मंगळवार, ७ एप्रिल, २०१५

वाद महत्वाचा की जीवन?

एखादी गोष्ट अन त्या गोष्टीचा वाद या दोन वेगळ्या बाबी असतात. जसे हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद, उपभोग आणि उपभोगवाद, स्त्री आणि स्त्रीवाद, विज्ञान आणि विज्ञानवाद, बुद्धी आणि बुद्धिवाद. ही यादी खूप वाढवता येईल. त्यात अधिकचा तपशील यापलीकडे अर्थ नाही. मूळ गोष्ट ही की या दोन स्वतंत्र बाबी आहेत. एखादी गोष्ट अंतिम म्हटले की, त्याचा वाद होतो. जसे उपभोग ही सामान्य गोष्ट आहे. आवश्यक बाब आहे. त्याविना जीवनच राहणार नाही. पण उपभोग ही अंतिम गोष्ट म्हटली की समस्या सुरु होतात. मग सगळ्या गोष्टींचा विचार त्याच संदर्भात आपण करू लागतो. कोणतीही गोष्ट योग्य का किंवा अयोग्य का? कोणतीही गोष्ट का करायची किंवा का करायची नाही? फार काय अन्य एखाद्या गोष्टीचा, घटनेचा, विचाराचा, व्यक्तीचा, वक्तव्याचा- अर्थ आणि आशय लावताना किंवा समजून घेताना ज्या वादाचे आपण असतो त्या अनुषंगानेच समजून घेण्याचा प्रयत्न करू लागतो. यामुळे कोलाहलाशिवाय दुसरे काहीही हाती लागत नाही. एवढेच नाही तर सगळ्या गोष्टी स्वच्छपणे समजून घेण्याची क्षमताच आपण हळूहळू गमावून बसू लागतो.

उपभोगाचे उदाहरण घेता येईल. उपभोग या सामान्य गोष्टीचा माणूस विचार करतो तेव्हा अडचण येत नाही. प्रत्येकाने आवश्यक तेवढा, योग्य प्रकारचा उपभोग, योग्य पद्धतीने घेतला पाहिजे. त्याला तो मिळाला पाहिजे. त्यासाठी त्याने व इतरांनीही प्रयत्न केले पाहिजेत, काळजी घेतली पाहिजे. पण उपभोगाचा उपभोगवाद होतो तेव्हा काय होते? उपभोग ही अंतिम गोष्ट ठरते आणि सगळ्या गोष्टींचा अर्थ त्याच अनुषंगाने लावला जातो. म्हणजे कसे? तर एखादी व्यक्ती किती उपभोग घेते त्यावर तिची योग्यता आणि श्रेष्ठता ठरू लागते. मग कोण किती पाणी वापरतो, कोण किती वाहनांचा उपभोग घेतो, कोण किती जमिनीचा उपभोग घेतो, किती वस्तूंचा उपभोग घेतो, किती पैशाचा उपभोग घेतो; यावरून व्यक्तीचे स्थान, व्यक्तीचे मानपान, व्यक्तीचे लहानमोठेपण, व्यक्तीची योग्यता ठरू लागते. गंमत अशी की, त्या उपभोगाची गरज आहे का वगैरे विचारही मग गौण ठरू लागतो. एवढेच कशाला त्या उपभोगाने निर्माण केलेल्या समस्यांचा विचारही केवळ उपभोगाच्या संदर्भातच केला जातो. जसे अनियंत्रित, अंदाधुंद उपभोगाने आज अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. पर्यावरणाच्या, आरोग्याच्या, मानसिकतेच्या, दृष्टीकोनाच्या अशा अनेक. मात्र त्याचा बहुश: विचार कसा केला जातो- येत्या काही वर्षांनी पाणी, तेल, जमीन, अन्नधान्य इत्यादी उपलब्ध झाले नाही तर काय करायचे? म्हणजे भविष्यात उपभोग मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या तर काय? पण उपभोग सर्वोच्च ठरला की, त्यासाठीची जीवघेणी धडपड सुरु होते, स्पर्धा सुरु होते, अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होतात; या साऱ्यातून आंतरिक शांतीचा, गुणांचा ऱ्हास होऊ लागतो. बाह्य प्रकृतीत तर बिघाड होतोच पण आंतरिक प्रकृतीही बिघडते. उपभोगाची स्पर्धा सुरु झाली की मग तो उपभोग खनिज तेलाचा असो की सौर उर्जेचा, तो बाह्य आणि आंतरिक संतुलन नष्ट करणारच. पण या साऱ्याचा विचार गौण ठरतो आणि विचार, चिंतन, योजना, तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टी फक्त पर्याय शोधण्यासाठी धडपडू लागतात. कारण उपभोग हा जीवनाचा भाग न राहता, जीवनाचा सर्वोच्च संदर्भबिंदू होऊन जातो.

हेच सूत्र सगळ्या गोष्टींना लागू होऊ शकते. स्त्री, पुरुष, विज्ञान, बुद्धी, समाज, लोकशाही, भाषा, प्रांत, बाजार, उपभोग, भांडवल, श्रम, ग्राम, शहर, पर्यावरण, साहित्य किंवा अशा असंख्य बाबी आवश्यक आणि योग्यच आहेत. पण त्यांना अवास्तव महत्व दिले की त्याचे वाद होतात आणि त्यातून संकटपरंपरा जन्माला येते. कोणतीही एक गोष्ट अंतिम वा सर्वोच्च नाही. हे सारे जीवनाचे विविध अंग आहेत. त्यामुळे या प्रत्येक गोष्टीचा विचार समग्र जीवनाच्या संदर्भात व्हायला हवा. जीवनाचा विचार यातील एकाच्या वा अनेकांच्या संदर्भात होऊ नये. तंत्रज्ञान असो की पर्यावरण, विज्ञान असो की साहित्य, स्त्री असो की पुरुष, बुद्धी असो की प्रशासन; आपापल्या ठिकाणी कितीही उच्च, उदात्त, उत्तम, अचूक असोत, त्यांना काहीही अर्थ नाही. त्यांच्या स्वीकार वा नकाराचा, त्यांच्या योग्य वा अयोग्यतेचा विचार अत्यंत असंतुलित, विविधांगी, परस्पर विरोधी गोष्टींनी, स्वविरोधी गोष्टींनी भरलेल्या या जगाच्या आणि जीवनाच्या संदर्भातच करणे शहाणपणाचे असते. एक गोष्ट दुसरीवर कुरघोडी करू पाहते तेव्हा संघर्ष आणि असंतुलन निर्माण होते. कारण या जगाचे किंवा जीवनाचे विक्षिप्त कडबोळे आपल्यापैकी कुणीही तयार केलेले नाही. आपली स्वप्ने किंवा कल्पना यावर ते बेतलेले नाही. हे जग आणि हे जीवन आपले गुलाम नाही तर आपण त्याचे गुलाम आहोत, याचा विसर अनर्थकारी ठरत असतो. एका अणुबॉम्बने घातलेला हैदोस ठाऊक असतानाही, आज जगात हजारो अणुबॉम्ब आहेत आणि त्यात भर घालण्याचीच स्पर्धा सुरु आहे; तरीही आपण विचार करायला तयार नाही हे दुर्दैवी आहे. आणि, एक वेळ अणुविघटन करणारा अणुबॉम्ब आम्हाला समजतो, पण मनबुद्धीत लपून बसलेले अणुबॉम्ब आम्हाला कळत नाहीत, हे त्याहून मोठे दुर्दैव आहे.

- श्रीपाद कोठे
नागपूर
मंगळवार, ७ एप्रिल २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा