शुक्रवार, २६ एप्रिल, २०१३

संघ, संघटना, संघटीत समाज

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे वर्ष प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा, हा हिंदू नववर्षाचा प्रारंभदिन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा हा जन्मदिन. संघात हा दिवस नववर्षाचा पहिला दिवस म्हणूनच साजरा केला जातो, डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिवस म्हणून नव्हे. अर्थात डॉ. हेडगेवार यांचे जीवन, कार्य आणि विचार यांचे संघात सतत स्मरण, चिंतन होत असते. त्यामुळे या प्रसंगी ते प्रमुखतेने होणे स्वाभाविकच ठरते. डॉ. हेडगेवार यांनी आपल्या १५ वर्षांच्या संघकामात अनेक मुलभूत गोष्टींची पायाभरणी केली होती. त्यावरच मग संघाचे विशाल कार्य उभे झाले. त्यातीलच एका मुलभूत विचाराचे या वर्ष प्रतिपदेनिमित्त प्रकट चिंतन.

डॉ. हेडगेवार नेहमी म्हणत असत, की आपल्याला संघाची ज्युबिली साजरी करायची नाही. अर्थ सरळ आणि स्पष्ट आहे. ५० वर्षे, ६० वर्षे, ७५ वर्षे, ८० वर्षे, १०० वर्षे... अशी वर्षांची उतरंड वाढवीत जायचे आणि आपली संस्था इतकी जुनी आहे वगैरेचे गोडवे गात, किती वर्षे संस्था चालली त्यावरून तिची थोरवी ठरवावी; हे संघाच्या संदर्भात त्यांना अभिप्रेत नव्हते. संघ खूप काळ चालत राहावा वगैरे त्यांची कल्पना नव्हती, हे स्पष्टच आहे. परंतु मग प्रश्न निर्माण होतो की, मग संघ काढला कशाला? आणि तो चालवायचा तरी कुठवर? या प्रश्नांच्या उत्तरासाठी काही गोष्टी थोड्या नीट समजून घेण्याची गरज आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो? या प्रश्नाचं उत्तर आहे, संघ हिंदूंचे संघटन करतो. कशासाठी हे संघटन करतो? हिंदू समाज सुसंघटीत करण्यासाठी. सारख्या भासणाऱ्या पण अतिशय वेगळ्या असणाऱ्या या दोन गोष्टी आहेत. इंग्रजीतील शब्दाचा उपयोग करून ही फोड करता येईल. संघ काय करतो, hindu organisation करतो. कशासाठी करतो? organised hindu society साठी करतो. organisation आणि state of being organised या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. संघाला हिंदू समाजाअंतर्गत एखादे संघटन उभे करायचे नाही, असे म्हटले जाते त्याचाही हाच अर्थ आहे. संघाला हिंदूंचे एखादे संघटन तर उभे करायचे नाहीच, पण संपूर्ण समाजाचेही संघटन करायचे नाही. संघाला संघटीत हिंदू समाज उभा करायचा आहे.

एखादी व्यक्ती खूप organised आहे असे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ हा होतो की, ती व्यक्ती गडबड गोंधळ करीत नाही. साऱ्या गोष्टी वेळच्या वेळी करते. रुमाल राहिला, पाकीट विसरलो, बिल भरायचं राहिलं अशा गोष्टी त्या व्यक्तीच्या बाबतीत संभवत नाहीत. एखादी अडचण उभी राहिली तर ती व्यक्ती हातपाय गाळत नाही. त्या व्यक्तीचे वेळेचे, पैशाचे नियोजन पक्के असते. ती आपत्तींना घाबरत नाही, केव्हा काय करायला हवे हे त्या व्यक्तीला नेमके कळते. कोण आपला, कोण परका हे त्याचे आडाखे योग्य असतात. आपण बनवले जात नाही याची ती व्यक्ती पूर्ण काळजी घेते. ही व्यक्ती विचारी, समजूतदार, विवेकी, निर्णयक्षम, समन्वय आणि संघर्ष दोन्हीची क्षमता असणारी अशी असते. थोडक्यात म्हणजे जीवन जगताना सुखी, सुरक्षित आणि सहज जीवन जगणारी व्यक्ती organised आहे असे आपण म्हणतो. हे सारे त्या व्यक्तीला कोणी सांगावे लागत नाही. प्रत्येक वेळी त्यासाठी त्याला प्रशिक्षण घ्यावे लागत नाही. तो त्याचा पिंड असतो, स्वभाव असतो. त्याचं अस्तित्वच त्या सगळ्या गुणांचा समुच्चय असतं.

समाजाच्याही बाबतीत असंच आहे. कोणतेही अभाव नसणारा, अभाव उत्पन्न झाले तर ते सहज दूर करणारा, भौतिक सुखसोयींनी समृद्ध, संपूर्ण समाज एक आहे या भावनेने ओतप्रोत, स्वत:सोबतच समाजाचा- सृष्टीचा- अन्य समाजाचा विचार करणारा, शत्रू आणि मित्र यांची पारख असलेला, कोणत्याही आपत्तीला समर्थपणे तोंड देऊ शकणारा; अशा समाजाला organised society म्हणता येईल. याच्या अभावी तो समाज विस्कळीत समाज आहे, असेच म्हटले जाईल. आपला समाज, म्हणजेच येथील राष्ट्रीय समाज असलेला हिंदू समाज, असाच विस्कळीत समाज आहे. तो सुव्यवस्थित झाल्याविना हा देश, हे राष्ट्र पुन्हा ताठ मानेने उभे राहू शकणार नाही, असे डॉ. हेडगेवार यांचे विश्लेषण होते. त्या दृष्टीने संघटीत समाज उभा करण्याचा संकल्प त्यांनी केला.

परंतु असा समाज उभा होण्यासाठी आणि हे सारे सहज, स्वाभाविक, उत्स्फूर्तपणे होण्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाचा विशिष्ट स्तर आवश्यक आहे. या समाजाच्या विचारांना, विचार करण्याच्या पद्धतीला तसा घाट द्यावा लागेल, त्याच्या सवयी बदलाव्या लागतील, स्वभाव बदलावा लागेल. प्रदीर्घ काळ यासाठी प्रयत्न केल्यानंतर समाजाचा विशिष्ट पिंड तयार होईल, समाजाची वृत्ती तयार होईल. हे घडवून आणण्यासाठी एखादी यंत्रणा हवी. ही यंत्रणा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. डॉ. हेडगेवार यांची ही दृष्टी नीट समजून घ्यायला हवी.

एखादी संघटना उभारायची आणि त्या संघटनेच्या भरवशावर समाजासाठी काम करीत राहायचे, अशी त्यांची दृष्टी नव्हती. समाजाला अशा बाह्य आधाराची गरज लागू नये, प्रत्येक गोष्टीला योग्य-अयोग्य असा प्रतिसाद देण्यासाठी समाज सक्षम असावा; अशी त्यांची स्पष्ट धारणा होती. संघ संघटना म्हणून सगळ्या समाजाचे नियमन आणि नियंत्रण करील, अशी त्यांची कल्पना नव्हती. म्हणूनच ज्यावेळी डॉक्टरांना कोणी विचारले की, आमच्या वस्तीत काही गडबड झाली तर तुम्ही संघाचे स्वयंसेवक पाठवाल का? त्यावर ते गमतीने म्हणालेही, `मी माझ्या स्वयंसेवकांना पांघरूण घेऊन झोपायला सांगेन. तुम्ही जर वस्तीसाठी सज्ज होऊन उभे राहणार असाल तर तुमच्या मदतीसाठी मी त्यांना पाठवीन.' संघ काहीही करणार नाही; स्वयंसेवक सारे काही करतील, असेही ते म्हणत त्याचाही तोच अर्थ आहे.

अर्थात अशा आदर्श समाजाची उभारणी होईपर्यंत त्याला नीट सवयी लावण्यासाठी संघालाही, संघ म्हणून पुढे होऊन अनेकदा कामे करावी लागतील. त्यातूनच दिशादर्शन होईल, संस्कार होतील आणि सवयीही लागतील याकडे त्यांनी दुर्लक्ष केले नव्हते. त्यामुळेच, रामटेकची यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी व्यवस्था करण्यासाठी स्वयंसेवकांचे दल पाठवणे असो किंवा नागपुरातील महालक्ष्मी दंग्याच्या वेळी मुकाबला करण्यासाठी स्वयंसेवकांचा उपयोग करून घेणे असो; या गोष्टीही त्यांनी केल्या आहेत. अर्थात `तात्कालिक' आणि `अंतिम' या दोन्ही गोष्टींचे अवधान डॉक्टरांनी नेहमीच राखले होते.

संघ हा सामाजिक काम करणारे संघटन, हे जसे त्यांना अपेक्षित नव्हते; तसेच संघ ही राजकीय संघटना हे देखील अपेक्षित नव्हते. राजकारणात पक्ष संघटन आणि सत्ता असे दोन भाग असतात. त्यात कोण वरचढ यासाठी चढाओढही असते. कम्युनिस्ट पद्धतीत संघटना श्रेष्ठ हे तत्वच आहे. काँग्रेसमध्ये यात परिस्थितीनुरूप बदल पाहायला मिळतो. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी पंतप्रधान असताना सत्ता संघटनेपेक्षा श्रेष्ठ होती. काही वेळेला संघटना श्रेष्ठ असते. जसे सध्या आहे. संघाची आणि संघ संस्थापकांची ही कल्पना नव्हती. संघटना बांधून सत्ता हाती घेऊन समाजाचे भले होईल, या विचारावर मुळातच विश्वास नसल्याने तसा प्रश्नच उत्पन्न होत नाही. (संघ आणि राजकारण, तसेच जनसंघ- भाजपची उभारणी, आजची भूमिका वगैरे स्वतंत्र विषय आहे.)

डॉ. हेडगेवार यांची ही भूमिका पुढेही कायमच होती. डॉ. हेडगेवार यांच्यानंतर सरसंघचालक पदी आलेले गोळवलकर गुरुजी यांनी इंदूर चिंतन बैठकीत ७ मार्च १९६० रोजी दिलेल्या बौद्धिकात या विषयाची सखोल चर्चा केली आहे. रा. स्व. संघाचे संघाचे संघटन कसे आहे, त्याची वैशिष्ट्ये कोणती याची चर्चा करताना `अनुशासन' या शब्दाची चर्चाही त्यांनी केली आहे. उपनिषदातील `अनुशासन' शब्दाचा अर्थ स्पष्ट करून तोच संघाला अभिप्रेत असल्याचेही ते म्हणाले. याविषयी ते म्हणाले, `विशिष्ट पद्धतीनेच वागले पाहिजे असा आदेश उपनिषदात नाही. विशिष्ट अशी नियमावली सांगितली नाही. बुद्धीचे स्वातंत्र्य दिले आहे. आणि या स्वातंत्र्याचा मौलिक अशा सिद्धान्तांशी समन्वय जोडून त्यालाच अनुशासन म्हटले आहे. आपल्याकडे अनुशासन या शब्दात व्यक्तीचे स्वातंत्र्य, व्यक्तीचे सूत्रबद्ध जीवन आणि समष्टीत तिचे विलीनीकरण या दोहोंचा अंतर्भाव आहे. या दोहोत जो सामंजस्य निर्माण करू शकतो तोच यथार्थतेने हिंदू संघटन करू शकतो. अन्यथा जगात ज्या प्रकारे निरनिराळ्या लोकांनी काही संघटीत स्वरूप उभे केले आणि त्या आधारावर त्यांनी काही काळ शक्तीचा अनुभवही घेतला होता त्याच प्रकारे आपल्याकडेही होऊ शकेल. त्यातून एक हिंदू शक्ती उत्पन्न होईल आणि ती काही काळानंतर नष्ट होईल. अशी शक्ती अल्पजीवी राहील आणि काही काळ सफलता हाती आली तरीही ती शक्ती संपल्यावर शेकडो पटींनी अधिक हानी पोहोचेल. हे मी अत्यंत स्पष्टपणे तुमच्यासमोर सांगतो आहे.'

याचेच विवरण करताना ते पुढे म्हणतात, `आपले कार्य हिंदू समाज संघटीत करण्याचे आहे. हिंदू समाजात वेगवेगळ्या संघटीत शक्ती निर्माण करण्याचे नाही. समाजात वेगवेगळे पक्ष निर्माण करण्याचे नाही. समाज संघटीत जीवनाच्या विचारांनी ओतप्रोत असावा आणि समाजातील सर्व व्यक्ती नि:शेषपणे त्या विचारांनी परिपूर्ण असाव्यात हे आपले लक्ष्य आहे. समष्टीमध्ये आपले जीवन विलीन करून स्वत:सिद्ध अनुशासनाच्या भावनेत स्वत:ला गुंफून घेण्याचा निश्चय करून लोकांनी येथे यावे. या प्रकारच्या समाज संघटनेचा आमचा विचार आहे आणि संकल्प आहे- एक संघटीत पक्ष निर्माण करण्याचा नाही, हा विवेक करणे उचित ठरेल. यावर कोणी विचारेल की, संघ एका पक्षाप्रमाणे नाही तर मग कसा चालतो? आपण पूर्ण विचार केला तर आपल्याला हे मान्य करावे लागेल की, व्यक्ती व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी; संपूर्ण समाजाचे संघटीत जीवन निर्माण करण्यासाठी एक मोठे देशव्यापी, निरलस, नि:स्वार्थ कार्यकर्त्यांनी मिळून बनलेले संघटनयंत्र आपल्याला उभे करावे लागेल. पण ते आपले लक्ष्य नव्हे, ते केवळ साधन आहे. समाज सुसंघटीत व्हावा यासाठी कार्यकर्ते निर्माण करणे ही केवळ पहिली पायरी आहे.'

शेक्सपिअरच्या `ज्युलियस सीझर' नाटकाचा संदर्भ देत `मास मुव्हमेंट', `क्लास मुव्हमेंट' याची चर्चाही त्यांनी केली. पुढे अतिशय नि:संदिग्ध शब्दात त्यांनी हा विचार मांडला. ते म्हणतात, `आर्य लोकात कधी दासभाव राहू शकत नाही. दासपण त्याला कधीच चांगले वाटू शकत नाही. मग ते स्वकीयांचे असो वा परकीयांचे असो. आर्यांच्या प्रतिभेचा आणि चैतन्याचा हा असामान्य गुण आहे. आपण आपल्या जीवनात मुक्ती हेच जर सर्वश्रेष्ठ लक्ष्य मानलेले आहे, सर्वतंत्र स्वतंत्र आणि कुठलीही बंधने नाहीत अशी अवस्था जर श्रेष्ठ मानली आहे तर मग ऐहिक जीवनातही दासतेचा विचार मान्य होऊच शकत नाही. जर कुणाला तो मान्य होत असेल तर आर्यत्वापासून तो ढळला. हा आपला स्वाभाविक गुण आहे आणि त्याचे पोषण करून आपल्याला तो परिपुष्ट बनवायचा आहे. कुणी जबरदस्तीने कुणाचा गुलाम बनत असेल आणि आपली प्रतिभा विकत असेल तर कोणत्याही व्यक्तीचे असे हे पतन आपल्याला सहन होण्यासारखे नाही. आपण हे मान्य करू शकत नाही.'

या बौद्धिकाच्या अखेरीस इशारा देताना गुरुजी म्हणतात, `संघटना करताना, अहिंदू आणि अनार्य संघटना विचारांचा प्रभाव आपल्यावर पडण्याचे भय राहू शकते. परिणामी आपणही एक रिजिड- नॉन इलॅस्टिक; समाजाला गुलाम बनविणारे यंत्र निर्माण करून राष्ट्राचे भोळसटपणामुळे अहित तर करून बसणार नाही, ही खबरदारी घेण्यासाठीच हे मी सांगितले. यावर विचार करणे हे आता आपले काम आहे.'

याचा अर्थ राष्ट्रजीवनात संस्था, संघटना राहणार नाहीत अथवा राहू नयेत असा नाही. याचा अर्थ फक्त एवढाच की, कोणतीही एखादी संघटना राष्ट्रजीवनाचे निर्धारण करू शकत नाही. उलट गरजेनुसार आवश्यक त्या संघटना, संस्था उभ्या करण्याची, त्यात कालानुरूप परिवर्तन करण्याची आणि गतार्थ संस्था विलीन करण्याची शक्ती आणि विवेक राष्ट्रात सतत जागृत असायला हवा. त्यासाठी चार गोष्टींचा विचार आधारभूत मानायला हवा.
१) राष्ट्राविषयी सुयोग्य धारणा.
२) त्याच्या दृश्य स्वरूपाचे संरक्षण.
३) राष्ट्राच्या मूल्यव्यवस्थेबद्दल आस्था.
४) याविषयी बांधिलकीची भावना.

संघाचे तिसरे सरसंघचालक आणि संघात ज्यांची ओळख प्रति डॉक्टर हेडगेवार अशी आहे, त्या बाळासाहेब देवरस यांनीही यासंबंधात स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. सरसंघचालक होण्याच्या पूर्वी १९६५ साली त्यांचे सहा अतिशय महत्वपूर्ण बौद्धिक वर्ग झाले. `राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- लक्ष्य व कार्य' या शीर्षकाने त्याचे संकलन प्रकाशितही झाले आहे. संघाच्या कामाविषयी अनेक मूलभुत बाबींची त्यात चर्चा आहे. बाळासाहेब देवरस यांनी व्यक्त केलेल्या विचारांचा सारांश असा-

`ज्या समाजातील व्यक्ती स्वार्थरहित होते, त्या समाजात सहज आणि स्वाभाविक सामर्थ्य निर्माण होते. आपल्या समाजात शक्तीचा जो वास्तविक स्रोत आहे, त्या स्वाभाविक सामर्थ्यास जागृत करण्यासाठी संघाचे कार्य चालले आहे. यावच्चंद्र दिवाकरौ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अस्तित्वात ठेवण्याची आपली कल्पना नाही. राष्ट्र पुनरुत्थानाच्या ठिणग्यांचे चिरस्थायी वन्हीमध्ये रुपांतर करण्याची आवश्यकता आहे. समाज आणि राष्ट्राचा विचार व त्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी हाही चारित्र्याचा महत्वाचा भाग आहे. शक्ती निर्माण करणे हीच आमची, जे अंतिम लक्ष्य आहे त्यासंदर्भातील भूमिका आहे. ते नीट न समजून घेतल्यास अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. जर संघ नसता तर आज जेवढ्या तात्कालिक समस्या आहेत त्यापेक्षा कितीतरी अधिक गंभीर झाल्या असत्या. संघ प्रश्नांचा सम्यक विचार करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या द्वारेच सदैव समाज शक्तिशाली राहील, असा संघाचा विचार नाही. समाजात परिवर्तन घडवू इच्छिणारा संघ हा एक प्रयत्न आहे.'

अर्थात याचा अर्थ संघ लगेच विसर्जित करण्याची वेळ आली आहे असा नाही. उलट आजची परिस्थिती पाहता आणखी शे-दोनशे वर्षे संघाची गरज राहू शकते. आपल्या राष्ट्राविषयी आस्था व बांधिलकी असणारे परंपरेने चालत आलेले घटक संघाबाहेरही विद्यमान होते. आज त्यांचेही क्षरण झाले आहे. त्यामुळे संघकार्याची गरज निर्विवादपणे आहे. मात्र त्याचवेळी संघाच्या कार्याबद्दल योग्य व स्पष्ट धारणा जेवढ्या अधिक प्रमाणात निर्माण होईल, तेवढेच अंतर्गत व बाह्य- समज, गैरसमज, व्यवहारातील अडथळे, अडचणी कमी होण्यास मदत होईल आणि संघटीत हिंदू समाज उभा करण्याच्या प्रयत्नांना बळकटी येईल.

- श्रीपाद कोठे
गुरुवार, ११ एप्रिल २०१३
नागपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा