पाठवीत जाईन. त्यामुळे `ब्रम्हवादिन'साठी पूर्ण वेळ काम करण्यास तुम्ही मोकळे व्हाल आणि परिणामी `ब्रम्हवादिन' अधिक यशस्वी होईल. छपाई वगैरेसाठी होणारा खर्च भागविण्यासाठी निधी उभारण्याच्या कामात श्री. मणी अय्यर व इतर मित्र साहाय्य करू शकतील. वर्गणीचे उत्पन्न किती येते? लेखकांना मानधन देऊन त्यांच्याकडून उत्कृष्ट लेखमाला लिहवून घेणे हे या रकमेत शक्य होईल काय? `ब्रम्हवादिन'मध्ये जे काही छापलेले असेल ते प्रत्येकाला अगदी समजलेच पाहिजे असे मुळीच नाही. माझे म्हणणे असे की, हिंदूंनी देशभक्तीने प्रेरित होऊन आणि सत्कर्म म्हणून वर्गणीदार व्हावे.'
पैशाच्या व्यवहाराबाबत सूचना करताना पुढे ते म्हणतात, `अनेक गोष्टी आवश्यक आहेत. प्रथमत: पूर्ण सचोटी हवी. तुमच्यापैकी कुणी सचोटीच्या मार्गापासून ढळेल असे मला मुळीच म्हणावयाचे नाही. परंतु पैशाच्या व्यवहाराच्या बाबतीत हिंदूंच्या ठिकाणी एक विशिष्ट गबाळेपणा आढळून येतो. ते आवश्यक तेवढे पद्धतशीर नसतात. जमाखर्च वगैरे ठेवण्याच्या बाबतीत ते काटेकोर नसतात.'
हाच विषय अधिक स्पष्ट करताना २६ ऑगस्ट १८९६ रोजीच्या पत्रात स्वामीजी डॉ. राव यांना लिहितात, `भारतात सर्व संघटित प्रयत्न एका दोषामुळे असफल होतात. तो दोष हा की काम करण्याची काटेकोर व कडक पद्धती अजून आपण शिकलो नाही. काम म्हणजे काम, मग तेथे मैत्री किंवा भीड उपयोगाची नाही. आपल्या ताब्यातील सर्व रकमेचा प्रत्येकाने चोख हिशेब ठेवला पाहिजे आणि एका विशिष्ट कार्यासाठी आपल्या स्वाधीन करण्यात आलेल्या रकमेचा विनियोग दुसऱ्या कोठल्याही कार्यार्थ होता कामा नये. मग आपल्यावर पुढच्या क्षणी भुकेने मरण्याची का पाळी येईना! याला म्हणतात व्यवहारातील सचोटी. दुसरी आवश्यक गोष्ट म्हणजे अदम्य उत्साह. कोणतेही काम केले तरी त्या वेळेपुरते ते काम तुम्ही उपासना म्हणून करा. सध्या या नियतकालीकालाच तुम्ही आपला देव समजा. म्हणजे मग तुम्ही यशस्वी व्हाल.' स्वामीजी किती कडक प्रशासक होते हे दाखवणारे हे पत्र आहे. एकदा आपल्याला यश मिळाले की विविध भाषांमधूनही आपण आपल्या नियतकालिकाचा विस्तार करू अशी भविष्यातील विस्ताराची दृष्टीही त्यांनी डॉ. राव यांच्यापुढे मांडली आहे.
आपल्या कामाला पोषक अशा विविध गोष्टींकडेही व्यवस्थापकाचे लक्ष असावे लागते आणि त्याचे नीट समायोजन त्याला करावे लागते. स्वामीजींनी हे कार्य केलेले देखील पाहायला मिळते. रशियाच्या झारने एक प्रवास वर्णनात्मक लेख लिहिला होता. त्यात भारताचे वर्णन `आध्यात्मिकतेची व ज्ञानाची भूमी' असे केले होते. तो लेख स्वामीजींनी अळसिंगा पेरूमल यांना पाठवला आणि तो `ब्रम्हवादिन'मध्ये छापण्याची सूचना केली.
अमेरिका व इंग्लंड येथे `प्रबुद्ध भारत' आणि `ब्रम्हवादिन' यांचे वितरक मिळावेत म्हणून देखील स्वामीजींनी खटपट केली होती. या मासिकांसाठी वर्गणीदार मिळवण्याचे कामही त्यांनी केले होते. `कर्मयोग', `भक्तियोग', `राजयोग' ही पुस्तके छापून त्यातून निधी उभा करण्याचा मोठा व्यापही त्यांनी केला होता. यासाठी होणाऱ्या विलंबासाठी त्यांनी कडक शब्दात पेरूमल यांची कानउघाडणीही केली होती. विलंबामुळे आपण संधी गमावून बसतो, विक्री कमी होते याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. स्वामीजी पहिला विदेश प्रवास आटोपून भारतात परतले तेव्हा आपल्यासोबत येणाऱ्या लोकांची माहिती देण्याची आणि त्यांच्या व्यवस्थेच्या सूचना देण्याची काळजीही त्यांनी घेतली होती. कोणाची गैरसोय होऊ नये ही व्यवस्थापकाची दृष्टीच त्यामागे होती.
स्वामीजींनी कशाकशाची व्यवस्था केली हे पाहण्यासारखे आहे. भारतात परतल्यावर मरी येथून जगमोहनलाल यांना लिहिलेल्या पत्रात विवेकानंद म्हणतात, `मी तिघा संन्याशांना जयपूरला पाठवीत आहे. तरी मुंबईला जाण्यापूर्वी त्या तिघांची काळजी घेण्यास कुणाला तरी सांगून ठेवा. त्यांच्या जेवणाखाण्याची आणि राहण्याची चांगली व्यवस्था करावयास सांगा. मी येईपर्यंत ते तिघे तेथेच राहतील. ते तिघेही सरळ स्वभावाचे असून फारसे शिकलेले नाहीत. ती माझीच माणसे असून त्यांच्यापैकी एक माझा गुरुबंधू आहे. त्यांची इच्छा असल्यास त्यांना खेत्रीला न्यावे.'
खेत्रीच्या राजेसाहेबांना १६ ऑक्टोबर १८९८ रोजी लिहिलेल्या पत्रात त्यांनी पाश्चात्य स्नेह्यांबाबत लिहिले आहे. ते म्हणतात, `माझे पाश्चिमात्य स्नेही जयपूर पाहण्यासाठी एखाद-दोन आठवड्यात येतील. जगनमोहन तेथे असल्यास त्यांना पाहुण्यांकडे लक्ष देण्यास, त्यांना शहर दाखविण्यास, तसेच जुन्या कलाकृती दाखविण्यास सांगावे. पाहुणे मंडळी जयपूरला जाण्यासाठी निघण्यापूर्वी मुन्शीजींना पत्र पाठवा, अशी सूचना मी माझे गुरुबंधू सारदानंद यांना देऊन ठेवली आहे.'
स्वामीजींनी विदेशात हिंदू तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार केला, आश्रमांच्या रूपाने त्यासाठी काही स्थायी कार्यही उभे केले अन त्यासाठी अनेक विदेशी स्त्री-पुरुषांना सोबत उभे करून सहकार्य मिळविले. यामुळे प्रभावित होऊन अनेक जण भारत पाहण्यासाठी आले. काही त्यांच्यासोबत आले. काही स्वतंत्रपणे आलेत. अनेक जण भारतात राहिलेही. भारतातील कामासाठीही अनेकांचे अनेक प्रकारे सहकार्य स्वामीजींनी मिळविले. पण हे सारे वाटते तितके सोपे नक्कीच नव्हते. याचे एक मासलेवाईक उदाहरण त्यांनी १० जुलै १८९७ रोजी कु. जोसेफाईन मॅक्लिऑड यांना लिहिलेल्या पत्रात पाहायला मिळते.
या पत्रात ते म्हणतात, `तुम्ही इकडे जरूर या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, युरोपीय आणि भारतीय लोक (युरोपीय त्यांना नेटिव्ह म्हणतात) एकत्र राहतात, पण तेल व पाणी याप्रमाणे. नेटीव्हांशी मिसळणे म्हणजे युरोपियांना आपला दर्जा कमी करून घेण्यासारखे वाटते. अगदी राजधानीच्या शहरात सुद्धा चांगली हॉटेले नाहीत. अनेक नोकर बरोबर घेऊन तुम्हाला प्रवास करावा लागेल. (नोकर ठेवणे हे हॉटेलात राहण्यापेक्षा स्वस्त आहे.) फक्त कमरेवरच वस्त्र असलेल्या लोकांची संगत तुम्हाला सहन करावी लागेल. मी सुद्धा असेच वस्त्र नेसलेला तुम्हाला आढळेन. घाण व कचरा सगळीकडे भरपूर; माणसे सावळ्या रंगाची. परंतु तत्वज्ञानाबद्दल तुमच्याशी चर्चा करणारी माणसे मात्र पुष्कळच आढळतील. येथील इंग्रज रहिवाशांशी जास्त संबंध जोडलात तर तुम्हाला जास्त सुखसोयी मिळतील.. परंतु येथील हिंदू कसे आहेत याची काहीच कल्पना येणार नाही. बहुधा मी तुमच्याबरोबर भोजन घेऊ शकणार नाही. परंतु तुमच्याबरोबर पुष्कळ प्रवास करण्याचे, पुष्कळ ठिकाणांना भेट देण्याचे आणि माझ्या शक्तीनुसार तुमचा प्रवास शक्य तितका सुखकर करण्याचे मात्र मी अभिवचन देतो. या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागणार या अपेक्षेने तुम्ही यावे हे चांगले. अर्थात प्रत्यक्षात यापेक्षा अधिक काही चांगले झाले तर उत्तमच.' किती प्रकारचे व्यवस्थापन स्वामीजींनी केले असेल?
भगिनी निवेदिता यांना २९ जुलै १८९७ रोजी अल्मोडा येथून लिहिलेल्या पत्रातही त्यांनी अशाच प्रकारे भारतातील परिस्थितीची स्पष्ट कल्पना देणारे, परंतु हिरमोड न करणारे; धाडस कमी न करणारे; उत्साह देणारे पण वास्तवाची जाण निर्माण करणारे पत्र लिहिले आहे.
कोलकाताहून संत्री घेऊन मद्रासला पाठवावी. तेथे ती आपल्याला मिळतील, असे स्वामी ब्रम्हानंद यांना एका पत्रात लिहिलेले वाचायला मिळते. स्वामी रामकृष्णानंद यांना लिहिलेल्या २० एप्रिल १८९७ च्या पत्रातही अशाच अनेक छोट्या छोट्या गोष्टींचे मार्गदर्शन दिसून येते. मद्रास येथील आश्रम तेथील एक गृहस्थ श्री. बिलिगिरी यांच्या घरी सुरु झाला. तेथील पूजाअर्चा, अन्य कामे यासोबतच बिलिगिरी यांच्या दोन विधवा मुली आहेत याची आठवण ठेवून, त्यांच्याशी योग्य व्यवहार असावा याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. या मुलींना धर्म, तसेच संस्कृत व इंग्रजीचे शिक्षण द्यावे यावरही स्वामीजींनी भर दिला आहे. कुणी श्री. गुप्ता यांना कुत्रा चावला होता, त्यांनी नीट औषध घ्यावे हे सांगायलाही स्वामीजी विसरले नाहीत.
व्यवस्थापकाचा अभिन्न गुण असलेल्या नेतृत्वाविषयीही स्वामीजींनी फार मोलाचे मार्गदर्शन केले आहे. भगिनी निवेदिता यांना श्रीनगर येथून १ ऑक्टोबर १८९७ रोजी लिहिलेल्या पत्रात स्वामीजींनी नेतृत्व या विषयाची चर्चा केली आहे. नेतृत्वाबाबतचा मुलभूत विचार तर त्यात पाहायला मिळतोच, पण आजच्या विविध क्षेत्रातील नेतृत्वाच्या पार्श्वभूमीवर त्याचे आगळेपण ठळकपणे नजरेत भरते.
स्वामीजी म्हणतात, `काही लोक दुसऱ्याच्या नेतृत्वाखाली उत्तम काम करतात. प्रत्येक जण नेतृत्व करण्यासाठी जन्मलेला नसतो. जो एखाद्या लहान मुलाप्रमाणे सत्ता गाजवतो तोच सर्वात उत्तम नेता होय. लहान मूल हे जरी सर्वांवर अवलंबून असलेले दिसले तरी त्याची सर्व कुटुंबावर निरंकुश सत्ता असते. कमीत कमी मला तरी नेतृत्वाचे रहस्य हेच आहे असे वाटते. पुष्कळांना इतरांबद्दल प्रेम, सहानुभूती इत्यादी वाटत असेल, परंतु फारच थोड्यांना या भावना व्यक्त करता येतात. दुसऱ्यांबद्दलची सहानुभूती, त्यांच्याबद्दल वाटणारे कौतुक आणि प्रेम ही व्यक्त करण्याची शक्ती ज्या व्यक्तीच्या ठायी असते ती त्या शक्तीच्या जोरावर इतरांच्या मानाने आपल्या विचारांचा व कल्पनांचा अधिक प्रभावीपणे प्रचार करू शकते.'
याच पत्रात याच विषयावर स्वामीजी पुढे म्हणतात, `सगळ्यात मोठी अडचण आहे ती अशी- लोक मला प्राय: त्यांचे सर्व प्रेम देऊन टाकताना दिसतात, परंतु मोबदल्यात मी मात्र त्यांना माझे संपूर्ण प्रेम देता कामा नये. कारण ज्या दिवशी मी तसे करीन त्या दिवशी कार्य नष्ट होईल. पण व्यक्तीला विसरून व्यक्तीनिरपेक्ष विचार करण्याची विशाल दृष्टी ज्यांना लाभलेली नाही अशा काही लोकांना मात्र अशा मोबदल्याची अपेक्षा असते. मी शक्य तितक्या लोकांचे अनिर्बंध प्रेम संपादन करावे, परंतु स्वत: मात्र व्यक्तीनिरपेक्ष दृष्टी ठेवून पूर्णपणे अलिप्त राहावे, हे कार्याच्या साफल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण मी जर तसा अलिप्त राहिलो नाही तर, मत्सर व कलह ही कार्याचा विध्वंस करून टाकतील. नेत्याने नेहमी व्यक्तीनिरपेक्ष दृष्टी बाळगणे आवश्यक आहे. तुम्हाला हे पटेल अशी मला खात्री आहे. अर्थात नेत्याने निर्दय बनावे, लोकांच्या श्रद्धेचा स्वत:चे हेतू साध्य करण्यासाठी उपयोग करून घ्यावा आणि मनातल्या मनात त्यांना हसत राहावे, असा माझ्या म्हणण्याचा आशय नाही. माझ्या म्हणण्याचा जो अर्थ आहे, तो माझ्या जीवनात तुम्हाला दिसेलच. तो अर्थ हा की, माझे प्रेम कितीही व्यक्तिगत असले तरी वेळ आली किंवा तसेच आवश्यक भासले तर बुद्धांच्या कथनाप्रमाणे `बहुजनहिताय बहुजनसुखाय' माझ्या हाताने आपले हृदय उपटून काढण्याची शक्ती माझ्या ठायी असली पाहिजे. प्रेमाचा वेडेपणा तर पाहिजे, परंतु त्याने निर्माण होणारे बंधन मात्र नको.' आज आपल्यापुढे ज्या प्रकारचे नेतृत्व विविध क्षेत्रात वावरताना दिसते, त्यातून निर्माण होणाऱ्या ज्या अनेक विकृती दिसतात; त्या संदर्भात विचार केला तर स्वामीजींचे हे विवेचन आणि मार्गदर्शन किती महत्वाचे आणि अनोखे आहे हे सहज जाणवावे.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)