शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४

उफराटा गाढवपणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी समारंभाला संतमहंत उपस्थित होते त्यावर आता टीकाटिप्पणी सुरु झाली आहे. अकलेचे तारे तोडले जात आहेत. का? संतमहंत समाजाचे अंग नाहीत का? हजारो वर्ष झालीत देव धर्म (याचा अर्थ आपल्या प्रत्ययाला येणारे विश्वच फक्त वास्तव नसून, आपल्या प्रत्ययाला न येणारे विश्वही आहे असा विश्वास असणारे.) मानणारे आणि न मानणारे असा झगडा सुरु आहे. तरीही आजदेखील देव धर्म मानणारे लोकच जगात (फक्त भारतात नव्हे) बहुसंख्य आहेत. भारताचा आणि महाराष्ट्राचाही तोच मुख्य प्रवाह आहे. तो नाकारण्याचे कारण काय? शासनाने खेळाडू, उद्योजक, व्यावसायिक, शिक्षक, सैनिक, पोलिस, वैज्ञानिक, महिला, बालके, साहित्यिक, कलाकार अन अन्य अशाच सगळ्यांचा गौरव- सन्मान करावा; पण संतमहंतांचा नको. का? या तर्काला मूर्खपणा याशिवाय काय म्हणायचे? वास्तविक समाजाचे सगळे घटक जर कुठे एक होत असतील तर ते देवाच्या दारीच. कोणाला पटो किंवा न पटो. सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिलेले चालते, पण तो ज्या देवधर्माला मानतो त्याचा सन्मान चालत नाही. संतमहंतांची माणसाच्या/ समाजाच्या जडणघडणीत एक महत्वाची भूमिका असते. केवळ भारतात नव्हे, संपूर्ण जगभर. संत भोंदू नसतात का? ढोंगी नसतात का? म्हणून आमचा त्यांना विरोध आहे वगैरे तर्क बालिश बडबड यापेक्षा अधिक काही नाही. भोंदू आणि ढोंगी कोण नसतात? विज्ञानापासून सत्तेपर्यंत आणि शिक्षणापासून उद्योगापर्यंत सर्वत्र भोंदू आणि ढोंगी असतात. याचा अर्थ भोंदुगिरी आणि ढोंग याचे समर्थन करणे नाही. पण ते ओळखणे, उघड करणे, त्यापासून समाजाला/ व्यक्तीला परावृत्त करणे यासाठी वेगळे उपाय, पद्धती वगैरे आहेत. त्याला कोणाची नादेखील नाही. पण काहीतरी कारणे पुढे करायची आणि संतमहंत यांच्यावर आगपाखड करायची हे योग्य नाही. कोणी देवधर्म मानायचा वा नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण देव नाही असे नि:संदिग्धपणे जोवर सिद्ध होत नाही, तोवर समाजाचा एक महत्वाचा घटक म्हणून तो विषय आणि वर्ग राहणारच. आणि म्हणूनच शासनानेही त्यांचा आदर-सन्मान करायलाच हवा. राज्यघटना वगैरेचा हवाला देऊन विरोध करणाऱ्यांना कशाचेही काहीही कळत नाही असे म्हणण्याशिवाय पर्याय नाही. डॉ. आंबेडकरांनी १९५० साली घटना सादर केली आणि त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी १९५६ साली बौद्ध धर्म स्वीकारला, हे विसरता कामा नये. मार्ग कोणता हा भाग ज्याच्या त्याच्या रुची प्रकृतीचा आहे. परंतु डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या प्रकांड बुद्धिवादी पंडितालाही धर्म अतिशय महत्वाचा आणि मोलाचा वाटत होता. पण तो व्यक्तिगत ठेवावा वगैरे फालतूपणाला अर्थ नाही. व्यक्तीसाठी जर तो अतिशय महत्वपूर्ण असेल तर शासन दरबारी त्याचा सन्मान करणे चुकीचे हा उफराटा गाढवपणा फक्त तथाकथित बुद्धीवादीच करू जाणोत.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १ नोव्हेंबर २०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा