शनिवार, ३१ जानेवारी, २०१५

गांधीजींची पुन्हा हत्या नको...

आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. शहीद दिन म्हणूनही हा दिवस ओळखला जातो. गांधी हत्या, नाथुराम गोडसे, गोपाळ गोडसे, त्या घटनेचा इतिहास, सत्य, अहिंसा, स्वच्छता; या विषयांची या निमित्ताने प्रसार माध्यमात चर्चा होते. ती स्वाभाविक आहे. परंतु गांधीजी हे अनेक पैलू असलेलं व्यक्तिमत्व होतं. त्यातील बोटावर मोजण्याएवढ्या पैलूंची चर्चा होते, बाकी अस्पर्शित राहतात. असाच एक पैलू म्हणजे इतिहास. अलीकडे भारताचा इतिहास, भारतीय समाजाची विविध क्षेत्रातील हजारो वर्षांची साधना, प्रगती या गोष्टींचीही चर्चा होऊ लागली आहे. त्याची टवाळीही होत असते. पण गांधीजींना याबद्दल काय वाटत होते? दोन उदाहरणे याबाबत उल्लेखनीय ठरावीत.

राष्ट्रीय शिक्षण देता यावे यासाठी गांधीजींनी १९२० साली गुजरात विद्यापीठाची स्थापना केली. त्यावेळी अभ्यासक्रमाची तयारी करताना प्रश्न आला की, आजचा इतिहास तर इंग्रजांनी लिहिलेला इतिहास आहे. तो चुकीचा आहे. मग काय करायचे? तेव्हा मगनलाल प्रभुदास देसाई या इतिहास शिक्षकाने दोन वर्षे संशोधन करून भारताचा २०० वर्षांचा इतिहास लिहिला. प्रयत्नपूर्वक, अभ्यासपूर्वक त्यांनी लिहिलेल्या इतिहासाच्या त्या पुस्तकाचे शीर्षक होते- `भारत मा अंग्रेजोने वेपारशाही' (भारतातील इंग्रजांची व्यापारशाही- जसे लोकशाही, राजेशाही, हुकुमशाही तसे व्यापारशाही).

दुसरे उदाहरण आहे प्रो. धरमपाल यांचे. प्रो. धरमपाल हे अतिशय ज्येष्ठ गांधीवादी. अखेरच्या दिवसात त्यांचा निवास गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमातच होता. गांधीजींच्या कार्यात ते त्यांच्यासोबत प्रदीर्घ काळ होते. १९३१ साली इंग्लंडमध्ये गोलमेज परिषद झाली. त्यावेळी चर्चेच्या ओघात गांधीजी इंग्रजांना उद्देशून एकदा म्हणाले की, `आमची भारतीय शिक्षण पद्धती तुमच्यापेक्षा अधिक चांगली, व्यापक आणि श्रेष्ठ होती.' त्यावर इंग्रज तज्ञांनी त्यांना पुरावे मागितले. (अगदी आजचे आमचे तथाकथित विद्वान मागतात तसे.) गांधीजी म्हणाले- `माझ्याकडे पुरावे नाहीत. त्यामुळे मी तुमचे समाधान करू शकणार नाही. पण मी म्हणतो ते सत्य आहे.' या उत्तरावरून गांधीजींची मस्करी करण्यात आली, टर उडवण्यात आली. १९४७ साली देश स्वतंत्र झाल्यानंतर गांधीजींचे अनेक अनुयायी त्यांच्याकडे पुढील मार्गदर्शन घेण्यासाठी गेले. त्यात प्रो. धरमपाल हेही होते. ते गांधीजींना म्हणाले- `आता देश स्वतंत्र झाला आहे. आता मी काय करावे? माझ्यासाठी तुमची काय आज्ञा आहे?' त्या क्षणी गांधीजींच्या मनाच्या तळाशी रुतून बसलेला १९३१ सालचा त्यांचा उपहास वर आला आणि तो सारा प्रकार सांगून गांधीजी प्रो. धरमपाल यांना म्हणाले, तुम्ही प्राचीन भारतीय शिक्षण या विषयावर संशोधन करून माझ्या म्हणण्याची पुष्टी करता येते का पाहा.' त्यानंतर प्रो. धरमपाल यांनी त्या कामाला वाहून घेतले. सुमारे चार दशके त्यांनी अथक अभ्यास आणि संशोधन केले. त्यापैकी बहुतांश काळ ते विदेशात देखील होते. ब्रिटीश पार्लमेंटच्या ग्रंथालयात बसून, हजारो कागदपत्रांचे सखोल संशोधन करून त्यांनी प्राचीन भारतीय शिक्षणाचा इतिहास सिद्ध केला. The Beautiful Tree शीर्षकाने त्यांचे हे संशोधन पुस्तकरूपाने प्रसिद्ध आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेसोबतच भारतीय ज्ञानविज्ञान, भारतीय संशोधने, भारतीय समाजव्यवस्था, आणि हे सारे उद्ध्वस्त करण्याची कारस्थाने अन डावपेच या साऱ्याचेही वस्तुनिष्ठ संशोधनात्मक लेखन त्यांनी केले. अनेक खंडात त्यांचे हे संशोधन उपलब्ध आहे.

आज जेव्हा इतिहास पुनर्लेखनाचा विषय येतो, भारतातील प्राचीन ज्ञानविज्ञान, भारतातील प्राचीन संशोधने, प्राचीन भारतीय व्यवस्था यांचा विषय येतो तेव्हा तथाकथित विद्वान आणि अभ्यासक जी कोल्हेकुई करतात; त्या पार्श्वभूमीवर गांधीजींची त्या संदर्भातील भूमिका आणि दृष्टीकोन महत्वाचा ठरतो. गांधीजींच्या हत्येची चर्चा करतानाच त्यांच्या या पैलूकडे दुर्लक्ष केले, त्याकडे जाणूनबुजून कानाडोळा केला तर ती त्यांची वैचारिक हत्याच ठरेल. एका नाथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केली, त्याने फक्त एक शरीर संपले. पण त्यांच्या वैचारिक हत्येचे परिणाम अधिक व्यापक आहेत. नाथुराम गोडसे अपराधी होताच. त्याला शिक्षाही मिळाली. पण वैचारिक हत्येचे पातक करणाऱ्यांचा अपराध मोजून त्यांनाही शिक्षा व्हायला नको का?

- श्रीपाद कोठे
नागपूर
शुक्रवार, ३० जानेवारी २०१५

मंगळवार, २७ जानेवारी, २०१५

हे तर चूक, पण हेही चूकच

फ्रान्सच्या `शार्ली हेब्डो' साप्ताहिकावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यावर जगभरात विविध प्रतिक्रिया उमटल्या. कोणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बाजू उचलून धरली, तर कोणी इस्लामिक कट्टरवादाचा समाचार घेतला. कोणी तर तिसऱ्या महायुद्धापर्यंत जाऊन पोहोचले. या अतिरेकी हल्ल्यानंतर साप्ताहिकाने पुन्हा एकदा इस्लामला मंजूर नसलेले मोहम्मद पैगंबर साहेबांचे व्यंगचित्र मुखपृष्ठावर छापून `हम भी कुछ कम नही' हे दाखवून दिले. त्यांना इस्लामी जगतातून पुन्हा धमक्याही मिळाल्या. भारतातही यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. कथित धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणेच अनाकलनीय होत्या. त्यांच्या दृष्टीने एखादी गोष्ट योग्य वा अयोग्य ठरण्याची एकच कसोटी असते. ती म्हणजे, मुसलमानांची बाजू घेणे. बाकी साऱ्या गोष्टी, सारे तर्क त्यानुसार बेतले जातात. या धर्मनिरपेक्षतेच्या ठेकेदारांच्या व्यतिरिक्त आणखीन दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. एक होती अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गाणारी आणि दुसरी होती, भारताने भोगलेल्या मुस्लिम अतिरेकापोटी उमटलेली. `पहा,  मुस्लिम कट्टरता जगभरात थैमान घालीत आहे आणि तो जगाला असलेला धोका आहे. भारत गेली अनेक शतके त्याच्याशी झुंज देत आहे. आता वेळ येउन ठेपली आहे की, सगळ्या जगाने मिळून तो निपटून काढायला हवा-' अशा आशयाची. जगातील किंवा भारतातील या सगळ्याच प्रतिक्रिया उथळ म्हणाव्या लागतील. मुस्लिम कट्टरता हे वास्तव आहे. त्यात दुमत होण्याचे कारण नाही. `भारतीय सेक्युलर' सोडले तर कोणाचे त्या बाबतीत दुमत होणारही नाही. अगदी इस्लामिक देशांचे सुद्धा. आज पाकिस्तान जी भाषा बोलतो आहे, ती याचेच निदर्शक म्हणावी लागेल. त्यामुळे मुस्लिम कट्टरता नीट हाताळायला हवी, समूळ नष्ट करायला हवी आणि त्यासाठी संपूर्ण जगाने प्रयत्न करायला हवे यात वादच नाही. मात्र  `शार्ली हेब्डो'च्या मार्गाने तसे करणे योग्यही नाही आणि फलदायीही नाही. या घडामोडींच्या अनुषंगाने दोन बाबींचा सखोल विचार करायला हवा. एक म्हणजे, अभिव्यक्तीस्वातंत्र्य कसे आणि किती असावे? दुसरे म्हणजे, इच्छित परिवर्तन कसे घडवावे?

एक गोष्ट निर्विवादपणे मान्य करायला हवी की, `शार्ली हेब्डो'ने जे काही केले ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सरळ सरळ उल्लंघन आहे. अतिरेकी हल्ल्यानंतर त्याने मोहम्मद पैगंबर साहेबांचे व्यंगचित्र छापणे ही कृती तर उघड चिथावणीखोर आहेच, पण त्याचे मूळ असलेले व्यंगचित्र हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे सरळ सरळ उल्लंघन आहे. केवळ एखाद्याला एखादी गोष्ट वाटते म्हणून ती व्यक्त केलीच पाहिजे आणि सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, हा अगोचरपणा झाला. माणसाच्या मनात अनेक गोष्टी येत जात असतात. त्यात प्राकृत, संस्कृत, विकृत असे सगळे प्रकार असतात. आपल्या मनातील प्रत्येकच वांती कुठेही अन कशीही बाहेर काढायची, याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणायचे का? अन तसे म्हणायचेच असेल तर `पिके'वर किंवा `एम. एफ. हुसेन'वर आक्षेप घेण्याचे कारण नाही. ज्या कारणांनी `पिके' चित्रपट वा हुसेनच्या चित्रांवर आक्षेप घेणे योग्य आहे त्याच न्यायाने पैगंबर साहेबांच्या व्यंगचित्रावरील आक्षेप योग्य आहे. अशा व्यंगचित्रावर मुस्लिमांनी का नाराज होऊ नये? मुळात सगळ्या जगाने प्रतिमा पूजन टाकून द्यावे हा इस्लामचा दुराग्रह जसा आणि जितका अयोग्य आहे तितकाच, इस्लामला मूर्तीपूजा मान्य नसतानाही आम्ही त्यांची मान्यता मोडीत काढून त्यांना डिवचू; ही मानसिकताही अयोग्य आहे. आपण हिंदूंनी विशेषत: हे लक्षात घ्यायला हवे. `एकं सत, विप्रा: बहुधा वदन्ति' ही जर आपली जीवनश्रद्धा असेल तर पैगंबर साहेबांचे चित्र काढण्याचा आचरट आग्रह चुकीचा आहे असेच म्हणावे लागेल. पैगंबर साहेबांचे चित्र काढल्याने काय मोठेसे होणार आहे? किंवा ते नाही काढले तर जगाचे काय नुकसान होणार आहे? आम्ही जर त्यांच्याच पावलावर पाऊल टाकीत राहिलो तर आमचे वैशिष्ट्य आणि महानता गमावून बसू. नव्हे आम्हीही त्यांच्याच पंगतीत जाऊन बसू. हिंदूंनी शक्तिशाली व्हायला हवे याचा जो काही आशय आहे त्यात आपली वैशिष्ट्ये आणि महानता न गमावता योग्य गोष्टींसाठी आग्रही होणे हा महत्वाचा पैलू आहे. मात्र आग्रह आणि अतिरेक यातील सीमारेषा निश्चित करण्याचा विवेक करण्याएवढी परिपक्वता आपल्यात असायला हवी. मुसलमान समाजातील बुरखा सारख्या अनिष्ट प्रथा, जगभरातील मुस्लिम आक्रमणे आणि आक्रस्ताळेपणा यांचा इतिहास, दारूल हरब आणि दारूल इस्लाम या किंवा यासारख्या त्यांच्या मूळ तत्वज्ञानातील संकल्पना; यासारख्या विषयांवर चकार शब्द न काढणे हा नक्कीच दुबळेपणा आहे. तो त्यागायलाच हवा. मुसलमान समाजातील तात्विक आणि व्यावहारिक परिवर्तन, त्याचे त्या समाजावरील आणि अन्य समाजांवरील परिणाम, मुसलमान समाजाचा अन्य समाजांशी संबंध, त्यांच्यातील सलोखा, शांततापूर्ण सुखदायी