सोमवार, ६ एप्रिल, २०१५

पाश्चात्य मनोविकृतीचे ताजे उदाहरण

स्टीफन हॉकिंग. एक नावाजलेले, गाजलेले, चर्चित असे नाव. या जगप्रसिद्ध वैज्ञानिकाने नुकतेच आपले नाव पेटंट केलेले आहे. पेटंट कायद्यानुसार आपण ज्या गोष्टीचे पेटंट करतो ती कशाकशासाठी वापरता येणार नाही याची वर्गवारी असते. अशा वर्गवारीतील ४१ व्या वर्गासाठी या वैज्ञानिकाने आपल्या नावाचे पेटंट केले आहे. औद्योगिक रसायने, रंग, दारू अशा अनेक गोष्टींसाठी खूप सारे वर्ग असतात. ४१ व्या वर्गासाठी पेटंट केल्याने शिक्षण व मनोरंजनाच्या सेवांसाठी त्याचे नाव वापरता येणार नाही. वर्गवारीतील १५, २४ आणि २६ व्या वर्गांसाठी त्याने पेटंट न केल्याने त्याच्या नावाचे पोस्टर, गालिचे वा कृत्रिम फुले सुद्धा लोकांना तयार करता येतील. हा सगळा तपशिलाचा आणि काहीसा किचकट भाग आहे. मूळ मुद्दा वेगळा आहे.

मुद्दा हा की ही पेटंट कल्पना मुळातच किती योग्य आहे. महात्मा गांधींनी ही कल्पना पूर्णपणे फेटाळून लावली होती. आपल्या लिखाणाचा उपयोग कोणीही करू शकतो, अशी त्यांची भूमिका होती. कधी काळी कट्टर मार्क्सवादी विचारवंत म्हणून ओळखले जाणारे, `हिंदू अर्थशास्त्र'चे लेखक, नागपूर विद्यापीठाचे एके काळचे विद्वान कुलगुरू, दिवंगत डॉ. म. गो. बोकरे यांनीही अशीच भूमिका घेतली होती. भारतीय विचार परंपरेतही याचा मागोवा घेता येतो. वेद, उपनिषदे किंवा अन्य साहित्य असो किंवा आजीबाईचा बटवा म्हणून ओळखले जाणारे वनौषधींचे ज्ञान असो. त्यात कोणी काय शोधले, कोणी काय प्रयोग केले, कोणी किती कष्ट घेतले काहीही माहीत नाही. क्षणभर आपल्याला वाटू शकते की, किती ही कृतघ्नता? पण श्रेय अथवा कमाई यासाठीच जगणे असते, अशा प्रकारचे कंडीशनिंग झालेल्या आपल्याला तसे वाटणे स्वाभाविक असले तरीही योग्य नाही.

आपल्या येथील सगळ्या विचारपरंपरा, ज्ञानपरंपरा, लोकपरंपरा, संशोधनपरंपरा यांच्या मुळाशी निखळ विश्वकल्याणाची प्रेरणा होती. तसेच या सगळ्या विश्वप्रपंचाकडे पाहण्याची एक विशेष दृष्टी होती. विश्वकल्याणाची ही प्रेरणा आणि विश्वप्रपंचाकडे पाहण्याची विशेष दृष्टी यांचे मूळ ईशावास्य उपनिषदाच्या पहिल्या मंत्रात आहे. म्हणूनच महात्मा गांधी म्हणत असत की- जगातील सगळे साहित्य लोप पावले तरीही हरकत नाही, पण एवढा एक मंत्र लोप पावायला नको. संपूर्ण विलयातून पुन्हा ओजस्वी आणि उर्जस्वल मानवी सभ्यता उभी करण्याची शक्ती त्या मंत्रात आहे. म्हणूनच आमच्या येथे ज्ञान वा संशोधन यावर कोणताही एकाधिकार नाही. ते सगळ्या जगासाठी आहे. कोणीही ते घ्यावे आणि स्वत:चे अन जगाचे कल्याण करावे. आपण विचार करीत नाही म्हणून; पण हळदीचा वापर कसा आणि कशासाठी करायचा येथपासून तर भरतनाट्यम पर्यंत, किंवा योगासनांपासून तर वस्त्र प्रावरणांपर्यंत असंख्य गोष्टी सहजतेने सगळ्यांपर्यंत पोहोचल्या. स्वयंपाक असो की स्वेटर विणणे, संपूर्ण समाज सहजतेने त्याचे ज्ञान मिळवीत राहिला.

खरे तर पाश्चात्य देशातही हीच पद्धती होती. पण २० व्या शतकात जागतिक मानवी मनाने स्वार्थाची जी अभूतपूर्व उसळी घेतली त्याने सारी मानवी सभ्यता अस्ताव्यस्त करून टाकली आहे. मानवी मनातील स्वार्थ ही स्वाभाविक बाब असली तरीही त्याला नियंत्रित करून आणि आळा घालूनच स्थिर, सुखी, शांततामय समाजाची उभारणी होऊ शकते. अन असा समाजच व्यक्तीच्याही सुख शांतीपूर्ण जीवनासाठी आवश्यक आहे, हे हजारो वर्षांच्या मानवी संचिताचे सार आहे. यात व्यक्ती वा समाज यांचे १०० टक्के समाधान होऊ शकत नाही. पण तसे होणे ही निव्वळ एक कल्पना आहे. प्रत्यक्षात ते अशक्य आहे. हा सारासार विचार आणि विवेक सोडून व्यक्ती आणि समाज यांच्यात सांगड घालण्याचे प्रयत्न करण्याऐवजी, संघर्ष उभा करून केवळ स्वार्थसाधनेसाठी ज्या अनिष्ट बाबी मानवतेच्या पदरात टाकण्यात आल्या त्यातील एक म्हणजे- पेटंट. आज त्याचा प्रचंड राक्षस उभा झाला आहे. स्टीफन हॉकिंगच्या पेटंटने ही गोष्ट अधोरेखित केली आहे.

एक तर एखाद्या गोष्टीवर, वस्तूवर, विचारावर, कृतीवर, नावावर कोणाचाही स्वामित्व अधिकार असूच कसा शकतो? माणसाला सारे काही देणारा निसर्ग आहे. नाव देणारा समाज आहे. विचार किंवा कल्पना देणारी अज्ञात अशी शक्ती आहे. अगदी विज्ञान सुद्धा कोणाही मानवाचे गुलाम नाही. उदाहरण घ्यायचे तर गुरुत्वाकर्षणाचे किंवा सापेक्षतेचे किंवा अगदी कोणत्याही विज्ञान शाखेच्या कोणत्याही सिद्धांताचे घेता येईल. ज्या क्षणी ती गोष्ट त्या त्या व्यक्तीच्या मनात जन्माला आली त्या क्षणी ती कशी आली? समोर एखाद्या गोष्टीचे, प्रयोगाचे किंवा अन्य कशाचे निरीक्षण करताना अथवा केल्यावर त्याच्या मनात वा बुद्धीत एखादी गोष्ट प्रतीत झाली म्हणजे काय? थोडा शांतपणे विचार केला तर लक्षात येईल की, हे सारे वैज्ञानिक ज्ञान सुद्धा अचानक एखादा दिवा लागावा तसेच कुठून तरी चित्तात उदय पावत असते. त्याशिवाय दुसरे काही असूच शकत नाही. म्हणजे तेदेखील कुणा अज्ञात शक्तीनेच दिलेले आहे. मग असे असताना- अज्ञात शक्तीने, समाजाने, निसर्गाने दिले असताना- त्यावर स्वामित्व कसचे? म्हणूनच ईशावास्य उपनिषद म्हणते- `ईशावास्यं इदं सर्वं'.

पाश्चात्य समाजाने गेली अनेक शतके जोपासलेले स्वार्थ आणि स्पर्धेचे तत्वज्ञान आणि विशेषत: गेल्या शतकात त्याला अनुसरून उभ्या केलेल्या अनेक गोष्टी यांना पूर्णत: तिलांजली दिल्याशिवाय जगाला सुख, शांती, समाधान मिळू शकणार नाही. अंधाराशिवाय दिवस असू शकत नाही तसेच उजेडाशिवाय देखील दिवस असू शकत नाही. सुखाशिवाय किंवा दु:खाशिवाय मानवी जीवन असूच शकत नाही. त्यामुळे केवळ स्वप्नमय वितंडवाद करण्यापेक्षा व्यवहारी विचार करण्याची गरज आहे. भारतीय परंपरेने तो केलेला आहे. म्हणूनच स्वार्थीपणा पूर्ण निपटून काढणे अशक्य आहे हे मान्य करूनही, माणसाला नि:स्वार्थ करण्याचाच प्रयत्न करावा लागेल. त्याला पर्याय नाही; हे लक्षात घेतले पाहिजे. या जगातील कशाचाही विचार हा सर्वसाधारण पद्धतीने, तारतम्यानेच करायचा असतो हे भान सुटायला नको, एवढेच. एकीकडे सगळ्या क्षेत्रात, सर्व स्तरांवर पूर्ण मोकळीक हवी असे म्हणत असतानाच, दुसरीकडे पेटंट सारख्या गोष्टी उचलून धरणाऱ्या आधुनिकतेचे खरे रूप ओळखण्याची गरज आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
सोमवार, ६ एप्रिल २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा