बुधवार, २२ एप्रिल, २०१५

समतेला माझा विरोध का?

१९ एप्रिल २०१५ रोजी मी फेसबुकवर एक पोस्ट टाकली. ती अशी-
समता दोन प्रकारांनी येऊ शकते-
१) सगळ्यांनी शहाणं होऊन.
२) सगळ्यांनी गाढव होऊन.
यावर एका मित्राने प्रतिक्रिया व्यक्त केली की, `हे कोणाच्याच हातात नाही, त्यामुळे ती (समता) कधीच येणे शक्य नाही.'

माझ्या पोस्टवरच्या सहज प्रतिक्रियेतून त्याने या विश्वातलं एक प्रखर सत्य अधोरेखित केलं. काळाचा महिमा म्हणा वा अन्य काहीही विश्लेषण करा. पण आज आपल्या मनावर, बुद्धीवर काही गोष्टींचा, काही घोषणांचा, शब्दांचा, काही कल्पनांचा एवढा पगडा आहे की, आपण त्याबाबत विचार करण्याची शक्तीच गमावून बसलो की काय असे वाटावे. समता किंवा समानता या अशाच कल्पना आहेत.

आज आपण स्वीकारलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्वत्रयी फ्रेंच राज्यक्रांतीतून आलेली आहे. ही तत्वं आपण फ्रेंच राज्यक्रांतीतून नव्हे तर भगवान बुद्धाच्या विचारातून घेतली आहेत, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्यावर वाद करण्याचे कारण नाही. पण सगळ्यांची भूमिका हीच असेल असे म्हणणे धाडसाचेच नव्हे तर चुकीचे ठरेल. दुसरी गोष्ट म्हणजे, या तीन तत्वांचा आग्रह धरताना वा त्यानुसार वागताना कुठेही बौद्ध विचारांचा मागमूस दिसत नाही. उलट पाश्चात्य जीवन मूल्यांचीच त्याला जोड असते. त्यामुळे समाजात व्याप्त अशा अर्थानेच मी चर्चा करणार आहे. त्यामुळे मी राज्यघटनेच्या विरोधी आहे किंवा डॉ. आंबेडकर मला मान्य नाहीत वगैरे किंकाळ्या मारण्यात अर्थ नाही. याचवेळी हेही विनम्रतेने नमूद करणे आवश्यक आहे की, समजा माझा राज्यघटनेशी किंवा डॉ. आंबेडकर यांच्याशी मतभेद असला तरीही त्यात काही गैर असण्याचे किंवा वाटण्याचे कारण नाही.

समतेवर माझा पहिला आक्षेप हा की, समता असूच शकत नाही. विषमता हाच या विश्वाचा पाया आणि आधार आहे. कोणाला पटून किंवा न पटून त्यात काहीही बदल होणार नाही. जी गोष्ट अस्तित्वातच नाही किंवा अस्तित्वात येउच शकत नाही, त्यासाठी रक्त, वेळ, पैसा, ऊर्जा, बुद्धिमत्ता, भावना; वाया घालवणे व्यर्थ आहे. या एका मुद्यावरून जे वाद, भांडणे, संघर्ष चहूकडे होताना दिसतात ते उबग आणणारे तर आहेच, पण दु:ख दायकही आहे. त्यातून काही चांगले, अर्थपूर्ण हाती लागण्याऐवजी त्रागा, संताप, मनस्ताप आणि कटुता एवढेच हाती लागते. हे सगळे होणे अपरिहार्य आहे. एखादी मौल्यवान गोष्ट समाजाच्या गळी उतरवायची असेल, प्रस्थापित करायची असेल तर हे होणारच; असा युक्तिवाद केला जाऊ शकतो. हा युक्तिवाद सशक्त आहे यात वादच नाही. पण आमच्या अनुभवावरून काहीच शिकायचे नाही का, हा मूळ प्रश्न आहे. रस्ता चुकला असला तरीही पुढेच चालत राहायचे का? कधी कधी प्रवासात रस्ता चुकतो. ओळखीच्या खुणा दिसत नाहीत किंवा वेळ लागूनही नेमक्या ठिकाणी पोहोचत नाही, तेव्हा शंका येतेच की रस्ता तर नाही ना चुकला. मग त्याची खात्री करून घ्यावी लागते आणि प्रसंगी ज्या रस्त्याने जात असतो तो टाकून देऊन माघारी फिरावे लागते. तेच योग्य, उचित आणि शहाणपणाचे असते. समतेच्या बाबतीतही हे करण्याची गरज आहे.

प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. काही जणांना जीवनात खूप काही मिळवायचे असते, तर काही जण संतुष्टीचे जीवन जगत असतात. काही अधिकार गाजवण्याच्या वृत्तीचे असतात, तर काही तसे नसतात. काही कठोर व्यवहारी असतात तर काही भावनांना अधिक महत्व देणारे असतात. काही पैशाच्या मागे धावणारे असतात तर काही कला साहित्य निसर्ग वगैरेत रमणारे असतात. काही संथ असतात तर काही वेगवान असतात. प्रत्येकाच्या आवडी वेगळ्या, गरजा वेगळ्या, परिस्थिती वेगळी. या सगळ्यासह जेव्हा माणसे जगतात तेव्हा विषमता राहणे, निर्माण होणे अपरिहार्य ठरते. अगदी छोटेसे उदाहरण. कोणत्याही कुटुंबात पाहायला मिळू शकते. पत्नीला चित्रपट पाहायला जायचे आहे आणि पतीला मात्र छानसे पुस्तक वाचायचे आहे; किंवा त्या दोघांची अदलाबदल करून; अशा वेळी कोणाला तरी आपले म्हणणे बाजूस ठेवावे लागते आणि समतेचे तत्व बाधित होते. दिसायला खूप छोटी गोष्ट आहे. कदाचित टिंगलटवाळी करावी अशी. पण थोडे गांभीर्याने आजूबाजूला पाहिले तर अशासारख्याच गोष्टींवरून घराघरात अशांतता आणि चौकाचौकात चर्चा झडताना दिसत नाहीत का?

चर्चा काय होतच राहतात. त्याचे काय एवढे? हे म्हणणे ठीक आहे, पण अशा चर्चातूनच अपेक्षा निर्माण होतात. मग अपेक्षा आणि अपेक्षाभंग यांचे चक्र सुरु होते. त्यातून मानसिक, सामाजिक, आर्थिक ताण सुरु होतात. एक सामाजिक वातावरण, शब्दावली, आनुषंगिक अर्थ अशी साखळी तयार होते. मग आपण शेतकरी आणि उद्योगपती यांना समान मानू लागतो. त्या दोघात असलेला जमीन अस्मानाचा फरक नजरेआड होऊ लागतो. लहान मुले आणि मोठी माणसे यांना समान समजू लागतो. अन लहान मुलांच्या समस्यांचे एक वेगळे जग आकाराला येते. एवढेच नाही तर त्या हाताळण्याची एक वेगळी समस्या पालकांसाठी तयार होते. रागावणं, बोलणं, टोमणे मारणं, एखादी कृती करणं,  एखादी गोष्ट करणं किंवा न करणं यांचे आग्रह, लकबी; अशा एक ना अनेक असंख्य गोष्टी समतेच्या चष्म्यातून पाहिल्या की नवीन समस्यांना जन्म देतात. सामान्य माणूस आणि राजकीय नेते समान आहेत ही धारणा मान्य केल्याने केवढा घोळ झाला आहे याचा विचार तरी आमच्या मनाला शिवतो का? या दोघांमध्ये प्रचंड फरक आहे. म्हणूनच नेत्यांनी जाणूनबुजून व्रतस्थतेने खडतर आयुष्य जगले पाहिजे. तो जेव्हा पैसा आणि अन्य सर्व प्रकारच्या धनसंपत्तीचा लोभ धरतो आणि आपणही माणूस आहोत असा युक्तिवाद करतो; तेव्हा सगळी सामाजिक, राजकीय, आर्थिक व्यवस्था भ्रष्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळेच दोघांमध्ये समानता राहायला नको. भूमिकेनुसार अनेक गोष्टी बदलत असतात, बदलायला हव्यात.

तरुण पिढीत वाढत असलेली उच्छ्रुंखलता, उर्मटपणा, बेपर्वा वृत्ती, या समानतेचीच देण आहेत. एवढेच नाही तर आपल्या वयाला न साजेसे असे वर्तन जेव्हा ज्येष्ठ पिढी करते तेव्हा ती समतेच्या या मूल्याने पोसलेल्या अहंगंड वा न्यूनगंडाने पछाडलेली असते असेच म्हणावे लागेल. स्त्री पुरुष समानतेचा घोळ तर सगळ्यांच्या परिचयाचा आहेच. वानगीदाखल दोनच गोष्टींचा उल्लेख पुरेसा ठरावा. एक म्हणजे- महिलाविषयक कायदेशीर तरतुदी आता प्रश्नांकित होऊ लागल्या असून त्या पातळ होऊ लागल्या आहेत. दुसरा उल्लेख एका व्यंगचित्राचा - या व्यंगचित्रात काही मुली दारू पिताना दाखवल्या होत्या आणि त्यावर लिहिले होते- `पोरगी शिकली, प्रगती झाली.' या गोष्टींचे समर्थन करणारे लोकही आहेत. म्हणजे केवळ पुरुषांची बरोबरी करायची या एकाच वेडाने झपाटलेल्या स्त्रिया दारू पिणे, जुगार खेळणे, शिव्यागाळी, सिगारेट पिणे, अन्य अमली पदार्थांचे सेवन, बेफाम गाड्या हाकणे; या आणि यासारख्या गोष्टींचे सर्रास समर्थन करतात. का? समानता. दुसरीकडे, हे करीत असताना त्या नकळत ही कबुली देतात की, एखादी गोष्ट चांगली का तर ती पुरुष करतात म्हणून. म्हणजे पुरुष करतात ते सगळे चांगले अशी कबुली देऊन, चांगले वाईट याचा विचार न करता ते करत सुटायचे. ही समता म्हणायची? जगात चांगल्या आणि वाईट, सभ्य आणि असभ्य, स्वार्थी आणि सर्वसमावेशक, एकांगी आणि एकात्म; अशा सगळ्याच वृत्ती असतात. त्यांच्यातील संघर्षात काय उचलून धरायचे आणि काय टाकून द्यायचे, हे कसे ठरवणार? कोण ठरवणार? समतेचे तत्व स्वीकारले तर यातून मार्ग कसा काढायचा? आज संपूर्ण मानवता या संभ्रमात सापडली आहे.

याशिवायही एक मोठे कारण आहे, ज्यामुळे माझा समतेला विरोध आहे. ते कारण आहे दांभिकता. अन ही दांभिकता आपल्या प्रगतीला, आपल्या विकासाला, आपल्या समजूतदारीला, आपल्या परिपक्वतेला अडसर उत्पन्न करते. प्रत्येक जण स्वत:ला सर्वोत्तम, सर्वोच्च, सर्वशक्तीसंपन्न, परिपूर्ण समजू लागला आहे. मला असे वाटते की मीच बरोबर, माझ्याहून मोठा कोण आहे? मग प्रत्येकच लेखक स्वत:ला कुसुमाग्रज समजू लागतो. चळवळीतला प्रत्येक व्यक्ती स्वत:ला डॉ. आंबेडकर समजू लागतो. प्रत्येक हिंदुत्ववादी स्वत:ला सावरकर समजू लागतो. प्रत्येक विचारवंत स्वत:ला विवेकानंद, अरविंद समजू लागतो. आपल्यापेक्षा सकस, अर्थपूर्ण, आशयसंपन्न काही असू शकते आणि मी स्वत:ला अधिक पूर्ण, अधिक सक्षम करायला हवे ही भावना हळूहळू लोप पावत आहे. दुसऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षा स्वत:च्या क्षमता, योग्यता आणि रुची या आधारे केल्या जातात; तर स्वत:च्या अपूर्णता, त्रुटी लक्षातही घेण्याची गरज वाटत नाही. अशा दोन्ही अंगाने समतेचे तत्व आपली मानसिकता बिघडवून टाकते. या जगात लोखंड, सोने, तांबे, पितळ, माती, पाणी असे सगळेच असते. प्रत्येकाचे महत्व आहे, स्थान आहे, वैशिष्ट्य आहे. पण ते समान नाही. माणसांचेही तसेच आहे. असंख्य आकार प्रकारची माणसे आहेत. त्यांनी परस्पर सौहार्द, सहकार्य करीत; सुखपूर्ण, आनंददायी जीवन जगावे. त्यांना तसे जगता यायला हवे. पण त्याचा मार्ग समतेतून जात नाही. समता हे तत्व वा आदर्श होऊच शकत नाही. प्रत्येकाच्या मनातील भावनांचे उन्नयन आणि संवेदनशीलता या आधारावर तो मार्ग प्रशस्त होतो. आमचा रस्ता चुकलेला आहे. कारण जेथे जावयाचे त्याची काहीही खुण मार्गावर दिसत नाही. वेळही खूप झालेला आहे. दुराग्रह सोडून आमच्या ध्येयाच्या दिशेने जाणारा योग्य मार्ग पकडणे आवश्यक आहे. त्याला पर्याय नाही.

- श्रीपाद कोठे
नागपूर
बुधवार, २२ एप्रिल २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा