शनिवार, २९ जून, २०१३

केदारनाथचा धडा

उत्तराखंडातील ढगफुटीने केदारनाथ परिसरात हाहा:कार उडाला आहे. १०-२० करता करता मृतांचा अधिकृत आकडा हजारावर पोहोचला आहे. अनधिकृतपणे हजारो लोक मरण पावले असावेत, असे म्हटले जात आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनीही हजारो लोक मरण पावले असावेत, अशी भीती व्यक्त केली आहे. हजारो यात्रेकरू अडकून पडले आहेत. गावेच्या गावे जमीनदोस्त झाली आहेत. ८-१० फूट चिखल, रेती सर्वत्र साचली आहे. सामान्य पावसापेक्षा ४०० टक्के अधिक पाऊस, तोही अगदी थोड्या वेळात आणि अचानक कोसळला. शब्दापलीकडील असे हे निसर्गाचे तांडव आहे. अशा स्थितीत लष्कराचे जवान सरसावले आहेत. प्राणांची बाजी लावून ते मदत आणि बचाव कार्य करीत आहेत. त्यांना सलाम करणे आपले कर्तव्य आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक देखील त्यांच्या स्वभावाला, वृत्तीला, संस्कारांना आणि परंपरेला धरून मदतकार्यात पुढे आले आहेत. अन्यही लोक आपापला वाटा उचलीत आहेत. प्रसार माध्यमेही माहितीच्या देवाणघेवाणीचे काम अथकपणे करीत आहेत. सध्या तरी याच गोष्टींवर लक्ष देणे आणि भर देणे आवश्यक आहे.

यासोबतच या `हिमालयन सुनामी'चे विश्लेषण पण सुरु झाले आहे. पर्यावरण, राजकारण, नोकरशाही, भ्रष्टाचार, अंदाधुंद विकास, उपभोगवाद, समाजाची जबाबदारी अशा अनेक मुद्यांचा उहापोह होत आहे. तसा तो व्हायलाही हवा. अगदी कर्कशपणे ही चर्चा व्हायलाही हरकत नाही. फक्त ती प्रामाणिक आणि जबाबदार असावी हे मात्र पाहायला हवे. अशीच एक चर्चा `times now' वाहिनीवर झाली. अर्णव गोस्वामीने राजकीय नेत्यांना अगदी फाडून खाल्ले. त्यानंतर चर्चा संपता संपता एका राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीने मत व्यक्त केले की, `तुमचे विश्लेषण बरोबर आहे. अशा दुर्दैवी घटना होऊ नयेत ही साऱ्यांचीच जबाबदारी आहे. राजकीय नेत्यांपासून याची सुरुवात व्हायला हवी हेही योग्य. पण बाकीच्यांचीही ही जबाबदारी आहे. आज पर्यावरण विरुद्ध विकास असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातून मार्ग कसा काढायचा यासाठी आपणही काही ठोस उपाय सुचवावे.' यावर मात्र चर्चा घेणाऱ्या अर्णव गोस्वामीने ते मत अमान्य केले आणि आम्ही फक्त प्रश्न विचारू आणि प्रश्न विचारणे सोडणार नाही, असा समारोप केला. या चर्चेचे स्वागत करतानाच वृत्तीचा मात्र निषेध करायला हवा. राजकारण, राजकीय नेते याबद्दल आज फार काही बोलण्यासारखे नसले तरीही; सारे खापर त्यांच्यावर फोडले की आपले काम संपले, अशी ही वृत्ती नक्कीच समर्थनीय नाही.

पर्यावरण रक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष हे केदारनाथ दुर्घटनेचे एक प्रमुख कारण आहे. गंगोत्रीपासून १६० किमीचा परिसर ecologically sensitive zone असल्याचे सरकारी अहवालच आहेत. त्यामुळे तिथे होणारी कामे अनेक प्रकारची काटेकोर काळजी घेऊन करायला हवीत. अशा प्रकारची काळजी घेतली जात नाही, असा अहवाल कॅगने २००९ सालीच दिलेला आहे. म्हणजे चार वर्षांपूर्वी. पण त्यावर अंमल मात्र झाला नाही. ताज्या ढगफुटीत वाहून गेलेल्या अनेक इमारती बेकायदेशीर असण्याची शक्यता आहे. जे झाले ते वाईट हे मान्य करतानाही राजकीय नेते आणि प्रशासन यांच्या चुकीकडे दुर्लक्ष कसे करता येईल? वाळू माफिया, लाकूड माफिया, जंगल माफिया, जमीन माफिया, जल माफिया हे सारे सगळीकडे आहेत तसेच उत्तराखंडातही आहेत. महाराष्ट्रातही आपल्याला हे नवीन नाही. या साऱ्या माफियांनी समाजाला सर्वत्र वेठीस धरले आहे. त्याचा भीषण परिणाम आज केदारनाथ दुर्घटनेच्या रुपात पाहायला मिळत आहे. भागीरथीचे अमाप पाणी आहे म्हणून अनावश्यक रीतीने अंदाधुंद हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट्सची उभारणी हेही महत्वाचे कारण आहे. अगदी विश्व हिंदू परिषदेने काही वर्षांपूर्वी गंगा वाचविण्यासाठी टिहरी धरणाला विरोध केला होता. भारतीय जनता पार्टीने मात्र पर्यावरणाच्या प्रश्नांकडे दुर्लक्षच केले.

परंतु प्रश्न इथेच संपत नाही. खरा प्रश्न हा आहे की, असे माफिया तयारच का आणि कसे होतात? जगातील सारी सत्ता आणि संपत्ती आपल्या हाती असली पाहिजे अशी वखवख, लालसा, हपापलेपण याच्या मुळाशी आहे. हे तर शक्य नाही. मग जास्तीत जास्त सत्ता आणि संपत्ती मिळवण्याचा आणि बाळगण्याचा प्रयत्न करायचा. संपत्तीसाठी सत्तेचे तळवे चाटायचे आणि सत्तेसाठी संपत्तीचे दासत्व स्वीकारायचे. या दोन्हीसाठी मग वाट्टेल ते करण्याची तयारी ठेवायची. पण एवढ्यानेही भागत नाही. सत्ता आणि संपत्ती याचा प्रमुख आधार सामान्य माणूस आहे. सामान्य माणसाशिवाय सत्ता मिळू शकत नाही आणि टिकूही शकत नाही. तेच संपत्तीच्या बाबतीत. सामान्य माणसाची मेहनत, कौशल्य आणि बुद्धिमत्ता यातूनच संपत्ती निर्माण होते. त्यामुळेच अनिच्छेने का होईना या सामान्य माणसाला, सत्ता व संपत्तीच्या या खेळात सहभागी करून घ्यावेच लागते. यातील गंमत अशी की, सत्ता व संपत्ती (विशेषत: संपत्ती) माणसाच्या जीवन व्यवहारालाही आवश्यक आहे. म्हणजेच ती त्याची गरजही  आहे. हा प्रश्न किती गुंतागुंतीचा आहे हे यातून स्पष्ट व्हावे. तीन मुद्दे याबाबत सांगता येतील-
१) संपत्ती ही माणसाची गरज आहे.
२) सुप्त रुपात त्याच्या मनात संपत्तीची लालसा आहे.
३) संपत्तीची लालसा तृप्त करण्याच्या प्रयत्नात जे वर पोहोचले आहेत ते सामान्य माणसाचा वापर करून घेत आहेत.
यातूनच अनेक समस्या आणि गुंतागुंती निर्माण होतात. अशांती निर्माण होते. अस्वस्थता निर्माण होते. लागेबांधे निर्माण होतात, गट निर्माण होतात.

सारी सत्ता आणि संपत्ती आपल्या हाती असावी अशी इच्छा असली तरीही तसे शक्य नसल्याने एकमेकांचे साहाय्य घेत अधिकाधिक लाभ पदरात पाडून घ्यायचा. कधी आवळून घ्यायचे, कधी मोकळे सोडायचे. सतत हिशेब मांडायचे. कधी एक जण बाजी मारेल तर कधी दुसरा. या साऱ्यात कोणाला तरी बळ मिळते आणि कोणी तरी बळी ठरतो. त्यातून वेगवेगळी तत्वज्ञाने निर्माण होतात. विविध पद्धती विकसित होतात. संकल्पना विकसित केल्या जातात. चांगल्या- वाईटाच्या, योग्य- अयोग्याच्या, जीवनस्तराच्या, प्रतिष्ठेच्या संकल्पना विकसित केल्या जातात. त्यांचा पद्धतशीर प्रचार- प्रसार केला जातो. आज आपण जाहिरातींचा जो पसारा पाहतो तो असाच आहे. त्याला वेष्टन चढवले जाते. असे वेष्टन चढवले की, आर. के. लक्ष्मणचा सामान्य माणूस त्या साऱ्या जाळ्यात छान अडकतो. या जाळ्यात अडकलेल्या माणसापुढे मग स्वप्ने सजवायची आणि सामुहिक लुटालूट करायची. सारं आयुष्य अशाच प्रकारे संपून जातं. कोणी यशस्वी म्हणून तिरडीवर चढतो, तर कुणी अयशस्वी म्हणून तिरडीवर चढतो. जग असंच सुरु राहतं.

या पार्श्वभूमीवर एक छोटीशी घटना सहज आठवते. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र सरकारने आपले औद्योगिक धोरण जाहीर केले होते. त्यावर चर्चा सुरु होती. त्यात डी.एस.के. डेव्हलपर्सचे कुलकर्णी सहभागी झाले होते. त्यांनी मुद्दा मांडला की, `लहान गावात सोयी नसतात; त्यामुळे उद्योग तेथे जात नाहीत. विमानतळ नसतात. जी विमानतळे आहेत ती लहान आहेत. अधिक विमाने तिथे ठेवता येत नाहीत.' वगैरे. त्यावर एकाने म्हटले की, तुम्ही तुमच्या पंचतारांकित जीवनशैलीला थोडी मुरड घातली पाहिजे. त्यावर कुलकर्णी म्हणाले, `हो. आम्ही मुरड घालू. विमानाऐवजी मोटारीने जाऊ. पण रस्ते तरी कुठे आहेत. सहा पदरी रस्ते हवेत.' या क्षणी अचानक त्यांना लक्षात आले असावे की, अरे आपण तर पुन्हा पंचतारांकित शैलीचीच चर्चा करीत आहोत. त्यामुळे सावरून घेत ते लगेच म्हणाले, `असे सहा पदरी रस्ते नसतील तर निर्यात कशी शक्य होईल? द्राक्षे ट्रकमध्ये भरली आणि ट्रक अडकला तर ती खराब होऊन जातील ना?' यावर अन्य कोणी काही बोलले नाही. हे विस्ताराने सांगण्याचे कारण हे की, कुलकर्णीसारखा माणूस असे फसवे युक्तिवाद करून सामान्य माणसाचा बुद्धिभेद कसा करीत असतो हे लक्षात यावे. यातील फसवेपण असे की, द्राक्षे खराब होतील हे खरे असले तरीही; इन्फोसिस वा विप्रो जे काही निर्यात करतात त्यासाठी सहा पदरी रस्त्यांची काहीही गरज नाही. किंवा, तिखट, हळद, मसाले, शर्ट, मेणबत्त्या, sanitary napkins, खडू, टाचण्या, डब्बे अशा असंख्य गोष्टी किंचित वेळ लागला तरी खराब होत नाहीत. सामान्य माणसाचे विचारीपण कसे वेठीस धरले जाते हे असंख्य उदाहरणांवरून सांगता येईल.

जग हे असे आहे. त्यामुळेच या जगाचा समतोल राहावा, या जगात शांतता, स्थैर्य, सलोखा राहावा यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न जगभरच्या प्रतिभावंतांनी, विचारवंतांनी, साधू संतांनी, धर्मांनी, समाज व्यवस्थांनी केला. या सगळ्या प्रयत्नांचे एक समान सूत्र म्हणजे, प्रत्येकाने अंतर्मुख झाले पाहिजे. अन्यांचा विचार केला पाहिजे. आपले वाटणे, आपल्या इच्छा, आकांक्षा वेळोवेळी तपासून पाहायला हव्यात. त्यातील अनावश्यक आणि अयोग्य इच्छा आकांक्षा टाकून द्याव्या. जीवनाचा सर्वांगानी विचार करावा. त्यातूनच अनेक प्रकारचे नीती-नियम, विधी-निषेध, कायदे-कानून, प्रथा-परंपरा वगैरे विकसित झाले.

आज मात्र विकास, विज्ञान, व्यक्तीस्वातंत्र्य, आधुनिकता आदी बाबींचा असा काही एकत्रित विस्फोट झाला आहे की, माणसाला कोणतेही बंधन नको. विचारीपण नको. हवे आहे केवळ सुख, सुख आणि सुख. या सुखाला अंत नाही. जो माणूस या सुखाच्या मागे धावतो आहे त्यालाही हे ठाऊक नाही की आपल्याला नक्की जायचे कुठे आहे? म्हणूनच आज तो ज्या सुखासाठी धडपडतो तेच उद्या त्याच्या दु:खाचे कारण ठरते. आज साधी सायकल असेल तर त्याला स्वयंचलित दुचाकी हवी. २-४ वर्षातच ती दुचाकी त्याला डोळ्यासमोर नकोशी होते, कारण त्याला मारुती-८०० भुरळ घालत असते. ती आली की, काही वर्षातच त्याला स्वप्न पडते होंडा सिटीचे आणि मारुती-८०० खुपू लागते. याला कुठेही अंत नाही. बरे ज्याला हा खेळ खेळायचा त्याने तो खेळायला कोणी हरकत घेण्याचे कारण नाही. पण दुर्दैव असे की, हा खेळ सगळ्यांना (म्हणजे केवळ व्यक्तींनाच नव्हे, तर निसर्गाला, भावभावनांना, चांगुलपणाला, मानवतेला) वेठीस धरतो. त्यामुळेच त्यावर प्रतिक्रिया उमटू लागतात. या प्रतिक्रिया जशा विचारवंतांच्या असतात तशाच निसर्गाच्याही असतात. अशीच एक प्रतिक्रिया निसर्गाने केदारनाथ येथे दिली.

आम्हाला एक घर पुरत नाही. पदपथसुद्धा मातीचे नकोत. त्याला वाळू लागते. आमची मागणी बेसुमार वाढत जाईल तेव्हा ती पूर्ण करण्यासाठी वाळूचा उपसा होईलच ना? हा उपसा मग नियमांच्या बाहेर जातो. पण कोणामुळे? आमच्या अनिर्बंध `हवे'पणानेच ना? आज गायी म्हशींची संख्या कमी होत आहे, पण दुध-दही, तूप, पनीर, खवा यांची मागणी वाढतेच आहे. कशी पूर्ण होणार ती? तेच पाण्याचे, तेच जमिनीचे, तेच लाकडाचे... सगळ्यांची रडकथा तीच. आज पृथ्वीचे तापमान सतत वाढत आहे. कदाचित अणुबॉम्बपेक्षाही मोठा असा हा धोका राहील, असे तज्ञ म्हणतात. या तापमान वाढीत सगळ्यात मोठा वाटा आहे ऑटो कुलिंगचा. पण आम्ही ए.सी. बंद करायला तयार आहोत का? गाड्यांचा वापर कमी करायला तयार आहोत का? आज राजकारणी, उद्योगपती, बिल्डर्स, माफिया यांच्या हातमिळवणीच्या चर्चा होतात. पण या बिल्डर्सच्या जाहिराती नाकारण्याची प्रसार माध्यमांची हिम्मत आहे का? एखादे माध्यम हे म्हणेल की, आम्ही बिल्डरची जाहिरात घेत नाही. पण त्याच वेळी ते माध्यम अल्युमिनियम कंपनीची जाहिरात घेते. कोण वापरते हे अल्युमिनियम? बिल्डरच ना? हे एक विषाक्त वर्तुळ आहे.

हे वर्तुळ भेदण्याचा प्रयत्न म्हणजेच धर्म, म्हणजेच आध्यात्म, म्हणजेच तत्वज्ञान, म्हणजेच संतांची शिकवण, म्हणजेच नीती, म्हणजेच कलाकाराची अस्वस्थता, म्हणजेच प्रतिभावंताची प्रज्ञा. आज आम्ही या साऱ्याला अडगळीत टाकले आहे. तसे नसते तर आज केदारनाथच्या यात्रेचे आम्ही पर्यटन केले नसते. अन या पर्यटनाला प्रोत्साहन दिले नसते. आदी शंकराचार्यांनी कशासाठी सांगितली ही चार धाम यात्रा? किंवा अन्य कोणतीही यात्रा? ती अवघड होती म्हणूनच. ज्यात अवघडपण नाही ती अन्य काहीही असू शकते, पण यात्रा नाही. अवघडपण नाही तर ती साधना नाही. यात्रा किंवा साधना यांना वेळ द्यावा लागतो. चांगले-वाईट, सुखाचे- दु:खाचे अनुभव, जीवन- मरणाच्या कळा, मान- अपमान अनुभवावे लागतात, पचवावे लागतात. यातूनच अनुभूती (realisation) होते. मी स्वत:. माझ्या भोवतीचं हे जग, आमचा संबंध आणि संघर्ष, त्यातील क्षणत्व आणि चिरकालीत्व, या साऱ्या मनोव्यापारातून होणारा ईशत्वाचा स्पर्श, त्यानंतर त्याची धारणा आणि नंतर जे होतं ते दर्शन. दर्शन होण्याची ही एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे. ती तुमच्याकडून अनेक गोष्टींची मागणी करते. ती किंमत न चुकवता आम्ही जे करतो ते फक्त पाहणे असते, दर्शन नाही. यात्रा दर्शनासाठी असतात, पाहण्यासाठी नाही. आम्ही त्या पाहण्यासाठी केल्या. मग पाहण्याची प्रक्रिया सुरु झाली आणि गाड्या, हॉटेल्स, गजबज, प्रदूषण, अविचार सुरु झाला. आज त्याचंच फळ आम्ही प्रत्यही भोगत असतो. केदारनाथचा अनुभव रोजचा नसल्याने त्याची चर्चा झाली. पण दरवर्षी सव्वा लाख लोक निव्वळ रस्ता अपघातात मरण पावतात, ते सवयीचे झाल्याने आम्ही विसरून जातो.

मग काय सगळे काही सोडून झाडांखाली भजन करत बसायचे फक्त? मुळीच नाही. ज्यांनी आध्यात्माचा, धर्माचा, संतसाहित्याचा प्रामाणिक धांडोळा घेतला ते सांगतील की, असे मुळीच नाही. सगळे करायचे. पैसा कमवायचा, सुख भोगायचे, पर्यटनाला जायचे, यात्राही करायच्या. परंतु यातील काहीही जीवनाचे ध्येय नाही हे लक्षात ठेवायचे. जीवनाचे ध्येय नावाची काही गोष्ट आहे. ती फार उंच आणि व्यापक आहे. तिच्यावरचे लक्ष ढळू द्यायचे नाही. त्या ध्येयाकडे जाण्यासाठी आवश्यक ते सारे काही करायचे. त्या ध्येयाकडे जाताना मार्गावरून बाजूला सारणार नाही असे सारे करायचे. पैसा कमावलाच पाहिजे पण अंबानी वा बिल गेट्स हे जीवनाचे ध्येय नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. सुख भोगलेच पाहिजे पण केदारनाथची यात्रा पायी आणि साधेपणानेच केली पाहिजे अन मृत्यूला सामोरे जाण्याच्या तयारीनेही. केदारनाथच्या गिरीकंदरात राहणाऱ्या आपल्याच रक्तमांसाच्या भावाबहिणींना चांगले जीवन जगायला मिळालेच पाहिजे, पण तेथील साधनसंपत्ती आमच्यासाठी ओरबाडून नाही; तर आमच्या घासातला घास देऊन. हा विवेक, विचार, समंजसपणा, संतुलन म्हणजेच आध्यात्मिकता, धर्म. केदारनाथाने शिकवलेला हा धडा आहे. शिकायचा की नाही हे आपल्यावरच अवलंबून आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, २९ जून २०१३

रविवार, २३ जून, २०१३

पैसा प्या पैसा

केदारनाथ दुर्घटनेची भीषणता छोट्या पडद्यावरून सगळे जग पाहत आहे. यातील एका व्यक्तीची आपबिती फार विदारक होती. त्या माणसाचा मुलगा पाणी पाणी करत होता. पण पाणी मिळत नव्हते. जिथून जसे शक्य होईल तसे पाण्याचे थेंब तो मुलाच्या तोंडात टाकत होता. त्याने सांगितले की, मरून पडलेल्या व्यक्तीची बनियन काढून ती मुलाच्या तोंडात पिळली. पण काही साध्य झाले नाही. अखेर पाणी पाणी करत त्याच्या मुलाने प्राण सोडला. त्याचं दु:ख आपण समजून घेऊच शकत नाही. आयुष्यभर आता ही घटना त्याचा पिच्छा पुरवणार आहे. पण आमच्यासाठी या घटनेचा काही बोध आहे की नाही? खरे तर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील दु:खाचे, अपघाताचे, दुर्दैवाचे प्रसंग बाकीच्यांसाठी काही शिकवण, काही बोध देऊन जातात. दुर्दैवाने आम्हाला अशा प्रकारे शिकण्याची सवय लागलेली नाही.

वरील प्रसंगातून पाण्याकडे पाहण्याची आमची दृष्टी, पाण्याविषयी आमची भावना, पाणीविषयक आमचे वर्तन हे आम्ही ठीकठाक करून घ्यायला हवे. हा विषय नवीन आहे असे नाही. पुष्कळदा त्याची चर्चा होते, अन वारंवार ती व्हायलाही हवी. पुढील महायुद्ध झाले तर ते पाण्यावरुनच होईल हेही सांगून झाले आहे. पण आम्ही पाण्याचा विचार करायला तयार नाही. आम्ही पैसा मोजतो, म्हणून वाटेल तेवढे आणि वाटेल तसे पाणी वापरण्याची आपल्याला मुभा आहे, ही वृत्ती टाकून देण्याची मात्र आमची तयारी नसते. वरील घटनेतील व्यक्तीच्या खिशातील पैशाचा, त्याला काहीही उपयोग झाला नाही. पैसा हे विनिमयाचे साधन आहे. पैसा काहीही तयार करू शकत नाही आणि पैसा कोणत्याही गोष्टीचा, गरजेचा पर्याय होऊ शकत नाही. या सगळ्याची जाणीव करून देणाऱ्या घटना आमच्या आजूबाजूला घडत नाहीतच असे नाही, पण आमची गुर्मी मात्र उतरायला तयार नाही. मोठमोठी शहरे, उद्योग पाण्याचा जो वापर करतात तो तर गुन्हेगारी स्वरूपाचा म्हणावा असा आहे. आम्ही जमिनीत पाणी मुरवत नाही. उपसा मात्र सतत सुरूच. सहज पाणी मुरावे यासाठी जमीन मोकळी ठेवायला आमची तयारी नाही. सिमेंट कोन्क्रीटचा एक भयानक भस्म्या रोग आम्हाला झाला आहे. ज्या मातीवर आम्ही आणि आमचा सारा सरंजाम उभा आहे त्या मातीविषयी अपार घृणा आम्ही बाळगतो.

पाण्याचा जपून आणि आवश्यक अन योग्य वापर तर सोडाच; पण रोज गाड्या धुणे, फरश्या धुणे, आजचे पाणी उद्या ओतून देणे; असे एक ना अनेक प्रकार. अतिशय थोडा पाऊस पडणाऱ्या राजस्थानच्या वाळवंटात पाण्याचे नियोजन आणि पाण्याचा वापर कसा होत असे, याचा इतिहास समजून घेण्यासारखा आहे. `राजस्थान की रजत बुन्दे' हे अनुपम मिश्रा यांचं पुस्तक सगळ्यांनी वाचावं असं आहे. त्यातून पाण्याची एक दृष्टी नक्कीच तयार होईल. पण अशा साऱ्या `निरर्थक' गोष्टींसाठी आमच्याकडे वेळ कुठे आहे?

केदारनाथाने एक जबर तडाखा लावून अनेक गोष्टी शिकण्याची, समजून घेण्याची संधी आम्हाला दिली आहे. वांड मुलाला पालक वा गुरुजन जसे कधीकधी जोरदार फटका देऊन वठणीवर आणण्याचा प्रयत्न करतात, तसेच या जगतपालकाने केले असावे. आम्ही आमचा वांडपणा टाकून देणार का, हा प्रश्न आहे. नाही तर उद्या, पाण्याऐवजी `पैसा प्या पैसा' असे म्हणण्याची पाळी येईल.

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, २४ जून २०१३

गुरुवार, १३ जून, २०१३

अडवाणी वाईट आहेत का?

अडवाणींनी राजीनामा दिला आणि अनेक चर्चा सुरु झाल्या. अनेकांना तर धरबंदच राहिला नाही. मनात प्रश्न आला, अडवाणी खरंच वाईट आहेत का? समाजाचीही गंमत असते. एखाद्याला डोक्यावर घेईल तर इतके की विचारू नका. आणि एखाद्याला डोक्यावरून खाली आपटेल तेही तसेच अतिरेकी. अडवाणींचे कर्तृत्व, त्यांनी खाल्लेल्या खस्ता वगैरे मग समाजाला आठवत नाहीत. त्याच्याशी त्याला फारसे देणेघेणे नसते. आज तो नरेंद्र मोदींवर स्वार झालेला असतो. कोणे एके काळी समाज अडवाणींवर असाच स्वार झाला होता याचा त्याला सहज विसर पडतो. अजून १५-२० वर्षांनी मोदी अडवाणींच्या मार्गाने तर जाणार नाहीत ना, ही शंकाही त्याला स्पर्श करत नाही. भस्मासुराची पुराणकथा; नीतिकथा वा बोधकथा म्हणून न पाहता `पुराणातली वांगी' म्हणून सोडून देतो. आणि तेच ते पुन्हा पुन्हा घडूनही समाज मात्र जिथल्या तिथेच राहतो.

याचा अर्थ अडवाणींचे सारे काही बरोबर आहे असा नक्कीच नाही. त्यांनी आता निवृत्त होऊन `तुका म्हणे आता, उरलो उपकारापुरता' असेच वागायला हवे. अजूनही सत्तेला चिकटून राहणे, उच्च पदाची आकांक्षा बाळगणे अन त्यासाठी बटबटीत राजकारण करणे नक्कीच अयोग्य आहे. पण ही भूमिका घेताना त्यामागील भाव, त्याचा आशय आणि अभिव्यक्ती कशी होते हे महत्वाचे आहे. त्यांच्याबद्दलचा उपेक्षेचा, उपहासाचा, तिरस्काराचा भाव नक्कीच योग्य म्हणता येणार नाही. तसेच मोदींसाठी त्यांनी दूर व्हावे हे देखील बरोबर नाही. पक्षासाठी, देशासाठी मोदींनी नेतृत्व करावे हा एक वेगळा मुद्दा आहे. आणि अडवाणींची वर्तमान भूमिका काय असावी हा वेगळा मुद्दा आहे.

खरं तर अशी संघर्षाची स्थिती का निर्माण होते? घरात सासूची सत्ता चालावी की सुनेची असा हा मुद्दा आहे. वर्चस्व गाजवण्याची लालसा, निर्णयाचे अधिकार माझ्या हाती असावेत ही भूमिका, लाभ-हानीची गणिते, यातून संघर्ष उत्पन्न होतात. पण निर्णय तर घ्यावे लागतात, कृती तर करावी लागते; प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी असते; मग अशा वेळी काय करायचे? ऐकायचे कोणाचे, माझे की तुझे? याचे की त्याचे? मोठ्यांचे की लहानांचे? तरुणांचे की म्हातार्यांचे? पुरुषांचे की बायकांचे? पैसेवाल्यांचे की गरिबांचे? आपण मत आणि निर्णय यांची गल्लत करतो. मत प्रत्येकाला असू शकते. आसवेही. पण निर्णय ही वेगळी आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असते. निरीक्षण, विश्लेषण, परिणाम, व्यवहार, भावना, लाभ आणि हानीची तुलना; या आणि अशा अनेक गोष्टी त्यात असतात. पण आपल्याकडे यासाठी फुरसद व इच्छा दोन्हीही नसते. आम्हाला २+२= ४ असे सोप्पे उत्तर हवे असते. जीवन व्यवहार असा नसतो, हे आपण लक्षात घेत नाही. एखादा निर्णय वा एखादी कृती करायची वा नाही हे; मत वा वाटणे यावर न बेतता; त्याचे गुंतागुंतीचे निकष समजून घ्यायला हवेत. हे शाळा, महाविद्यालयात शिकवता येत नाहीत. ते जीवन व्यवहारातूनच शिकावे लागतात. बहुतेक वेळा स्वत:चे स्वत:च. यालाच समजूतदारी आणि परिपक्वता म्हणतात. ती असली की मग अनेक गोष्टी सुरळीत होतात. राजकारणात, समाजकारणात, अर्थकारणात आणि कुटुंबातही. नि:स्वार्थता, दुसऱ्याच्या भूमिकेत शिरून विचार करण्याची वृत्ती, `मी' बाजूला काढून ठेवण्याची तयारी, या त्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत. हे जसे समाजाला लागू होते तसेच व्यक्तीलाही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १३ जून २०१३

गाढव तज्ञ

अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी आज जनतेला आवाहन केले की, कृपया सोने खरेदी करू नका. आपण किती गाढव आहोत, हे दाखवण्याची या तज्ञ लोकांना वारंवार इतकी उबळ का येते कळत नाही. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरते आहे. सोने आयात करण्यासाठी आपल्याला डॉलर द्यावे लागतात. त्यामुळे डॉलरची गंगाजळी आटते आणि foreign exchange reserve घटते. त्याने असंतुलन निर्माण होते, म्हणून सोने खरेदी करू नका, असा यांचा तर्क!! खरे तर `दुखणे पायाला आणि पट्टी डोक्याला' असा हा प्रकार आहे.

मुळात हे सगळे प्रश्न निर्माण झाले आहेत, कच्च्या तेलामुळे. यावर उपाय करायचे सोडून तज्ञांचे मात्र उफराटे उपदेश देणे सुरु आहे. कच्च्या तेलासाठी आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यावाचून गत्यंतर नाही. त्यामुळे त्यातून मार्ग काढायचा याचा अर्थ, त्याचा वापर कमी करायचा आणि त्याला पर्याय शोधायचे. वापर कमी करायचा तर पर्यायी जीवनशैली विकसित करावी लागेल. शहर नियोजनापासून अनेक गोष्टी करता येतील. पण त्या करायच्या नाहीत आणि चुकीचे उपदेश द्यायचे. याला काय म्हणायचे? खरे तर आजची अर्थव्यवस्था कोणतेही प्रश्न सोडवू शकत नाही. अन या अर्थव्यवस्थेचा आधार असलेले अर्थशास्त्र दिशाहीन आहे. मुळात अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था, अर्थचक्र कशासाठी? या प्रश्नापासून सुरुवात करायला हवी. तो एक स्वतंत्र विषय आहे.

परंतु मर्यादित विचार केला तरीही, सोने खरेदी न करण्याचा उपदेश किती मूर्खपणाचा आहे हे लक्षात येईल. आपल्या देशात सोने खरेदीची जी एक परंपरा आहे त्यामुळे लोकांच्या जगण्याला आणि अर्थव्यवस्थेला एक मजबूत आधार आहे. अडीअडचणीला लोकांना त्याचा आधार असतो. एक अतिशय सकारात्मक असा आपल्या जीवनव्यवहारांचा तो पैलू आहे. सरकारच्या नाकर्तेपणात स्वत:ला वाचवण्याचा तो एक चांगला उपाय आहे. दुसरे असे की, कच्चे तेल वा अन्य काहीही वापरून संपून जाणारे आहे. त्यात खर्च होणारे डॉलर म्हणजे घाट्यातला सौदा आहे. म्हणजे डॉलर तर खर्च होणारच. पण त्यानंतर आपल्या हातीही काही राहणार नाही. सोने खरेदी केल्यास, उद्या तिजोरीत खडखडाट झाला तरीही, आपण कफल्लक मात्र नक्कीच होणार नाही. सोने ही नेहमीच खात्रीची गुंतवणूक आहे. कदाचित त्याची विनिमय दराने किंमत थोडी कमीजास्त होईल, पण त्याचे मूल्य मात्र कायम राहील आणि म्हणूनच ते कधीही शून्यावर येणार नाही.

पण काय करणार? आज परिस्थिती अशी आहे की, `गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता.'

-श्रीपाद कोठे
नागपूर
गुरुवार, १३ जून २०१३