सहअस्तित्व; यांची व्यापक चर्चा व्हायला हवीच. योग्य त्या मंचावर, योग्य त्या भाषेत, योग्य त्या व्यक्तींनी अशा प्रकारचे प्रयत्न करणे यात वावगे काहीच नाही. किंबहुना तोच योग्य परिवर्तनाचा राजमार्ग आहे. हे करताना अन्य लोक दुबळे आहेत, आपल्या अतिरेकाला ते घाबरतात, आक्रस्ताळेपणा करून आपण वाटेल ते करू शकतो, असा मुसलमान समाजाचा ग्रह होणार नाही; तसेच पूर्वीच झालेला अशा प्रकारचा ग्रह कायम टिकणार नाही; असे अन्य समाजाचे, विशेषत: हिंदू समाजाचे वर्तन असायलाच हवे. त्यासाठी जे काही करणे आवश्यक ते करायलाच हवे. मात्र हे करताना परिवर्तनाची व्याप्ती आणि सगळ्यांबद्दल समादराची भावना यांचे भान राखले जायला हवे. पैगंबर साहेबांचे व्यंगचित्र काढणे आणि त्याचे समर्थन करणे हा तो मार्ग नाही आणि `तुम्हाला काहीही वाटो आम्ही असेच करीत राहणार' हा  `शार्ली हेब्डो'चा आचरटपणा तर निषेधार्हच आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली संपूर्ण मानवजातीला तंत्रविहिनतेकडे नेण्याचा आणि विनोदाच्या नावाखाली मानवी जीवनाला गांभीर्यहीन बनवण्याचा जो उपद्व्याप सध्या जगभर सुरु आहे तो नीट समजून घेणे गरजेचे आहे. यामुळेच भारतातील `पिके'चे आणि फ्रान्समधील  `शार्ली हेब्डो'च्या कृतीचे समर्थन होऊ लागते. साहित्य, पत्रकारिता, चित्रपट, नाटके, वृत्तपत्रे, अन्य नियतकालिके, दूरचित्रवाणी, आकाशवाणी, भ्रमणध्वनी, आंतरजाल; असा खूप सारा पसारा मानवजातीने २१ व्या शतकापर्यंत पसरून ठेवलेला आहे. परंतु ही सारी माध्यमे आहेत. त्यांचा उपयोग कशासाठी करायचा, किती करायचा, कुठे करायचा, का करायचा, किंवा हे सगळे का करायचे नाही याची साधकबाधक चर्चा मात्र होत नाही. त्यानुसार वर्तन ही तर दूरची गोष्ट राहिली. प्रत्येक साधन प्रत्येक गोष्टीसाठी योग्य असतेच असे नाही. त्या प्रत्येक साधनाच्या मर्यादा असतात. या मर्यादा जशा शारीरिक असतात तशाच मानसिक, आर्थिक, सामाजिक, भावनिक, वर्तनशैलीला अनुसरून; अशा अनेक प्रकारच्या असतात. म्हणूनच त्या साधनांचा अमर्याद, बेछूट उपयोग अयोग्य आणि त्याज्य ठरतो. परंतु या सगळ्याचा गांभीर्याने विचार न करता अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे गोडवे गायिले जातात. कोणतेही स्वातंत्र्य व्यक्तीच्या आणि समाजाच्या हितरक्षणाने मर्यादित होत असते, नव्हे व्हायला हवे. स्वातंत्र्य हे मूळ तत्व नसून व्यक्तीचा आणि समाजाचा विकास आणि त्यांचे हितरक्षण ही मूळ बाब आहे. त्यासाठी आवश्यक आणि पोषक असेच स्वातंत्र्य असायला हवे. हे सत्य स्वीकारताना अर्ध्याकच्च्या मनाने, पण परंतु करीत, स्वीकारणे कुचकामाचे ठरेल. स्पष्ट व रोखठोक विचार करायला हवा. नाहीतर स्वातंत्र्याच्या नावाने तंत्रविहिनतेकडे सुरु असलेला प्रवास कपाळमोक्ष घडवल्याशिवाय राहणार नाही.

कोणत्याही गोष्टीला विनोदी फोडणी देण्याचाही प्रकार प्रघात होऊ पाहतो आहे. take it easy - अशी एक संस्कृतीच रुजवण्याचा प्रयत्न सुरु आहे. माणसावरील दबावाचे आणि त्याच्या तणावाचे इतके भयंकर स्तोम माजवले जात आहे की, गांभीर्य नावाची काही गोष्ट आहे आणि ती आवश्यक आणि अपरिहार्य आहे याचाच विसर पडावा. जो उठेल तो, ज्यावर वाटेल त्यावर, जे वाटेल तसे बरळत सुटतो; वाटेल तशी टीकाटिप्पणी करत सुटतो, वाटेल तशी प्रतिक्रिया देत राहतो आणि कळस म्हणजे वाटेल तसे हिडीस कलारूप देत राहतो. खरे तर विनोद हा विषय गांभीर्याने घेण्याचा आहे हे भानच सुटले आहे. विनोदाचे जीवनात एक स्थान आहे. पण त्याची एक मर्यादाही आहे. चार घटका विरंगुळा आणि भावनांचे विरेचन एवढेच त्याचे क्षेत्र आहे. पण फक्त चार घटकाच, उरलेल्या घटीकांचे काय? त्याचे गांभीर्य राहायला आणि राखायला हवे की नाही? दुसरे म्हणजे- माणूस त्याला वाट्टेल तसा, वाट्टेल त्या मृगजळामागे धावत सुटणार, त्याविषयी काहीही ऐकून घेण्याची त्याची तयारी नसणार आणि वरून त्याच्यावरील दाब आणि त्याचा ताण यांचे बहाणे करून take it easy चे तत्वज्ञान बनवणार. ही सरळ सरळ विकृत मानसिकता आहे. विनोदाने आजवर जग घडवलेले नाही. जगात जे काही चांगले, आनंददायी, सुखपूर्ण, सुखपोशक, आधार देणारे, घडवले आणि निर्मिले गेले आहे; ते ते अतिशय गांभीर्याने घडलेले वा घडवलेले आहे, हे विसरता कामा नये. नेते असोत वा वैज्ञानिक, सामाजिक कार्यकर्ते असोत वा तत्वज्ञानी, कारखानदार असोत वा सैनिक; यांच्यावर विनोद वगैरे झाले असतील, पण हे कोणीही विनोदाच्या वगैरे भानगडीत पडले नाहीत. कोणासोबत हसणे आणि कोणाला हसणे यातील फरक समजायला अगोदर गांभीर्य समजावे लागते. जीवनातील हास्य नाकारणारे गांभीर्य सुतकी असतेच, पण जीवनातील गांभीर्य नाकारणारे हास्य पोरकट असते; हे त्याहून खरे आहे. एक वेळ एखादी व्यक्ती गंभीर राहत असेल, आपल्याशी बोलत नसेल ते चालू शकते, पण आपल्याला कुणी हसले तर चालेल काय? स्मितहास्याची प्रसन्नता आणि दात विचकण्याचा निलाजरेपणा यातील फरक पुसून टाकणे श्रेयस्कर ठरेल का? म्हणूनच अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय, विनोद काय, व्यंगचित्र काय; सगळ्याची जाण आणि समज वाढायला हवी आणि त्याला अनुसरूनच कायदे-नियम असायला हवेत. आज त्याची वानवा आहे. म्हणूनच `पिके'तील थिल्लरपणा चूक आणि `शार्ली हेब्डो'चे व्यंगचित्रही चूकच.

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, २७ जानेवारी २०१५

शनिवार, १० जानेवारी, २०१५

महान विचारवंत समाजसेवकाची असहिष्णुता

एकेक वेळ असते आणि त्या क्षणातून त्या व्यक्तीची ओळख होत असते. आपण सहिष्णू आहोत असे म्हणणे वेगळे आणि तसे असणे वेगळे. आज असाच एक अनुभव आला. विश्वंभर चौधरी हे नाव आता महाराष्ट्रात नवीन राहिलेले नाही. त्यांनी त्यांच्या फेसबुक पानावर एक कथित छोटीशी कथा लिहिली आहे. महात्मा गांधी आणि रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांची भेट, असा त्या कथित उपरोधिक कथेचा विषय आहे. अशी भेट झाली हाच मुळात खोटा प्रचार आहे, असा त्याचा ध्वनित अर्थ आहे. त्यावर मी खरमरीत मत व्यक्त केले आणि त्या कथेला शीर्षकही सुचवले. काही वाचकांनी माझे मत आणि शीर्षक लाईक केल्याचे नोटिफिकेशन सुद्धा मला आले. त्यावेळी दुसऱ्या कामात असल्याने मी व्यस्त होतो. थोड्या वेळाने पाहतो तर विश्वंभर चौधरी यांनी मला त्यांच्या मित्र यादीतून काढल्याचे दिसले. त्याचे मला कणभरही दु:ख नाही. कोणाच्या मित्र यादीत असणे वा नसणे किंवा नाव असलेल्या व्यक्ती सोबतचे फोटो वगैरे खूप म्हणजे खूपच छोट्या गोष्टी आहेत माझ्यासाठी. शोध पत्रकारितेचा पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते स्वीकारतानाचा फोटोही मी स्वत:च्या वडिलांना बैठकीच्या खोलीतून काढायला लावला होता. अन सुमारे १५ वर्षांपूर्वीची ही गोष्ट आज निमित्त घडले म्हणून सांगत आहे. असो. मूळ विषयावर यायचे म्हणजे, मी चौधरी यांच्या भिंतीवर जाऊन पाहिले तर तिथेही ती कथा दिसली नाही. ती कथा काढली वा ती मला दिसू नये असे काही केले माहित नाही. परंतु खूप मोठमोठ्या गोष्टी सांगणारी व्यक्ती किती असहिष्णू असू शकते याचा प्रत्यय आला. मलाही लोकांचे विविध अनुभव येतात. अतिशय कडवट देखील. मात्र मी माझ्याकडून कोणाला मित्र यादीतून वगळल्याचे उदाहरण नाही. हेच धैर्य अन सहिष्णुता शेवटपर्यंत टिको हीच प्रभूला प्रार्थना.

थोडेसे चौधरी यांच्या कथेच्या विषयासंबंधी. १९९७ साली मी स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त दैनिक लोकसत्तेत `स्मृतींची चाळता पाने' हा विदर्भाच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित स्तंभ लिहिला होता. साधारण ३०-३२ लेख झाल्यानंतरचा लेख महात्मा गांधी व डॉ. हेडगेवार यांच्या वर्धा शिबिराच्या वेळी झालेल्या भेटीवरीलच होता. नेमका त्यावेळी मी सुट्टीवर होतो. दुसऱ्या दिवशी पाहिले तर माझा स्तंभ नाही. चौकशी केली तेव्हा ते पान सांभाळणाऱ्या मुख्य उपसंपादकाने सांगितले की, त्यावेळच्या संपादकांनी तो माझा लेख थांबवला. ही भाकडकथा असून संघवाल्यांचा हा खोटा प्रचार आहे, असे त्यांचे म्हणणे. मी त्यावर आक्षेप नोंदवला आणि माझे संपादक असूनही मी त्यांना स्पष्ट सांगितले की, तो लेख छापणार नसाल तर माझी लेखमाला बंद. आणि ५२ भागांची ती मालिका ३२ लेख होऊन पूर्ण झाली. मला त्याचाही खेद नाही. पण मोठ्या गोष्टी सांगणारे किती असहिष्णू असतात त्याचेच तेही एक उदाहरण होते. अन `गांधी विचारधारा' या विषयाचा पदवीधर असल्याने मी अधिकृतपणे सांगतो की डॉ. हेडगेवार आणि महात्मा गांधी यांची वर्धा शिबिराच्या वेळी भेट झाली होती. स्वत: महात्मा गांधी यांनी आपल्या हरिजनमध्ये या भेटीचा उल्लेख केलेला आहे. `समग्र हरिजन' मध्ये ते पाहता येईल.

या देशाचा इतिहास आणि अभ्यासक्रम, या देशाचा इतिहास आणि विचारवंत, या देशाचा इतिहास आणि प्रसार माध्यमे; या प्रमाणेच संघ आणि अभ्यासक्रम/ विचारवंत/ प्रसार माध्यमे हा एक खूप मोठा विषय आहे. अन आज समाजात ज्यांची टिमकी वाजवली जाते ते किती असहिष्णू आहेत, किती आकस आणि द्वेष बाळगतात याची अनेक उदाहरणे अगदी नावनिशीवार माझ्याकडे आहेत. अन संघाची भूमिका काय असते हेही मी अधिकृतपणे सांगू शकतो. अनेक वर्षे संघाचे सरकार्यवाह राहिलेले स्व. हो. वे. शेषाद्री यांची एक मुलाखत संघाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मी घेतली होती ई.स. २००० साली. तेव्हा ते संघाचे अ.भा. प्रचारक प्रमुख होते. प्रसार माध्यमातून संघाबद्दल छापून आलेली एक चुकीची माहिती आणि नंतर झालेला त्याचा खुलासा, यावर मी त्यांना विचारले होते की संघ त्या व्यक्तीच्या अन वृत्तपत्राच्या माफीची मागणी करणार का? यावर शेषाद्रीजी म्हणाले, `नाही. ती संघाची रीत नाही. अन आम्हाला त्यासाठी वेळही नाही. आम्ही फक्त काम करीत असतो.' यावर वेगळे काही म्हणण्याची गरज नाही.

विश्वंभर चौधरी नावाच्या माणसाने मला मित्र यादीतून वगळले याचे मला ना दु:ख आहे, ना खेद. माझ्या मनात फक्त चीड आणि कीव आहे. तीही व्यक्तिश: त्यांच्याबद्दल नसून, अशा वृत्तीबद्दल आणि अशा वृत्तीच्या व्यक्तींबद्दल. समाज आणि देशाला त्याचे परिणाम भोगावे लागतात, ही माझी वेदना आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
शनिवार, १० जानेवारी २०१४